सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

हृष्यत्येको मणिं लब्ध्वा क्रुद्ध्यत्यन्यो ह्यलाभतः ।
पश्यत्येव विरक्तोऽत्र न हृष्यति न कुप्यति ॥ २१ ॥
शि० – ते कसे ? गु० – कल्पना कर कीं, तीन पुरुष एका मार्गानें जात असतां त्यांच्या दृष्टीस एक रत्न पडलें. तें न्यावयास त्यांपैकीं दोघे धांवले. त्यांत जो पुढें गेला त्यास तें मिळालें व तेणेंकरून त्यास परम आनंदही झाला. जो मागें राहिला त्यास तें न ‘ मिळाल्यामुळे वाईट वाटून तो संतापला; आणि तिसरा जो विरक्त होता त्यास हर्ष व शोक हे दोन्ही झाले नाहींत. ॥ २१ ॥

प्रियोऽप्रिय उपेक्ष्यश्चेत्याकारा मणिगास्त्रयः ।
सृष्टा जीवैरीशसृष्टं रूपं साधारणं त्रिषु ॥ २२ ॥
शि० – मग यांत जीवसृष्टि कोणती व ईशसृष्टि कोणती? गु० – यांत प्रियत्व, अप्रियत्व आणि उपेक्ष्यत्व असे जे तीन गुण रत्नाच्याठायी आले ते तिघां पुरुषांनी क्रमेंकरून उत्पन्न केले, म्हणून ते जीवसृष्ट होत; आणि तिहीमध्ये साधारण जें रत्नरूप ते ईश्वरनिर्मित होय. ॥ २२ ॥

भार्या स्नुषा ननान्दा च याता मातेत्यनेकधा ।
प्रतियोगिधिया योषिद्‌भिद्यते न स्वरूपतः ॥ २३ ॥
शि० – हें माझ्या ध्यानात नीट येईना; याकरिता अधिक स्पष्ट करून सांगवे. गु०- तुला आणखी एक दृष्टांत सांगतो म्हणजे.चांगलें समजेल. स्त्री स्वरूपतः एकच असून संबंधभेदानें, नवर्‍यास बायको, सासवेस सून, भावजयेस नणंद आणि पुत्रास माता झाली. येथे स्त्री ही ईशसृष्टि होय; आणि..’ तिच्याठायीं बायको, सून, नणंद इत्यादि कल्पना जीवाच्या आहेत. ॥ २३ ॥

ननु ज्ञानानि भिद्यन्तामाकारस्तु न भिद्यते ।
योषिद्वपुष्यतिशयो न दृष्टो जीवनिर्मितः ॥ २४ ॥
शि०–आपण दिलेल्या दृष्टांतांत बायको एकच असून तिजवर केलेल्या जीवांच्या कल्पना मात्र भिन्न आहेत, परंतु बायकोच्या आकारांत कांहीं भेद नाहीं, का जीवाने अधिक काय निर्माण केलें ? ॥ २४ ॥

मैवं मांसमयी योषित्काचिदन्या मनोमयी ।
मांसमय्या अभेदेऽपि भिद्यतेऽत्र मनोमयी ॥ २५ ॥
गु०- अधिक कसे केलें नाही ? येथें दोन स्त्रिया झाल्या, एक मांसमयी आणि एक मनोमयी. मांसमयी ही ईशकृत असून ती एकच आहे. पण मनोमयी स्त्रिया जीवानें निर्माण केल्या आहेत; व त्या भिन्न आहेत. ॥ २५ ॥

भ्रान्तिस्वप्नमनोराज्यस्मृतिष्वस्तु मनोमयम् ।
जाग्रन्मानेन मेयस्य न मनोमयतेति चेत् ॥ २६ ॥
शि० – भ्रांति, स्वप्न, मनोराज्य व स्मृति इत्यादि अवस्थांमध्ये भासणारे पदार्थ मनोमय आहेत; असें म्हणतां येईल. कारण तेथे बाह्य विषय नाहींत; परंतु जागृतींत प्रत्यक्ष दिसणाऱ्या पदार्थास मनोमय असें कसे म्हणावें. ॥ २६ ॥

बाधं माने तु मेयेन योगात्स्याद्विषयाकृतिः ।
भाष्यवार्तिककाराभ्यामयमर्थ उदाहृतः ॥ २७ ॥
गु०- होय तू म्हणतोस तें खरे. परंतु बाह्यविषय जरी असले तरी विषयाकार प्रत्यक्ष होण्याला विषय आणि मन या दोहोंचा संयोग झाला पाहिजे. हें सांगणें आमच्या पदरचें नव्हे. भाष्यकारांनी व वार्तिककारांनींही असाच सिद्धांत केला आहे ॥ २७ ॥

मूषासिक्तं यथा ताम्रं तन्निभं जायते तथा ।
रूपादीन् व्याप्नुवच्चित्तं तन्निभं दृश्यते ध्रुवम् ॥ २८ ॥
भाष्यकारांनीं असे म्हटलें आहे कीं, ज्याप्रमाणें मुशींत ओतलेले तांबे तिच्यासारखेच होतें त्याप्रमाणे रूपादिक विषयांस व्यापणारे चित्त खरोखर तत्तद्विषयाकार झाल्यासारखें दिसतें. ॥ २८ ॥

व्यञ्जको वा यथा लोको व्यङ्ग्यस्याकारतामियात् ।
सर्वार्थव्यञ्जकत्वाद्धीरर्थाकारा प्रदृश्यते ॥ २९ ॥
अथवा दुसरा दृष्टांत. ज्याप्रमाणे सूर्याचा प्रकाश ज्या ज्या पदार्थावर पडेल, त्या त्या पदार्थासारखा त्याचा आकार बनतो त्याप्रमाणें बुद्धि ही सर्व पदार्थांची प्रकाशक असल्यामळें ती ज्या पदार्थास व्यापते त्या पदार्थाप्रमाणें तिचा आकार होतो. ॥ २९ ॥

मातुर्मानाभिनिष्पत्तिर्निष्पन्नं मेयमेति तत् ।
मेयाभिसंगतं तच्च मेयाभत्वं प्रपद्यते ॥ ३० ॥
आतां वार्तिककारांचे वचन ऐक. कोणताही पदार्थ गोचर होतांना प्रथमत: चिदाभासापासून मनोवृत्ति उत्पन्न होते:. ती उत्पन्न झाल्यानंतर घटादि विषयांवर जाऊन आदळते. तदनंतर त्या विषयांस व्यापून त्यांसारखाच तिचा आकार बनतो. ॥ ३० ॥

सत्येवं विषयौ द्वौ स्तो घटौ मृण्मयधीमयौ ।
मृण्मयो मानमेयः स्यात्साक्षिभाष्यस्तु धीमयः ॥ ३१ ॥
शि० – मग पुढें काय म्हणतां ? गु० – या वार्तिककारांच्या व भाष्यकारांच्या वचनांवरून सहज लक्षांत येइल कीं, घटज्ञान होतेवेळीं दोन घट असतात. एक मातीचा व दुसरा मनाचा. मातीचा घट मनास गोचर होतो, व मनाचा साक्षीस गोचर होतो. ॥ ३१ ॥

अन्वयव्यतिरेकाभ्यां धीमयो जीवबन्धकृत् ।
सत्यस्मिन्सुखदुःखे स्त स्तस्मिन्नसति न द्वयम् ॥ ३२ ॥
याप्रमाणें ईशनिर्मित व जीवनिर्मित अशी दोन प्रकारची द्वैतसृष्टि सिद्ध झाली. यास अन्वयव्यतिरेक लावून पाहिलें असतां मनोमय दृष्टीच जीवाच्या सुखदुखांस कारण आहे असें समजेल. कारण जोपर्यंत हा मानस प्रपंच आहे, तोपर्यंत जीवांस सुखदुःखे होतात, आणि त्याच्या अभावीं सुखही नाही व दुःखही नाहीं. ॥ ३२ ॥

असत्यपि च बाह्यार्थे स्वप्नादौ बध्यते नरः ।
समाधिसुप्तिमूर्च्छासु सत्यप्यस्मिन्न बध्यते ॥ ३३ ॥
यास उदाहरण. बाहेरील पदार्थ नसूनही मनुष्यास स्वप्नाचेठायीं सुखदुःखे होतात; आणि ते पदार्थ सभोवार असूनही समाधि, निद्रा व मूर्च्छा इत्यादि अवस्थांमध्ये मनुष्यास सुखदुःखांची बाधा मुळीच होत नाहीं. ॥ ३३ ॥

दूरदेशं गते पुत्रे जीवत्येवात्र तत्पिता ।
विप्रलम्भकवाक्येन मृतं मत्वा प्ररोदिति ॥ ३४ ॥
मनोमय प्रपंचच सुखदुःखांस कारण आहे याविषयीं आणखी एक उत्कृष्ट उदाहरण देतों, म्हणजे स्पष्ट समजेल. कल्पना कर कीं एका गृहस्थाचा पुत्र. दूरदेशी गेला आहे. तेथें तो सुखरूप व सुरक्षित असूनही प्रक। ठगानें त्यास असें सांगितलें कीं, तुमचा पुत्र मेला; हें वचन ऐकून तो पुत्रशोकानें खरोखरच रडं लागतो. ॥३४ ॥

मृतेऽपि तस्मिन्वार्तायामश्रुतायां न रोदिति ।
अतः सर्वस्य जीवस्य बन्धकृन्मानसं जगत् ॥ ३५ ॥
बरें आतां याच्या उलट पहा. समज कीं, तो त्याचा पुत्र खरोखरच मेलो. पण बापाच्या कानीं ती वार्ता जोपर्यंत आली नाहीं; तोपर्यंत त्याला त्याचें कांहींच वाटत नाहीं; तो खुशाल आनंदांत असतो. तस्मात ही मानससृष्टीच जीवाच्या सुखदुःखांस कारण आहे, हें सिद्ध झालें. ॥ ३५ ॥

विज्ञानवादो बाह्यार्थवैयर्थ्यात्स्यादिहेति चेत् ।
न हृद्याकारमाधातुं बाह्यस्यापेक्षितत्त्वतः ॥ ३६ ॥
शि० – पण असें जर म्हणावे, तर बाह्य जगताचा कांहींच उपयोग नाहीसा होऊन बौद्धांचा जो विज्ञानवाद तो स्वीकारल्यासारखा होईल ? गु० – विज्ञानवाद कसा होतो ? बौद्ध आपल्या विज्ञानवादांत बाह्य जग मुळींच कबूल करीत नाहींत. ते म्हणतात कीं, या‍वत्‌किंचित, सर्व जग बुद्धीचेंच बनलें आहे. तसें आमचें म्हणणे नाहीं. आमचें म्हणणें असें आहे. की, जरी जीवाच्या सुखदुःखांस कारण हा मानस प्रपंच आहे, तथापि तो होण्याला बाह्य जगाची आवश्यकता आहे. ते बाह्य जग मुळीच नाही असें आमचे मत नाही. मग विज्ञानवाद कसा होईल ? ॥ ३६ ॥

वैयार्थ्यमस्तु वा बाह्यं न वारयितुमीश्महे ।
प्रयोजनमपेक्षन्ते न मानानिति हि स्थितिः ॥ ३७ ॥
शि० – बाह्य सृष्टि जर सुखदुःखांस कारण नाहीं, तर ती असून नसल्यासारखीच झाली. मग विज्ञानवादांत आणि तुमच्या म्हणण्यांत भेद तो काय ? गु० – भेद आहे तर. नाही कसा ? अरे बाह्य दृष्टि निरुपयोगी झाली म्हणून ती मुळींच नाही, असें म्हणतां येणार नाही. अमुक वस्तु आहे, असें सिद्ध करण्यास तिच्या अस्तित्वाबद्दल चांगले प्रमाण असलें म्हणजे झालें; तिच्या प्रयोजनींची मुळींच अपेक्षा नाहीं. ॥ ३७ ॥

बन्धश्चेन्मानसं द्वैतं तन्निरोधेन शाम्यति ।
अभ्यासेद्योगमेवातो ब्रह्मज्ञानेन किं वद ॥ ३८ ॥
श० – आपल्या म्हणण्याप्रमाणें जीवाच्या बंधासही मानस दृष्टीच जर कारण आहे तर तिच्या निवारणार्थ चित्तनिरोधरूप योगाभ्यास केला म्हणजे झाले. मग आणखी ब्रह्मज्ञान कशाला पाहिजे ? ॥ ३८ ॥

तात्कालिक द्वैतशान्तावप्यागामीजनीक्षयः ।
ब्रह्मज्ञानं विना न स्यादिति वेदान्तडिण्डिमः ॥ ३९ ॥
पु ० -अरे बाबा, योगाभ्यासानें द्वैतशांति जरी झाली तरी ती तेवढ्या वेळेपुरती मात्र होते. परंतु एकदां हें मानसजग नाहींसें झाल्यानंतर पुन: उत्पन्न होऊं नये अशा प्रकारची जर शांति पाहिजे तर ती ब्रह्मज्ञानावांचून कधींही होणार नाहीं. असा वेदांताचा डंका वाजत आहे. ॥ ३९ ॥

अनिवृत्तेऽपीशसृष्टे द्वैते तस्य मृषात्मताम् ।
बुद्ध्वा ब्रह्माद्वयं बोद्धुं शक्यं वस्त्वैक्यवादिना ॥ ४० ॥
शि० – बाह्म जग ( ईशसृष्टि) अगदी नाहींसें झाल्यावांचून ब्रह्मज्ञान कसें होईल ? गु० – ज्ञान होण्यास ईशसृष्टीच्या निवारणाची मुळींच गरज नाहीं. ती जरी आहे तशीच असली तरी ती मिथ्या आहे अशी पक्की खात्री झाली असतां, अद्वैत ब्रह्मानें ज्ञान होण्यास कोणतीच नड नाहीं. ॥ ४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *