सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

सदद्वैतं श्रुतं यत्तत्पञ्चभूतविवेकतः ।
बोद्धुं शक्यं ततो भूतपञ्चकं प्रविविच्यते ॥ १ ॥
जग उत्पन्न होण्याच्या पूर्वी जगास कारणीभूत जें सद्‌रूप अद्वितीय ब्रह्म श्रुतीत सांगितलें आहे, तें स्वतः वाणीस व मनास अगोचर असल्यामुळे त्याचा साक्षात् बोध होणे अशक्य आहे; याकरितां त्यास उपाधिभूत जी पंचभूते त्यांचे विवेचन केलें असतां अधिष्ठानाचा बोध चांगला होईल म्हणून आम्ही पंचभूतांचें येथे विवेचन करून दाखवितो. ॥१॥

शब्दस्पर्शौ रूपरसौ गन्धो भूतगुणा इमे ।
एकद्वित्रिचतुः पञ्चगुणा व्योमादिषु क्रमात् ॥ २ ॥
शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे पंचभूतांचे गुण आहेत. यांचा क्रम असा कीं, आकाशाचा गुण केवळ शब्दमात्र, वायुचे शब्द आणि स्पर्श; अग्नीचे शब्द, स्पर्श आणि रूप; आपाचे शब्द, स्पर्श, रूप आणि रस; आणि पृथ्वीचे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध याप्रमाणें समजावे. ॥२॥

प्रतिध्वनिर्वियच्छब्दो वायौ वीसीति शब्दनम् ।
अनुष्णाशीतसंस्पर्शो वह्नो भुगुभुगुध्वनिः ॥ ३ ॥
आकाशाचा जो गुण शब्द म्हणून सांगितला तो प्रतिध्वनिरूप समजावा. वायूमधील शब्द सों सों सों असा जो होतो तो समजावा. त्याचा स्पर्श अनुष्ण आणि अशीत असतो. वन्हीचे ठायीं भुक् भुक् असा होणारा ध्वनि, ॥३॥

उष्णः स्पर्शः प्रभा रूपं जले बुलु बुलु ध्वनिः ।
शीतास्पर्शः शुक्लरूपं रसो माधुर्यमीरितम् ॥ ४ ॥
ऊष्ण स्पर्श आणि प्रभा रूप. जलाचे ठायीं बुल बुल ध्वनि, शीतस्पर्श, शुक्लरूप, आणि माधुर्य रस. ॥४॥

भूमौ कडकडाशब्दः काठिन्यं स्पर्श इष्यते ।
नीलादिकं चित्ररूपं मधुराम्लादिको रसः ॥ ५ ॥
भूमीचे ठायी कडकडा शब्द; कठिण स्पर्श, निळे हिरवे इत्यादि रूप, मधुर आम्लादिक रस आणि ॥५॥

सुरभीतरगन्धौ द्वौ गुणाः सम्यग्विवेचिताः ।
श्रोत्रं त्वक्चक्षुषि जिह्वा घ्राणं चेन्द्रियपञ्चकम् ॥ ६ ॥
चांगला आणि वाईट असे दोन गंध, याप्रमाणें आकाशापासून पृथ्वीपर्यंत त्या त्या भूतांचे गुण समजावे. आतां या पंचभूतांचीं कार्यें सांगतो. श्रोत्र, त्वचा, चक्षू, जिव्हा आणि घ्राण ही पांच ज्ञानेंद्रिये होत. ॥६॥

कर्णादिगोलकस्थं तच्छब्दादिग्राहकं क्रमात् ।
सौक्ष्म्यात्कार्यानुमेयं तत्प्रायो धावेद्बहिर्मुखम् ॥ ७ ॥
या इंद्रियांची स्थानें कर्णादिक छिद्रें होत. शब्दस्पर्द्शादिक जे वर सांगितलेले पंचभूतांचे गुण ते या श्रोत्रादिक इंद्रियांचे क्रमेंकरून विषय होत. हीं इंद्रिये अतिशय सूक्ष्म असल्यामळे त्यांच्या अस्तित्वाचे अनुमान कार्यावरून करावयाचें. हीं बहुतकरून बहिर्मुख आहेत. ॥७॥

कदाचित्पिहिते कर्णे श्रूयते शब्द आन्तरः ।
प्राणवायौ जाठराग्नौ जलपानेऽन्नभक्षणे ॥ ८ ॥
केव्हां केव्हा या इंद्रियांस शरीराच्या आंतील विषयही गोचर होतात. कान झांकले असतां प्राणवायु आणि जठराग्नींतील होणारा शब्द ऐकू येतो. जलपान व अन्नभक्षण करतांना शरीराच्या आंतील स्पर्श अनुभवास येतात. ॥८॥

व्याज्यान्ते ह्यान्तराः स्पर्शामीलने चान्तरं तमः ।
उद्गारे रसगन्धौ चेत्यक्षाणामान्तरग्रहः ॥ ९ ॥
डोळे झांकले असतां आंतील अंधकार दृष्टीस पडतो. आणि ढेंकर दिला असतां रस आणि गंध या दोन्ही विषयांचा अनुभव येतो. ॥९॥

पञ्चोक्त्यादानगमनविसर्गानन्दकाः क्रियाः ।
कृषिवाणिज्यसेवाद्याः पञ्चस्वन्तर्भवन्ति हि ॥ १० ॥
हें ज्ञानेंद्रियांचें विवेचन झाले. आतां कमेंद्रियें सांगतो. बोलणें, देणें, घेणें, चालणें, विसर्जन करणें आणि आनंद या पांच कर्मेंद्रियांच्या क्रिया आहेत. कृषि, वाणिज्य, सेवा इत्यादि कर्मांचा अंतर्भाव या पांच क्रियांतच होतो. ॥१०॥

वाक्पाणिपादपायूपस्थैरक्षैस्तत्क्रियाजनिः ।
मुखादिगोलकेष्वास्ते तत्कर्मेन्द्रियपञ्चकम् ॥ ११ ॥
या क्रिया वाचा, पाद, पाणी, पायु, आणि उपस्थ या पांच इंद्रियांपासून क्रमेंकरून उत्पन्न होतात. मुख, कर, चरण, गुद, शिश्न, ही वागादि कमेंद्रियांचीं क्रमेंकरून स्थानें होत. ॥११॥

मनो दशेन्द्रियाध्यक्षं हृत्पद्मगोलके स्थितम् ।
तच्चान्तःकरणं बाह्येष्वस्वातन्त्र्याद्विनेन्द्रियैः ॥ १२ ॥
मन हें या दहा इंद्रियांचा राजा आहे. हें हृदयकमलांत वास करते. यासच अंतःकरण असे म्हणतात. कारण इंद्रियांच्या साहाय्यावांचून बाह्यविषयांवर याला स्वतंत्रतेनें जातां येत नाहीं. ॥१२॥

अक्षेष्वर्थार्पितेष्वेतद्गुणदोषविचारकम् ।
सत्त्वं रजस्तमश्चास्य गुणा विक्रियते हि तैः ॥ १३ ॥
इंद्रिये विषयांवर गेली असतां हें मन गुणदोषाचा विचार करते. सत्व, रज आणि तम – असे मनाचे तीन गुण आहेत. त्यांच्या योगाने हें वारंवार विकार पावतें. ॥१३॥

वैराग्यं क्षान्तिरौदार्यमित्याद्याः सत्त्वसम्भवाः ।
कामक्रोधौ लोभयत्नावित्याद्या रजसोत्थिताः ॥ १४ ॥
वैराग्य (विषय नकोसे होणें), क्षमा, औदार्य इत्यादि प्रकार सत्त्वगुणाचे आहेत. काम क्रोध, लोभ, यत्‍न इत्यादि प्रकार रजेगुणाचे आहेत. ॥१४॥

आलस्यभ्रान्तितन्द्राद्या विकारास्तमसोत्थिताः ।
सात्त्विकैः पुण्यनिष्पत्तिः पापौत्पत्तिश्च राजसैः ॥ १५ ॥
आळस, भ्रांति, तंद्रा इत्यादि विकार तमोगुणाचे आहेत. सात्त्विक मनोविकारापासून पुण्यनिष्पत्ति होते, राजसापासून पाप निष्पत्ति होते. ॥१५॥

तामसैर्नोभयं किन्तु वृथायुःक्षपणं भवेत् ।
अत्राहम्प्रत्ययी कर्तेत्येवं लोकव्यवस्थितिः ॥ १६ ॥
तामसापासून कांहींच न होतां व्यर्थ आयुष्याचा क्षय मात्र होतो. येथें मी मी म्हणणारा कर्ता असें समजावे. ॥१६॥

स्पष्टशब्दादियुक्तेषु भौतिकत्वमतिस्फुटम् ।
अक्षादावपि तच्छास्त्रयुक्तिभ्यामवधार्यताम् ॥ १७ ॥
प्रत्यक्ष अनुभवास येणार्‍या शब्दस्पर्शादिक गुणांनी युक्त असे घटादि पदार्थ पंचभूतांचे बनलेले आहेत, हें उघड आहे. परंतु इंद्रिये देखील पंचभूतांचींच बनलीं आहेत असें कशावरून समजावे ? अशी शंका कोणीं घेऊं नये. ”अन्नमयं हि सोम्यमनः,” ”आपोमयः प्राणः” इत्यादि श्रुतिप्रमाणांवरून व अनुमानावरून त्यांचें भौतिकत्व सिद्ध होते. ॥१७॥

एकादशेन्द्रियैर्युक्त्या शास्त्रेणाप्यवगम्यते ।
यावत्किंचिद्‌भवेदेतदिदं शब्दोदितं जगत् ॥ १८ ॥
अकरा इंद्रियांसहित शास्त्र व युक्तीवरून जेवढें म्हणून जग नजरेस येते त्याचा बोध ”सदेव सोम्येदमग्र आसीत्” या श्रुतीतील ‘इदं’ पदानें केला जातो. ॥१८॥

इदं सर्वं पुरा सृष्टेरेकमेवद्वितीयकम् ।
सदेवासीन्नामरूपे नास्तामित्यारुणेर्वचः ॥ १९ ॥
वरील श्रुतीचा अभिप्राय असा कीं, ‘हे सर्व जग सृष्टीपूर्वी कांहीं नसून एकच अदितीय सद्‌रूप होतें; तेव्हां नामरूपें मुळींच नव्हती.’ असें अरुणाचा पुत्र उद्दालक याचे वचन आहे. ”एकम्, एव, अद्वितीयं,” याः तीन पदांनीं ‘ ब्रह्माचे ठायीं येऊ पहाणार्‍या भेदत्रयाचें निरसन केलें. ते भेद स्वगत, सजातीय आणि विजातीय असें तीन प्रकारचे आहेत. यास उदाहरणार्थ एक वृक्ष घेऊन त्यांत हे तीन भेद कसे होतात तें आम्ही दाखवितो. ॥१९॥

वृक्षस्य स्वगतो भेदः पत्रपुष्पफलादिभिः ।
वृक्षान्तरात्सजातीयो विजातीयः शिलादितः ॥ २० ॥
वृक्षाचीं पानें व पुष्पें यांपासून होणारा जो भेद तो स्वगत भेद होय; दोन निरनिराळ्या, वृक्षांमधील जो भेद तो सजातीय; आणि दगड, माती आणि वृक्ष यांमधील जो भेद तो विजातीय समजावा. ॥२०॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *