सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २२६ ते २५० पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

226-14
इयाचि परी देख । तमसत्त्व अधोमुख । बैसोनि जैं आगळीक । धरी रज ॥226॥
हे पहा, याचप्रमाणे ज्यावेळी तमोगुण व सत्वगुण खाली तोंड करून बसतात (कमी होतात) व रजोगुण ज्यावेळेला वृद्धी पावतो.
(रजोगुणाचे लक्षण)
227-14
आपलिया कार्याचा । धुमाड गांवीं देहाचा । माजवी तैं चिन्हांचा । उदयो ऐसा ॥227॥
तेव्हा रजोगुण शरीररूप गावात आपल्या कार्याचा धुमाकूळ घालतो. त्यावेळी शरीरात लक्षणांचा असा उदय होतो.
228-14
पांजरली वाहुटळी । करी वेगळ वेंटाळी । तैसी विषयीं सरळी । इंद्रियां होय ॥228॥
पसरलेली वाहुटळ निरनिराळ्या पदार्थांचे (बरे वाईट न पहाता) एकीकरण करते, त्याप्रमाणे इंद्रियांना विषयांमधे मोकळीक असते.
229-14
परदारादि पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे । मग शेळियेचेनि तोंडें । सैंघ चारी ॥229॥
परस्त्री वगैरेशी प्रसंग आला असता या गोष्टी शास्त्रनिषिद्ध आहेत असे त्यास वाटत नाही व मग तो शेळीप्रमाणे इंद्रियांना बरे वाईट विषय सरसकट चरतो.
230-14
हा ठायवरी लोभु । करी स्वैरत्वाचा राबु । वेंटाळितां अलाभु । तें तें उरे ॥230॥
येथपर्यंत त्या रजोगुणी पुरुषाचा लोभ स्वेच्छाचारीपणाचा धुमाकूळ घालतो व दुसर्‍याच्या वस्तु लुबाडताना जेवढ्या वस्तू प्राप्त ककरून घेणे अशक्य असते, तेवढ्याच वस्तू शिल्लक रहातात.

231-14
आणि आड पडलिया । उद्यम जाती भलतिया । प्रवृत्ती धनंजया । हातु न काढी ॥231॥
आणि अर्जुना, कोणताही धंदा समोर आला असता, करण्याचा प्रसंग आला असता, तो धंदा करण्याविषयीचा मनाचा कल मागे घेत नाही.
232-14
तेवींचि एखादा प्रासादु । कां करावा अश्वमेधु । ऐसा अचाट छंदु । घेऊनि उठी ॥232॥
त्याचप्रमाणे एखादे भले मोठे मंदिर बांधावे अथवा अश्वमेध यज्ञ करावा, असा अघटित नादाच्या मागे तो लागतो.
233-14
नगरेंचि रचावीं । जळाशयें निर्मावीं । महावनें लावावीं । नानाविधें ॥233॥
मोठमोठी शहरे निर्मान करावीत, जलाशय (तळी विहिरी) वगैरे पाण्याचे साठे बांधावेत व नाना प्रकारचे मोठे बगीचे अरण्यात निर्मान कराव्यात.
234-14
ऐसैसां अफाटीं कर्मीं । समारंभु उपक्रमीं । आणि दृष्टादृष्ट कामीं । पुरे न म्हणे ॥234॥
त्याप्रमाने तो अचाट कर्मांना आरंभ करतो आणि इहलोकीचे व परलोकप्राप्तीची इच्छा त्याला कधीही प्राप्त होत नाही.
235-14
सागरुही सांडीं पडे । आगी न लाहे तीन कवडे । ऐसें अभिलाषीं जोडे । दुर्भरत्व ॥235॥
समुद्र दुर्लभ खरा, पण तो या रजोगुणी पुरुषाच्या अभिलाषापुढे हार खाईल. अग्नीला कितीही जाळ घातला तरी, त्याची तृप्ती होत नाही असा तो दुर्भर आहे. खरा, परंतु त्याच्या अभिलाषांच्या दुर्भरत्वापुढे अग्नीची तीन कवड्या इतकीही किंमत नाही, असे त्याच्या अभिलाषांच्या ठिकाणी दुर्भरत्व असते.

236-14
स्पृहा मना पुढां पुढां । आशेचा घे दवडा । विश्व घापे चाडा । पायांतळीं ॥236॥
विषयतृष्णा किंवा विषयाची इच्छा ही चंचल मनाच्या पुढे पुढे आशेची धाव घेते व सर्व विश्वही फिरण्यास त्याला पुरेसे होत नाही.
237-14
इत्यादि वाढतां रजीं । इयें चिन्हें होतीं साजीं । आणि ऐशा समाजीं । वेंचे जरी देह ॥237॥
याप्रमाणे रजोगुणाचा उत्कर्ष झाला म्हणजे अशी लक्षणे प्रखरपणे (प्रगट) होतात. व अशा लक्षणांच्या समुदायात जर देह पडला तर (मृत्यू आला)
238-14
तरी आघवाचि इहीं । परिवारला आनी देहीं । रिगे परी योनिही । मानुषीचि ॥238॥
तर या सर्व लक्षणांनी युक्त असा तो याच रजोगुणांनी युक्त होऊन मनुष्ययोनीतच दुसर्‍या देहाने जन्म घेत असतो.
239-14
सुरवाडेंसिं भिकारी । वसो पां राजमंदिरीं । तरी काय अवधारीं । रावो होईल? ॥239॥
हे पहा एखादा भिकारी मनुष्य जर सर्व सुखासह आणि मोठ्या चैनीने रुबाबदारपणाने राजवाड्यात बसला? तर तेवढ्यावरून तो राजा होऊ शकेल का?
240-14
बैल तेथें करबांडें । हें न चुके गा फुडें । नेईजो कां वऱ्हाडें । समर्थाचेनी ॥240॥
बैलाला जरी श्रीमंताच्या वर्‍हाडाबरोबरच्या गाडीला जोडून नेला, जाताना त्यातील वर्‍हाड पाच पक्वान्ने खातात.पण बैलाच्या नशीबी कडबा खाणेच ठरलेले असते.

241-14
म्हणौनि व्यापारा हातीं । उसंतु दिहा ना राती । तैसयाचिये पांती । जुंपिजे तो ॥241॥
म्हणून व्यापार कामधंदा यातुन ज्यांना राञंदिवस थोडीसुद्धा विश्रांती मिळत नाही अशा प्रकारच्या लोकांच्या पंक्तीस तो जुंपला जातो. म्हणजे तशांच्या कुळात त्याला जन्म प्राप्त होतो.
242-14
कर्मजडाच्या ठायीं । किंबहुना होय देहीं । जो रजोवृत्तीच्या डोहीं । बुडोनि निमे ॥242॥
फार काय सांगायचे? जो रजोगुणांनी बनलेल्या वृत्तीच्या डोहात बुडून मरण पावतो, तो काम्य कर्मे करणार्‍या कर्मठ लोकांच्या कुळामध्ये जन्मास येतो.
243-14
मग तैसाचि पुढती । रजसत्त्ववृत्ती । गिळूनि ये उन्नती । तमोगुण ॥243॥
त्याचप्रमाणे जेव्हा रजोगुण व सत्वगुण नाहीसे होऊन तमोगुण उन्नतीला येतो, म्हणजे वाढत जातो.
244-14
तैंचि जियें लिंगें । देहींचीं सबाह्य सांगें । तियें परिस चांगें । श्रोत्रबळें ॥244॥
त्या वेळची जी लक्षणे देहाच्या आत व बाहेर असतात ती आम्ही सांगतो. ती चांगल्या प्रकारे एकाग्र चित्ताने श्रवण कर.
245-14
तरी होय ऐसें मन । जैसें रविचंद्रहीन । रात्रींचें कां गगन । अंवसेचिये ॥245॥
ज्याप्रमाने सुर्य-चंद्राशिवाय अमावस्येच्या राञीचे आकाश पुर्णपणे अंधारमय असते. त्याप्रमानेच तमोगुणी मन हे विवेकहीन होते.

246-14
तैसें अंतर असोस । होय स्फूर्तिहीन उद्वस । विचाराची भाष । हारपे तैं ॥246॥
त्याप्रमाणे त्याचे अंत:करण अमावस्येच्या राञीसारखे पूर्णपणे विचारशून्य व रिकामे असते व तेव्हा त्या अंत:करणात सारासार विवेकाची गोष्ट नाहीशी होते. विचाराच्या भाषेला त्या ठीकानी जागाच शिल्लक रहात नाही.
247-14
बुद्धि मेचवेना धोंडीं । हा ठायवरी मवाळें सांडी । आठवो देशधडी । जाला दिसे ॥247॥
ज्याप्रमाने बुद्धी अवघड वेळेस दगडास सुद्धा मागे सारेन म्हणजे एकवेळेस दगड, बरा अशा वेळेस या मर्यादेपर्यंत बुद्धीने विचारशक्ती गमावलेली असते अथवा टाकुन दिलेली असते.आणि त्याची स्मरनशक्ती सुद्धा नष्ट झालेली असते.
248-14
अविवेकाचेनि माजें । सबाह्य शरीर गाजे । एकलेनि घेपे दीजे । मौढ्य तेथ ॥248॥
त्याच्या शरिरावरती आतील आणि बाहेरील अविवेक,अविचार हा नजरेस पडत असतो. व त्या तमोगुणी माणसाचे संपुर्ण व्यवहार हे मुर्खपणाचे प्रमान देतात.
249-14
आचारभंगाचीं हाडें । रुपतीं इंद्रियांपुढें । मरे जरी तेणेंकडे । क्रिया जाय ॥249॥
या तमोगुणी पुरुषाच्या इंद्रियासमोर अनाचार हा कायमस्वरुपी उभा असतो.आणि जेव्हा ह्या तमोगुणी मनुष्याने हे शरीर त्यागले असता अथवा मृत्युलोकास गेला तरी,त्याने केलेली दष्कृत्ये किंवा पापक्रियाही त्यासोबतच यमयातना भोगावयास जात असते.
250-14
पैं आणिकही एक दिसे । जे दुष्कृतीं चित्त उल्हासे । आंधारी देखणें जैसें । डुडुळाचें ॥250॥
ज्याप्रमाने काळकुट्ट अंधार्‍या राञीत सुद्धा घुबडास अतिस्पष्ट दिसते. त्याप्रमाने बाकीच्या लोकांपेक्षा त्यास वाईट कर्म किंवा पापकर्म करावयाचे झाल्यास सुद्धा त्यांच्या चित्तामध्ये फार उल्हास,आनंद असतो.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading