सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक १०१ ते १०९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अवज्ञातं सदद्वैतं निःशंकैरन्यवादिभिः ।
एवं का क्षतिर्रस्माकं तद्द्वैतमवजानताम् ॥ १०१ ॥
आम्ही येथें केवळ व्यावहारिक भेदाचा मात्र निरास करतों. इतर वाद्यांनीं जर आमच्या सद्‌रूप अद्वैत ब्रह्माची निशंकपणें अवज्ञा केली तर आम्हांलाही त्यांच्या द्वैताचा अनादर करण्यास कोणाची भीति आहे ? ॥१०१॥

द्वैतावज्ञा सुस्थिता चेदद्वैता धीः स्थिरा भवेत् ।
स्थैर्ये तस्याः पुमानेष जीवन्मुक्त इतीर्यते ॥ १०२ ॥
त्यांच्या अद्वैताच्या अनादराप्रमाणे आम्ही केलेला द्वैताचा अनादर निष्फळ नाहीं. हा द्वैताचा अनादर एकदां चित्तांत चांगला ठसला असतां अद्वैतबुद्धि स्थिर होते, व ती स्थिर झाली असतां मनुष्य जीवन्मुक्त होतो. ॥१०२॥

एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ १०३ ॥
याविषयीं गीतावाक्य प्रमाण आहे. भगवंतांनी अर्जुनास असें म्हटलें आहे की, है अर्जुना, या अद्वैतबुद्धीला ब्राह्मीस्थिति असें म्हणतात. ही प्राप्त झाली असतां प्राणी मोह पावत नाहीं; व या स्थितींत असल्यावर अंतकाळीं ब्रह्मप्रासि होते. ॥१०३॥

सदद्वैतेऽनृतद्वैते यदन्योऽन्यैक्यवीक्षणम् ।
तस्यान्तकालस्तद्‌भेदबुद्धिरेव न चेतरः ॥ १०४ ॥
येथें अंतकाळ या शब्दाचा अर्थ असा की, सद्‌रूप अद्वैत ब्रह्म आणि असद्‌रूप द्वैत ह्या दोन्हींचें भ्रमेंकरून जें ऐक्यज्ञान त्याचा जो अंतकाल तो समजावा. तो अंतकाल म्हटला म्हणजे द्वैत व अद्वैत या दोहोमधील भेंदबुद्धि होय. ॥१०४॥

यद्वान्तकालः प्राणस्य वियोगोस्तु प्रसिद्धितः ।
तस्मिन्कालेऽपि न भ्रान्तेर्गतायाः पुनरागमः ॥ १०५ ॥
अथवा अंतकाल या शब्दाचा जो लोकप्रसिद्ध अर्थ तो घेतला तरी चालेल. प्राणोत्क्रमणकालींही एकदां गेलेली भ्रांति पुनः परत येत नाही. ॥१०५॥

नीरोग उपविष्टो वा रुग्णो वा विलुठन्भुवि ।
मूर्च्छितो वा त्यजेदेष प्राणान्भ्रान्तिर्न सर्वथा ॥ १०६ ॥
हा मनुष्य रोगी असो, निरोगी असो, बसला असो, भुईवर लोळत पडला असो, प्राणत्यागकाली मूर्च्छित पडो, कसाही असो; तेथे भ्रांतीची शंकाच नाहीं. ॥१०६॥

दिने दिने स्वप्नसुप्त्योरधीते विस्मृतेऽप्ययम् ।
परेद्युर्नानधीतः स्यात्तत्त्वविद्या न नश्यति ॥ १०७ ॥
ज्याप्रमाणे प्रति दिवशीं केलेले वेदपठण स्वप्न व निद्रा यांमध्ये जरी विसरलें तरी दुसरे दिवशी आठवते, त्याप्रमाणें एकदां झालेलें ज्ञान नष्ट होत नाहीं. ॥१०७॥

प्रमाणोत्पादिता विद्या प्रमाणं प्रबलं विना ।
न नश्यति न वेदान्तात्प्रबलं मानमीक्षते ॥ १०८ ॥
शिवाय प्रमाणापासून उत्पन्न झालेलें ज्ञान दुसर्‍या प्रबल प्रमाणावांचून नाशपावत नाही. वेदांतापेक्षां तर दुसरें प्रमाणच नाहीं. ॥१०८॥

तस्माद्वेदान्तसंसिद्धं सदद्वैतं न बाध्यते ।
अन्तकालेऽप्यतो भूतविवेकान्निर्वृतिः स्थिता ॥ १०९ ॥
इति भूतविवेकनाम द्वितीयः परिच्छेदः ॥ २ ॥
तस्मात वेदांत प्रमाणांनीं सिद्ध केलेले जें अद्वैत तें कधींही बाधित होत नाहीं. म्हणून भूतविवेकापासून अंतकालीं मोक्षप्रासि होते. ॥१०९॥
भूतविवेक समाप्त.

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *