सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक ८१ ते १००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

स्वतोऽपरोक्षजीवस्य ब्रह्मत्वमभिवांछतः ।
नश्येत्सिद्धपरोक्षत्वमिति युक्तिर्महत्यहो ॥ ८१ ॥
स्वत: जो अपरोक्ष जीव आहे आणि तोच ब्रह्म होऊं इच्छिल्याने त्याचे जे मूळचे अपरोक्षत्व तेही नाहींसें होतें ही कल्पना मोठीच म्हणावयाची ॥ ८१ ॥

वृद्धिमिष्टवतो मूलमपि नष्टमितीरितम् ।
लौकिकं वचनं सार्थं सम्पन्नं त्वत्प्रसादतः ॥ ८२ ॥
एकूण ” बुद्धिमिष्टवतो मूलमपि नष्टं” ही जी लोकांत म्हण आहे तिचे सार्थक्य तं आज केलेस ही मोठी कृपाच समजावयाची. ( व्याज इच्छिणाराचें मुद्दलही गमावलें.) ॥ ८२ ॥

अन्तःकरणसंभिन्नबोधो जीवोऽपरोक्षताम् ।
अर्हत्युपाधिसद्‌भावान्न तु ब्रह्मानुपाधितः ॥ ८३ ॥
याजवर असा एक पूर्वपक्ष आहे की, हा बोध अंतःकरणविशिष्ट साक्षी जो जीव त्याच्या स्वरूपाचे अपरोक्षज्ञान होणें योग्य आहे. कारण तेथे उपाधि आहे. परंतु ब्रह्मास तशी मुळींच उपाधि नाहीं, तेव्हां त्याचे अपरोक्षज्ञान कसें व्हावें ? ॥ ८३ ॥

नैवं ब्रह्मत्वबोधस्य सोपाधिविषयत्वतः ।
यावद्विदेहकैवल्यमुपाधेरनिवारणात् ॥ ८४ ॥
तर तशी कांहीं शंका घ्यावयास नको. ब्रह्माला ही उपाधि आहेच. कारण, उपाधि विदेहकैवल्यापर्यंत ( म्हणजे जीवन्मुक्ताच्या देहपातापर्यंत) जात नाहीं. ॥ ८४ ॥

अन्तःकरणसाहित्यराहित्याभ्यां विशिष्यते ।
उपाधिर्जीवभावस्य ब्रह्मतायाश्च नान्यथा ॥ ८५ ॥
अंतकरणासहवर्तमान असणें ही जशी जीवाची उपाधि तशीच अंतःकरणाविरहीत असणें ही बलाची उपाधि आहे. ॥ ८५ ॥

यथा विधिरुपाधिः स्यात्प्रतिषेधस्तथा न किम् ।
सुवर्णलोहभेदेन शृङ्खलात्वं न भिद्यते ॥ ८६ ॥
पहिली आहेपणाची उपाधि आहे आणि दुसरी नाहींपणाची आहे; एवढाच काय तो भेद. विधि उपाधि झाल्यानंतर मग निषेध उपाधि कां नव्हे ? एक सोन्याची शृंखला झाली आणि दुसरी लोखंडाची; म्हणून शृंखला कोठे जाईल. उपाधीचे लक्षण हेंच कीं, कार्य असेपर्यंत असणार्‍या भेदाचें जें कारण तीच उपाधि- ॥ ८६ ॥

अतद्‌व्यावृत्तिरूपेण साक्षाद्विधिमुखेन च ।
वेदान्तानां प्रवृत्तिः स्याद्‌द्विधेत्याचार्यभाषितम् ॥ ८७ ॥
आचार्यानी असें सांगितलें आहे कीं, वेदांतांत ब्रह्माचे जे वर्णन केले आहे ते कांही ठिकाणीं विधिमुखानें व कांहीं ठिकाणी निषेधमुखानें केले आहे. म्हणजे “सत्यंज्ञानमनंतं ब्रह्म” इत्यादिक श्रुतीने ब्रह्म अशा अशा प्रकारचे आहे म्हणून सांगितलें आहे आणि कोठे कोठे “नेति नेति” इत्यादिक श्रुतीने द्वैतांतील मिथ्या पदार्थाचे निरसन करून म्हणजे हे ब्रह्म नव्हे, हें ब्रह्म नव्हे, अशा रीतीनें त्याचें स्वरूप वर्णन केले आहे. ॥ ८७ ॥

अहमर्थपरित्यागादहं ब्रह्मेति धीः कुतः ।
नैवमंशस्य हि त्यागो भागलक्षणयोदितः ॥ ८८ ॥
वर निषेधमुखानें ब्रह्मस्वरूप वर्णिलें आहे असें म्हटले त्यावरून असा एक प्रश्न निघण्याजोगा आहे कीं, “अहं ब्रह्मास्मि” या वाक्यांत “अहं” शब्दाचाही “नेति नेति” या श्रुतीवरून त्याग करावा लागेल. मग मी ब्रह्म आहे असे सामानाधिकरण्यानें ऐक्यज्ञान कसें होईल ? तर त्याजवर आमचे उत्तर असे आहें कीं, तेथे “अहं” शब्दाचा सर्वांशी त्याग होत नाहीं. जहदजहलक्षणेच्या योगानें केवळ त्यांतील जडांशाचा मात्र त्याग सांगितला आहे. कूटस्थाचा त्याग होत नाहीं. म्हणून “मी ब्रह्मा आहे” असें ऐक्यज्ञान होण्यास प्रत्यवाय नाहीं. ॥ ८८ ॥

अन्तःकरणसन्त्यागादवशिष्टे चिदात्मनि ।
अहं ब्रह्मेति वाक्येन ब्रह्मत्वं साक्षिणीक्ष्यते ॥ ८९ ॥
येथे अंतकरणरूप उपाधीचा त्याग करून बाकी राहिलेल्या साक्षीचेठायीं अहं ब्रह्म या वाक्याने ब्रह्मत्व सिद्ध होते. ॥ ८९ ॥

स्वप्रकाशोऽपि साक्ष्येव धीवृत्त्या व्याप्यतेऽन्यवत् ।
फलव्याप्यत्वमेवास्य शास्त्रकृद्‌भिर्निवारितम् ॥ ९० ॥
येथे दुसरी अशी एक शंका आहे कीं, आत्मा स्वप्रकाश असून तो बुद्धीस कसा विषय होईल ? तर याचें समाधान असें कीं, आत्मा जरी स्वप्रकाश असला तरी वाकीच्या घटादि पदार्थांप्रमाणे तो बुद्धीनें व्याप्त होतो. आतां शास्त्रकारांनी जे आत्म्याचे बुद्धिव्याप्यत्व निराकृत केले ( मनोवृत्तीस विषय नाहीं असें जे म्हटले) त्याचा अभिप्राय असा कीं, चिदाभासाचा परिणाम ‘त्याजवर विशेष घडत नाहीं. ॥ ९० ॥

बुद्धितत्स्थचिदाभासौ द्वावपि व्याप्नुतो घटम् ।
तत्राज्ञानं धिया नश्येदाभासेन घटः स्फुरेत् ॥ ९१ ॥
कोणच्याही पदार्थाचें ज्ञान होतांना बुद्धि आणि तिजमधील प्रतिबिंबित चिदाभास हे दोन्हीही त्या पदार्थास व्यापतात. तेव्हां दोन्हींची निरंनिराळी कार्यें त्या पदार्थावर घडतात. बुद्धिव्याप्तीनें अज्ञानाचा नाश होतो. आभासाने पदार्थाचे स्फुरण होतें. म्हणजे तो अमुक असे भासते. ॥ ९१ ॥

ब्रह्मण्यज्ञाननाशाय वृत्तिव्याप्तिरपेक्षिता ।
स्वयं स्फुरणरूपत्वान्नाभास उपयुज्यते ॥ ९२ ॥
ब्रह्मज्ञान होतांनाही असाच प्रकार घडतो. परंतु येथे अज्ञानाचा नाश होण्याची मात्र गरज आहे. स्फुरणाची गरज नाहीं. कारण ते स्वत: स्फुरणरूप आहे. याकरितां बुद्धिव्याप्तीचा मात्र येथें उपयोग होतो. परंतु चिदाभासाचा जो विशेष उपयोग तो येथे होत नाहीं, हें पुढील दृष्टांतावरून चांगले ध्यानांत येईल. ॥ ९२ ॥

चक्षुर्दीपावपेक्ष्येते घटादेर्दर्शने यथा ।
न दीपदर्शने किन्तु चक्षुरेकमपेक्ष्यते ॥ ९३ ॥
घटादिक पदार्थ पहाण्यास डोळा आणि दिवा ही दोन साधने अवश्य आहेत. परंत केवळ दिवाच पहावयाचा असेल तर, एक डोळ्याचे साधनच बस्स आहे. आणखी दुसर्‍याची गरज नाही. ॥ ९३ ॥

स्थितोऽप्यसौ चिदाभासो ब्रह्मण्येकीभवेत्परम् ।
न तु ब्रह्मण्यतिशयं फलं कुर्याद्‌वटादिवत् ॥ ९४ ॥
त्याप्रमाणें ब्रह्मज्ञान होतांना चिदाभास जरी असला तरी त्याचा विशेष परिणाम ब्रह्मावर घडत नाहीं. सूर्यप्रकाशांत दिव्याचा प्रकाश जसा लीन होतो, त्याप्रमाणें तो चिदाभास ब्रह्माचे ठायीं लीन होतो.. ॥ ९४ ॥

अप्रमेयमनादिं चेत्यत्र श्रुत्येदमीरितम् ।
मनसैवेदमाप्तव्यमिति धीव्याप्यताश्रुता ॥ ९५ ॥
“अप्रमेयमनादिं च” इत्यादि श्रुतिवाक्यांचा अभिप्राय हाच कीं, चिदाभासाचा परिणाम ब्रह्मावर मुळींच घडत नाही. आणि मनसैवेदमाप्तव्यं इत्यादिक श्रुतिवाक्यांवरून बुद्धिव्याप्तीची अपेक्षा आहे असा अभिप्राय निघतो. ॥ ९५ ॥

आत्मानं चेद्विजानीयादयमस्मीति वाक्यतः ।
ब्रह्मात्मव्यक्तिमुल्लिख्य यो बोधः सोऽभिधीयते ॥ ९६ ॥
“आत्मानंचेत् विजानायीत् अयमस्मीति पूरुषः” या वाक्यावरून, सत्यादि लक्षण जें ब्रह्म तें विषय करून “मी ब्रह्म आहे” असा जो बोध, तो येथे सांगितला. ॥ ९६ ॥

अस्तु बोधोऽपरोक्षोऽत्र महावाक्यात् तथाऽप्यसौ ।
न दृढः श्रवणादीनामाचार्यैः पुनरीरणात् ॥ ९७ ॥
महावाक्यापासून जरी एकदां अपरोक्ष ज्ञान झाले तरी तें व्हावे तसे बळकट होत नाहीं. म्हणून श्रवणमननादिकांचा अभ्यास, ते ज्ञान घट्ट होईपर्यंत केला पाहिजे. असे आचार्यांनी म्हटले आहे. ॥ ९७ ॥

अहं ब्रह्मेति वाक्यार्थबोधो यावद्दृढीभवेत् ।
शमादिसहितस्तावदभ्यसेच्छ्रवणादिकम् ॥ ९८ ॥
त्यांनी असे म्हटलें आहे कीं, “अहं बह्मास्मि” या महावाक्यापासून होणारे ज्ञान अगदी दृढ होईपर्यंत शमदमादि साधनसंपन्न होऊन मुमुक्षूनें श्रवणादिकांचा अभ्यास करावा. ॥ ९८ ॥

बाधं सन्ति ह्यदार्ढ्यस्य हेतवः श्रुत्यनेकता ।
असम्भाव्यत्वमर्थस्य विपरीता च भावना ॥ ९९ ॥
याजवर कोणी अशी शंका घेईल की, महावाक्यापासून अपरोक्ष ज्ञान होते असे तुम्ही म्हणतां, मग तें दृढ नाही असे कसें होईल ? तर त्याजवर आमचें उत्तर असें आहे कीं, जरी वाक्यापासून ज्ञान झाले तरी ते डळमळीत असण्यास पुष्कळ कारणे आहेत. एक तर श्रुति निरनिराळ्या असतात. दुसरे जाणण्याचा विषय नेहमीच्या रूढींतला नसल्यामुळे तो एकदां समजला तरी पुन: पुन: संशय येतो. तसेंच मी कर्ता व भोक्ता अशा विपरीत भावना वारंवार मनांत उठतात. या प्रकारचींच आणखी दुसरी कारणें आहेत. म्हणून श्रवणादिकांचा अभ्यास केलाच पाहिजे. ॥ ९९ ॥

शाखाभेदात्कामभेदाच्छ्रुतं कर्माण्यथान्यथा ।
एवमत्रापि माशङ्कीत्यतः श्रवणमाचरेत् ॥ १०० ॥
ज्याप्रमाणे वेदशाखा व कर्मकरत्याची कामना भिन्न भिन्न असल्यामुळे वेदामध्ये कर्मेंही निरनिराळी झालीं आहेत, त्याप्रमाणे उपनिषदांतही निरनिराळी दिसण्यांत विरुद्ध वाक्ये पाहून मुमुक्षूस भेदशंका येईल. तिचें निवारण व्हावें म्हणून श्रवणाची जरूर आहे. ॥ १०० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *