सार्थ पंचदशी मराठी अष्टमः परिच्छेदः- कूटस्थदीपः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

खादित्यदीपिते कुड्ये दर्पणादित्यदीप्तिवत् ।
कूटस्थभासितो देहो धीस्थजीवेन भास्यते ॥ १ ॥
ज्याप्रमाणें भिंतीवर आकाशांतील सूर्याचा एक प्रकाश पडला असून त्यावरच दुसरा आरशमधील प्रतिबिंबित सूर्याचा प्रकाश पडावा, त्याप्रमाणें हा देही दोन प्रकारच्या ज्ञानांनी प्रकाशीत झाला आहे. पूर्वी ब्रह्मज्ञानाचे योगाने प्रकाशित असून त्याजवर आणखी एक जीवाचा प्रकाश पडून तो विशेष स्पष्ट होतो. या दृष्टांतांत खऱ्या व खोट्या सूर्याचे दोन प्रकाश दर्शवून एक ब्रह्माचे सामान्य ज्ञान आणि दुसरें जीवाचे विशेष ज्ञान अशीं दोन ज्ञाने दर्शविली. येथें देहस्थानी भिंत, कूटस्थ स्थानी आकाशांतील सूर्य, जीवस्थानीं आरशांतील सूर्य, आणि बुद्धिस्थानीं आरसा अशीं दृष्टांताची योजना समजावी. ॥ १ ॥

अनेकदर्पणादित्यदीप्तीनां बहुसन्धिषु ।
इतरा व्यज्यते तासामभावेऽपि प्रकाशते ॥ २ ॥
अशा प्रकारच्या निरनिराळ्या आरशाची किरणे भिंतीवर पडली असतां मध्यंतरी, किंवा तीं सर्व किरणे आरसे काढून टाऊन नाहीशी केली असतां सर्वत्र आकाशांतील सूर्याचा सामान्य प्रकाश स्पष्ट दिसतो. ॥ २ ॥

चिदाभासविशिष्टानां तथाऽनेकधियामसौ ।
सन्धिं धियामभावं च भासयन् प्रविविच्यताम् ॥ ३ ॥
ज्याप्रमाणें वरील दृष्टांतांत विशेष प्रकाशापासून सामान्य प्रकाश निराळा स्पष्ट भासतो, त्याप्रमाणें चिदाभासयुक्त ज्या निरनिराळ्या बुद्धीच्या वृत्ती उठतात त्यांच्या मध्यंतरी किंवा त्यांच्या अभावीं कूटस्थ ज्ञानाचा प्रकाश स्पष्ट भासतो, तो वाचकांनी सूक्ष्म दृष्टीनें ध्यानांत आणावा. ॥ ३ ॥

घटैकाकारधीस्था चिद्घटमेवावभासयेत् ।
घटस्य ज्ञातता ब्रह्मचैतन्येनावभासते ॥ ४ ॥
ही देहातील गोष्ट झाली. आतां देहाबाहेरही ही दोन प्रकारची ज्ञाने तशींच अनुभवास येतात. ज्या वेळीं आम्हास घट समजतो त्या वेळीं केवळ घटापुरत्याच त्यागून असणाऱ्या बुद्धीतील चिदाभासास फक्त घटाचें मात्र ज्ञान होतें. हें चिदाभासज्ञान समजावे, आणि तो घट मीं जाणला ही गोष्ट ज्या ज्ञानाने समजते तें ब्रह्मज्ञान असे जाणावे. पहिले विशेष आणि दुसरे सामान्य आहे. ॥ ४ ॥

अज्ञातत्वेन ज्ञातोऽयं घटो बुद्ध्युदयात्पुरा ।
ब्रह्मणैवोपरिष्टात्तु ज्ञातत्वेनेत्यसौ भिदा ॥ ५ ॥
ब्रह्मज्ञानानें जर घट समजतो तर आणखी बुद्धि ती कशाला पाहजे असा कोणाचा प्रश्न असेल तर त्याचें समाधान हें कीं, बुद्धीवाचून घटाचे समजणे न समजणें हे भेद मुळींच संभवणार नाहींत. बुद्धि उत्पन्न होण्यापूर्वी या घटाचें ज्ञान ब्रह्मास होतें तें न समजून होतें; आणि तेंच बुद्धीचा उदय झाल्यावर ब्रह्माला त्या घटाच ज्ञान समजून झाले, एवढाच कायता भेद. ॥ ५ ॥

चिदाभासान्तधीवृत्तिर्ज्ञानं लोहान्तकुन्तवत् ।
जाड्यमज्ञानमेताभ्यां व्याप्तः कुम्भो द्विधोच्यते ॥ ६ ॥
एकाच घटाला ज्ञातत्व आणि अज्ञातत्व ही दोन्हीही कशी संभवतात, हें ध्यानांत येण्यास ज्ञान व अज्ञान या दोहींचे स्वरूप चांगले समजले पाहिजे. ज्या बुद्धिवृत्तीच्या शेवटीं चिदाभास असतो अशी जी, शेवटीं पोलाद असलेल्या भाल्यासारखी वृत्ति, तेच ज्ञान आणि ज्यात स्फूर्ति मुळींच नाहीं, तें अज्ञान. ह्या दोहोंनी पाळीपाळीनें घट व्याप्त होतो. ॥ ६ ॥

अज्ञातो ब्रह्मणा भास्यो ज्ञातः कुम्भस्तथा न किम् ।
ज्ञातत्वजननेनैव चिदाभासपरिक्षयः ॥ ७ ॥
येथें घटाची ज्ञातता ब्रह्माला कशी समजली अशी कोणी शंका घ्यावयास नको. अज्ञात कुंभ जसा ब्रह्माला तसा ज्ञात कुंभही ब्रह्मालाच समजतो असें म्हणण्यास कोणती नड आहे ? कारण घटाचें ज्ञातत्व उत्पन्न होतांच चिदाभासाचा क्षय होतो. तेव्हां चिदाभासास त्या घटाची ज्ञातता कशी समजेल ? ॥ ७ ॥

आभासहीनया बुद्ध्या ज्ञातत्वं नैव जन्यते ।
तादृग्बुद्धेर्विशेषः को मृदादेः स्याद्विकारिणः ॥ ८ ॥
घटाची अज्ञातता जशी अज्ञानाने उत्पन्न होते तशी घटाची ज्ञातता उत्पन्न होण्यास केवळ बुद्धीचेच साधन बस आहे. त्यांत आणखी चिदाभास कशाला पाहिजे अशी शंका घेऊं नये. कारण नुसति बुद्धि आणि माति या दोहोंमध्ये जाड्यत्वाचे संबधाने कांहींच भेद नाही. म्हणून ज्ञातता उत्पन्न होण्यास चिदाभासाची अवश्यकता आहे. ॥ ८ ॥

ज्ञात इत्युच्यते कुम्भो मृदा लिप्तो न कुत्रचित् ।
धीमात्रव्याप्तकुम्भस्य ज्ञातत्वं नेष्यते तथा ॥ ९ ॥
जसा केवळ मातीने सारविलेला घट ज्ञात म्हणजे जाणला असें म्हणतां येत नाहीं, त्याप्रमाणें चिदाभासरहित केवळ बुद्धीने व्यापलेला घट जाणला असें म्हणतां येणार नाहीं. ॥ ९ ॥

ज्ञातत्वं नाम कुम्भेऽतश्चिदाभासफलोदयः ।
न फलं ब्रह्मचैतन्यं मानात्प्रागपि सत्वतः ॥ १० ॥
याकरिता चिदाभासरूप फलाची जी उत्पत्ति तेंच कुंभाचे ज्ञातत्व. तें ज्ञातत्व उत्पन्न करणें हे काहीं ब्रह्माचे काम नव्हे. कारण घट स्फुरण होण्यापूर्वीही ब्रह्म होतेंच. ॥ १० ॥

परागर्थप्रमेयेषु या फलत्वेन संमता ।
संवित्सैवेह मेयोऽर्थो वेदान्तोक्ति प्रमाणतः ॥ ११ ॥
घटादीक पदार्थांचे ज्ञान होतांना ज्या ज्ञानाचा उपयोग होतो तेंच ज्ञान आमच्या वेदांत शास्त्रांत चिदाभास शब्दाने प्रसिद्ध आहे असें सुरेश्वराचार्यांचे वार्तिक आहे. ॥ ११ ॥

इति वार्तिककारेण चित्सदृश्यं विवक्षितम् ।
ब्रह्मचित्फलयोर्भेदः सहस्र्यां विश्रुतो यतः ॥ १२ ॥
या वार्तिकात जसे चिदाभासालाच घट ज्ञानाचे प्रमाणफलत्व दिलें आहे, व शंकराचार्यांच्या उपदेशसाहस्री नामक ग्रंथांतही ब्रह्म आणि चिदाभास यांचा भेद तसाच वर्णिला आहे. ॥ १२ ॥

आभास उदितस्तस्माज्ज्ञातत्वं जनयेद्घटे ।
तत्पुनःर्ब्रह्मणाभास्यमज्ञातत्ववदेव हि ॥ १३ ॥
याकरितां चिदाभास उत्पन्न होतांच घटाचें ज्ञातत्व उत्पन्न होतें म्हणजे घट समजतो. आणि तें ज्ञातत्व पूर्वींच्या अज्ञातत्वाप्रमाणें ब्रह्मालाच समजते. ॥ १३ ॥

धीवृत्त्याभासकुम्भानां समूहो भास्यते चिता ।
कुम्भमात्रफलत्वात्स एक आभासतः स्फुरेत् ॥ १४ ॥
म्हणजे धीवृत्ति, चिदाभास आणि घट या तिहींचा समुदाय ब्रह्माला समजतो. आणि चिदाभासाचें काम केवळ घट स्फुरण करणें असें असल्यामुळे त्याला घट मात्र समजतो. ॥ १४ ॥

चैतन्यं द्विगुणं कुम्भे ज्ञातत्वेन स्फुरेत्यतः ।
अन्येऽनुव्यवसायाख्यमाहुरेतद्यथोदितम् ॥ १५ ॥
एवंच असें सिद्ध झाले की, घटज्ञान होतांना त्याजवर दोन प्रकारच्या ज्ञानाचे व्यापार घडतात. हें जें आम्ही घटाची ज्ञातता समजणारे ब्रह्मज्ञान सांगितलें त्याला नैय्यायिक अनुव्यवसायाख्य म्हणतात. ॥ १५ ॥

घटोऽयमित्यसावुक्तिराभासस्य प्रसादतः ।
विज्ञातो घट इत्युक्तिर्ब्रह्मानुग्रहतो भवेत् ॥ १६ ॥
दोनही ज्ञानें साधारण व्यवहारातील भाषणावरूनही समजून येतात. जेव्हां एकाद्याच्या मुखांतून हा घट असा उद्गार निघतो तेव्हां तो चिदाभास ज्ञानामुळे निघाला असें समजावे, आणि जेव्हां हा घट मला समजला असें तो म्हणतो तेव्हां तें ब्रह्मज्ञानाचे लक्षण समजावे. ॥ १६ ॥

आभासब्रह्मणी देहाद्‌बहिर्यद्वद्विवेचिते ।
तद्वदाभासकूटस्थौ विविच्येतां वपुष्यपि ॥ १७ ॥
एथवर देहाबाहेर ब्रह्मज्ञान आणि चिदाभासज्ञान या दोहोंमधील भेद दाखवला. आतां तसाच भेद देहाचे आंतही कूटस्थ आणि चिदाभास या दोहोंचे विवेचन करून दाखवू. ॥ १७ ॥

अहंवृत्तौ चिदाभासः कामक्रोधादिकासु च ।
संव्याप्य वर्तते तप्ते लोहे वह्निर्यथा तथा ॥ १८ ॥
ज्याप्रमाणें तापलेल्या लोखंडांत अग्नि ओतप्रोत व्यापून असतो त्याप्रमाणें अहं वृत्तींत व दुसऱ्या कामकोधादिक वृत्तींमध्ये चिदाभासही व्यापून असतो ॥ १८ ॥

स्वमात्रं भासयेत्तप्तं लोहं नान्यत्कदाचन ।
एवमाभाससहिता वृत्तयः स्वस्वभासिकाः ॥ १९ ॥
आणि तें तापलेले लोखंड जसे आपल्याला मात्र भासवितें तशा त्या आभासासहवर्तमान वृत्तीही आपल्यालाच भासवितात. ॥ १९ ॥

क्रमाद्विच्छिद्य विच्छिद्य जायन्ते वृत्तयोऽखिलाः ।
सर्वा अपि विलीयन्ते सुप्तिमूर्च्छासमाधिषु ॥ २० ॥
या सर्व वृत्ति क्रमाने एका मागून एक अशा उत्पन्न होतात व सुषुप्ति, मूर्च्छा समाधि या अवस्थांमध्ये त्या सर्व लीन होतात. ॥ २० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *