सार्थ पंचदशी मराठी अष्टमः परिच्छेदः- कूटस्थदीपः श्लोक ४१ ते ७६

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

जीवापेतं वाव किल शरीरं म्रियते न सः ।
इत्यत्र न विमोक्षोऽर्थः किन्तु लोकान्तरे गतिः ॥ ४१ ॥
तर मग ”जीवापेतं वावकिल” श्रुतीवरून शरीर मेले तरी जीव मरत नाहीं असें दिसते. तेव्हां आमच्या बोलण्यास विरोध येतो असें कोणी म्हणेल तर त्यास श्रुतीचा भाव समजला नाहीं असें स्पष्ट दिसते. कारण श्रुतीचा अर्थ जीवाचा अत्यंत नाश होतोच असें नाहीं; तर त्याचा अर्थ असा कीं, जीव हें शरीर सोडून लोकांतरास जातो म्हणजे शरीराबरोबरच याचा नाश होत नाही. ॥ ४१ ॥

नाहं ब्रह्मेति बुध्येत स विनाशीति चेन्न तत् ।
सामानाधिकरण्यस्य बाधायामपि सम्भवात् ॥ ४२ ॥
यावर अशी एक शंका आहे कीं, जीव जर विनाशी आहे तर अहंब्रह्म असें तादात्म्यज्ञान त्याला कसें होईल. कारण विनाशी आणि अविनाशी यांमध्ये विरोध आहे. तर याचे समाधान हेंच की-डोहोंपैकी एकाची बाधा झाली असताही सामानाधिकरण्य होऊं शकते ॥ ४२ ॥

योऽयं स्थाणुः पुमानेष पुंधिया स्थाणुधीरिव ।
ब्रह्मास्मीति धिया शेषाप्यहंबुद्धिर्निवर्तते ॥ ४३ ॥
बाधा सामानाधिकरण्याने वाक्यार्थ कसा होतो एतद्विषयीं वार्तिककारांनी दृष्टांतपृर्वक सांगितलें आहे. एक मनष्य मार्गाने जात असतां त्याच्यापुढे एक पुरुष उभा होता, तो खुंट आहे असें त्यास वाटलें. पुढें जवळ येऊन जो पाहतो तो त्याची स्थाणु-बुद्धि जाऊन पुरुषबुद्धि झाली. त्याचप्रमाणें मी ब्रह्म असें ज्ञान होतांच मी जीव हें ज्ञान नष्ट होतें. ॥ ४३ ॥

नैष्कर्म्यसिद्धावप्येवमाचार्यैः स्पष्टमीरितम् ।
सामानाधिकरण्यस्य बाधार्थत्वं ततोऽस्तु तत् ॥ ४४ ॥
नैप्कर्म्य सिद्धिनामक ग्रंथामध्ये आचार्यांनी सामानाधिकरण्यामध्यें बाधेचा संभव आहे, असें स्पष्ट सांगितलें आहे. त्यावरून ब्रह्मास्मि या वाक्यालाही तो नियम लाग करण्यास कोणचीच हरकत दिसत नाहीं. ॥ ४४ ॥

सर्वं ब्रह्मेति जगता सामानाधिकरण्यवत् ।
अहं ब्रह्मेति जीवेन सामानाधिकृतिर्भवेत् ॥ ४५ ॥
श्रुतीमध्ये “सर्वं ब्रह्म” या वाक्याने ब्रह्म आणि जग या दोहोंचे सामानाधिकरण्य म्हणजे ऐक्य होतें. तसेंच अहंब्रह्म या वाक्याने जीव आणि ब्रह्म यांचें ऐक्य होतें ॥ ४५ ॥

सामानाधिकरण्यस्य बाधार्थत्वं निराकृतम् ।
प्रयत्‍नतो विवरणे कूटस्थत्य विवक्षया ॥ ४६ ॥
विवरण नामक ग्रंथामध्ये आचार्यांनी सामानाधिकरण्यामध्ये बाधा करण्याची गरज नाहीं असें म्हटले आहे, तें केवळ अहं शब्दाचा अर्थ कूटस्थ असें समजून म्हटलें आहे ॥ ४६ ॥

शोधितस्त्वंपदार्थो यः कूटस्थो ब्रह्मरूपताम् ।
तस्य वक्तुं विवरणे तथोक्तमितरत्र च ॥ ४७ ॥
म्हणजे बुद्ध्यादिकांपासून विवेचन केलेला जो त्वंपदवाच्य कूटस्थ त्याला ब्रह्माचीं सत्यत्वादि लक्षणें लागतात म्हणून कूटस्थच ब्रह्म आहे असें विवरणांत व दुसऱ्या ग्रंथांत ठरविलें आहे. ॥ ४७ ॥

देहेन्द्रियादि युक्तस्य जीवाभास भ्रमस्य या ।
अधिष्ठानचितिः सैषा कूटस्थात्र विवक्षिता ॥ ४८ ॥
देहेंद्रियातियुक्त जो चिदाभास तो ज्या अधिष्ठान चैतन्यावर आम्हाला भ्रमाने दिसतो, त्या चैतन्याला कूटस्थ असें आम्ही नांव ठेवले. ॥ ४८ ॥

जगद्‌भ्रमस्य सर्वस्य यदधिष्ठानमीरितम् ।
त्रय्यन्तेषु तदत्र स्याद्‌ब्रह्मशब्दविवक्षितम् ॥ ४९ ॥
आणि ज्या अधिष्ठानावर भ्रमानें सर्व जग दिसत आहे त्या अधिष्ठानास वेदांतांत ब्रह्म असें नांव ठेवले आहे. ॥ ४९ ॥

एतस्मिन्नेव चैतन्ये जगदारोप्यते यदा ।
तदा तदेकदेशस्य जीवाभासस्य का कथा ॥ ५० ॥
ह्या ब्रह्मचैतन्यावर सर्व जगाचा आरोप जर आहे तर त्या जगाचा एक अंश जो जीवाभास त्याचाही आरोप असलाच पाहिजे. ॥ ५० ॥

जगत्तदेकदेशाख्यसमारोप्यस्य भेदतः ।
तत्त्वंपदार्थौ भिन्नौ स्तो वस्तुतस्त्वेकता चितेः ॥ ५१ ॥
जग आणि जीव या दोन उपाधींमध्ये भेद असला तरी त्यांचें अधिष्ठान जें ब्रह्मचैतन्य तें एकच आहे. ॥ ५१ ॥

कर्तृत्वादीन्बुद्धिधर्मान् स्फूर्त्याख्यां चात्मरूपताम् ।
दधद्विभाति पुरत आभासोऽतो भ्रमो भवेत् ॥ ५२ ॥
भ्रमामध्ये कांहीं अधिष्ठानाचे व कांहीं आरोप्याचे असे दोहोंचेही धर्म भासले पाहिजेत. हें भ्रमाचे लक्षण चिदाभासाबरोबर लागू पडते तें कसें ? तर कर्तृत्वादि बुद्धिधर्म आणि स्फुरणरूप आत्म्याचा धर्म हे दोन्ही त्याचेमध्यें आहेत. म्हणून चिदाभास हा भ्रम आहे. ॥ ५२ ॥

का बुद्धिः कोऽयमाभासः को वात्रात्मा जगत्कथम् ।
इत्यनिर्णयतो मोहः सोऽयं संसार इष्यते ॥ ५३ ॥
या भ्रमाला कारण हेंच कीं, बुद्धि म्हणजे काय ? चिदाभास कशाला म्हणावें ? आत्म्याचे स्वरूप कोणतें ? आणि त्यामध्ये जग कसें झालें ? या प्रश्नांचा उलगडा न होणें तोच मोह; आणि यालाच संसार असें म्हणतात. ॥ ५३ ॥

बुद्ध्यादीनां स्वरूपं यो विविनक्ति स तत्त्ववित् ।
स एव मुक्त इत्येवं वेदान्तेषु विनिश्चयः ॥ ५४ ॥
वर सांगितले जें बुद्ध्यादिकांचे स्वरूप त्याचें विवेचन ज्याने उत्तम केले तोच तत्त्ववेत्ता आणि तोच मुक्त असा वेदांताचा ठराव आहे. ॥ ५४ ॥

एवं च सति बन्धः स्यात्कस्येत्यादिकुतर्कजाः ।
विडम्बना दृढं खण्ड्याः खण्डनोक्तिप्रकारतः ॥ ५५ ॥
असें असून बंधमोक्ष कोणाला ? इत्यादिक तार्किक लोक पुष्कळ तर्क करतात. ते इतके आम्हाला पोरकट वाटतात कीं, त्याची उत्तरे देत बसणे हें केवळ व्यर्थ वेळ घालविणे आहे. त्यांचें तोड हर्षमिश्राचार्यांनी आपल्या खंडनग्रंथांत चांगले बंद करून टाकले आहे. ॥ ५५ ॥

वृत्तेः साक्षितया वृत्तिप्रागभावस्य च स्थितः ।
बुभुत्सायां तथाज्ञोऽऽस्मीत्याभासाज्ञानवस्तुनः ॥ ५६ ॥
हें कूटस्थ विवेचन शैव पुराणांत केलेले दृष्टीस पडतें. तेथें असें म्हटले आहे कीं, हा कूटस्थ सर्वकाळी सारखा आहे. मनाच्या वृत्ती असतांना तो त्या वृत्तींचा साक्षी होऊन असतो. वृत्ती उत्पन्न होण्यापूर्वी त्यांच्या प्रागभावाचा साक्षी होऊन असतो. मुमुक्षु-दशेंत जिज्ञासेचा साक्षी होऊन असतो. आणि अज्ञान-दशेंत मी नेणता आहें या अज्ञानाचा साक्षी होऊन राहतो. ॥ ५६ ॥

असत्यालम्बनत्वेन सत्यः सर्वजडस्य तु ।
साधकत्वेन चिद्‌रूपः सदा प्रेमास्पदत्वतः ॥ ५७ ॥
आनन्दरूपः सर्वार्थसाधकत्वेन हेतुना ।
सर्व सम्बन्धवत्त्वेन सम्पूर्णः शिवसंज्ञितः ॥ ५८ ॥
तो साक्षी सचिदानंदरूप आहे. त्याची सिद्धता अशी – जे असत्यांचे अधिष्ठान असतें तें सत्य. हा साक्षी असत्य जगाचे अधिष्ठान आहे म्हणून तो सद्‌रूप आहे. जो जडास भासविणारा तो चिद्‌रूप साक्षी. जडास भासवितो म्हणून तो चिद्‌रपू आहे. ज्यावर सदा सर्वदां प्रेम जडलेले असतें तो आनंदरूप. साक्षीवर नेहमी आमचे प्रेम आहे म्हणून तो आनंदरूप. आणि ज्याच्या योगाने सर्व पदार्थांची सिद्धि होऊन ज्याचा सर्व पदार्थांशी संबंध असतो तो पूर्ण. आमचा साक्षीही तसाच आहे म्हणून तोही पूर्ण आहे. ( याप्रमाणे आत्मा हा सच्चिदानंद परिपूर्ण शिवरूपी आहे हें सिद्ध झालें.) ॥ ५७-५८ ॥

इति शैवपुराणेषु कूटस्थः प्रविवेचितः ।
जीवेशत्वादिरहितः केवलः स्वप्रभः शिवः ॥ ५९ ॥
याप्रमाणे शैव पुराणामध्ये जीवेश कल्पनारहित स्वयंप्रकाश शिवस्वरूपी कूटस्थाचे विवेचन केलें आहे. ॥ ५९ ॥

मायाभासेन जीवेशौ करोतीति श्रुतत्वतः ।
मायिकावेव जीवेशौ स्वच्छौ तौ काचकुम्भवत् ॥ ६० ॥
माया ही प्रतिबिंबाच्या योगानें जीव आणि ईश या दोघांना करते, असें श्रुतींत सांगितलें. आहे. त्यावरून ते दोघेही मायिक ठरतात. त्यामध्ये आणि देहादिकांमध्यें अंतर म्हणून इतकेंच कीं, ते स्वच्छ आहेत आणि देहादिक मळीण आहेत. कीं जसे कांचेचा घट आणि मातीचा घट.॥ ६०॥

अन्नजन्यं मनोदेहात्स्वच्छं यद्वत्तथैव तौ ।
मायिकावपि सर्वस्मादन्यस्मात्स्वच्छतां गतौ ॥ ६१ ॥
ज्याप्रमाणें मन आणि देह ही दोन्ही अन्नापासून झालेलीं असून मन स्वच्छ आहे आणि देह मलीन आहे, त्याप्रमाणें जीव आणि ईश हें मायिक असूनही इतर पदार्थापेक्षा ते स्वच्छ आहेत. ॥ ६१ ॥

चिद्‌रूपत्वं च सम्भाव्यं चित्त्वेनैव प्रकाशनात् ।
सर्वकल्पनशक्ताया मायाया दुष्करं न हि ॥ ६२ ॥
त्यांत चैतन्यही आमच्या अनुभवास येतें म्हणून तें चिद्‌रूप आहे, हें कसें म्हणून कोणी विचारू नये. कारण, पाहिजे ती कल्पना करण्यास समर्थ अशी जी माया तिला कोणती गोष्ट अशक्य आहे. ॥ ६२ ॥

अस्मन्निद्राऽपि जीवेशौ चेतनौ स्वप्नगौ सृजेत् ।
महामाया सृजत्येतावित्याश्चर्यं किमत्र ते ॥ ६३ ॥
किंबहुना आमची निद्रा देखील स्वप्नाचेठायी चेतनरूप जीवेश उत्पन्न करील मग ती महामाया त्यांस करते यांत आश्चर्य तें काय ? ॥ ६३ ॥

सर्वज्ञत्वादिकं चेशे कल्पयित्वा प्रदर्शयेत् ।
धर्मिणं कल्पयेद्याऽस्याः को भारो धर्मकल्पने ॥ ६४ ॥
त्या ईशाचेठायी सर्वज्ञत्वादि धर्मांची कल्पनाही ती मायाच करते. कारण जिने धर्मीची कल्पना केली तिला धर्माचे कल्पनेचे श्रम कितीसे होणार ? ॥ ६४ ॥

कूटस्थेऽप्यतिशङ्‌का स्यादिति चेन्माऽतिशंक्यताम् ।
कूटास्थमायिकत्वे तु प्रमाणं न हि वर्तते ॥ ६५ ॥
एथे कूटस्थ हा कल्पित आहे अशी फाजील शंका कोणी घेऊं नये. कारण, त्याविषयी श्रुतीमध्ये प्रमाण कोठेही आढळत नाहीं. ॥ ६५ ॥

वस्तुत्वं घोषयन्त्यस्य वेदान्ताः सकला अपि ।
सपत्‍नरूपं वस्त्वन्यन्न सहन्तेऽत्र किंचन ॥ ६६ ॥
कूकथ हीच खरी वस्तू असा वेदांतांत जिकडे तिकडे डांगोरा वाजत आहे. त्यावांचन दुसऱ्या कोणत्याही पदार्थास सत्यता देणे म्हटलें म्हणजे वेदांतास अगदीं खपत नाहीं. ॥ ६६ ॥

श्रुत्यर्थं विशदीकुर्मो न तर्कान्वच्मि किंचन ।
तेन तार्किकशंकानामत्र कोऽवसरो वद ॥ ६७ ॥
आम्हीं एथें केवळ श्रुत्यर्थ स्पष्ट करून दाखविण्याचे काम पत्करले आहे. आमच्या पदरच्या तर्काने आम्ही कांहींच बोलत नाहीं म्हणून तार्किकांच्या शंकेस जागाच राहिली नाही. ॥ ६७ ॥

तस्मात्कुतर्कं सन्त्यज्य मुमुक्षुः श्रुतिमाश्रयेत् ।
श्रुतौ तु मायाजीवेशौ करोतीति प्रदर्शितम् ॥ ६८ ॥
याकरितां कुतर्क टाकून देऊन मुमुक्षूनें श्रुतीचाच आश्रय करावा. आतां श्रुती तर असें सांगते कीं, माया ही जीव आणि ईश यांना करते. ॥ ६८ ॥

ईक्षणादिप्रवेशान्ता सृष्टिरीशकृता भवेत् ।
जाग्रदादिविमोक्षान्तः संसारो जीवकर्तृकः ॥ ६९ ॥
आरंभी ईक्षण आणि शेवटीं प्रवेश आहे जिच्या अशी सृष्टि ईश्वराने केली, आणि आरंभी जाग्रदवस्था आणि अंती मोक्ष असा संसार जीवाने केला आहे. ॥ ६९ ॥

असङ्ग एव कूटस्थः सर्वदा नास्य कश्चन ।
भवत्यतिशयस्तेन मनस्येवं विचार्यताम् ॥ ७० ॥
आणि कूटस्थ अगदीं असंग आहे. त्यांत कमीजास्तपणा कधींही होत नाहीं. तर मनुष्यानें याचा विचार चांगला मनामध्ये करावा. ॥ ७० ॥

न निरोधो न चोत्पत्तिर्न बद्धो न च साधकः ।
न मुमुक्षुर्न वै मुक्त इत्येषा परमार्थता ॥ ७१ ॥
कूटस्थास जन्ममरणादि भाव नाहींत याविषयी श्रुतिप्रमाण असें आहे कीं, त्यास निरोध नाहीं; उत्पत्ति नाहीं; तो बद्धही नाहीं; साधकही नाहीं; तो मुमुक्षुही नव्हे; मुक्तही नव्हे; असें जें समजणे तोच परमार्थ. ॥ ७१ ॥

अवाङ्‌मनसगम्यं तं श्रुतिर्बोधयितुं सदा ।
जीवमीशं जगद्वापि समाश्रित्य प्रबोधयेत् ॥ ७२ ॥
जीव ईश आणि जग यांचें जें श्रुतीने प्रतिपादन केलें आहे, तें केवळ आत्म्याचा बोध व्हावा म्हणून. कारण, तो वाणी व मनास अगम्य असल्यामुळें जीवादिकांस घेऊन त्याचें वर्णन केल्याशिवाय त्याचा यथार्थ बोध व्हावयाचा नाहीच. ॥ ७२ ॥

यया यया भवेत्पुंसां व्युत्पत्तिः प्रत्यगात्मनि ।
सा सैव प्रक्रियेह स्यात् साध्वीत्याचार्यभाषितम् ॥ ७३ ॥
आतां श्रुतीमध्यें जें निरनिराळे सांगणे आढळतें, तें केवळ निरनिराळ्या विद्यार्थ्यांस त्याच्या त्याच्या समजुतीप्रमाणे निरनिराळी प्रक्रिया सांगितली आहे. ती आपापल्या ठिकाणी चांगलीच आहे असें आचार्यांनी म्हटले आहे. ॥ ७३ ॥

श्रुतितात्पर्यमखिलमबुद्धा भ्राम्यते जडः ।
विवेकी त्वखिलं बुद्ध्वा तिष्ठत्यानन्दवारिधौ ॥ ७४ ॥
सर्व श्रुतीचे तात्पर्य न समजल्यामळें मूढास भ्राण्ति होते; परंतु विचारी मनुष्याची गोष्ट तशी नाहीं. तो तें तात्पर्य चांगले जाणून आनंदाच्या डोहांत बुडी देऊन बसतो. ॥ ७४ ॥

मायामेघो जगन्नीरं वर्षत्वेष यथा तथा ।
चिदाकाशस्य नो हानिर्न वा लाभ इति स्थितिः ॥ ७५ ॥
त्या विचारी मनुष्याचा निश्चय असा बाणून गेलेला असतो कीं, हा मायारूप मेघ जगद्‌रूप पाण्याचा पाहिजे तितका वर्षाव करो. त्यापासून या ब्रह्माकाशाला लाभ किंवा हानि मुळीच नाहीं. ॥ ७५ ॥

इमं कूटस्थदीपं योऽनुसन्धत्ते निरन्तरम् ।
स्वयं कूटस्थरूपेण दीप्यतेऽसौ निरन्तरम् ॥ ७६ ॥
इति कूटस्थदीपोनाम अष्टमः परिच्छेदः ॥ ८ ॥
आतां याची फलश्रुती सागन हे प्रकरण आटपतों. जो मनुष्य या कूटस्थ दीपाचे निरंतर अनुसंधान करतो तो स्वतः कूटस्थच बनून जाऊन निरंतर प्रकाशतो. ॥ ७६ ॥
कूटस्थदीप समाप्त.

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *