सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक १२१ ते १४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

पामराणां व्यवहृतेर्वरं कर्माद्यनुष्ठितिः ।
ततोऽपि सगुणोपास्तिर्निर्गुणोपासनं ततः ॥ १२१ ॥
एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेच आहे, अडाण्याच्या व्यवहारापेक्षां कर्मानुष्ठान बरें. त्याहीपेक्षां सगुणोपासना बरी, त्याहीपेक्षा निर्गुण उपासना श्रेष्ठ. ॥ १२१ ॥

यावद्विज्ञानसामीप्यं तावच्छ्रैष्ठ्यं विवर्धते ।
ब्रह्मज्ञानाय ते साक्षान्निर्गुणोपासनं शनैः ॥ १२२ ॥
याप्रमाणे ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत एकावर एक अशा ह्या पायऱ्या आहेत. तुझी निर्गुण उपासना चांगली दृढ झाली म्हणजे त्यापासून ब्रह्मज्ञान होतें. ॥ १२२ ॥

यथा संवादिविभ्रान्तिः फलकाले प्रमायते ।
विद्यायते तथोपास्तिर्मुक्तिकालेऽतिपाकतः ॥ १२३ ॥
ज्याप्रमाणें संवादि-भ्रमापासून फलकाल आला असतां फलप्राप्ति होते, त्याप्रमाणें निर्गुण उपासना पक्व होऊन मोक्षप्राप्तीची वेळ आम्ही म्हणजे ब्रह्मसाक्षात्कार होतो. ॥ १२३ ॥

संवादिभ्रमतः पुंसः प्रवृत्तस्यान्यमानतः ।
प्रमेति चेत्तथोपास्तिर्मान्तरे कारणायताम् ॥ १२४ ॥
शि० -संवादिभ्रमानें प्रवृत्त झालेल्या पुरुषाला इंद्रियार्थसंनिकर्षापासून पुढें ज्ञान होतें; पण तो भ्रमच ज्ञान होऊं शकत नाहीं. गु० -उपासनेचीही गोष्ट तशीच आहे. ती तरी स्वतः ज्ञान कोठे आहे ? महावाक्यापासृन् होणाऱ्या अपरोक्ष ज्ञानाला ती कारण आहे. ॥ १२४ ॥

मूर्तिध्यानस्य मन्त्रादेरपि कारणता यदि ।
अस्तु नाम तथाप्यत्र प्रत्यासत्तिर्विशिष्यते ॥ १२५ ॥
शि० -निर्गुण उपासना जशी अपरोक्ष ज्ञानास कारण आहे, तशी मूर्तिध्यानमंत्रादिही ज्ञानास कारण आहेत. मग उपासनेची एवढी प्रतिष्ठा कशाला ? गु० -होय, तूं म्हणतोस तें खरें आहे. पण दोहोंमध्ये भेद इतकाच कीं, निर्गुण उपासना ज्ञानास अगदीं जवळची पायरी आहे. बाकीची मंत्रादि साधने दूरच्या पायर्‍या आहेत. ॥ १२५ ॥

निर्गुणोपासनं पक्वं समाधिः स्याच्छनैस्ततः ।
यः समाधिर्निरोधाख्यः सोऽनायासेन लभ्यते ॥ १२६ ॥
शि० -जवळची पायरी म्हटलें त्याचा अर्थ काय ? गु० – त्याचा अर्थ हाच कीं, निर्गुण उपासना पक्व झाली म्हणजे हळूहळू सविकल्प समाधि साधतो, तो पक्व झाला म्हणजे अनायासाने निर्विकल्प समाधि होतो. ॥ १२६॥

निरोधलाभे पुंसोऽन्तरसङ्गं वस्तु शिष्यते ।
पुनः पुनर्वासितेऽस्मिन्वाक्याज्जायेत तत्त्वधीः ॥ १२७ ॥
तो झाल्यानंतर असंग जी आत्मवस्तू तीच तो पुरुष होतो ही भूमि पुन चांगली दृढ झाल्यावर त्यास महावाक्यापासून तत्त्वज्ञान होतें, ॥ १२७॥

निर्विकारासङ्गनित्यस्वप्रकाशैकपूर्णताः ।
बुद्धौ झटिति शास्त्रोक्ता आरोहन्त्यविवादतः ॥ १२८ ॥
तसें झाल्यानंतर मी निर्विकारी, असंग, नित्य स्वप्रकाश आणि परिपूर्ण आहें, अशीं जी शास्त्रोक्त ब्रह्माची लक्षणें ती त्याच्या बुद्धीत लवकर ठसतात. ॥ १२८ ॥

योगाभ्यासस्त्वेतदर्थोऽमृतबिन्द्वादिषु श्रुतः ।
एवं च दृष्टद्वारापि हेतुत्वादन्यतो वरम् ॥ १२९ ॥
याकरितांच अमृतबिंद्वादि उपनिषदांत योगाभ्यास सांगितला आहे. याप्रमाणे निर्विकल्प समाधिरूप दृष्टफल प्राप्तीच्या संबंधानेही इतर साधनापेक्षा निर्गुण उपासना श्रेष्ठ आहे. ॥ १२९ ॥

उपेक्ष्य तत्तीर्थयात्रां जपादीनेव कुर्वताम् ।
पिण्डं समुत्सृज्य करं लेढीति न्याय आपतेत् ॥ १३० ॥
एवढे निर्गुण उपासनेचे फल असून तिची उपेक्षा करून जे तीर्थयात्रा जपादिक कर्मे करतात त्यांना ” पिंड समुत्सृज्य करं लेढि ” ( हातांतील लाडू टाकून हात चाटीत बसणे) ही म्हण लागू पडते. ॥ १३० ॥

उपासकानामप्येवं विचारत्यागतो यदि ।
बाधं तस्माद्विचारस्यासम्भवे योग ईरितः ॥ १३१ ॥
शि० -विचार सोडून जे लोक उपासना करतात त्यांस देखील ही म्हण लागू पडत नाही काय ? गु० -नाहीं कोण म्हणतो, त्यासही ती तशीच लागू पडते. जशी तीर्थयात्रेपेक्षा उपासना श्रेष्ठ तसा उपासनेपेक्षां विचार श्रेष्ठ. परंतु आम्ही जो योग (उपासना) सांगितला, तो विचारक्षम पुरुषास नव्हे. ज्यास विचार नाहीं त्यास तो सांगितला. ॥ १३१ ॥

बहुव्याकुलचित्तानां विचारात्तत्त्वधीर्न हि ।
योगो मुख्यस्ततस्तेषां धीदर्पस्तेन नश्यति ॥ १३२ ॥
शि० -कित्येकांस विचार कां होत नाहीं ? गु० -ज्याचे चित्त कामक्रोधादिकांनी गांजले गेलें आहे. त्यांस विचार करण्याचें सामर्थ्य नसल्यामुळें तत्त्वज्ञान होत नाही. म्हणून त्यांस योगच मुख्य आहे. तेणेकरून बुद्धिजाड्य नाहीसे होतें. ॥ १३२ ॥

अव्याकुलधियां मोहमात्रेणाच्छादितात्मनाम् ।
साङ्ख्यनामा विचाराः स्यान्मुख्यो झटिति सिद्धितः ॥ १३३ ॥
आणि ज्यांच्या चित्तांत कामक्रोधादिक नसल्यामुळे आयते वैराग्य आटून केवळ आत्म्याविषयी अज्ञान मात्र आहे, त्यांना सांख्यनामक विचार मुख्य सांगितला. त्यापासून त्यांना लवकर मुक्ति मिळते. ॥ १३३॥

यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते ।
एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥ १३४ ॥
यास गीतावाक्य प्रमाण “यत्सांख्यैः प्राप्यते स्थानं” या शोकाचा अभिप्राय असा आहे कीं, जें फल सांख्यापासून मिळतें तेंच योगापासून मिळतें. ते दोन्हीही फलत्वेंकरून एकच आहेत असे ज्याला समजते, त्यासच शास्त्रसिद्धांत समजला. ॥ १३४ ॥

तत्कारणं साङ्ख्ययोगाधिगम्यमिति हि श्रुतिः ।
यस्तु श्रुतेर्विरुद्धः स आभासः साङ्ख्ययोगयोः ॥ १३५ ॥
श्रुतींचेही तसेंच प्रमाण आहे. “तत्कारणं सांख्ययोगाधिगम्यं” या श्रुतीचा अर्थ ते जगत्कारण ब्रह्म सांख्य किंवा योगापासून समजतें. शि० -योग आणि सांख्य हे दोनही मुक्तीस जर साधन आहेत, तर त्या शास्त्रात सांगितलेले सर्वच प्रमाण म्हणून समजले पाहिजे. गु० -तसे नव्हे, त्यांत श्रुतिविरुद्ध जे विचार ते आभास म्हणून गाळावे. ॥ १३५ ॥

उपासनं नातिपक्वमिह यस्य परत्र सः ।
मरणे ब्रह्मलोके वा तत्त्वं विज्ञाय मुच्यते ॥ १३६ ॥
शिं० -उपासना करणाराला ज्ञान न होतां मरण आलें तर मोक्षसिद्ध कशी होते ? गु० – ज्याची उपासना या जन्मी पक्व झाली नाहीं त्याला अंतकाली किंवा ब्रह्मलोकी तत्त्वज्ञान होऊन मुक्ति मिळते. ॥ १३६ ॥

यं यं चापि स्मरन्भावं त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं तेवैति यच्चित्तस्तेन यातीति शास्त्रतः ॥ १३७ ॥
मरणकालीं जी मुक्ति होते त्यास प्रमाण, जो जो भाव स्मरून प्राणी देह सोडतो, तो तो भाव त्याला प्राप्त होतो असें गीतेत सांगितलें आहे. “यचित्तस्तेन याति” असेही शास्त्रआहे. ॥ १३७ ॥

अन्त्यप्रत्ययतो नूनं भाविजन्म तथा सति ।
निर्गुणप्रत्ययोऽपि स्यात्सगुणोपासने यथा ॥ १३८ ॥
शि० -तुम्ही म्हणतां कीं, निर्गुण उपासना पक्व झाली तर त्यास मरणकाळीं मुक्ति होते, पण त्याविषयी जी प्रमाणें दिलींत त्यापासून पुनर्जन्म होतो असें सिद्ध होते. तर या विरोधाचा परिहार कसा ? गु० -ते खरे आहे. पणे सगुणोपासनेनें अन्तकालीं जसा सगुणसाक्षात्कार होतो तसा निर्गुणोपासनेनेही निर्गुणसाक्षात्कार झालाच पाहिजे. ॥ १३८ ॥

नित्यं निर्गुणरूपं तन्नाममात्रेण गीयताम् ।
अर्थतोमोक्ष एवैष संवादि भ्रमवन्मतः ॥ १३९ ॥
शि० -तर त्याला निर्गुणरूपाची प्राप्ति होईल मुक्ति कशी मिळेल ? गु० -अरे निर्गुणरूपाची प्राप्ति आणि मुक्ति यांत नाममात्रांचा भेद आहे. परंतु दोन्हीचा अर्थ एकच आहे. मुक्ति म्हणजे स्वरूपावस्थिति. ती येथे प्रात होतेच. ज्याप्रमाणें संवादि भ्रमाला भ्रम हें नाममात्र आहे. ॥ १३९ ॥

तत्सामर्थ्याज्जायते धीर्मूलाविद्यानिवर्तिका ।
अविमुक्तोपासनेन तारकब्रह्म बुद्धिवत् ॥ १४० ॥
शि० -निर्गुण उपासना ही मानसिक क्रियाआहे, तेव्हां ती मुक्तीला साधन कशी होईल ? गु० -ती जरी साक्षात् साधन होत नाहीं, तरी मूळ अविद्येस भस्म करून टाकणारे ज्ञान तिजपासून उत्पन्न होते यास दुसरा दृष्टांत नको. सगुण उपासनेने जशी तारक ब्रह्मबुद्धि होते, तसेंच निर्गुण उपासनेने ब्रह्मज्ञान होतें. ॥ १४०॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *