सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १६१ ते १८०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
सार्थ पंचदशी सूची

स्वभावजेन कौन्तेय निबद्धः स्वेन कर्मणा ।
कर्तुं नेच्छसि यन्मोहात् करिष्यस्यवशोऽपि तत् ॥ १६१ ॥
हे अर्जुना, तूं आपल्या प्रारब्ध कर्मानें बांधला गेला आहेस, म्हणून जें कर्म करण्याची तुला इच्छा नाहीं तेंही परवश होऊन मोहाने तुला करावेच लागतें. ॥ १६१ ॥

नानिच्छन्तो न चेच्छन्तः परदाक्षिण्यसंयुताः ।
सुखदुःखे भजन्त्येतत्परेच्छा पूर्वकर्म हि ॥ १६२ ॥
मनुष्यास एकादे कृत्य करण्याची इच्छा असो किंवा नसो, दुसर्‍याचे ताब्यांत सापडल्यामुळे तो जें करतो तें परेच्छापूर्वक समजावे. ॥ १६२ ॥

कथं तर्हि किमिच्छन्नित्येवमिच्छा निषिध्यते ।
नेच्छानिषेधः किन्त्विच्छाबाधो भर्जितबीजवत् ॥ १६३ ॥
तर मग पूर्वीं दिलेल्या श्रुतींत “किमिच्छन्” या पदानें इच्छेचा निषेध सांगितला आहे तेथें हे सांगणे जमत नाही अशी कोणी शंका घेईल, तर त्यास हेंच उत्तर कीं, श्रुतीत जें “किमिच्छिन्” पद दिलें आहे त्याचा अर्थ ज्ञान्यास इच्छा मुळींच होत नाहींत असें नाहीं; तर त्या जरी झाल्या तरी भाजलेल्या बीजाप्रमाणें त्या निर्जीव असतात. ॥ १६३ ॥

भर्जितानि तु बीजानि सन्त्यकार्यकराणि च ।
विद्वदिच्छा तथेष्टव्याऽसत्त्वबोधान्न कार्यकृत् ॥ १६४ ॥
भाजलेले बी दिसण्यांत बीजाप्रमाणेंच दिसतें, परंतु त्यापासून अंकुरादि कार्ये होत नाहींत. त्याप्रमाणें तत्त्ववेत्त्याची इच्छा दिसण्यांत इतर लोकांच्या इच्छेसारखी जरी दिसली तरी विषय खोटे आहेत असें त्याला पक्कें समजले असल्यामुळें, त्यापासून दुःखादि कार्यें होत नाहींत. ॥ १६४ ॥

दग्धबीजमरोहेऽपि भक्षणायोपयुज्यते ।
विद्वदिच्छाऽप्यल्पभोगं कुर्यान्न व्यसनं बहु ॥ १६५ ॥
भाजलेलें बीं जरी पेरण्याचे उपयोगी नाहीं तरी खाण्याचे उपयोगी पडतें. त्याप्रमाणें ज्ञान्याच्या इच्छेपासनू भोग घडतो; परंतु दुःख होत नाहीं. ॥ १६५ ॥

भोगेन चरितार्थत्वात्प्रारब्धं कर्म हीयते ।
भोक्तव्यसत्यता भ्रान्त्याव्यसनं तत्र जायते ॥ १६६ ॥
प्रारब्धकमार्चा नाश भोगाने होतो, म्हणून भोगापासून जे दुःख होतें तें प्रारब्ध कर्मापासून होतें असें नाहीं. तें दुःख होण्याचे कारण असें कीं, भोगण्याचे जे विषय ते आम्ही खरे मानतो; परंतु ते मिथ्या आहेत अशी ज्ञान्याची खात्री असते, म्हणून त्यांस दुःख होत नाहीं. ॥ १६६ ॥

मा विनश्यत्वयं भोगो वर्धतामुत्तरोत्तरम् ।
मा विघ्नाः प्रतिबध्नन्तु धन्योऽस्म्यस्मादिति भ्रमः ॥ १६७ ॥
वर दुःखास कारण भ्रांति असें सांगितलें ती ही कीं, हे विषयोपभोग मला नेहमी मिळोत. उत्तरोत्तर यांची वृद्धि होवो. यांत विघ्न कोणचेंच न येवो, येणेकरूनच मी धन्य आहें असें जें वाटणें तीच भ्रांति. ॥ १६७ ॥

यदभावि न तद्‌भावि भावि चेन्न तदन्यथा ।
इति चिन्ताविषग्नोऽयं बोधो भ्रमनिवर्तकः ॥ १६८ ॥
या भ्रांतीचा परिहार करण्याला एक उपाय आहे. जें होण्यास अशक्य तें होत नाहीं. आणि होण्यास जे शक्य तें झाल्यावांचून राहणार नाहीं; असा विवेक करावा. हा विवेक चिंतारूप विषाला मारतो. आणि त्यापासून भ्रांतीचे निवारण होतें. ॥ १६८ ॥

समेऽपि भोगे व्यसनं भ्रान्तो गच्छेन्न बुद्धिमान् ।
अशक्यार्थस्य सङ्कल्पाद्‌भ्रान्तस्य व्यसनं बहु ॥ १६९ ॥
ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांना जरी विषयभोग सारखाच असला तरी अज्ञान्यास जसें दुःख होतें तसें ज्ञान्यास होत नाहीं. कारण, अज्ञानी हा असंभाव्य गोष्टीचे मांडे मनांत खाऊन दुःख पावतो. परंतु ज्ञान्याची गोष्ट तशी नाहीं. ॥ १६९ ॥

मायामयत्वं भोग्यस्य बुद्ध्वाऽऽस्थामुपसंहरन् ।
भुञ्जानोऽपि न सङ्कल्पं कुरुते व्यसनं कुतः ॥ १७० ॥
भोगाचें मिथ्यात्व पक्के समजून त्याजविषयीं अनास्था करून तें भोगीत असतांही त्याला दुःख होत नाहीं. कारण त्याचे मनांत संकल्पच नाहीं. ॥ १७० ॥

स्वप्नेन्द्रजालसदृशमचिन्त्यरचनात्मकम् ।
दृष्टनष्टं जगत्पश्यन् कथं तत्रानुरज्जति ॥ १७१ ॥
ज्याची रचना मनांत देखील आणतां येत नाहीं असें जें जग तें स्वप्नेंद्रजालाप्रमाणें दिसून नाश पावणारें असे आहे हें प्रत्यक्ष समजून तेथें त्याचें मन कसें बरें रमेल ? ॥ १७१ ॥

स्वस्वप्नमापरोक्ष्येण दृष्ट्वा पश्यन् स्वजागरम् ।
चिन्तयेदप्रमत्तः सन्नुभावनुदिनं मुहुः ॥ १७२ ॥
तें समजाग्याचा प्रकार असा आहे की, मनुष्याने नेहमी सावध राहून आपलें स्वप्न व जागृति या दोन्ही अवस्थांची परस्पर तुलना करीत असावें. ॥ १७२ ॥

चिरं तयोः सर्वसाम्यमनुसन्धाय जागरे ।
सत्यत्वबुद्धिं संत्यज्य नानुरज्जति पूर्ववत् ॥ १७३ ॥
मग त्या दोहोंमधील साम्य चांगलें ध्यानांत आणूत जागृतीविषयी सत्यत्वबुद्धि सोडून दिली असतां स्वप्नाप्रमाणें जागृति ही खोटी आहे असें पक्के समजेल. मग अर्थातच पूर्वील अज्ञानदशेप्रमाणें या जगांत त्याचें मन रमणार नाही. ॥ १७३ ॥

इन्द्रजालमिदं द्वैतमचिन्त्यरचनात्वतः ।
इत्यविस्मरतो हानिः का वा प्रारब्धभोगतः ॥ १७४ ॥
ह्या सर्व जगाची रचना इंद्रजालाप्रमाणे अचिंत्य आहे हा विचार ज्याचे मनांत नेहमी वागतो, त्याला प्रारब्धभोगापासून काय हानि आहे ? ॥ १७४ ॥

निर्बन्धस्तत्त्वविद्याया इन्द्रजालत्वसंस्मृतौ ।
प्रारब्धस्याग्रहो भोगे जीवस्य सुखदुःखयोः ॥ १७५ ॥
तत्त्वविद्येचे काम इतकेंच कीं, हें जग इंद्रजालाप्रमाणे खोटे आहे याची आठवण ती तत्त्वविद्या मनुष्यास करून देते, आणि जीवाकडून सुख व दुःख भोगवणें हें प्रारब्धाचें काम होय. ॥ १७५ ॥

विद्यारब्धे विरुद्ध्येते न भिन्नविषयत्वतः ।
जानद्‌भिरप्यैन्द्रजालो विनोदो दृश्यते खलु ॥ १७६ ॥
याकरितां तत्त्वज्ञान आणि प्रारब्ध यांमध्यें विरोध मुळीच नाहीं. कारण त्या दोहोंचे विषय भिन्न भिन्न आहेत. गारुड्याचा खेळ पाहणारा हें गारुड आहे असे समजून केवळ कौतुकाने ती मौज पाहतो. त्याप्रमाणे ज्ञान्यालाही या जगाची मौज वाटते. ॥ १७६ ॥

जगत्सत्यत्वमापाद्य प्रारब्धं भोजयेद्यदि ।
तदा विरोधि विद्याया भोगमात्रान्न सत्यता ॥ १७७ ॥
हें प्रारब्ध कर्म जगाला सत्यत्त्व आणून जर सुखदुःखे जीवाकडून भोगवील, तर मात्र तें तत्त्वज्ञानास विरोधी होईल. पण तशी कांहीं गोष्ट नाही. म्हणून विषयांचा भोग होण्यास तो सत्यच असला पाहिजे असा नियम नाहीं. ॥ १७७ ॥

अनोनो जायते भोगः कल्पितैः स्वप्नवस्तुभिः ।
जाग्रत्वस्तुभिरप्येवमसत्यैर्भोग इष्यताम् ॥ १७८ ॥
स्वप्नामधील कल्पित विषयांचा जसा पूर्णपणें भोग होतो तसाच जागृतीमधील खोट्या विषयांचाही भोग होतो असे म्हणण्यास कोणती हरकत आहे ? ॥ १७८ ॥

यदि विद्यापह्नुवित जगत्प्रारब्ध घातिनी ।
तदा स्यान्न तु मायात्वबोधेन तदपह्नवः ॥ १७९ ॥
तसेच जर या तत्त्वविद्येपासून जगाचा मुळीच लोप होईल तर ती प्रारब्ध कर्माशी विरोधी होईल. परंतु तीजपासून तसें होत नाही अमुक वस्तु खोटी आहे असें समजल्यानें तिचा म्हणजे अगदीच नाश होतो असें नाहीं. ॥ १७९ ॥

अनपन्हुत्य लोकास्तदिन्द्रजालमिदं त्विति ।
जानन्त्येवानपन्हुत्य भोगं मायात्वधीस्तथा ॥ १८० ॥
लोकांमध्ये पदार्थांचा नाश न होतां तो पदार्थ खोटा आहे असें ज्ञान होण्याचा संभव आहे त्याप्रमाणें विषयभोगाचा नाश न होतां त्याचा खोटेपणा मनांत ठसण्यास कोणचाही अडथळा दिसत नाही. ॥ १८० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading