सार्थ पंचदशी मराठी द्वादशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे आत्मानन्दः श्लोक ६१ ते ८०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

एवं स्थिते विवादोऽत्र प्रतिबुद्धविमूढयोः ।
श्रुत्योदाहारि तत्रात्मा प्रेयानित्येव निर्णयः ॥ ६१ ॥
साक्ष्येव दृश्यादन्यस्मात्प्रेयानित्याह तत्त्ववित् ।
प्रेयान्पुत्रादिरेवेमं भोक्तुं साक्षीति मूढधीः ॥ ६२ ॥
आत्मनोऽन्यं प्रियं ब्रूते शिष्यश्च प्रतिवाद्यपि ।
तस्योत्तरं वचोबोधशापौ कुर्यात्तयोः क्रमात् ॥ ६३ ॥

प्रियं त्वां रोत्स्यतीत्येवमुत्तरं वक्ति तत्त्ववित् ।
स्वोक्तप्रियस्य दुष्टत्वं शिष्यो वेत्ति विवेकतः ॥ ६४ ॥
अलभ्यमानस्तनयः पितरौ क्लेशयेच्चिरम् ।
लब्धोऽपि गर्भपातेन प्रसवेन च बाधते ॥ ६५ ॥
जातस्य ग्रहरोगादिH कुमारस्य च मूर्खता ।
उपनीतेऽप्यविद्यत्वमनुद्वाहश्च पण्डिते ॥ ६६ ॥

यूनश्च परदारादि दारिद्र्यं च कुटुम्बिनः ।
पित्रोः दुःखस्य नास्त्यन्तो धनी चेन्म्रियते तदा ॥ ६७ ॥

एवं विविच्य पुत्रादौ प्रीतिं त्यक्त्वा निजात्मनि ।
निश्चित्य परमां प्रीतिं वीक्षते तमहर्निशम् ॥ ६८ ॥
आग्रहाद्‌ब्रह्मविद्‌द्वेषादपि पक्षममुञ्चतः ।
वादिनो नरकः प्रोक्तो दोषश्च बहुयोनिषु ॥ ६९ ॥
ब्रह्मविद्‌ब्रह्मरूपत्वादीश्वरस्तेन वर्णितम् ।
यद्यत्तत्तत्तथैव स्यात्तच्छिष्यप्रतिवादिनोः ॥ ७० ॥

याप्रमाणे आत्मा अतिप्रिय आहे असें सिद्ध जाहले. याविषयी ज्ञानी आणि अज्ञानी यामध्ये चाललेला वाद श्रुतीत सांगितला आहे. यावरूनही आत्म्याचे प्रियतमत्व ठरतें. ॥ ६१ ॥
तो वाद असा की, साक्षी हा यावत् दृश्य पदार्थांपेक्षा फार प्रिय आहे असें तत्त्ववेत्त्वाचे म्हणणे, आणि अज्ञानी असें म्हणतो कीं, पुत्रादिकच प्रियतम आहेत आणि साक्षी हा केवळ त्यांचा भोक्ता आहे. ॥ ६२ ॥
आत्म्यावाचून दुसरे पदार्थ प्रिय आहेत असें म्हणणारा मनुष्य एक शिष्य तरी असला पाहिजे किंवा प्रतिवादी तरी असला पाहिजे. म्हणून त्याजवर तत्त्ववेत्त्यानें दिलेले जे उत्तर तें शिष्यपक्षी बोधपर आणि प्रतिवादीपक्षी शापपर असें दोन प्रकारांनीं घेतलें पाहिजे. ॥ ६३ ॥
ते उत्तर असें कीं. “अरे हे प्रिय प्रिय म्हणतोस पण हे तुला रडवील बरें” येथें आपण ज्याला प्रिय म्हणतों त्यामध्यें रडविण्याचा दोष आहे असें शिष्य विवेकाने समजतो. आणि प्रतिवाद्याच्या वाटणीस शापच होतो. प्रिय म्हणण्यामध्यें रडविण्याचा दोष आहे असे जें झटले त्या दोषाचा तो असा विचार करतो. ॥ ६४ ॥
उदाहरणार्थ पुत्रच घे म्हणजे झालें. हा पुत्र मनुष्यास जो इतका प्रिय झाला आहे तो जन्मास येण्यापृर्वीपासनूच मनुष्यास कसे रडवितो तें पहा. तो झाला नाहीं तरी आईबापांत दुःख आहेच. बरें झाला तरी गर्भपाताची भीति. त्यांतून सुटला तर प्रसवाचें दुःख. ॥ ६५ ॥
त्यातूनही सुटून उदराबाहेर आला तर ग्रहांची व रोगांची पीडा व त्यातूनही सुटून मोठा झाला तर खुळा होण्याची चिंता. बरे शाहणा झाला, मुंज झाली, तरी त्यास विद्या कशी येईल ही चिंता आहेच. कदाचित् विद्याही चांगली झाली तर त्यांचें लग्न कसें होईल ही चिंता. ॥ ६६ ॥
सुदैवेंकरून मुलगी चांगली मिळून लग्नही झालें तरी चिंता कोठे गेली. त्याला एकादे बाहेर छंदाचे व्यसन लागेल. बरें, व्यसन नाहीं, तर मुले फार होऊन त्यांचे पोटाची पंचाईत पडेल. तीही कदाचित् पंचाईत गेली म्हणा. संतति, संपत्ति, विद्या, सद्गुण इत्यादिक गोष्टी सर्व प्राप्त झाल्या तरी शेवटी त्याच्या मरणाविषयी काळजी आहेच. याप्रमाणे आईबापांच्या दुःखास अंतच नाहीं. ॥ ६७ ॥
असा विचार करून पुत्रादिकांवरची प्रीति सोडून देऊन परम प्रीति काय ती आत्म्यावरच आहे असा निश्चय करून रात्रंदिवस आत्म्याचेच तो अनुसंधान करतो. ॥ ६८ ॥
वर आम्ही म्हटले आहे कीं, ही प्रीति तुला रडवील असा तत्त्ववेत्त्या प्रतिवाद्यास शाप दिला तो असा कीं, आग्रहाने किंवा तत्त्ववेत्त्याशी द्वेष करून धरलेला पक्ष न सोडणाऱ्या प्रतिवादीला नरकप्राप्ति होईल व जन्मजन्मांतरी दुःख होईल असें सांगितलें. ॥ ६९ ॥
खरेंच आहे कीं, ब्रह्मवेत्ता हा केवळ ब्रह्मच असल्यामुळें त्याला ईश्वरत्वही सहजच आलें. तो शिष्यास किंवा प्रतिवाद्यास शाप किंवा आशीर्वाद रूपाने जें जें बोलेल तें तें खरेंच होईल यांत नवल तें काय ? ॥ ७० ॥

यस्तु साक्षिणमात्मानं सेवते प्रियमुत्तमम् ।
तस्य प्रेयानसावात्मा न नश्यति कदाचन ॥ ७१ ॥
परप्रेमास्पदत्वेन परमानन्दरूपता ।
सुखवृद्धिः प्रीतिवृद्धौ सार्वभौमादिषु श्रुता ॥ ७२ ॥
चैतन्यवत्सुखं चास्य स्वभावश्चेच्चिदात्मनः ।
धीवृत्तिष्वनुवर्तेत सर्वास्वपि चितिर्यथा ॥ ७३ ॥

मैवमुष्णप्रकाशात्मा दीपस्तस्य प्रभा गृहे ।
व्याप्नोति नोष्णता तद्वच्चितेरेवानुवर्तनम् ॥ ७४ ॥

गन्धरूपरसस्पर्शेष्वपि सत्सु यथा पृथक् ।
एकाक्षेणैक एवार्थो गृह्यते नेतरस्तथा ॥ ७५ ॥

चिदानन्दौ नैव भिन्नौ गन्धाद्यास्तु विलक्षणाः ।
इति चेत् तदभेदोऽपि साक्षिण्यन्यत्र वा वद ॥ ७६ ॥

आद्ये गन्धादयोप्येवमभिन्नाः पुष्पवर्तिनः ।
अक्षभेदेन तद्‌भेदे वृत्तिभेदात्तयोर्भिदा ॥ ७७ ॥

सत्ववृत्तौ चित्सुखैक्यं तद्वृत्तेर्निर्मलत्वतः ।
रजोवृत्तेस्तु मालिन्यात्सुखांशोऽत्र तिरस्कृतः ॥ ७८ ॥
तिन्तिणीफलमत्यम्लं लवणेन युतं यदा ।
तदाम्लस्य तिरस्कारादीषदग्नं यथा तथा ॥ ७९ ॥
ननु प्रियतमत्वेन परमानन्दतात्मनि ।
विवेक्तुं शक्यतामेवं विना योगेन किं भवेत् ॥ ८० ॥

जो पुरुष साक्षी जो सर्वांत उत्तम प्रिय असा आत्मा त्याचें अनुसंधान करतो, त्याला तो अतिप्रिय आहे आणि त्याला पुत्रादिकांप्रमाणें नाशही नाहीं. ॥ ७१ ॥
आत्मा परप्रेमास्पद आहे म्हणून तो परमानंदरूपही आहे. सार्वभौमादि पदांपासून हिरण्यगर्भापर्यंत जसजशी प्रीतीची वृद्धि होते तसतशी सुखाचीही वृद्धि होते, असें बृहदारण्यकांत सांगितलें आहे. ॥ ७२ ॥
शिष्य – तुम्ही, म्हणता कीं आनंदरूपता हा आत्म्याचा स्वभावच आहे. पण चैतन्य जसे त्याचा स्वभाव म्हणता येईल तसे सुख हा त्याचा स्वभावच म्हणतां येत नाहीं. कारण तसें जर असतें तर सर्व बुद्धिवृत्तीच्या ठायीं चैतन्याप्रमाणे सुखाचीही व्याप्ति असती. पण तशी कांहीं दृष्टीस पडत नाही हे कसें ? ॥ ७३ ॥
गुरु – याला तुला एक दृष्टांत देतो, म्हणजे चांगले समजेल. दिव्याचा स्वभाव दोन प्रकारचा. एक उष्णता आणि दुसरा प्रकाश. परंतु सर्व घरांत प्रकाशाची जशी व्याप्ति असते, तशी उष्णतेची नसते. म्हणून काय तेथें उष्णता नाहीं म्हणता येईल काय ? त्याप्रमाणें बुद्धिवृत्तीच्याठायी चैतन्याचीच व्याप्ति असून कोठे कोठे सुखाची असते. ॥ ७४ ॥
शिष्य – चैतन्य आणि आनंद या दोन्हींचा अभेद आहे तर चैतन्य प्रकाश करणारी जी ही वृत्ति तीच आनंदालाही व्यक्त करील. गुरु – तसा कांहीं नियम नाही. कल्पना कर कीं, ज्यामध्ये गंध, रूप, रस, स्पर्श, असे चारीही गुण असलेला एक पदार्थ आहे, उदाहरणार्थ आंबाच कां घेईनास. आतां या आंब्याचे ज्ञान होण्यास एकाच इंद्रियाने भागत नाही. तर त्याचा गंधादिक प्रत्येक गुण समजण्यास घ्राणादिक निराळी इंद्रियेच पाहिजेत. एक गुण दुसऱ्या इंद्रियाने घेता येतच नाहीं. ॥ ७५
शिष्य – खरे, परंतु हां दृष्टांत बरोबर जुळत नाहींसे वाटतें. कारण गंधादिक गुणांमध्ये जसा परस्पर भेद आहे तसा चैतन्य आणि आनंद यांत मुळींच नाहीं. गुरु – चैतन्य आणि आनंद या दोन्हींचा अभेद जो तूं म्हणतोस तो काय साक्षीच्या ठिकाणी कीं दुसऱ्या ठिकाणी तें सांग. ॥ ७६ ॥
साक्षीचे ठायीं जर म्हणशील तर चैतन्य आणि आनंद यांचा जसा अभेद आहे तसा आंब्यामध्ये किंवा पुष्पामध्येंही गंधादि गुणांचा अभेदच आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी जर म्हणशील तरी आमचा दृष्टांत तसाच जुळतो. इंद्रिये भिन्न भिन्न असल्यामुळें गंधादि गुणही भिन्न झाले. त्याप्रमाणें वृत्तिभेदाने चैतन्य आणि आनंद यांत भेद आला. ॥ ७७ ॥
शिष्य-मग चिदानंदाचें ऐक्य तरी कोठे दृष्टीस पडते ? गुरु – बुद्धीची जी सात्विक वृत्ति तीत चिदानंदाचे ऐक्य स्पष्ट भासते. कारण ती वृत्ति स्वच्छ आहे. परंतु राजस वृत्ति मलीन असल्यामुळें तिजमध्यें सुखांशाचा लोप होतो. ॥ ७८ ॥
यास दृष्टांत. चिंचेमध्यें मीठ घातले असतां त्याचा आंबटपणा जसा कमी होतो, त्याचप्रमाणे वृत्तीमध्ये रजोगुण मिळाल्यानें तिचाआनंद लोपनू जातो. ॥ ७९ ॥
शिष्य – आत्मा प्रियतम असल्यामुळें तो परमानंदरूप आहे असें विचाराअंती ठरलें, परंतु योगावाचून काय होणार ? ॥ ८० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *