सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

तथा सद्वस्तुनो भेदत्रयं प्राप्तं निवार्यते ।
ऐक्यावधारणद्वैतप्रतिषेधैस्त्रिभिः क्रमात् ॥ २१ ॥
हे तीन भेद सद्‌वस्तूचे ठायीं मुळींच संभवत नाहीत असें दाखविण्याकरितां ऐक्य, अवधारणा, आणि द्वैतप्रतिनिषेध हे तीन अर्थ दाखविणार्‍या तीन पदांनीं श्रुतीनें वरील भेदत्रयाचें निवारण केलें. ॥२१॥

सतो नावयवाः शंक्यास्तदंशस्यानिरूपणात् ।
नामरूपे न तस्य अंशौ तयोरद्याप्यनुद्‌भवात् ॥ २२ ॥
तें असें कीं, सद्‌वस्तूला अवयवाची शंका मुळींच नसल्यामुळे स्वगत भेद संभवत नाहीं. नाम-रूपे त्याचे अंश आहेत असें कोणी म्हणेल तर सृष्टीपूर्वी त्यांचा उद्‌भवच नव्हता. ॥२२॥

नामरूपोद्‌भवस्यैव सृष्टित्वात्सृष्टितः पुरा ।
न तयोरुद्‌भवस्तस्मात्सन्निरंशं यथा वियत् ॥ २३ ॥
नामरूपें उद्‌भवणें यालाच सृष्टि म्हणतात, म्हणून सृष्टीच्या पूर्वी त्या नामरूपांचा उद्‌भव मुळीच नव्हता, हें उघड आहे. यास्तव, नामरूप हे सद्‌वस्तूचे अंश हें संभवत नाहीं. तस्मात सद्‌वस्तु निरंश असल्यामुळे स्वगतभेदशून्य आहे हे सिद्ध झाले. ॥२३॥

सदन्तरं सजातीयं न वैलक्षण्यवर्जनात् ।
नामरूपोपाधिभेदं विना नैव सतो भिदा ॥ २४ ॥
स्वगतभेदाप्रमाणेंच सजातीयभेदही सद्‌वस्तुचेठायीं ठरूं शकत नाहीं. कारण सजातीय भेदाला दुसरी एक सद्‌वस्तु पाहिजे. पण ती तर कोठे दिसत नाहीं. येथे कोणी अशी शंका घेतील कीं, घटसत्ता, पटसत्ता असे सद्‌वस्तूचे भेद अनेक दृष्टीस पडतात. परंतु हे भेद घटाकाश, मठाकाश इत्यादि आकाशभेदाप्रमाणें केवळ औपाधिक आहेत; वस्तुतः नव्हेत. याकरिता नामरूपसंबंधीं उपाधिभेदावांचून सद्‌वस्तूस वास्तविक सजातीयभेद नाहीं असें सिद्ध झालें. ॥२४॥

विजातीयमसत्तत्तु न खल्वस्तीति गम्यते ।
नास्यातः प्रतियोगित्वं विजातीयाद्‌भिदा कुतः ॥ २५ ॥
आतां तिसरा विजातीयभेद. तो सद्‌वस्तूस नाहीं असें सांगण्याची मुळींच जरूर नाहीं. कारण सताला विजातीय काय ते असत्, तें आहे असे मुळीच म्हणतां येत नाहीं. याकरिता यास दुसरे प्रतियोगी नसल्यामुळे विजातीय भेदाचा मुळीच संभव नाहीं. ॥२५॥

एकमेवाद्वितीयं सत्सिद्धमत्र तु केचन ।
विह्वला असदेवेदं पुरासीदित्यवर्णयन् ॥ २६ ॥
याप्रमाणें एकम्, एव आणि अद्वितीय या तीन पदांचा अर्थ झाला. परंतु कित्येक लोक भांबावून या श्रुतीचा अर्थ उलट करितात. ते म्हणतात कीं, सृष्टीपूर्वी कांहींच नव्हतें. ॥२६॥

मग्नस्याब्धौ यथाऽक्षाणि विह्वलानि तथाऽस्य धीः ।
अखण्डैकरसं श्रुत्वा निःप्रचारा बिभेत्यतः ॥ २७ ॥
ज्याप्रमाणे समुद्रांत बुडालेल्या मनुष्याचे डोळे भांबावून जातात, त्याप्रमाणें या मूढ लोकांची बुद्धि अखंड एकरसाचे श्रवण करून तिला आधार कांहींच न सांपडल्यामुळें भांबावून जाते. ॥२७॥

गौडाचार्या निर्विकल्पे समाधावन्ययोगिनाम् ।
साकारध्याननिष्ठानामत्यन्तं भयमूचिरे ॥ २८ ॥
हा अद्वैतविषयच तसा आहे. सगुण ब्रह्माचे ध्यान करणारे योगी निर्विकल्प समाधींत भांबावून जातात असें गौडापादाचार्यांनींही सांगितलें आहे. ॥२८॥

अस्पर्शयोगो नामैष दुर्दर्शः सर्वयोगिभिः ।
योगिनो बिभ्यति ह्यस्मादभये भयदर्शिनः ॥ २९ ॥
त्यांच्या वार्तिकांत असें सांगितले आहे कीं, हा अस्पर्श योगाख्य समाधि सगुण योग्यांना मोठा कठिण जातो. ज्याप्रमाणें निर्जन अरण्यांत मुले भितात, त्याप्रमाणें निर्विकल्प समाधींत वस्तुतः भय नसूनही योगी घाबरतात. ॥२९॥

भगवत्पूज्यपादाश्च शुष्कतर्कपटूनमून् ।
आहुर्माध्यमिकान्भ्रान्तानचिन्त्येऽस्मिन्सदात्मनि ॥ ३० ॥
हे शुष्कतर्कपटु जे माध्यमिक ते अचिंत्य ब्रह्मस्वरूपीं भांबावून जातात असे आचार्यांनीही म्हटले आहे. ॥३०॥

अनादृत्य श्रुतिं मौर्ख्यादिमे बौद्धस्तपस्विनः ।
आपेदिरे निरामत्वमनुमानैकचक्षुषः ॥ ३१ ॥
याविषयीं आचार्यांनी असे म्हटले आहे कीं, हे तमोगुणी बौद्ध मूर्खपणानें श्रुतीचा अनादर करून केवळ अनुमानाच्या दृष्टीनें शून्यत्व प्रतिपादन करतात. ॥३१॥

शून्यमासीदिति ब्रूषे सद्योगं वा सदात्मताम् ।
शून्यस्य न तु तद्युक्तमुभयं व्याह तत्त्वतः ॥ ३२ ॥
या शून्यवाद्यास आम्ही असे पुसतो कीं, सृष्टीपूर्वीं शून्य होते असे जें तू म्हणतोस तें काय शून्य सद्‌रूप आहे, कीं ते सत्तेने युक्त आहे ? या दोन्ही गोष्टी शून्यास संभवत नाहींत. ॥३२॥

न युक्तस्तमसा सूर्यो नापि चासौ तमोमयः ।
सच्छून्ययोर्विरोधित्वाच्छून्यमासीत्कथं वद ॥ ३३ ॥
सूर्य तमानें युक्तही नाहीं व तमाचा केलेलाही नाहीं. प्रकाश-तमाप्रमाणें सत्ता आणि शून्य ही एकमेकांची विरोधी आहेत. तेव्हां शून्य होतें असे कसे म्हणता येईल ? ॥३३॥

वियदादेर्नामरूपे मायया सति कल्पिते ।
शून्यस्य नामरूपे च तथा चेज्जीव्यतां चिरम् ॥ ३४ ॥
आतां तूं असे कदाचित् म्हणशील कीं, ‘सद्‌रूप ब्रह्माचे ठायीं आकाशादि पंच भूतांना जशी मायेनें नामरूपें कल्पिलेलीं आहेत. तशीं शून्यालाही कल्पिली आहेत.’ तर तें आम्हांला इष्टच आहे. ॥३४॥

सतोऽपि नामरूपे द्वे कल्पिते चेत्तदा वद ।
कुत्रेति निरधिष्ठानो न भ्रमः क्वचिदीक्ष्यते ॥ ३५ ॥
सतालाही नामरूपें कल्पिली अशी जर शंका घेशील. तर ती मात्र अगदी बरोबर नाही. कारण, सताला नामरूपें कल्पिली असें तूं म्हणतोस त्याजवर आम्ही असे विचारितों कीं, तीं नामरूपें कशावर कल्पिली, काय सतावर कीं असतावर कीं जगावर ? पहिला पक्ष मुळींच संवभत नाहीं. कारण कल्पना जी करावयाची ती एका पदार्थावर दुसर्‍या पदार्थाची केली पाहिजे. म्हणून सतावर सताचीच कल्पना म्हणणें योग्य नव्हे. असतावर मुळींच संभवत नाहीं. तिसरा पक्षही तसाच खंडित होतो. कारण सतापासून उत्पन्न झालेले जग सन्नामरूप कल्पनेस अधिष्ठान कसें होईल ? ॥३५॥

सदासीदिति शब्दार्थभेदे द्वैगुण्यमापतेत् ।
अभेदे पुनरुक्तिः स्यान्मैवं लोके तथेक्षणात् ॥ ३६ ॥
असतच होतें असे म्हणण्यास जसा व्याहृतिदोष येतो, तसा सत् होतें अशा वाक्यांतही एक दोष आमचे प्रतिपक्षी कदाचित् आणतील. तो हा कीं, सद् होते या दोन शब्दांच्या अर्थामध्ये भेद असेल तर अद्वैतहानी होते. आणि अभेद असेल तर पुनरुक्तीचा दोष येतो. ॥३६॥

कर्तव्यं कुरुते वाक्यं ब्रूते धार्यस्य धारणम् ।
इत्यादिवासनाविष्टं प्रत्यासीत्सदितीरणम् ॥ ३७ ॥
या पूर्वपक्षावर आमचें असें उत्तर आहे कीं, वरील अर्थामध्ये अभेदच घेतला पाहिजे. असा अर्थ केला असतां जो पुनरुक्तीचा दोष तुम्ही आणूं पाहतां तो येऊ शकत नाहीं. कारण अशा प्रकारचे प्रयोग लोकरूढींत असून ते दोषास पात्र होत नाहीत. जसें तो कर्तव्य करतो, तो बोलणें बोलतो, धरण्यास योग्य वस्तूचे धरणे असे म्हणण्याचा परिपाठ आहे. व अशीं वाक्यें ऐकण्याचा ज्यांना संस्कार झाला आगे अशा त्या श्वेतकेतूला उद्देशून ’सत् आसीत्’ असे म्हटले आहे. ॥ ३७ ॥

कालाभावे पुरेत्युक्तिः कालवासनयायुतम् ।
शिष्यं प्रत्येव तेनात्र द्वितीयं न हि शंक्यते ॥ ३८ ॥
अद्वितीय वस्तूचे ठिकाणी कालाचीही प्रवृत्ति होत नसताना ’अग्रे’ असा कालनिर्देश कसा केला ? यावर सांगतात – प्रलयावस्थेंत काल नसतांनाही ’सृष्ट्युत्पत्तीपूर्वी’ असे जे म्हटले आहे ते कालाच्या वासनेने युक्त असलेल्या शिष्याला उदेशून आहे. म्हणून त्यावेळी द्वैताच्या अस्तित्वाविषयी शंका घेतां येत नाही. ॥ ३८ ॥

चोद्यं वा परिहारो वा क्रियतां द्वैतभाषया ।
अद्वैतभाषया चोद्यं नास्ति नापि तदुत्तरम् ॥ ३९ ॥
अद्वैत सिद्धान्ताविषयी शंका घेणे व तिचे समाधान करणे ही दोन्हीं द्वैत भाषेने करावी. कारण अद्वैत भाषेनें प्रश्नकरतां येत नाही व तसेंच उत्तरही देतां येत नाही. ॥ ३९ ॥

अतस्तिमितगम्भीरं न तेजो न तमस्ततम् ।
अनाख्यमनभिव्यक्तं सत्किंचिदवशिष्यते ॥ ४० ॥
प्रलयकाली निश्चल व गंभीर, प्रकाशही नव्हे व अंधकारही नव्हे, पण सर्वव्यापी, बोलतां न येण्यासारखे, व अगदी अस्पष्ट असे कांही सत्तारूप अवशिष्ट राहते. हे बृहद्‌योगवसिष्ठांतील वसिष्ठांचे वचन आहे. त्यांनी रामाला प्रलयकालच्या अवस्थेचा बोध केला आहे. त्यावेळी काय असते हे शब्दांनी सांगता येत नाही. तो प्रकाश म्हणावा तर प्रकाशध्र्मरहित व तम म्हणावे तर तेंही नव्हे. असे काही अनिर्वाच्य पण सद्‌रूप, विद्यमान अस्तित्वरूप असते. ॥ ४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *