सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १२१ ते १४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अप्यब्धिपानान्महतः सुमेरून्मूलनादपि ।
अपि वन्ह्यशनात् साधो विषमश्चित्तनिग्रहः ॥ १२१ ॥
एखाद्या वेळीं समुद्र प्राशन करतां येईल, मेरुपर्वत उपटून टाकतां येईल, व एकाद्या वेळीं अग्नि सुद्धां सेवन करतां येईल, पण चित्तनिग्रह असाध्य आहे असें वसिष्ठ, म्हणतात. ॥ १२१ ॥

कथनादौ न निर्बन्धः शृङ्खलाबद्धदेहवत् ।
किन्त्वनन्तेतिहासाद्यैर्विनोदो नाट्यवद्धियः ॥ १२२ ॥
परंतु कथनादिकांचा जो अभ्यास सांगितला, त्यामध्ये शृंखलाबद्ध देहाप्रमाणें अटकाव कोणाचाच नाही. इतकेंच नव्हे, तर नानातर्‍हेच्या पुराणांतील मनोरंजक कथा ऐकून मनाला उलटी मौज वाटते. ॥ १२२ ॥

चिदेवात्मा जगन्मिथ्येत्यत्र पर्यवसानतः ।
निदिध्यासनविक्षेपो नेतिहासादिभिर्भवेत् ॥ १२३ ॥
सर्व इतिहासांचें तात्पर्य आत्मा सत्य आणि जग मिथ्या, या दोन गोष्टींवर ठेवून कथनादिकांचा अभ्यास केल्याने इतिहासादिकांच्या योगानें निदिध्यासाला विक्षेप येईल येती शंका घेण्याचें कारण नाहीं. ॥ १२३ ॥

कृषिवाणिज्यसेवादौ काव्यतर्कादिकेषु च ।
विक्षिप्यते प्रवृत्ता धीस्तैस्तत्त्वस्मृत्यसम्भवात् ॥ १२४ ॥
परंतु कृषिवाणिज्य सेवा इत्यादिक ज्या प्रपंचांतील क्रिया, व अलंकारशास्त्राचा व तर्कशास्त्राचा अभ्यास करण्याचे योगानें मात्र बुद्धीस विक्षेप होतो. कारण, तेथें तत्त्वाची विस्मृति होण्याचा संभव आहे. ॥ १२४ ॥

अनुसन्दधतैवात्र भोजनादौ प्रवर्तितुम् ।
शक्यतेऽत्यन्तविक्षेपाभावादाशु पुनः स्मृतेः ॥ १२५ ॥
एवढ्यावरून म्हणजे भोजनादिकांचा देखील त्याग करावा, असें कांहीं नाहीं. कारण, आम्हाला भोनन करितां करितां देखील आत्म्याचें अनुसंधान ठेवतां येतें. कदाचित् तेवढ्या काळापुरता जरी विक्षेप झाला, तरी पुन: तत्त्वस्मृतीचा संभव असल्यामुळे तेथें अत्यंत विक्षेपाची भीति मुळींच नाहीं ॥ १२५ ॥

तत्त्वविस्मृतिमात्रान्नानर्थः किन्तु विपर्ययात् ।
विपर्येतुं न कालोऽस्ति झटिति स्मरतः क्वचित् ॥ १२६ ॥
विपरीत भावनेपेक्षां सिद्धांताचें विस्मरण हजार पटीनें बरें. कारण, त्यापासून अनर्थ होण्याची भीति नाहीं. अनर्थ करणारी काय ती विपरीत भावना. ती होण्यास तेथें मुळीच अवकाश नाहीं. कारण मुमुक्षूला तत्त्वाचे स्मरण लागलेच होते. ॥ १२६ ॥

तत्त्व स्मृतेरवसरो नास्त्यन्याभ्यासशालिनः ।
प्रत्युताभ्यासघतित्वाद्‌बलात्तत्त्वमपेक्ष्यते ॥ १२७ ॥
पण काव्य तर्काचा अभ्यास करणार्‍या लोकांना तत्त्व आठवण्यास अवकाशच मिळत नाहीं. इतकेंच नव्हे तर तत्त्वाभ्यासाशीं त्यांचा विरोध असल्यामुळें त्यांजकडून त्याची उलटी हयगय होते ॥ १२७ ॥

तमेवैकं विजानीथ ह्यन्या वाचो विमुञ्चथ ।
इति श्रुतं तथान्यत्र वाचो विग्लापनं त्विति ॥ १२८ ॥
अध्यात्म विषयावांचून दुसर्‍या कोणत्याही शब्दाचा उच्चार करूं नये, असें श्रुतीत सांगितले आहे. दुसर्‍याविषयीं संभाषण केल्याने वाणीस शीण मात्र होतो असेंही एका ठिकाणी सांगितलें आहे. ॥ १२८ ॥

आहारादि त्यजन्नैव जीवेच्छास्त्रान्तरं त्यजन् ।
किं न जीवसि येनैवं करोष्यत्र दुराग्रहम् ॥ १२९ ॥
भोजनादिकांच्या त्यागाविषयी इतका दुराग्रह तरी कां असावा. आहारादि टाकल्यानें मनुष्य वांचणार नाहीं. परंतु काव्य तर्काची गोष्ट तशी नाहीं. त्यावांचून आमचें मुळीच आडत नाहीं. ॥ १२९ ॥

जनकादेः कथं राज्यमिति चेद्दृढबोधतः ।
तथा तवापि चेत्तर्कं पठ यद्वा कृषिं कुरु ॥ १३० ॥
एथें अशी कोणी शंका येईल कीं, पुराणांतरी जनकोदिक तत्वज्ञांच्या ज्या कथा आम्ही ऐकतो, त्याजवरून ते राज्य करीत होते असें दिसते. मग त्यांच्या अभ्यासांत विघ्न कसें आले नाही ? तर याजवर आमचे असे उत्तर आहे कीं, आम्हीं जो अभ्यास वर सांगितला तो केवळ ज्ञानदाढ्याकरितां. जनकादिकांचें ज्ञान घट्टमुट्ट होतें. त्याप्रमाणें ज्यांस ज्ञान झालें असेल त्यांनीं हवा असल्यास शास्त्राभ्यास करावा, कृषिकर्म करावें, पाहिजे तें करावें. ॥ १३० ॥

मिथ्यात्ववासनादार्ढ्ये प्रारब्धक्षयकाङ्क्षया ।
अक्लिश्यन्तः प्रवर्तन्ते स्वस्वकर्मानुसारतः ॥ १३१ ॥
ज्ञानदार्ढ्य होऊनही ( हा संसार खोटा आहे असें समजूनही) ज्ञानाची प्रवृत्ति संसाराकडे जी होते ती के-वळ प्रारब्धकर्माच्या क्षयास्तव होते. आपापल्या कर्मास अनुसरून ते निमूटपणे संसार करतात. तेणेकरून त्यांस क्लेश मुळींच होत नाहीं. ॥ १३१ ॥

अतिप्रसङ्गो मा शंक्यः स्वकर्मवशवर्तिनाम् ।
अस्तु वा केन शक्येत कर्म वारयितुं वद ॥ १३२ ॥
संसाराच्या प्रवृत्तीस जर प्रारब्धकर्म कारण आहे तर त्याच कारणानें तत्वज्ञाच्या हातून अनाचाराची कृत्येही घडतील अशी कोणी शंका घेईल तर आम्ही नाहीं कुठे म्हणतो; घडतील तर घडोत बापडीं. प्रारब्धकर्म टाळण्याचें ब्रह्मदेवाचेही हातीं नाहीं, मग आमची तुमची कथा काय ? ॥ १३२ ॥

ज्ञानिनोऽज्ञानिनश्चात्र समे प्रारब्धकर्मणि ।
न क्लेषो ज्ञानिनो धैर्यान्मूढः क्लिश्यत्यधैर्यतः ॥ १३३ ॥
ज्ञानी आणि अज्ञानी हे दोघेही प्रारब्धकर्म भोगण्याविषयीं सारखेच आहेत. ज्ञान्यास आंतून धैर्य असल्यामुळें क्लेश होत नाहीं. आणि मूढास, ते नसल्यामुळे तो होतो. इतकाच काय तो भेद. ॥ १३३ ॥

मार्गे गन्त्रोर्द्वयोः श्रान्तौ समायामप्यदूरताम् ।
जानन्धैर्याद् द्रुतं गच्छेदन्यस्तिष्ठति दीनधीः ॥ १३४ ॥
यास दृष्टांत एका मार्गानें दोन प्रवासी जात असतां दोघांसही श्रम तितकाच. परंतु मार्गाची माहिती असणारास जाईन असें धैर्य असल्यामुळे तो लवकर लवकर चालतो. व ज्यास माहिती नाहीं तो आतां कसें करूं ? म्हणून रडत बसतो. ॥ १३४ ॥

साक्षात्कृतात्मधीः सम्यगविपर्ययबाधितः ।
किमिच्छन् कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत् ॥ १३५ ॥
ज्याला आत्म्याचा साक्षात्कार झाला आहे आणि त्याच्या मनांतील विपर्यय नाहींसा झाला आहे त्याच्याठायीं इच्छा करणाराही राहिला नाहीं आणि इच्छेला विषयही नाहीं. मग शरीरास संताप झाल्याने याला जो संताप व्हावयाचा, तो कशाने होणार ? ॥ १३५ ॥

जगन्मिथ्यात्वधीभावादाक्षिप्तौ काम्यकामुकौ ।
तयोरभावे सन्तापः शाम्येन्निःस्नेहदीपवत् ॥ १३६ ॥
जगाचा खोटेपणा बुद्धीच्या ठायीं ठसला म्हणजे काम्य आणि कामुक हे दोघेही नाहींसे झाले. मग अर्थातच, तेल नसलेल्या दिव्याप्रमाणें संतापही नाहींसा होतो, ॥ १३६ ॥

गन्धर्वपत्तने किंचिन्नेन्द्रजालिकनिर्मितम् ।
जानन् कामयते किन्तु जिहासति हसन्निदम् ॥ १३७ ॥
गंधर्वपत्तन म्हणून जो चमत्कार दिसतो, ते सर्व गारुड असे जाणून पाहणारा त्याचा अभिलाष करीत नाहीं. केवळ त्याचा अनादर करून हांसत बसतो. ॥ १३७ ॥

आपातरमणीयेषु भोगेष्वेवं विचारवान् ।
नानुरज्जति किन्त्वेतान् दोषदृष्ट्या जिहासति ॥ १३८ ॥
त्याप्रमाणें विचारी पुरुष केवळ डोळयांस मात्र रमणीय दिसणारे जे स्त्रीधनादिक विषय, ते खोटे असें मानून शेडीने त्यांचा त्याग करितो. ॥ १३८ ॥

अर्थानामर्जने क्लेशस्तथैव परिपालने ।
नाशे दुःखं व्यये दुःखं धिगर्थान् क्लेशकारिणः ॥ १३९ ॥
वर दोषदृष्टि म्हणून जी म्हटली ती अशी. प्रथम द्रव्यामध्ये कोणकोणचे दोष आहेत ते पहा. द्रव्य मिळवण्यांत केश, रक्षण करण्यांत क्लेश, त्याचा नाश झाला तरी क्लेश, आणि खर्च झाला तरी क्लेशच. तस्माद् हें दुःख देणारे जें द्रव्य त्यास धिक्कार असो. ॥ १३९ ॥

मांसपाञ्चातिकायास्तु यन्त्रलोलेऽङ्गपञ्जरे ।
स्नाय्वस्थिग्रन्थिशालिन्याः स्त्रियाः किमिव शोभनम् ॥ १४० ॥
हे द्रव्याचे सोहळे झाले. आता स्त्री पहा कशी ती. स्त्री म्हटली म्हणजे एक हाड, मांस, स्नायु, ग्रंथी इत्यादिक पदार्थांची बनलेली पुतळीच आहे. तिच्या प्राणयंत्रानें चंचल दिसणार्‍या शरीरांत, काय सौंदर्य असेल तें असो. ॥ १४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *