सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक ४१ ते ६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अतीतेनापि महिषीस्नेहेन प्रतिबन्धतः ।
भिक्षुस्तत्त्वं न वेदेति गाथा लोके प्रगीयते ॥ ४१ ॥
भूत प्रतिबंधाचें उदाहरण तेथें असें दिलें आहे कीं, कोणी एक मनुष्याची आपल्या म्हशीवर फार प्रीति होती. पुढे त्यानें संन्यास घेतला. वेदांत श्रवणाचे वेळीं ती म्हैस वरचेवर त्याचे डोळ्यांपुढें उभी राहत असे. त्यामुळे तत्त्वविचारास अडथळा येऊन त्याची समजूत चांगली पडेना. ॥ ४१ ॥

अनिसृत्य गुरुः स्नेहं महिष्यां तत्त्वमुक्तवान् ।
ततो यथावद्वेदैष प्रतिबन्धस्य संक्षयात् ॥ ४२ ॥
म्हणून गुरूनी त्याच्या त्या म्हशीवरील प्रीतीलाच अनुसरून त्या म्हशीमध्ये व्यापून असणारेच तूं ब्रह्म आहेस असा उपदेश केल्याने त्यास तो उपदेश चांगला ठसला. ही गोष्ट लोकांत प्रसिद्ध आहे. ॥ ४२ ॥

प्रतिबन्धो वर्तमानो विषयासक्तिलक्षणः ।
प्रज्ञामान्द्यं कुतर्कश्च विपर्ययदुराग्रहः ॥ ४३ ॥
आतां वर्तमान प्रतिबंध विषयासक्ति, बुद्धिमांद्य, श्रुतिविरुद्ध कुतर्क आणि विपरीत भावनेविषयी दुराग्रह ही वर्तमान प्रतिबंधाची उदाहरणे समजावी. ॥ ४३ ॥

शमाद्यैः श्रवणाद्यैश्च तत्र तत्रोचितैः क्षयम् ।
नीतेऽस्मिन्प्रतिबन्धेऽतः स्वस्य ब्रह्मत्वमश्नुते ॥ ४४ ॥
शि० -ह्या वर्तमान प्रतिबंधाचे. निवारणास उपाय कोणते ? गु० -त्यास उपाय दुसरे नाहींत. शमदमादिक साधनांचा अभ्यास आणि श्रवण, मनन, निदिध्यासन यांची योजना यथायोग्य रीतीनें केली असतां त्या प्रतिबंधाचा क्षय होऊन ब्रह्मप्राप्ति होते. ॥ ४४ ॥

आगामिप्रतिबन्धश्च वामदेवे समीरितः ।
एकेन जन्मना क्षीणो भरतस्य त्रिजन्मभिः ॥ ४५ ॥
शिष्य -आतां भावी प्रतिबंधाचें एक उदाहरण द्यावे. गुरु -वामदेव आणि भरत यांची कथा तूं ऐकलीच असशील. पहिल्याला साक्षात्कार होण्यास एक जन्म घ्यावा लागला, आणि दुसऱ्यास तीन जन्म घ्यावे लागले. यांचें कारण असें कीं, हा भावी प्रतिबंध जन्मांतर दिल्यावांचून राहत नाहीं. कारण, तो प्रारब्धशेष आहे; त्या अर्थीं तें भोगलेच पाहिजे. ॥ ४५॥

योगभ्रष्टस्य गीतायामतीते बहुजन्मनि ।
प्रतिबन्धक्षयः प्रोक्तो न विचारोऽप्यनर्थकः ॥ ४६ ॥
शिष्य-असे आणखी कोणच्या तरी प्रसिद्ध ग्रंथांत सांगितलें आहे काय गु० -असें गीतच सांगितलें आहे. गीतेत योगभ्रष्टास मुक्त होण्यास पुढील जन्म घ्यावे लागतात असें जें सांगितलें तो भावी प्रतिबंधच समजला पाहिजे. ॥ ४६ ॥

प्राप्य पुण्यकृतां लोकानात्मतत्त्वविचारतः ।
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते ॥ ४७ ॥
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम् ।
निस्पृहः ब्रह्मतत्त्वस्य विचारात्तद्धि दुर्लभम् ॥ ४८ ॥
तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकम् ।
यतते च ततो भूयस्तस्मादेतद्धि दुर्लभम् ॥ ४९ ॥
पूर्वाभ्यासेन तेनैव ह्रियते ह्यवशोऽपि सः ।
अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् ॥ ५० ॥
शिष्य -मग एकूण या जन्मी केलेला विचार निष्फलच म्हणा. गुरु – विचार केलेला कधीं फुकट जाईल काय ? ह्याचा विचार या गीतेतील श्लोकावरून तुला चांगला समजेल. “प्राप्य पुण्यकृतां लोकान्” या श्लोकापासून “ततो याति परां गतिम् ” या श्लोकांत्तापर्यंत तुला त्याचा अभिप्रायच सांगतो म्हणजे झालें. योगभ्रष्ट पुरुष आत्मतत्त्व विचाराचे बळाने पुण्यलोकांस जाऊन तेथें यावद्‌भोग सुख अनुभवून पुनः या लोकी शुचिर्भूत व तेजस्वी आईबापांच्या पोटी जन्मास येतो किंवा ब्रह्मतत्त्व विचाराने स्वतः विरक्त होऊन योग्यांच्या घरींच जन्म घेतो. हें जन्म फार दुर्लभ आहे. कारण, तेथें पूर्वदेही संबंधी जो बुद्धीस योगाचा संस्कार असतो तो जशाचा तसाच उठून तो पुढें तसाच प्रयत्न करीत जातो. याचे कारण असें कीं, तो योगभ्रष्ट पूर्व संस्काराच्या स्वाधीन होऊन शेवटीं ब्रह्मप्राप्ति होईपर्यंत तसाच चालतो. ॥ ४७-५० ॥

ब्रह्मलोकाभिवाञ्छायां सम्यक्सत्यां निरुध्यताम् ।
विचारयेद्य आत्मानं न तु साक्षात्करोत्ययम् ॥ ५१ ॥
आणखी एक दांडगा प्रतिबंध आहे तो तुला सांगतो. योग करतां करतां ब्रह्मलोकप्राप्तीची इच्छा झाली म्हणजे तत्त्वविचार कितीही केला तरी त्यास साक्षात्कार होत नाहीं. ॥ ५१॥

वेदान्तविज्ञानसुनिश्चितार्थाः इति शास्त्रतः ।
ब्रह्मलोके सकल्पान्ते ब्रह्मणा सह मुच्यते ॥ ५२ ॥
शिष्य -मग त्याला साक्षात्काराची मुळींच आशा नाही कीं काय ? गुरु -त्याला साक्षात्कार मुळीच होत नाहीं असे नाहीं. तरी तेवढ्या इच्छेमुळे मोठ्या गोत्यात पडला. कारण, “वेदांतविज्ञानसुनिश्चितार्था” या श्रुतीप्रमाणे त्यास ब्रह्मलोकप्राति झाल्यानंतर कल्पांतीं ब्रह्मदेवाबरोबरच मुक्ति व्हावयाची. ॥ ५२ ॥

केषांचित्स विचारोऽपि कर्मणा प्रतिबद्ध्यते ।
श्रवणायापि बहुभिर्यो न लभ्य इति श्रुतेः ॥ ५३ ॥
परंतु हे जे तीन प्रतिबंध सांगितले ते तत्त्वविचारास आड येणारे आहेत. पण हा तत्त्वविचारही कित्येकांना प्रारब्धवशात् करतां येत नाहीं. यास “श्रवणायापिबहुभिः” या श्रुतीचे प्रमाणें आहे. ॥ ५३ ॥

अत्यन्तबुद्धिमान्द्याद्वा सामग्र्या वाप्यसम्भवात् ।
यो विचारं न लभते ब्रह्मोपासीत सोऽनिशम् ॥ ५४ ॥
शि० -मग अशा पुरुषास मुक्ति कशी मिळावी ? गु० -म्हणूनच आज तुला ब्रह्माची उपासना सांगत आहो. ज्याची बुद्धि अत्यंत मंद असल्यामुळें किंवा गुरुशास्त्रादिक सामग्री अनुकलू नसल्यामुळें ज्यास तत्त्वविचार करणें मुष्कील आहे त्यानें अहोरात्र ब्रह्माची उपासना करावी. ॥ ५४ ॥

निर्गुणब्रह्मतत्त्वस्य न ह्युपास्तेरसम्भवः ।
सगुणब्रह्मणीवात्र प्रत्ययावृत्तिसम्भवात् ॥ ५५ ॥
शि० – होय, पण निर्गुण ब्रह्माची उपासना कशी करावी ? गु० – जशी सगुणाची करावी तशीच निर्गुणाची करावी. उपासना म्हणजे प्रत्ययाची आवृत्ति ती जशी सगुणावर चालते तशी निर्गुणाविषयीही होते. ॥ ५५ ॥

अवाङ्मनसगम्यं तन्नोपास्यमिति चेत्तदा ।
अवाङ्मनसगम्यस्य वेदनं च न सम्भवेत् ॥ ५६ ॥
शि० -होय, पण वाणी आणि मनाला अगम्य अशा ब्रह्माची उपासना कशी करावी ? गु० – असें ब्रह्म जाणावे तरी कसें तें सांग. ॥ ५६ ॥

वागाद्यगोचराकारमित्येवं यदि वेत्त्यसौ ।
वागाद्यगोचराकारमित्युपासित नो कुतः ॥ ५७ ॥
शि० -जाणण्यास कोणती नड आहे. तें वाणीस व मनास अगोचर आहे असें समजणे हेंच त्याला जाणणे. गु० -अशा प्रकारचे ब्रह्म आहे असें समजण्यास असें येते तशीच त्याची उपासनाही करण्यास कोणची नड आहे ? ॥ ५७ ॥

सगुणत्वमुपास्यत्वाद्यदि वेद्यत्वतोऽपि तत् ।
वेद्यं चेल्लक्षणावृत्त्या लक्षितं समुपास्यताम् ॥ ५८ ॥
शि० -ब्रह्म जर उपासनेस विषय होईल तर त्याला सगुणत्व येतें, तसें ज्ञानास विषय झाल्यानेंही सगुणत्व येईल. शि० -लक्षणा वृत्ति म्हणून जी वाक्यार्थ करण्याची रीत आहे तिला अनुसरून जाणल्यास त्यास सगुणत्व येत नाहीं. गु० -मग तशा लक्षणाने लक्षित जे ब्रह्म त्याची उपासना केली असताही सगुणत्व येत नाहीं. ॥ ५८ ॥

ब्रह्म विद्धि तदेव त्वं नत्विदं यदुपासते ।
इति श्रुतेरुपास्यत्वं निषिद्धं ब्रह्मणो यदि ॥ ५९ ॥
शिष्ट तर मग “तदेवं ब्रह्म त्वं विद्धि नेदं यदिदं उपासते” या श्रुतीनं उपासनेचा निषेध कां केला ? गु० – अरे उपासनेचा जसा श्रुतीने निषेध केला आहे, तसा ज्ञानाचाही निषेध श्रुतीने केला आहे. ॥ ५९ ॥

विदितादन्यदेवेति श्रुतेर्वेद्यत्वमस्य न ।
यथा श्रुत्यैव वेद्यं तत्तथा श्रुत्याप्युपास्यताम् ॥ ६० ॥
“अन्यदेव तद्विदितादथोविदितादधीति ” ही श्रुति तुला माहीत आहेच. शि० -त्या श्रुतींत जाणलेलेंही नव्हे आणि न जाणलेलेंही नव्हे असें ब्रह्म सांगितलें तसेंच तें जाणले म्हणजे झालें. गु० – मग उपासनाही तशीच करावी. ॥ ६० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *