26-12
अमृताचिया सागरीं । जे लाभे सामर्थ्याची थोरी । तेचि दे अमृतलहरी । चुळीं घेतलेया ॥26॥
अमृताच्या समुद्रात अमर करण्याचे जे थोर सामर्थ्य असते, तेच त्याच्या एका लहरीतून निघालेल्या चूळभर अमृतातही असते.
27-12
हे कीर माझ्या चित्तीं । प्रतीति आथि जी निरुती । परि पुसणें योगपती । तें याचिलागीं ॥27॥
अर्जुन म्हणतो, भगवंता ! त्याप्रमाणेच तुझी व्यक्त व अव्यक्त ही दोन्ही स्वरूपे पूर्ण ब्रह्मस्वरूप आहेत, असाच माझ्या चित्ताचा निश्चित अनुभव आहे; पण योगपती देवा ! तुम्ही जे थोडा वेळ व्यापकरूप धारण केले, तेच तुमचे खरे स्वरूप होय,
28-12
जें देवा तुम्हीं नावेक । अंगिकारिलें व्यापक । तें साच कीं कवतिक । हें जाणावया ॥28॥
की क्षणभर त्या स्वरूपाचे लीला कौतुक मला दाखविले, हे जाणून घेण्याकरिता मी पुढील प्रश्न विचारीत आहे.
29-12
तरी तुजलागीं कर्म । तूंचि जयांचें परम भक्तीसी मनोधर्म । विकोनि घातला ॥29॥
ज्यांची सर्व कर्मे तुझ्याकरिता होतात, ते तुलाच आपली परमगती समजतात, त्यांचे सर्व मनोविकार देखील तुझ्या एक प्रेमाकरिताच उठतात.
30-12
इत्यादि सर्वीं परीं । जे भक्त तूंतें श्रीहरी । बांधोनियां जिव्हारीं । उपासिती ॥30॥
हे भगवंता ! याप्रमाणे तुझ्या ठिकाणी सर्वभाव समर्पण करून व तुला अंतःकरणांत साठवून, जे भक्त तुझ्या एकदेशीय साकारस्वरूपाची उपासना करतात.
31-12
आणि जें प्रणवापैलीकडे । वैखरीयेसी जें कानडें । कायिसयाहि सांगडें । नव्हेचि जें ॥31॥
आणि जे ज्ञानी पुरुष प्रणवाच्या पलिकडे असलेल्या, शब्दाचा विषय न होणार्या, किंवा जे कशासारखे आहे असे दाखविता न येणार्या-
32-12
तें अक्षर जी अव्यक्त । निर्देश देशरहित । सोहंभावे उपासित । ज्ञानिये जे॥32॥
अविनाशी, ईंद्रियातित, संपूर्ण दोषरहित-म्हणजे शुध्द- देशांनी मर्यादित नसलेल्या, तुझ्या व्यापक स्वरूपाची सोहंभावाने “मी तैं ब्रह्म आहे” अशा ध्यानाने उपासना करतात.
33-12
तयां आणि जी भक्तां । येरयेरांमाजी अनंता । कवणें योगु तत्त्वतां । जाणितला सांगा ॥33॥
असे जे ज्ञानी भक्त या दोहोंमध्यें, अनंता ! खरें ऐक्याचें स्वरूप कोण जाणतो, हे मला सांग.
34-12
इया किरीटीचिया बोला । तो जगद्बंधु संतोषला । म्हणे हो प्रश्नु भला । जाणसी करूं ॥34॥
असे अर्जुनाचे भाषण ऐकून तो जगद्बंधु परमात्मा श्रीकृष्ण अत्यंत संतुष्ट झाला व म्हणाला अर्जुना ! उत्तम प्रश्न कसा करावा हें तूंच जाणतोस.
श्री भगवानुवाच
। मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धा परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः॥12.2॥
श्रीकृष्ण म्हणाले माझे ठिकाणी मन ठेऊन नित्य युक्त होवून अतिशय श्रद्धेने युक्त असे जे माझी उपासना करतात ते सर्वात उत्कृष्ट योगी असे मी समजतो.॥12-2॥
35-12
तरी अस्तुगिरीचियां उपकंठीं । रिगालिया रविबिंबापाठीं । रश्मी जैसे किरीटी । संचरती ॥35॥
सूर्यबिंब अस्ताचलाच्या आड झाले असतां, सूर्यबिंबाच्यामागून ज्याप्रमाणे अर्जुना ! त्याची किरणेही जातात,
36-12
कां वर्षाकाळीं सरिता । जैसी चढों लागें पांडुसुता । तैसी नीच नवी भजतां । श्रद्धा दिसे ॥36॥
किंवा अर्जुना ! पावसाळ्यांत जसा नदीला पूर येतो, त्याप्रमाणे माझे भजन करीत असतांना ज्याचे ठिकाणी नित्य नवी श्रध्दा किंवा वाढते प्रेम दिसून येतें.
37-12
परी ठाकिलियाहि सागरु । जैसा मागीलही यावा अनिवारु । तिये गंगेचिये ऐसा पडिभरु । प्रेमभावा ॥37॥
ज्याप्रमाणे गंगा समुद्रास मिळाल्यानंतरहि तिच्या मागच्या प्रवाहाचे वेग सारखे वाहतच असतात, त्याप्रमाणे ज्याच्या प्रेमभावाचा भगवंताकडे अखंड सारखा वेग असतो,
38-12
तैसें सर्वेंद्रियांसहित । मजमाजीं सूनि चित्त । जे रात्रिदिवस न म्हणत । उपासिती ॥38॥
त्याप्रमाणे सर्व इंद्रियांसह माझ्या ठिकाणी चित्त ठेऊन – म्हणजे एक मलाच आपल्या सर्व इंद्रियांसह मनाचा विषय करून – जे अहोरात्र न पाहतां माझी उपासना करतात.
39-12
इयापरी जे भक्त । आपणपें मज देत । तेचि मी योगयुक्त । परम मानीं ॥39॥
याप्रमाणे ज्या भक्तांनी आपल्याला माझ्या ठिकाणी संपूर्ण समर्पण केले, तेच माझ्याशी अत्यंत ऐक्य पावले, असे मी समजतो.
ये त्वक्षर्मनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवं ॥12.3॥
अर्थ तथापि जे अक्षर, अनिर्देश्य, अव्यक्त, सर्वव्यापी, अचिंत्य. अविकारी, अचल, ध्रुव,॥12-3॥
40-12
आणि येर तेही पांडवा । जे आरूढोनि सोऽहंभावा । झोंबती निरवयवा । अक्षरासी ॥40॥
अर्जुना ! आणि दुसरें जे “ब्रह्म मी आहे” अशा वृत्तीचा अभिमान धरून निरवयव व अविनाशी अशा ब्रह्मस्वरूपाला कवटाळतात.
41-12
मनाची नखी न लगे । जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे । ते इंद्रियां कीर जोगें । कायि होईल ?॥41॥
ज्या अव्यक्त परब्रह्मवस्तूचे ठिकाणी मनाचा स्पर्श देखील होऊ शकत नाही व बुध्दीची दृष्टी प्रवेश करू शकत नाही, मग इंद्रियांनी ग्रहण करण्याजोगे होईल काय?
42-12
परी ध्यानाही कुवाडें । म्हणौनि एके ठायीं न संपडे । व्यक्तीसि माजिवडें । कवणेही नोहे ॥42॥
इतकेच नाही, तर ती एखाद्या मर्यादित वस्तू प्राप्त करून घेण्याजोगी नसल्यामुळे, त्याचे ध्यानही होणे शक्य नाही.
43-12
जया सर्वत्र सर्वपणें । सर्वांही काळीं असणें । जें पावूनि चिंतवणें । हिंपुटी जाहलें ॥43॥
जी वस्तू सर्वत्र, सर्वभावाने व सर्वकाळी आहे असे पाहून, चिंतनही अत्यंत कष्टी होते – म्हणजे चिंतनही करता येत नाही.
44-12
जें होय ना नोहे । जें नाहीं ना आहे । ऐसें म्हणौनि उपाये । उपजतीचि ना ॥44॥
जी उत्पन्न होत नाही किंवा नाहीशी होत नाही, जी नाही किंवा आहे म्हणता येत नाही. असे असल्यामुळे जिच्या प्राप्तीचे उपायच उत्पन्न होत नाहीत,
45-12
जें चळे ना ढळे । सरे ना मैळे । तें आपुलेनीचि बळें । आंगविलें जिहीं ॥45
जी इकडे क्षुब्ध पावत नाही किंवा हालत नाही आणि जी संपत नाही व मलीनही होत नाही, अशी परब्रह्मवस्तू ज्यांनी “तेच मी आहे” या वृत्तीच्या अभ्यासबळाने आपल्या ठिकाणी प्राप्त करून घेतली
सन्नियम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ॥12.4॥
अर्थ अशा ब्रह्माची, इंद्रियसमुदायांचे नियमन करून सर्वत्र समान बुद्धी ठेवणारे व सर्वभूतांचे हित त्यामध्ये रत असणारे, उपासना करतात ते देखील माझ्याप्रतच येतात.॥12-4॥
46-12
पैं वैराग्यमहापावकें । जाळूनि विषयांचीं कटकें । अधपलीं तवकें । इंद्रियें धरिलीं ॥46॥
ज्यांनी वैराग्यरूपी अत्यंत प्रखर अग्नीत पंचविषयांचे समूह जाळून, त्या अग्नीने होरपळलेली इंद्रिये धैर्याने आवरून ठेवली.
47-12
मग संयमाची धाटी । सूनि मुरडिलीं उफराटीं । इंद्रियें कोंडिलीं कपाटीं । हृदयाचिया ॥47॥
आणि ज्यांनी मग त्यांना संयमाच्या (धारणा, ध्यान व समाधी यांच्या) मार्गात घालून म्हणजे त्यांना त्यांचा (संयमाचा) अभ्यास लावून ह्रदयाकडे मुरडवून ह्रदयाच्या पोकळीत कोंडले.
48-12
अपानींचिया कवाडा । लावोनि आसनमुद्रा सुहाडा । मूळबंधाचा हुडा । पन्नासिला ॥48॥
ज्यांनी अपानवायूच्या तोंडाशी वज्रासनाची दृढमुद्रा लावून मूळबंधाचा किल्ला बांधला.
49-12
आशेचे लाग तोडिले । अधैर्याचे कडे झाडिले । निद्रेचें शोधिलें । काळवखें ॥49॥
ज्यांनी आशेचे संबंध तोडून टाकले, अधीरपणाचे कडे दूर करून निद्रारूप अंधार नाहीसा केला. आणि तिचा काळोख नाहीसा केला- म्हणजे
50-12
वज्राग्नीचिया ज्वाळीं । करूनि सप्तधातूंची होळी । व्याधींच्या सिसाळीं । पूजिलीं यंत्रें ॥50॥
वज्रासनाच्या योगाने पेटलेल्या अग्नीच्या ज्वाळेत सप्त धातू (रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व रेत) यांची होळी करून व्याधींच्या मुंडक्यांचे यंत्रांना बळी देऊन त्यांचे पूजन केले.