401-15
मी रिगालों असें भूतळीं । म्हणौनि समुद्र महाजळीं । हे पांसूचि ढेंपुळी । विरेचिना ॥ 401 ॥
मी पृथ्वीमध्ये प्रवेश केला आहे म्हणून, समुद्रासारख्या महाजलाशयांत, ही रजःकणांनी बनलेली पृथ्वीरूप ढेपळी विरून जात नाही. 1
402-15
आणी भूतेंही चराचरें । हे धरितसे जियें अपारें । तियें मीचि धरी धरे । रिगोनियां ॥ 402 ॥
आणि ही पृथ्वी, जी असंख्य स्थावरजंगमभूते आपल्यावर धारण करते त्या पृथ्वीमध्ये प्रवेशून मीच तिला धारण करतो. 2
403-15
गगनीं मी पंडुसुता । चंद्राचेनि मिसें अमृता । भरला जालों चालता । सरोवरु ॥ 403 ॥
अर्जुना, मी गगनांत चंद्राच्या रूपाने जणु कांहीं अमृताचे चालतें सरोवर झालों आहे. 3
404-15
तेथूनि फांकती रश्मिकर । ते पाट पेलूनि अपार । सर्वौषधींचे आगर । भरित असें मी ॥ 404 ॥
तेथून (चंद्रापासून) अमृतश्राव करणारी किरणें फांकतात. त्यांचे ओघ बनवून सर्व औषधींच्या वनाचे मी पोषण करितों. 4
405-15
ऐसेनि सस्यादिकां सकळां । करी धान्यजाती सुकाळा । दें अन्नद्वारां जिव्हाळा । भूतजातां ॥ 405 ॥
अशाप्रकारें सर्व जातीच्या धान्यादि पिकांचे पोषण करून, त्यांचा सुकाळ करितों व अन्नद्वारा सर्व भूतांचे मी रक्षण करतो. 5
406-15
आणि निपजविलें अन्न । तरी तैसें कैचें दीपन । जेणें जिरूनि समाधान । भोगिती जीव ॥ 406 ॥
आणि अन्न जरी तयार केले तरी ते पचवून जीवांना समाधान होईल अशी त्यांच्या ठिकाणीं दीपक (पाचक) शक्ति कोठची असणार? 6
अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः ।
प्राणापानसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम् ॥ 15.14॥
407-15
म्हणौनि प्राणिजातांच्या घटीं । करूनि कंदावरी आगिठी । दीप्ति जठरींही किरीटी । मीचि जालों ॥ 407 ॥
म्हणुन (पचन व्हावें म्हणून) प्राणिजातांच्या शरीरात नाभिकंदावर आगटी ठेवून अर्जुना, जठराग्नीही मीच झालों. 7
408-15
प्राणापानाच्या जोडभातीं । फुंकफुंकोनियां अहोराती । आटीतसें नेणों किती । उदरामाजीं ॥ 408 ॥
प्राण व अपान या वायूच्या जोड भात्याने अहोरात्र ती शेगडी फुंकून, फुंकून उदरामध्ये किती अन्न जिरविलें असेल ते सांगता नये. 8
409-15
शुष्कें अथवा स्निग्धें । सुपक्वें कां विदग्धें । परी मीचि गा चतुर्विधें । अन्नें पचीं ॥ 409 ॥
ओली, सुकी, शिजलेली,भाजलेली वगैरे चारी प्रकारची अन्ने मीच पचवितों. 9
410-15
एवं मीचि आघवें जन । जना निरवितें मीचि जीवन । जीवनीं मुख्य साधन । वन्हिही मीचि ॥ 410 ॥
अशाप्रकारे सर्व प्राणी मीच आहे, त्यांच्यानिर्वाहास लागणारें अन्न मीच आहे; व अन्न पचविण्याचे मुख्य साधन जो जठराग्नि तोही मीच आहे, 410
411-15
आतां ऐसियाहीवरी काई । सांगों व्याप्तीची नवाई । येथ दुजें नाहींचि घेईं । सर्वत्र मी गा ॥ 411 ॥
आतां याहीपेक्षा माझ्या व्यापकपणाची नवाई तुला काय सांगू? अरे, जगांत दुसरें असें कांहीं नाहींच; सर्वत्र मीच आलें असें जाणः 11
412-15
तरी कैसेनि पां वेखें । सदा सुखियें एकें । एकें तियें बहुदुःखें । क्रांत भूतें ॥412
( पुढील दोन ओव्यांत अर्जुनाच्या संभाव्य शंकेचे देव आपणच उत्थापन करून म्हणतात.) तर मग कांही भूतांचे आकार (मनुष्यादि) सुखी असावें व कांहींचे (पश्वादि) सदा दुःखाक्रान्त असावे असें कां? 12
413-15
जैसी सगळिये पाटणीं । एकेंचि दीपें दिवेलावणी । जालिया कां न देखणी । उरलीं एकें ॥ 413 ॥
जसे सर्व नगरांत एकाच जातीचे दिवे लावल्यास त्यांतील कांहीं प्रकाशतात, कांहीं प्रकाशतच नाहीत असे होईल कां? 13
414-15
ऐसी हन उखिविखी । करित आहासि मानसीं कीं । तरी परिस तेही निकी । शंका फेडुं ॥ 414 ॥
अर्जुना, तुझ्या मनांत असे तर्कवितर्क येत असणारच; पण त्या शंकेचेंही निरसन करितों तें ऐक. 14
415-15
पैं आघवा मीचि असें । येथ नाहीं कीर अनारिसें । परी प्राणियांचिया उल्लासें । बुद्धि ऐसा ॥ 415 ॥
हे पहा सर्वत्र माझी व्याप्ति आहे अथवा सर्व मीच आहे ह्याबद्दल विवादच नाही; परंतु, विचित्रता दिसण्याचे कारण प्राण्यांच्या बुद्धि उपाधींचे वैचित्र्य होय. (माझ्यांत बदल नाही.) 15
416-15
जैसें एकचि आकाशध्वनी । वाद्यविशेषीं आनानीं । वाजावें पडे भिन्नीं । नादांतरीं ॥ 416 ॥
आकाशाचा ध्वनि सदा एकरूप असूनही, भिन्न भिन्न वाद्यांच्या उपाधिद्वारां श्रवणावर येऊ लागला म्हणजे आकाशाच्या ध्वनीतच भिन्नता आहे अस वाटते. 16
417-15
कां लोकचेष्टीं वेगळालां । जो हा एकचि भानु उदैला । तो आनानी परी गेला । उपयोगासी ॥ 417 ॥
उगवलला एकच सूय किंवा सूर्यप्रकाश जस लोकांच्या भिन्नभिन्न व्यापाराला उपयोगी पडतो. 17
418-15
नाना बीजधर्मानुरूप । झाडीं उपजविलें आप । तैसें परिणमलें स्वरूप । माझें जीवां ॥ 418 ॥
किंवा पाणी तेच; पण त्या त्या बीजधर्मानुसार वृक्षांमध्ये भिन्न भिन्न परिणाम पावतें, तसें मी नित्य एकरूप असता उपाधीच्या योगें भिन्न भिन्न स्वरूपाचा वाटतो. 18
419-15
अगा नेणा आणि चतुरा । पुढां निळयांचा दुसरा । नेणा सर्पत्वें जाला येरा । सुखालागीं ॥ 419 ॥
अरे, अज्ञ आणि तज्ज्ञ (अशा दोन पुरुषांपुढे पडलेला एकच दोन पदरी नीलमण्यांचा हार पहिल्याला सर्पभ्रांतीमुळे दुःखाला कारण झाला तर दुसऱ्याला (तज्ज्ञाला) हार अशी प्रज्ञा होऊन सुखास कारण झाला. 19
420-15
हें असो स्वातीचें उदक । शुक्तीं मोतीं व्याळीं विख । तैसा सज्ञानांसी मी सुख । दुःख तों अज्ञानांसी ॥ 420 ॥
किंवा आणखी दृष्टांत एकाच स्वातिनक्षत्राचे पाणी शुक्तीत पडले तर मोतीं होते, सर्प मुखात पडले तर आणि विष रूपाने परिणाम पावतें, त्याप्रमाणे ज्ञान्यांना सुखरूप जो मी, तो सुखाला कारण होतो व तोच सुखरूप मी अज्ञान्याला दुःखाला कारण होतो. 420
सर्वस्य चाहं हृदि संनिविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च ।
वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृद्वेदविदेवचाहम् ॥ 15.15॥
421-15
एऱ्हवीं सर्वांच्या हृदयदेशीं । मी अमुका आहें ऐसी । जे बुद्धि स्फुरे अहर्निशीं । ते वस्तु गा मी ॥ 421 ॥
अरे, थोडक्यांत माझी खूण अशी आहे. ” मी म्हणून एक असा आहे” असें जें स्फुरण (ज्ञान) प्राण्यांच्या ठिकाणीं रात्रंदिवस असतें, ते माझे स्वरूप होय. 21
422-15
परी संतासवें वसतां । योगज्ञानीं पैसतां । गुरुचरण उपासितां । वैराग्येंसीं ॥ 422 ॥
परंतु (तें वस्तु, (मत्स्वरूप,) यथार्थत्वाने केव्हां कळणार? तर,) संत समागम करशील, योग आणि ज्ञान अथवा ज्ञानयोगाचा अभ्यास करशील व वैराग्ययुक्त होत्साता सद्गुरू ह्या बुद्धीने त्यांची सेवा करशील 22
423-15
येणेंचि सत्कर्में । अशेषही अज्ञान विरमे । जयांचें अहं विश्रामे । आत्मरूपीं ॥ 423 ॥
तेव्हां, आणि ह्याच एका पुण्याचरणाने (माझ्या प्राप्तीच्या आड येणारें,) अज्ञान समूळ नाश पावतें; (त्याची खूण काय?) ज्यांचा अहंकार, त्याला प्रकाशित करणाऱ्या आत्मस्वरूप दर्शनाने विश्रांतीला गेला आहे, (म्हणजे बाधित होऊन ज्याचे पूर्वस्वरूप गेले आहे) 23
424-5
ते आपेआप देखोनि देखीं । मियां आत्मेनि सदा सुखी । येथें मीवांचून अवलोकीं । आन हेतु असे? ॥ 424 ॥
त्यांना आत्मदर्शन म्हणजे सुखरूप जो मी त्या माझेच दर्शन झाल्यामुळे, ते सदा सुखी असतात. मग हें पहा ! या व्यवहारांत त्यांच्या सुखाचा माझ्यावांचून अन्य कोणता हेतु आहे? 24
425-15
अगा सूर्योदयो जालिया । सूर्यें सूर्यचि पहावा धनंजया । तेवीं मातें मियां जाणावया । मीचि हेतु ॥ 425 ॥
अर्जुना, दिवस उगवल्यावर, सूर्याच्या तेजानेच सूर्य पहावा लागतो, त्याप्रमाणे, माझे ज्ञाननही माझ्या सहाय्यानेच (मजकडूनच) होत असतें. 25
Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण