सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः २४१ ते २६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

ज्ञानीनां विपरीतोऽस्मान्निश्चयः सम्यगीक्ष्यते ।
स्वस्वनिश्चयतो बद्धो मुक्तोऽहं वेति मन्यते ॥ २४१ ॥
हा जो अज्ञानी लोकांचा निश्चय सांगितला, त्याच्या उलट ज्ञान्यांचा निश्चय स्पष्ट दिसून येतो. ज्ञानी आणि अज्ञानी हे दोघेही आपापल्या निश्चयांप्रमाणें मी मुक्त आणि मी बद्ध असें मानतात. ॥ २४१ ॥

नाद्वैतमपरोक्षं चेन्न चिद्रूपेण भासनात् ।
अशेषेण न भातं चेद्द्वैतं किं भासतेऽखिलम् ॥ २४२ ॥
अद्वैत युक्तीनेच सिद्ध होतें. अनुभवास ते येत नाहीं, मग निश्चय कसा करावा असें जर कोणी म्हणेल तर तशी शंका घेणे नलगे. कारण, घटादिक जे आम्हांस भासतात त्यांत ज्ञानरूपाने तें प्रत्यक्ष अनुभवास येतें; परंतु तें समग्र भासत नाहीं, असें जर कोणी म्हणेल तर आम्ही त्यास पुसतो कीं, तुमची द्वैतसृष्टि तरी समग्र भासते काय ? समग्र न भासण्याचे संबंधाने द्वैत आणि अद्वैत ही दोन्ही सारखीच आहेत. ॥ २४२ ॥

दिङ्मात्रेण विभानं तु द्वयोरपि समं खलु ।
द्वैतसिद्धिवदद्वैतसिद्धिस्त्वेतावता न किम् ॥ २४३ ॥
दिङ्‌मात्रेकरून जसे तुमचे द्वैत भासते, तसें आमचे अद्वैतही भासते. ही गोष्ट दोहींलाही साधारणच आहे. परंतु तेवढ्याने जर तुमची द्वैतसिद्धि होते, तर मग आमची अद्वैतसिद्धि ही कां न व्हावी ? ॥ २४३ ॥

द्वैतेन हीनमद्वैतं द्वैतज्ञाने कथं त्विदम् ।
चिद्‌भानं त्वविरोध्यस्य द्वैतस्यातोऽसमे उभे ॥ २४४ ॥
या लोकांत पूर्वपक्षी अद्वैतसिद्धि होत नाहीं अशी शंका अन्य प्रकाराने करतो कीं, अद्वैत म्हणजे द्वैतरहित; म्हणून द्वैत आणि अद्वैत ही परस्पर अत्यंत विरुद्ध आहेत; आणि हें जर सत्य आहे, तर सांप्रत द्वैतप्रतीति असतां अद्वैत कसें संभवेल ? संभवणारच नाहीं. आतां, हे सिद्धांती जर तूं असें म्हणशील कीं, अद्वैत हें द्वैतविरोधी आहे, तर मग अद्वैतप्रतीतिकालीं द्वैतही असिद्ध आहे असा तुझा समान प्रश्न मला होणारच; यावर मी (पूर्वपक्षी) असें सांगतो कीं, हे सिद्धांती, तुझ्या मनांत चिद्‌रूपप्रतीति म्हणजेच अद्वैतप्रतीति आहे, आणि ती चिद्रूपप्रतीति तर ह्या प्रत्यक्ष द्वैताच्या विरोधी नाहीं; याकरिता उभयसाम्य नाहीं. या बोलण्यांत पूर्वपक्ष्याचा इतकाच अभिप्राय कीं, चिद्रूप जें अद्वैत, त्याच्या प्रतीतिकालीं द्वैतभान संभवते. ॥ २४४ ॥

एवं तर्हि शृणु द्वैतमसन्मायामयत्वतः ।
तेन वास्तवमद्वैतं परिशेषाद्विभासते ॥ २४५ ॥
याचे समाधान हेंच कीं, द्वैत मायाकल्पित असल्यामुळें तें मुळीच खोटे आहे; म्हणून खरें उरले जें अद्वैत तेंच भासते असें म्हणावयाचे. ॥ २४५ ॥

अचिन्त्यरचनारूपं मायैव सकलं जगत् ।
इति निश्चित्य वस्तुत्वमद्वैते परिशेष्यताम् ॥ २४६ ॥
ज्याच्या रचनेची कल्पनाच करतां येत नाहीं असें जें जग तें मायाकल्पित आहे म्हणून तें मिथ्या असा निश्चय करून उर्वरीत जें अद्वैत तेंच खरें असे समजावे. ॥ २४६ ॥

पुनर्द्वैतस्य वस्तुत्वं भाति चेत्त्वं तथा पुनः ।
परिशीलय को वात्र प्रयासस्तेन ते वद ॥ २४७ ॥
सिद्धांतानें जगन्मिथ्यात्व जरी भासले, तरी तें पुनः पुनः खरेंच भासतें असें जर कोणी म्हणेल, तर पुनः त्याचाच निदिध्यास करावा यांत श्रम तो काय ? ॥ २४७ ॥

कियन्तं कालमिति चेत्खेदोऽयं द्वैत इष्यताम् ।
अद्वैते तु न युक्तोऽयं सर्वानार्थनिवारणात् ॥ २४८ ॥
अशीच किती दिवस याची घोंटणी करावी अशी जर कोणास चिंता असेल तर तीच चिंता द्वैताविषयी “हे देवा, हे द्वैत किती दिवस मला भासणार” अशी चिंता करावी. अद्वैताविषयी चिंता नको. कारण, त्याने सर्व खेदाचे निवारण होते. ॥ २४८ ॥

क्षुत्पिपासादयो दृष्टा यथापूर्वं मयीति चेत् ।
मच्छब्दवाच्येऽहङ्कारे दृश्यतां नेति को वदेत् ॥ २४९ ॥
इतके मला ज्ञान होऊन क्षुधातृषादि प्राणधर्म मला पूर्वीप्रमाणेंच भासतात, असें जर कोणी म्हणेल, तर आम्ही नाहीं कोठें म्हणतों ? जरी ते भासले, तरी मी म्हणणारा जो अहंकार त्याचेठायी ते भासतात, तर भासेनात बापडे. ॥ २४९ ॥

चिद्रूपेऽपि प्रसज्येरन् तादात्म्याध्यासतो यदि ।
माध्यासं कुरु किन्तु त्वं विवेकं कुरु सर्वदा ॥ २५० ॥
आत्म्यालाही तादात्म्याध्यासामुळे त्यांचा संपर्क लागेल अशी जर भीति वाटत असेल, तर तशी वाटण्याचें कारण नाहीं. कारण, तसा अभ्यास न होऊं देता विवेकच केला म्हणजे झालें. ॥२५०॥

झटित्यध्यास आयाति दृढवासनयेति चेत् ।
आवर्तयेत्द्विवेकं च दृढं वासयितुं सदा ॥ २५१ ॥
आतां फार दिवसांची दृढवासना असल्यामुळें विवेक केला तरी पुनः पुनः अध्यास होतो हे खरें आहे. पण त्याजवर विवेकावाचून दुसरा उपाय नाहीं. विवेकाचे पुनः पुनः आवर्तन करून तेंच दृढ करावे ॥ २५१ ॥

विवेके द्वैतमिथ्यात्वं युक्त्यै वेति न मण्यताम् ।
अचिन्त्यरचनात्वस्यानुभूतिर्हि स्वसाक्षिकी ॥ २५२ ॥
विवेकाने जें जगाचे मिथ्यात्व ठरते ते कवळ युक्तिसिद्ध होय. प्रत्यक्ष अनुभवास येत नाहीं. ही शंका योग्य नाहीं. कारण, जगाची अचिंत्य रचना प्रत्यक्ष अनुभवास येते; तेव्हां त्याचें मिथ्यात्व ज्ञान प्रत्यक्षच म्हटलें पाहिजे. ॥२ ५२ ॥

चिदप्यचिन्त्यरचना यदि तर्ह्यस्तु नो वयम् ।
चितिं स्वचिन्त्यरचनां ब्रूमो नित्यत्वकारणात् ॥ २५३ ॥
तुमच्या चैतन्याची रचनाही अचिंत्यच आहे असें म्हणाल, तर आम्ही नाहीं कोठे म्हणतो ? द्वैत व अद्वैत ही दोनीही अचिंत्यच आहेत; परंतु हेतु मात्र निराळे. एकाला अनित्यत्व कारण, आणि दुसऱ्याला नित्यत्व कारण. अनित्य म्हणजे पदार्थांचा प्रागभाव ज्यास आहे तें. ॥ २५३ ॥

प्रागभावो नानुभूतश्चितेर्नित्या ततश्चितिः ।
द्वैतस्य प्रागभावस्तु चैतन्येनानुभूयते ॥ २५४ ॥
तुमच्या चैतन्याला तरी नित्यत्व कोठे आहे असें जर कोणी म्हणेल तर आमचे उत्तर असें कीं, ज्या पदार्थाला प्रागभावआहे तोअनित्य. चैतन्याचा प्रागभाव कोणाच्याचअनुभवास येत नाहीं. परंतु द्वैतसृष्टीचा अभाव निद्रेमध्यें साक्षी चैतन्याचे अनुभवास येतो. ॥ २५४ ॥

प्रागभावयुतं द्वैतं रच्यते हि घटादिवत् ।
तथापि रचना चिन्त्या मिथ्या तेनेन्द्रजालवत् ॥ २५५ ॥
म्हणून घटादिकांप्रमाणें सकल द्वैत प्रागभावानें युक्त असून त्याची रचनाही पुनः अचिन्त्य आहे म्हणून इंद्रजालाप्रमाणे तें मिथ्या आहे हें सिद्ध. ॥ २५५ ॥

चित्प्रत्यक्षा ततोऽन्यस्य मिथ्यात्वं चानुभूयते ।
नाद्वैतमपरोक्षं चेत्येतन्न व्याहतं कथम् ॥ २५६ ॥
याप्रमाणे चैतन्य प्रत्यक्ष अनुभवास येतें व द्वैताचे मिथ्यात्वही तसेंच अनुभवसिद्ध आहे. असें असून अद्वैत प्रत्यक्ष नाहीं म्हणणें हा विरोध नव्हे काय ? ॥ २५६ ॥

इत्थं ज्ञात्वाप्यसन्तुष्टाः केचित्कुत इतीर्य ताम् ।
चार्वाकादेः प्रबुद्धस्याप्यात्मा देहः कुतो वद ॥ २५७ ॥
इतकें समजूनही कित्येक लोक असंतुष्ट कां दिसतात, असा जर कोणी प्रश्न करीत असेल तर त्याजवर आम्ही असा प्रश्न करतो कीं चार्वाकादिक पंडित इतके विद्वान ते देहाला आत्मा कां मानतात ? ॥ २५७ ॥

सम्यग्विचारो नास्त्यस्य धीदोषादिति चेत्तथा ।
असन्तुष्टाश्च शास्त्रार्थं न त्वीक्षन्ते विशेषतः ॥ २५८ ॥
चार्वाकादिकांना कामक्रोधादि बुद्धिदोषांमुळें चांगला विचार होत नाहीं असें जर म्हणाल, तर आमचेही तसेंच उत्तर आहे. जे लोक असंतुष्ट दिसतात असें तुम्ही म्हणतां ते केवळ शास्त्राचा चांगला विचार न केल्यामुळें तसे दिसतात. ॥ २५८ ॥

यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामा येऽस्य हृदि श्रिताः ।
इति श्रौतं फलं दृष्टं नेति चेद्दृष्टमेव तत् ॥ २५९ ॥
तर मग “यदा सर्वे प्रमुच्यन्ते कामायेस्य हृदि श्रिताः” (जेव्हां हदयांतील सर्व काम नष्ट होतात) हें श्रुतीचे फळ कोठे अनुभवास येत नाहीं, असें कोणी म्हणू नये. सर्व श्रुतींची एकवाक्यता करून विचार केला असतां तें फल सिद्ध होतें. ॥ २५९ ॥

यदा सर्वे प्रभिद्यन्ते हृदयग्रन्थयस्त्विति ।
कामा ग्रन्थिस्वरूपेण व्याख्याता वाक्यशेषतः ॥ २६० ॥
“ज्या काळी सर्व हदयग्रंथि सुटतात” असें दुसरें एके ठिकाणी वाक्य आहे, तेथें हदयग्रंथिरूपानें कामाची व्याख्या केली आहे. ॥ २६० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *