सार्थ पंचदशी मराठी एकादशः परिच्छेदः- ब्रह्मानन्दे योगानंदः श्लोक १०१ ते १२०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

शनैः शनैरुपरमेद्बुद्ध्या धृतिगृहीतया ।
आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् ॥ १०१ ॥
यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।
ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ १०२ ॥
प्रशान्तमनसं ह्येनं योगिनं सुखमुत्तमम् ।
उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ १०३ ॥
यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।
यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ १०४ ॥
सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।
वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ १०५ ॥
यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।
यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ १०६ ॥
तं विद्याद्दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।
स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ १०७ ॥
युञ्जन्नेवं सदात्मानं योगि विगतकल्मषः ।
सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ १०८ ॥
उत्सेक उदधेर्यद्वत्कुशाग्रेणैकबिन्दुना ।
मनसो निग्रहस्तद्वद्‌भवेदपरिखेदतः ॥ १०९ ॥

बृहद्रथस्य राजर्षेः शाकायन्यो मुनिः सुखम् ।
प्राह मैत्राख्यशाखायां समाध्युक्तिपुरःसरम् ॥ ११० ॥

तें असे कीं, हे अर्जुना, हळू हळू धैर्ययुक्त बुद्धीने मनाचा उपरम करून आत्म्यावर त्याची स्थापना करावी. आणि मग कांहीं एक चिंतन न करतां स्वस्थ बसावे हाच योगाचा परमावधि. ॥ १०१ ॥
त्याचा क्रम असा कीं, ज्या ज्या विषयापासून मन उठून दुसऱ्या विषयाकडे धावते, तोच त्याला तेथून ओढून आणून बसवावे. कारण ते फार चंचळ आणि अस्थिर आहे. ॥ १०२ ॥
याप्रमाणे मन शांत झालें असतां मनामधील रजतमादि कल्मष नाहीसें होऊन हें सर्व ब्रह्मच आहे असें त्या योग्यास ज्ञान होऊन उत्तम सुखाची प्राप्ति होते. ॥ १०३ ॥
त्या वेळेस योगाभ्यासानें चित्ताचा निरोध झाल्याने त्याचा उपरम होऊन आत्म्याकडे त्याची दृष्टि परतते. आणि आपल्यामध्येच आपण तो सुख पावतो. ॥ १०४ ॥
तें सुख अतीद्रिंय असून केवळ बुद्धीस मात्र ग्राह्य असतें. याप्रमाणे एकदा आत्म्यावर योग्याचे मनाची स्थापना झाली असतां तो स्वरूपापासून ढळत नाहीं. ॥ १०५ ॥
अशी आत्मप्राप्ति झाल्यावर त्यापेक्षा त्याला दुसरा कोणचाही लाभ अधिक वाटत नाहीं. आणि एकदा त्याची आत्मस्वरूपाशी चिकाटी बसली ज्याने शस्त्रघातासारख्या भयंकर दुःखाच्यानेही त्याला तेधून हालविता येत नाही. ॥ १०६
या योगांत दुःखाचा संयोग मुळींच नाही. वैराग्ययुक्त चित्ताने मुमुक्षूने याचे अनुष्ठान करावे. ॥ १०७ ॥

याप्रमाणे सदा सर्वदा आत्म्याचें अनुसंधान करणारा पापरहित योगी आत्यंतिक जें ब्रह्मसुख तें अनायासानें पावतो. ॥ १०८ ॥

मनोनिग्रह कठिण आहे म्हणून बसून उपयोग नाहीं. टिट्टिभपक्ष्यानें समुद्राने नेलेली अंडी परत मिळावी म्हणून आपणामध्ये आणि समुद्रामध्ये अंतर मुळींच न पाहता कुशाग्रेकरून त्याचा एकेक बिंदू उपसण्याचा प्रयत्न धैर्य न सोडता चालविला असतां तो जसा शेवटीं सिद्धीस गेला, त्याप्रमाणें मनाचा निग्रहही खचित सिद्धीस जाईलच जाईल. ॥ १०९ ॥
मैत्रायणी नामक यजुःशाखेमध्ये शाकायन्य नामक मुनीने आपला शिष्य जो बृहद्रथ राजा यास समाधीने सुख प्राप्ति होते अशाविषयीं पुष्कळ उपदेश केला आहे. ॥ ११० ॥

यथा निरिन्धनो वह्निः स्वयोनावुपशाम्यति ।
यथा वृत्तिक्षयाच्चित्तं स्वयोनावुपशाम्यति ॥ १११ ॥

स्वयोनावुपशान्तस्य मनसः सत्यकामिनः ।
इन्द्रियार्थविमूढस्यानृताः कर्मवशानुगाः ॥ ११२ ॥
चित्तमेव हि संसारस्तत्प्रयत्‍नेन शोधयेत् ।
यच्चित्तस्तन्मयो मर्त्यो गुह्यमेतत्सनातनम् ॥ ११३ ॥
चित्तस्य हि प्रसादेन हन्ति कर्म शुभाशुभम् ।
प्रसन्नात्मात्मनि स्थित्वा सुखमक्षयमश्नुते ॥ ११४ ॥
समासक्तं यथा चित्तं जन्तोर्विषयगोचरे ।
यद्येवं ब्रह्मणि स्यात्तत्को न मुच्येत बन्धनात् ॥ ११५ ॥
मनो हि द्विविधं प्रोक्तं शुद्धं चाशुद्धमेव च ।
अशुद्धं कामसम्पर्काच्छुद्धं कामविवर्जितम् ॥ ११६ ॥
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।
बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥ ११७ ॥
समाधिनिर्धूतमलस्य चेतसो
निवेशितस्यात्मनि यत्सुखं भवेत् ।
न शक्यते वर्णयितुं गिरा तदा
स्वयं तदन्तःकरणेन गृह्यते ॥ ११८ ॥
यद्यप्यसौ चिरं कालं समाधिर्दुर्लभो नृणाम् ।
तथापि क्षणिको ब्रह्मानन्दं निश्चाययत्यसौ ॥ ११९ ॥
श्रद्धालुर्व्यसनी योऽत्र निश्चिनोत्येव सर्वथा ।
निश्चिते तु सकृत्तस्मिन् विश्वसित्यन्यदाप्ययम् ॥ १२० ॥

तेथें त्यांनीं असें सांगितलें आहे कीं, सर्व काष्ठादिक इंधन जळून गेल्यावर ज्वाला शांत होऊन अग्नि जसा नुसता तेजमात्र राहतो, त्याप्रमाणें घटपटाटिक वृत्तींचा क्षय झाला असतां चित्ताचे रजतमत्व जाऊन तें केवळ सात्विक होऊन राहते. यालाच मनोनाश म्हणतात. ॥ १११ ॥
याप्रमाणें आपल्या कारणाच्याठायीं मनाची शान्ति होऊन केवळ आत्म्याकडेच त्याचा ध्यास लागून विषयापासून तें परतले असतां अर्थातच कर्मापासून होणारी सर्व दुःखे मिथ्या ठरतात. ॥ ११२ ॥
कारण आमचा सर्व प्रपंच मनाचाच केलेला आहे. म्हणून त्या मनाचे शोधन प्रयत्‍नानें केलें पाहिजे. ज्या विषयाकडे मनुष्याचे मन लागलें तो तन्मय होतो. हें गूढ कांहीं आजकालचें नव्हे. तर अनादिकालापासून चालत आलें आहे. ॥ ११३ ॥
चित्ताची शद्धि होऊन ब्रह्मानुसंधान त्यास लागलें म्हणजे सर्व शुभाशुभ कर्मांचा नाश होऊन मनुष्याचें चित्त प्रसन्न होऊन आत्मस्वरूपीं त्याला अक्षय सुख मिळतें. ॥ ११४ ॥
प्राण्यांचे चित्त जसे विषयांवर लागलेले आहे, तसें ब्रह्मावर लागेल तर कोण बरें मुक्त होणार नाही ? ॥ ११५ ॥

मनाचे प्रकार दोन. एक शुद्ध आणि अशुद्ध. जेव्हां ते कामक्रोधांनी भरलेलें असतें तेव्हां तें अशुद्ध आणि त्याही करून रहित असते तेव्हां तें शुद्ध समजावे. ॥ ११६ ॥
मनुष्याच्या बंधमाक्षांस कारण मनच आहे. तें विषयासक्त झाल्याने मनुष्य बंधात पडतो. आणि तें निर्विषय झाल्याने मुक्त होतो. ॥ ११७ ॥
समाधीच्या अभ्यासानें ज्याचा मल धुवून टाकलेला आहे व ज्याचा प्रवेश आत्मस्वरूपीं झाला आहे, त्या चित्तास जें सुख होतें त्याचें वर्णन वाणीने करणें अशक्य आहे. तें स्वतः अन्तकरणानेंच ग्रहण करावयाचें. ॥ ११८ ॥

हा समाधि चिरकाल राहणे जरी कठिण आहे, तथापि तो क्षणभर मिळू शकतो, तेवढा ब्रह्मानंदाचा निश्चय करण्यास बस आहे. ॥ ११९ ॥
या आनंदाचा निश्चय होण्यास श्रद्धा आणि व्यसन ही दोन साधने अवश्य आहेत. व्यसन म्हणजे एका कामाच्या पाठीस लागलें असतां तें होई-पर्यंत चैन नसणे. तो एक केवळ निश्चय झाला असतां तो तसाच सर्वदा आहे, अशी खात्री होते. ॥ १२० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *