सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ४१ ते ६०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

ननु भूम्यादिकं मा भूत्परमाण्वन्त नाशतः ।
कथं ते वियतोऽसत्त्वं बुद्धिमारोहतीति चेत् ॥ ४१ ॥
भूमि, उदक, तेज व वायु या चार द्रव्यांचा परमाणुपर्यंत नाश होत असल्यामुळें तीं मिथ्या असोत. पण आकाश मिथ्या आहे असें तुमच्या बुद्धीवर असें आरूढ होतें असें जर म्हणशील तर ऐक. ॥ ४१ ॥

अत्यन्तं निर्जगद्व्योम यथा ते बुद्धिमाश्रितम् ।
तथैव सन्निराकाशं कुतो नाश्रयते मतिम् ॥ ४२ ॥
सर्व जगाचा नाश झाल्यावर राहणाऱ्या आकाशाचे तुझी बुद्धि जसे ग्रहण करते, तसेंच आकाशरहित सत् वस्तूचे ती कां बरे ग्रहण करीत नाहीं ? ॥ ४२ ॥

निर्जगद्व्योम दृष्टं चेत्प्रकाशतमसी विना ।
क्व दृष्टं किंच ते पक्षे न प्रत्यक्षं वियत्खलु ॥ ४३ ॥
जगद्‌रहित आकाश भासते असें जर म्हणशील तर ते प्रकाश व अंधकार यावांचून कोठे दिसते ? को‍ठेच नाही ? मग तुमच्या मती आकाशाचे प्रत्यक्ष ज्ञान होत नाहीं कीं काय ? ॥ ४३ ॥

सद्वस्तु सिद्धन्त्वस्माभिर्निश्चितैरनुभूयते ।
तूष्णीं स्थितौ न शून्यत्वं शून्यबुद्धेस्तु वर्जनात् ॥ ४४ ॥
स्वस्थ (सर्व अंतर्बहिरिंद्रियांचा व्यापार बंद करून) बसले असतां आम्हां अनुभवी पुरुषांना अद्वितीय सद्‌वस्तूचा अनुभव येतो. त्या अवस्थेंत शून्याचा बुद्धीला भास होत नसल्यामुळे शून्यत्वाचा अनुभव कधींच येत नाहीं. ॥ ४४ ॥

सद्बुद्धिरपि चेन्नास्ति मास्त्वस्य स्वप्रभत्वतः ।
निर्मनस्कत्वसाक्षित्वात्सन्मात्रं सुगमं नृणाम् ॥ ४५ ॥
तुष्णीं स्थितींत सद्‌बुद्धिसुद्धां नसते असें जर म्हणशील तर ती नसेना. हे सत् स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला अतःकरण लीन झाल्याचेही ज्ञान होतें. त्यामुळें केवल सद्‌वस्तु सर्व साधकांना सुलभ आहे. ॥ ४५ ॥

मनोजृम्भनराहित्ये यथा साक्षी निराकुलः ।
मायाजृम्भणतः पूर्वं सत्तथैव निराकुलम् ॥ ४६ ॥
मन वृत्तिशून्य असतांना साक्षी चैतन्य जसे शांत असतें तसेच मायेचा उदय होण्यापूर्वी सत् स्वस्थ असतें. ॥ ४६ ॥

निस्तत्त्वा कार्यगम्यास्य शक्तिर्मायाग्निशक्तिवत् ।
न हि शक्ति क्वचित्कैश्चिद्बुद्ध्यते कारयतः पुरा ॥ ४७ ॥
अग्नीच्या शक्तिप्रमाणे ह्या सद्‌रूप आत्म्याची तत्त्वशून्य व कार्यावरूनच जाणतां येणारी अशी जी शक्ति तीच माया होय. कार्याच्या पूर्वी कोणालाही कधी शक्तीचे ज्ञान होत नाही. ॥ ४७ ॥

न सद्वस्तु सतः शक्तिर्न हि वह्नेः स्वशक्तिता ।
सद्विलक्षणतायान्तु शक्तेः किं तत्त्वमुच्यताम् ॥ ४८ ॥
सत्‌ची शक्ति सद्‌रूपच असणार नाहीं. कारण अग्निच अग्निची शक्ति नव्हे. मग सत्‌ची शक्ति सत्‌पेक्षां विलक्षण जर आहे, तर तिचे तत्त्व काय तें सांग पाहूं ॥ ४८ ॥

शून्यत्वमिति चेच्छून्यं मायाकार्यमितीरितम् ।
नशून्यं नापि सद्यादृक्तादृक्तत्त्वमिहेष्यताम् ॥ ४९ ॥
शून्य हेंच मायेचे तत्त्व असें जर म्हणशील तर शून्य मायेचे कार्य आहे. असें पूर्वी ( शून्यं चेत् जीव्यतां चिरं या वाक्यांत) सांगितलेच आहे. यास्तव शून्यही नव्हे व सत्‌ही नव्हे अशा प्रकारचे मायेचे कांही स्वरूप मानावें ॥ ४९ ॥

नासदासीन्नो सदासीत्तदानीं किन्त्वभूत्तमः ।
सद्योगात्तमसः सत्त्वं न स्वतस्तन्निषेधनात् ॥ ५० ॥
प्रलयकाळी असत् ( शून्य) नव्हतें व सत् ( विद्यमान असेंही कांहीं) नव्हते. तर तम होते. त्याचें सद्‌वस्तूच्या आश्रयानेच सत्त्व असतें. व श्रुतिस्मृतींत निषेध केला असल्यामुळे त्याचें स्वाभाविक सत्त्व नसते. ॥ ५० ॥

अतएव द्वितीयत्वं शून्यवन्नहि गण्यते ।
न लोके चैत्रतच्छक्त्योर्जीवितं गण्यते पृथक् ॥ ५१ ॥
म्हणूनच आम्ही त्या शक्तीची शून्याप्रमाणे निराळी गणना करीत नाहीं. लोकांत सुद्धां चैत्र नांवाचा मनुष्य व त्याची शक्ति या उभयतांना निरनिराळे वेतन लिहीत नाहीत. ॥ ५१ ॥

शक्त्याधिक्ये जीवितं चेद्वर्धते तत्र वृद्धिकृत् ।
न शक्तिः किन्तु तत्कार्यं युद्धकृष्यादिकं तथा ॥ ५२ ॥
शक्ति अधिक असली म्हणजे वेतन वाढते असें जर समजत असशील तर ते व्यर्थ आहे. कारण वेतनाची वृद्धि शक्ति करीत नसते तर युद्ध, शेतकी इत्यादि तिचीं कार्यें त्याची वृद्धि करतात ॥ ५२ ॥

सर्वथा शक्तिमात्रस्य न पृथग्गणना क्वचित् ।
शक्तिकार्यं तु नैवास्ति द्वितीयं शंक्यते कथम् ॥ ५३ ॥
तस्मात् शक्तिमात्राची गणना शक्तीपासून पृथक् करतां येत नाहीं, इतकें सिद्ध झालें. शक्तिकार्याची गणना पृथक् होऊं शकेल, पण ते मुळीच मिथ्या आहे. याकरिता ब्रह्माचेठायीं द्वैताचा संभव मुळीच नाहीं हे सिद्ध झालें, ॥५३॥

न कृत्स्नब्रह्मवृत्तिः सा शक्तिः किन्त्वेकदेशभाक् ।
घटशक्तिर्यथा भूमौ स्निग्धमृद्येव वर्तते ॥ ५४ ॥
ब्रह्माची शक्ति ब्रह्मास सर्वत्र न व्यापतां ती केवळ एकदेशी मात्र आहे. ज्याप्रमाणें घट होण्याची शक्ति चिकण मातींत मात्र असते. ॥५४॥

पादोऽस्य विश्वा भूतानि त्रिपादस्ति स्वयं प्रभः ।
इत्येकदेशवृत्तित्वं मायाया वदति श्रुतिः ॥ ५५ ॥
माया ही ब्रह्मावर एकदेशीं व्याप्त आहे. एतद्विषयीं पुढील श्रुति प्रमाण आहे. ”या परमेश्वराचा एक पाद सर्व भूतांना व्यापून स्वतः त्रिपाद होत्सातां स्वयंप्रकाश होऊन रहातो.” ॥५५॥

विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत् ।
इति कृष्णोर्जुनायाह जगतस्त्वेकदेशताम् ॥ ५६ ॥
याविषयी गीतेंतही प्रमाण आहे. भगवंतांनीं अर्जुनास असें सांगितले आहे कीं मी या सर्व जगास माझ्या एका अंशाने व्यापून राहिलों आहे. ॥५६॥

सभूमिं सर्वतो वृत्वा अत्यतिष्ठद्दशाङ्गुलम् ।
विकारावर्ति चात्रास्ति श्रुतिसूत्रकृतोर्वचः ॥ ५७ ॥
सर्व विश्व व्यापून परमेश्वर दशांगुळे उरला. अशीही एक श्रुति आहे; ‘विकारवर्तिच’ असे एक व्यासाचे सूत्र आहे. त्याचाही अभिप्राय हाच आहे. ॥५७॥

निरंशेऽप्यंशमारोप्य कृत्स्नेंऽशे वेति पृच्छतः ।
तद्‌भाषयोत्तरं ब्रूते श्रुतिः श्रोतुर्हितैषिणी ॥ ५८ ॥
निरंश ब्रह्माला अंश कसा ? अशी शंका येईल तर तिचे समाधान असें कीं, निरंशावर अंशाचा आरोप ठेवून माया ब्रह्माला सर्वत्र व्यापते किंवा अंशतः व्यापते असें विचारणारास उद्देशून त्याचें समाधान करण्याकरिता श्रुतीचे असें वचन आहे. ॥५८॥

सत्तत्त्वमाश्रिता शक्तिः कल्पयेत्सति विक्रियाः ।
वर्णाभित्तिगताभित्तौ चित्रं नानाविधं यथा ॥ ५९ ॥
सद्‌वस्तूचा आश्रय करून असणारी शक्ति सद्‌वस्तूचे ठायी नानाप्रकारच्या विकारांची कल्पना करते. ज्याप्रमाणें भिंतीवर काढलेल्या चित्रात नानाप्रकारचे वर्ण भासतात. ॥५९॥

आद्यो विकार आकाशः सोऽवकाशस्वभावान् ।
आकाशोऽस्तीति सत्तत्त्वमाकाशेऽप्यनुगच्छति ॥ ६० ॥
सद्‌वस्तूवरील पहिला विकार आकाश होय. त्याचें मुख्य स्वरूप अवकाश. ‘आकाश आहे’ या वाक्यावरून आहेपणा आकाशाचे ठायीं व्यापून आहे असे होतें. ॥६०॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *