सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ८१ ते १००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

सतोऽनुवृत्तिः सर्वत्र व्योम्नो नेति पुरोदितम् ।
व्योमानुवृत्तिरधुना कथं नव्याहतं वचः ॥ ८१ ॥
पूर्वी असें सांगितलें आहे की, सताची जशी सर्वत्र अनुवृत्ति आहे, तशी आकाशाची नाहीं. पण आतां आकाशाची व्याप्ति वायूमध्यें दाखवितां; तेव्हां पूर्वोत्तर विरोध येतो, अशी कोणी शंका घेईल, ॥८१॥

छिद्रानुवृत्तिर्नेतीति पूर्वोक्तिरधुना त्वियम् ।
शब्दानुवृत्तिरेवोक्ता वचसो व्याहतिः कुतः ॥ ८२ ॥
तर त्याचें समाधान हेंच कीं, पूर्वी आम्ही जी व्याप्ती निवारिली, ती अवकाशलक्षण स्वरूपाची आणि आतां जी आम्ही सांगत आहों, ती केवळ शब्दरूप धर्माची म्हणून पूर्वोत्तर विरोध येत नाहीं. ॥८२॥

ननु सद्वस्तुपार्थक्यादसत्त्वं चेत्तदा कथम् ।
अव्यक्तमायावैषम्यादमायामयतापि नो ॥ ८३ ॥
याजवरही असा एक पूर्वपक्ष आहे कीं, वायूंतून सत्ता निराळी काढली असतां बाकी राहिलेलें वायूचें रूप निस्तत्त्व जसे आहे तसेंच अव्यक्त मायेपासून तें भिन्न असल्यामुळे त्यास मायाही म्हणतां येत नाहीं. ॥८३॥

निस्तत्त्वरूपतैवात्र मायात्वस्य प्रयोजिका ।
सा शक्तिकार्ययोस्तुल्या व्यक्ताव्यक्तत्वभेदिनोः ॥ ८४ ॥
तर याजवर आमचे अस समाधान आहे कीं, माया ही अव्यक्तच असली पाहिजे असें कांहीं नाहीं. निस्तत्त्वरूप हेंच मायेचें रूप, ते असलें म्हणजे झालें. माया व्यक्त असो, किंवा अव्यक्त असो, त्या दोहींलाही हें निस्तत्त्वरूप साधारणच आहे. ॥८४॥

सदसत्त्वविवेकस्य प्रस्तुतत्त्वात्सचिन्त्यताम् ।
असतोऽवान्तरो भेद आस्तां तच्चिन्तयात्र किम् ॥ ८५ ॥
परंतु प्रस्तुत या विचाराची जरूर नाहीं. तूर्त सत् कोणचें आणि असत् कोणचें याचा विवेक करणे आमचें काम आहे. असताचे जे अवांतर भेद आहेत त्यांचे काही येथें प्रयोजन नाहीं. ॥८५॥

सद्वस्तुब्रह्मशिष्टोंऽशोवायुर्मिथ्या यथा वियत् ।
वासयित्वा चिरं वायोर्मिथ्यात्वं मरुतं त्यजेत् ॥ ८६ ॥
याकरिता वायूचे ठायीं जो सत्तारूप अंश आहे, तो वजा जातां बाकी उरलेला जो वायूचा अंश तो आकाशाप्रभाणे मिथ्या आहे. हें वायूचे मिथ्यात्व चित्तामध्ये ठसवून बुद्धीनें वायूचा त्याग करावा. ॥८६॥

चिन्तयेद्वह्निमप्येवं मरुतो न्यूनवर्तिनम् ।
ब्रह्माण्डावरणेष्वेषां न्यूनाधिकविचारणा ॥ ८७ ॥
याचप्रमाणें वायूपेक्षां न्यूनदेशी असणारा जा वन्हि त्याचें चिंतन करावे, म्हणजे सत्तारूप अंश वजा केला असतो अवशिष्ट वन्हि मिथ्या आहे असा दृढ निश्चय करावा. हा न्यूनाधिक विचार बह्मांडावरणाचेठायीं दृष्टीस पडतो. ॥८७॥

वायोर्दशांशतोन्यूनोवह्निर्वायौ प्रकल्पितः ।
पुराणोक्तं तारतम्यं दशांशैर्भूतपञ्चके ॥ ८८ ॥
वायूच्या दहाव्या हिश्शानें वायूच्या ठायीं अग्नि असतो हें पंचभूतांचें एकाहून एक दशांशेंकरून न्यूनत्व पुराणांत सांगितलें आहे. ॥८८॥

वह्निरुष्णप्रकाशात्मा पूर्वानुगतिरत्र च ।
अस्ति वह्निः सनिस्तत्त्वः शब्दवान्स्पर्शवानपि ॥ ८९ ॥
वन्हीचें स्वरूप उष्ण प्रकाशात्मक आहे. वन्हि आहे यांत सत्तारूप धर्म आला तो एकीकडे सारून, वन्हि निराळा केला असतां तो निस्तत्त्व शब्दवान् आणि स्पर्शवान् आहे असे दिसेल. ॥८९॥

सन्मयाव्योमवाय्वंशैर्युक्तस्याग्नेर्निजो गुणः ।
रूपं तत्र सतः सर्वमन्यद्बुद्ध्या विविच्यताम् ॥ ९० ॥
याप्रमाणें सत्ता, माया, आकाश व वायु या सर्व अंशांहींकरून युक्त जो अग्नि त्याचें स्वतःचा गुण रूप होय; त्याची निवड बुद्धीनें करावी. ॥९०॥

सतो विवेचिते वह्नौ मिथ्यात्वे सति वासिते ।
आपो दशांशतो न्यूनाः कल्पिता इति चिन्तयेत् ॥ ९१ ॥
सत्तेपासून अग्नीची निवड करून त्याचें मिथ्यात्व चित्तांत ठसलें असतां उदक हें अग्नीहून दशांशानें कमी आहे असें कल्पावें. ॥९१ ॥

सन्त्यापोऽमूः शून्यतत्त्वाः सशबदस्पर्शसंयुताः ।
रूपवत्योऽन्यधर्मानुवृत्या स्वीयो रसो गुणः ॥ ९२ ॥
पाणी आहे या व्यवहारास कारणीभत जी सत्ता ती वेगळी करून पाहिलें असतां बाकी राहिलेले उदक हें अगदी निस्तत्त्व आहे. यांत शब्द, स्पर्श, रूप हे तीन गुण बाकीच्या भूतांचे असून रस हा पाण्याचा स्वकीय गुण आहे. ॥९२॥

सतो विवेचितास्वप्सु तन्मिथ्यात्वे च वासिते ।
भूमिर्दशांशतो न्यूना कल्पिताप्स्विति चिन्तयेत् ॥ ९३ ॥
सत्तेपासून पाणी पृथक् करून त्याचेंही मिथ्यात्व चित्तांत ठसले असतां त्याहून दशांशानें कमी असणारी जी पृथ्वी तिचें चिंतन करावे. ॥९३॥

अस्ति भूस्तत्त्वशून्यास्याः शब्दस्पर्शौ स्वरूपकौ ।
रसश्च परतो नैजो गन्धः सत्ता विविच्यताम् ॥ ९४ ॥
पृथ्वी आहे या व्यवहारास कारणीभूत जी सत्ता ती निराळी करून बाकी राहिलेली पृथ्वी निस्तत्व आहे. शब्द, स्पर्श, रूप आणि रस हे चार गुण तिजमध्यें इतर भूतांचे असून गंध हा तिचा स्वकीय गुण आहे. ॥९४ ॥

पृथक्कृतायां सत्तायां भूमिर्मिथ्यावशिष्यते ।
भूमेर्दशांशतो न्यूनं ब्रह्माण्डं भूमिमध्यगम् ॥ ९५ ॥
तिजपासून सत्ता निराळी करून तिचें मिथ्यात्त्व चांगले ठसल्यानंतर तिजहून दशांशाने कमी असे तिच्या मध्यभागीं असणारे ब्रह्मांड, ॥९५ ॥

ब्रह्माण्डमध्ये तिष्ठन्ति भुवनानि चतुर्दश ।
भुवनेषु वसन्त्येषु प्राणिदेहा यथायथम् ॥ ९६ ॥
व त्या ब्रह्मांडांत चतुर्दश भुवनें आहेत. त्या भुवनांमध्यें प्राण्यांचे देह आहेत. ॥९६॥

ब्रह्माण्डलोकदेहेषु सद्वस्तुनि पृथक्कृते ।
असन्तोऽण्डादयो भान्तु तद्‌भानेऽपीह का क्षतिः ॥ ९७ ॥
या सर्वाहून सद्‌वस्तू वेगळी केली असतां बाकीचे अंडादिक मिथ्या ठरतात. तीं डोळयांस जरी भासली तरी तीं मिथ्याच समजावीं. ॥९७॥

भूतभौतिकमायानामसमत्वेऽत्यन्तवासिते ।
सद्वस्त्वद्वैतमित्येषा धीर्विपर्येति न क्वचित् ॥ ९८ ॥
पंचभूते व त्यांपासून झालेली बह्मांडें व या दोहोंस कारणीभूत जी मायाशक्ति यांचें मिथ्यात्व विवेक व ध्यान यांच्या योगानें एकदी चित्तांत चांगलें ठसले असतां सद्‌वस्तूच अद्वैत आहे असा निश्चय चित्तांतून कधींही ढळणार नाहीं. ॥९८॥

सदद्वैतात्पृथग्भूते द्वैते भूम्यादिरूपिणि ।
तत्तदर्थक्रिया लोके यथा दृष्टा तथैव सा ॥ ९९ ॥
सद्‌रूपापासून वेगळी केलेली भूम्यादिक द्वैतसृष्टि मिथ्या ठरली असतां तत्त्ववेत्त्याचा व्यवहार अगदी बंद पडेल अशी शंका कोणी घेऊं नये. पदार्थ मिथ्या ठरल्यानें व्यवहार बंद पडतो असें समजणें ही मोठी चूक आहे. ज्या ज्या कामाकरिता जी जी क्रिया पाहिजे, ती ती क्रिया यथास्थित चालण्यास जगन्मिथ्यात्वामुळें मुळींच नड येत नाहीं. ॥९९॥

सांख्यकाणादबौद्धाद्यैर्जगद्‌भेदो यथा यथा ।
उत्प्रेक्ष्यतेऽनेकयुक्त्या भवत्वेष तथा तथा ॥ १०० ॥
सांख्य, कणाद, बौद्ध आदिकरून जे वादी होऊन गेले, त्यांनीं निरनिराळ्या रीतीनें जसजसें भेदाचे प्रतिपादन केलें आहे, त्या सर्वांचे खंडन करण्याचें आमचें काम नाहीं. त्यांचें मत तूर्त आहे तसेंच असूं दे. ॥१०० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *