सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक ४१ ते ६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

संसार्यहं विबुद्धोऽहं निःशोकस्तुष्ट इत्यपि ।
जीवगा उत्तरावस्था भान्ति न ब्रह्मगा यदि ॥ ४१ ॥
पण ब्रह्म अधिष्ठान आहे ही गोष्ट जरी सर्व अवस्थांस सारखी लागू आहे, तरी “मी संसारी” “मी ज्ञानी” “मी शोकरहित झालो” “मी तृप्ति पावलों ” अशा चार उत्तरावस्था जीवालचा आहेत असें दिसतें. त्या ब्रह्माला संभवत नाहींत. या पूर्वपक्षावर आमचें उत्तर असें कीं,- ॥ ४१ ॥

तर्ह्यज्ञोऽहं ब्रह्मसत्त्वभाने मद्दृष्टितो न हि ।
इति पूर्वे अवस्थे च भासेते जीवगे खलु ॥ ४२ ॥
वरील कारणावरून या चार अवस्था जर जीवास आहेत तर त्याच कारणास्तव पूर्वीच्या दोन अवस्थाही जीवास संभवतात. कारण मला कांहीं समजत नाहीं, ब्रह्माचें असणे भासणें मास्या अनुभवास येत नाही असेही जीव म्हणतो. ॥ ४२ ॥

अज्ञानस्याश्रयो ब्रह्मेत्यधिष्ठानतया जगुः ।
जीवावस्थात्वमज्ञानाभिमानित्वादवादिषम् ॥ ४३ ॥
तर ब्रह्म हे अज्ञानाला आश्रय आहे असे पूर्वाचार्यांनीं कां सांगितले ? असें कोणी पुसेल तर त्यावर आम्ही असे सांगतों कीं, तेथे त्याची विवक्षा निराळी आहे. त्यांनी जो आश्रय म्हटला तो केवळ अधिष्ठान असें समजावे. आणि आम्ही जे अज्ञान जीवाची अवस्था असें म्हणतो तें तेथे जीवाचे अधिश्त्ठान नाही, तर त्याचा अभिमान जीवानें घेतला आहे असें समजावे. ॥ ४३ ॥

ज्ञानद्वयेन नष्टेऽस्मिन्नज्ञाने तत्कृतावृतिः ।
न भाति नास्ति चेत्येषा द्विविधापि विनश्यति ॥ ४४ ॥
याप्रमाणे बंधास कारणीभूत अशा तीन अवस्था दाखविल्या. आतां बाकी राहिलेल्या अवस्थांपैकीं मुक्तिला कारणीभूत ज्या दोन अवस्था त्या येथें दाखवून त्यांपासून अज्ञान व आवरण ही कशीं नाश पावतात तें सांगतो. परोक्ष व अपरोक्ष या दोन ज्ञानांच्या योगानें पूर्वोक्त अज्ञान नाश पावले म्हणजे ब्रह्म नाहीं व ते दिसत नाहीं असें अज्ञानापासून होणारे जें दोन प्रकारचें आवरण तेही नाश पावते. ॥ ४४ ॥

परोक्षज्ञानतो नश्येदसत्त्वावृत्तिहेतुता ।
अपरोक्षज्ञाननाश्या ह्यभानावृत्तिहेतुता ॥ ४५ ॥
परोक्षज्ञानाच्या योगानें असत्त्वरूप आवरणं नाश पावतें आणि अपरोक्षज्ञानाचे योगानें अभावरूप आवरण नाश पावतें. ॥ ४५ ॥

अभानावरणे नष्टे जीवत्वारोपसंक्षयात् ।
कर्तृत्वाद्यखिलः शोकः संसाराख्यः निवर्तते ॥ ४६ ॥
अभावरूप आवरण अपरोक्ष ज्ञानाने नष्ट झालें असतां “मी ब्रह्म आहें” “जीव नव्हें” असा अनुभव होऊन जीवत्व नाहींसें होते; मग अर्थातच कर्तृत्वादिक अभिमानापासून होणारा संसाररूपी शोक नाहीसा होतो. ॥ ४६ ॥

निवृत्ते सर्वसंसारे नित्यमुक्तत्वभासनात् ।
निरङ्कुशा भवेत्तृप्तिः पुनः शोकासमुद्‌भवात् ॥ ४७ ॥
सर्व संसार निवृत्त झाला असतां मी नित्य मुक्त आहें असें सहजच वाटू लागतें. हीच निरंकुशतृप्तिसंज्ञक सातवी अवस्था. कारण ही तृप्ति झाली असतां कोणतीही कर्तव्यता न राहिल्यामुळे पुन: दुःख होण्याचें कारणच नाहीं. ॥ ४७ ॥

अपरोक्षज्ञानशोकनिवृत्ताख्ये उभे इमे ।
अवस्थे जीवगे ब्रूते आत्मानं चेदिति श्रुतिः ॥ ४८ ॥
या प्रकरणाच्या आरंभीं जी “आत्मानं चेत्” अशी श्रुति दिलेली आहे, तिजवर व्याख्यान देणें हा प्रकृत विषय असून, आम्ही जें अवस्थासप्तकाचें निरूपण केलें तें विषयांतर झालें अशी शंका नलगे. कारण, चिदाभासाच्या ज्या चार उत्तर अवस्था सांगीतल्या, त्यांपैकीं अपरोक्षज्ञान आणि शोकनिवृत्ति या दोन अवस्थांचें मात्र प्रतिपादन करण्याचा जरी या श्रुतीचा मुख्य उद्देश आहे तथापि बाकीच्या पांच ज्या सांगितल्या आहेत, त्या विषयाच्या ओघानें सांगाव्या लागल्या. ॥ ४८ ॥

अयमित्यपरोक्षत्वमुक्तं तद्द्विविधं भवेत् ।
विषयस्वप्रकाशत्वाद्धियाप्येवं तदीक्षणात् ॥ ४९ ॥
“अयं” अयं या श्रुतीतील शब्दापासून आत्म्याच्या अपरोक्षत्वाचा बोध होतो; असे जें वर सांगितले, त्यावरून आत्मा हा अपरोक्षज्ञानालाच विषय आहे; परोक्ष ज्ञानाला तो विष नाहीं, असें जर कोणी म्हणेल, तर आम्ही त्याचा विचार येते सांगतो. तो असा कीं, अपरोक्षज्ञानाचे दोन प्रकार आहेत. विषयस्वप्रकाशत्वेंकरून एक, व तसें बुद्धीनें त्याचे स्वरूप समजणे हा दुसरा. ॥ ४९ ॥

परोक्षज्ञानकालेऽपि विषयस्वप्रकाशता ।
समाब्रह्म स्वप्रकाशमस्तीत्येवं विबोधनात् ॥ ५० ॥
अपरोक्षज्ञानकाली ब्रह्माची स्वप्रकाशता जशी असते तशीच परोक्षज्ञानकालींही असते. कारण, बल स्वप्रकाश आहे हें तेव्हांही वाक्यद्वारा समजते. ॥ ५० ॥

अहं ब्रह्मेत्यनुल्लिख्य ब्रह्मास्तीत्येवमुल्लिख्त् ।
परोक्षज्ञानमेतं न भ्रान्तं बाधानिरूपणात् ॥ ५१ ॥
प्रत्यगभिन्न ब्रह्माविषयींच्या ज्ञानाला परोक्षत्व कसें येईल ? असें जर कोणी म्हणेल तर, वाक्यांत प्रत्यगंशाचें ग्रहण केलें नाहीं हाणून ती शंका संभवत नाहीं. कारण, “मी ब्रह्म” असें न लिहितां केवळ “ब्रह्म आहे” असें लिहिलें आहे. हें परोक्षज्ञान भ्रांत्यात्मक असे कोणी म्हणत असेल तर त्यास आम्ही असें पुसतो कीं, परोक्षज्ञान जें भ्रांत्यात्मक तुम्ही म्हणतां तें कोणत्या कारणास्तव ? काय “ब्रह्मास्ति” हें वाक्य रद्द करण्याजोगे दुसरें वाक्य आहे म्हणून म्हणता ! कीं व्यक्तीचा उल्लेख नाहीं म्हणून म्हणतां ? कीं, प्रत्यक्षत्वेकरून समजण्याची वस्तू परोक्षत्वेंकरून घेतली म्हणून म्हणतां ? किंवा अंशाचे ग्रहण होत नाहीं म्हणून म्हणतां ? ह्या चार कारणांपैकी, पहिलें कारण जी वाक्याची बाधा ती येथें कांहीं संभवत नाहीं. ॥ ५१ ॥

ब्रह्म नास्तीति मानं चेत्स्याद्बाध्येत तदा ध्रुवम् ।
न चैवं प्रबलं मनं पश्यामोऽतो न बाध्यते ॥ ५२ ॥
कारण, ब्रह्मास्ति या वाक्याची बाधा करण्यास ब्रह्म नास्ति असें वाक्य कोठेही आढळत नाहीं, म्हणून येथें बाधा संभवत नाहीं. ॥ ५२ ॥

व्यक्त्यनुल्लेखमात्रेण भ्रमत्वे स्वर्गधीरपि ।
भ्रान्तिः स्याद्व्यक्त्यनुल्लेखात्सामान्योल्लेखदर्शनात् ॥ ५३ ॥
आतां भ्रांतीचें दुसरें कारण व्यक्तीचा उल्लेख जरी नसला तरी तेवढ्यानेंच केवळ त्या ज्ञानाला भ्रांतित्व येत नाहीं. कारण तसें जर म्हणावे, तर स्वर्गज्ञान देखील भ्रांति म्हणावें लागेल. “स्वर्ग आहे” या वाक्यांत व्यक्तीचा उल्लेख मुळींच नाहीं. केवळ सामान्य उलेख आहे. ॥ ५३ ॥

अपरोक्षत्व योग्यस्य न परोक्षमतिर्भ्रमः ।
परोक्षमित्यनुल्लेखादर्थात्पारोक्ष्यसम्भवात् ॥ ५४ ॥
तिसरें, अपरोक्षत्वास योग्य असून परोक्षत्वेकरून ग्रहण केले, यामुळेंच केवळ भ्रांति संभवत नाहीं. कारण “आहे” या वाक्यांत “ब्रह्म परोक्ष” असें मुळींच म्हटले नाहीं, मग ब्रह्मज्ञान तरी परोक्ष कसें ? असें जर म्हणाल तर, “इदं ब्रह्म” असा व्यक्त्युल्लेख वाक्यांत नाही म्हणून अर्थातच परोक्षत्वसिद्धि झाली. ॥ ५४ ॥

अंशागृहीतिर्भ्रान्तिश्चेद् घटज्ञां भ्रमो भवेत् ।
निरंशस्यापि संशत्वं व्यावर्त्यांशविभेदतः ॥ ५५ ॥
भ्रांतीचे चौथें कारण; अंशाचे अग्रहण. तेंही येथें बरोबर लागू पडत नाहीं. कारण तेवढ्याचमुळें जर, ज्ञान भ्रांत्यात्मक म्हणावे तर, घटज्ञानही भ्रांति म्हणावी लागेल. कारण, घटज्ञानांत देखील आतील सर्व अवयवांचे ग्रहण होत नसते. आम्ही येथे घटाचा दृष्टांत दिला, त्याजवरून आणखी एक प्रश्न निघण्याजोगा आहे. तो हा कीं, घट सांश आहे म्हणून तेथें अंशाचे ग्रहण संभवते परंतु निरंश ब्रह्माला शांतत्व कसे संभवेल ? तर त्याचे उत्तर असे कीं ब्रह्मालाही, भेदक उपाधिरूप मायेचा अंश आहेच. ॥ ५५ ॥

असत्वांशो निवर्तेत परोक्षज्ञानतस्तथा ।
अभानांशनिवृत्तिः स्यादपरोक्षधिया कृता ॥ ५६ ॥
ते भेदक अंश दोन आहेत. एक असत्वांश आणि दुसरा अभानांश. पहिला परोक्षज्ञाने निवृत्त होतो. आणि दुसरा अपरोक्षज्ञानानें नाहींसा होतो. ॥ ५६ ॥

दशमोऽस्तीत्यविभ्रान्तं परोक्षज्ञानमीक्ष्यते ।
ब्रह्मास्तीत्यपि तद्वत्स्यादज्ञानावरणं समम् ॥ ५७ ॥
“दहावा आहे” या आप्तवाक्यापासून उत्पन्न होणारे परोक्षज्ञान हें वरील दृष्टांतांत जसें निभ्रांत आहे, तसेंच “ब्रह्मास्ति” या वाक्यापासून होणारे ज्ञानही निभ्रांत आहे. दोहीकडे अज्ञानाचें असत्वावरण समानच आहे. ॥ ५७ ॥

आत्मा ब्रह्मेति वाक्यार्थे निःशेषेण विचारिते ।
व्यक्तिरुल्लिख्यते यद्वद्दशमस्त्वमसीत्यतः ॥ ५८ ॥
“अयमात्मा बह्म” या महावाक्याचा अर्थ चांगला विचारपर्वक केला असतां, ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होतें. ज्याप्रमाणे “दहावा तूं आहेस” या वाक्याचा विचारपर्वूक अर्थ केल्याने मीच दहावा असें अपरोक्षज्ञान झालें त्याप्रमाणें समजावें. ॥ ५८ ॥

दशमः क इति प्रश्ने त्वमेवेति निराकृते ।
गणयित्वा स्वेन सह स्वमेव दशमं स्मरेत् ॥ ५९ ॥
वाक्याचा विचारपूर्वक अर्थ म्हणून सांगितला. तो असा कीं, “दहावा आहे” असें जें तुम्ही म्हणतां तो कोण ? असा प्रश्न आप्तास केल्यावर आप्त म्हणतो कीं, “तूंच दहावा” तें उत्तर ऐकून आपणासहवर्तमान बाकीच्या नवांस मोजून पाहून मीच दहावा असें त्याला स्मरले. ॥ ५९ ॥

दशमोऽस्मीति वाक्योत्था न धीरस्य विहन्यते ।
आदिमध्यावसानेषु न नवत्वस्य संशयः ॥ ६० ॥
जेथे विचारपूर्वक अर्थ केल्यापासून मीच दहावा असे जें ज्ञान झालें तें आदि मध्य अवसानीं अप्रतिहत राहतें “मी दहावा” होय कीं नाहीं हा संशय मुळींच राहत नाहीं. ॥ ६० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *