सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक ४१ ते ६९

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

प्रलये तन्निवृत्तौ तु गुरुशास्त्राद्यभावतः ।
विरोधिद्वैताभावेऽपि न शक्यं बोद्धुमद्वयम् ॥ ४१ ॥
शि० – ईशसृष्टि मिथ्या आहे, इतकेंच केवळ समजल्याने ब्रह्मज्ञान कसें होईल ? ती अगदीं नाहींशीच केली प्राहिजे असें मला वाटतें. गु० -अरे तिची निवृत्ति प्रलयकाळी होत नाहीं काय ? मग तेव्हां कोठे ब्रह्मज्ञान होतें ? प्रलयकालीं गुरुशास्त्रादिक ज्ञानसाधनांचा अभाव असल्यामुळें उलटा ज्ञानास प्रतिबंधच होईल. तेव्हां विरोध द्वैताभाव जरी झाला तरी अद्वैतज्ञान होणे अशक्य आहे. ॥ ४१ ॥

अबाधकं साधकं च द्वैतमीश्वरनिर्मितम् ।
अपनेतुमशक्यं चेत्यास्तां तद्द्विष्यते कुतः ॥ ४२ ॥
तस्मात् या ईश्वरनिर्मित सृष्टीपासून मुळीच हानि नाहीं. इतकेच नव्हे, तर तिजपासून पूर्वीं सांगितल्याप्रमाणें गुरुशास्त्रादिकांच्या संबंधाने उलटा फायदाच आहे. बरें तिचें निवारण करणे तरी शक्य आहे म्हणावें तर तेही असाध्यच; मग ती असेना बापडी, तिचा उगीच कां तिरस्कार करतोस. ॥ ४२ ॥

जीवद्वैतं तु शास्त्रीयमशास्त्रीयमिति द्विधा ।
उपाददीता शास्त्रीयमातत्त्वस्यावबोधनात् ॥ ४३ ॥
हे जीवद्वैत दोन प्रकारचे आहे. एक, शास्त्रीय व दुसरे अशास्त्रीय, यांपैकी अशास्त्रीय द्वैतप्रपंचाचा मात्. ममुक्षुनें त्याग करावा परंतु तत्त्वज्ञान होईपर्यंत शास्त्रीय द्वैत सहसा टाकू नये. ॥ ४३ ॥

आत्मब्रह्मविचाराख्यं शास्त्रीयं मानसं जगत् ।
बुद्धे तत्त्वे तच्च हेयमिति श्रुत्यनुशासनम् ॥ ४४ ॥
शि० —शास्त्रीय द्वैत म्हणजे काय ? गु० – श्रवण, मनन व निदिध्यासनरूप जो ब्रह्मविचार व त्याचीं साधनें, यांसच शास्त्रीय द्वैत म्हणतात. हा मानस प्रपंच तत्त्वबोध झाल्यानंतर सोडून द्यावा. अशी श्रुतींची आज्ञा आहे,. शि० – तर मग ( आसुप्तेरामृतेःकालं नयेद्वेदांतचिंतया) म्हणजे मुमुक्षुंनी सर्व आयुष्य वेदांतचिंतनांत घालवावे, असें जे शास्त्रानें सांगितले त्याचा अर्थ काय ? गु० – त्याचा अर्थ इतकाच कीं, कामादि षड्‍‌रिपूंना मनांत येण्यास अगदी अवकाशच देऊं नये; म्हणून तसें शास्त्राने सांगितले. एऱ्हवीं तत्त्वज्ञान झाल्यावर शास्त्रीय द्वैताची मुळीच गरज नाहीं. ॥ ४४ ॥

शास्त्राण्यधीत्य मेधावी अभ्यस्य च पुनः पुनः ।
परमं ब्रह्म विज्ञाय उल्कावत्तान्यथोत्सृजेत् ॥ ४५ ॥
शि० – बरें याजविषयी श्रुतींची आला आहे असें तुही म्हटले तर त्या श्रुती कोणत्या ? गु० – त्या श्रुतींचा अभिप्राय तुला सांगतों. बुद्धिमान् मुमुक्षूनें शास्त्रांचें अध्ययन व पुन: पुन: अभ्यास करून परब्रह्माचे ज्ञान झालें म्हणजे उल्केप्रमाणें त्यांचा ”त्याग करावा; ही एक श्रुति. ॥ ४५ ॥

ग्रन्थमभ्यस्य मेधावी ज्ञानविज्ञानतत्परः ।
पलालमिव धान्यार्थी त्यजेद्ग्रन्थमशेषतः ॥ ४६ ॥
दुसरी श्रुति असें म्हणते कीं, बुद्धिमान् मुमुक्षूनें शास्त्रांचा अभ्यास करून, धान्यार्थी जसा कोंडा टाकून देतो तद्वत् सर्व ग्रंथांचा त्याग करावा. ॥ ४६ ॥

तमेव धीरो विज्ञाय प्रज्ञां कुर्वीत ब्राह्मणः ।
नानुध्यायाद्बहूञ्छब्दान्वाचो विग्लापनं हि तत् ॥ ४७ ॥
तिसरी श्रुति म्हणते कीं, त्या एका आत्म्याला मात्र जाणून धीर पुरुषाने बुद्धीचा निश्चय करावा. पुष्कळ शब्दांचे अध्ययन करण्यांत कांहीं अर्थ नाही. उगीच वाणीला श्रम मात्र होतों. ॥ ४७ ॥

तमेवैकं विजानीत ह्यन्या वाचो विमुञ्चथ ।
यच्चेद्वाङ्मनसी प्राज्ञ इत्याद्याः श्रुतयः स्फुटाः ॥ ४८ ॥
चौथी म्हणते कीं, त्या आत्म्याला मात्र नीट जाणून घ्या. आत्मविचारावांचून इतर भाषणच सोडून द्या. वाणी आणि मन यांचें नियमन करावें. इत्यादि श्रुतींची स्फुट वचनें आहेत. ॥ ४८ ॥

अशास्त्रीयमपि द्वैतं तीव्रं मन्दमिति द्विधा ।
कामक्रोधादिकं तीव्रं मनोराज्यं तथेतरत् ॥ ४९ ॥
शि० – एथवर शास्त्रीय द्वैत झालें. आता अशास्त्रीय द्वैताविषयी कांहीं सांगावें. गु० – अशास्त्रीय द्वैतामध्ये आणखी तीव्र आणि मंद असे अवांतर दोन भेद आहेत. कामक्रोधाधिक जे मनोविकार ते तीव्र आणि मनोराज्य हें मंद होय. ॥ ४९ ॥

उभयं तत्त्वबोधात्प्राङ्निवार्यं बोधसिद्धये ।
समः समाहितत्वं च साधनेषु श्रुतं यतः ॥ ५० ॥
शि० – मग या अशास्त्रीय द्विविध द्वैतांचा त्याग केव्हां करावा ? गु० – ज्ञानप्राप्ति होण्याकरितां, या दोन्ही द्वैतांचा त्याग तत्त्वज्ञानापूर्वीच केला पाहिजे. कारण शांति व समाधि ही श्रुतींत ब्रह्मज्ञानाच्या साधनांमध्ये गणलीं आहेत ॥ ५० ॥

बोधादूर्ध्वं च तद्धेयं जीवन्मुक्तिप्रसिद्धये ।
कामादिक्लेशबन्धेन युक्तस्य न हि मुक्तता ॥ ५१ ॥
शि० – तर मग तत्त्वज्ञानानंतर त्याचा स्वीकार करावा असें होतें काय ? गु- अरे पूर्वी त्याग करावा.असें म्हटल्यावर नंतर त्याचा स्वीकार करावा कीं काय ? जीवन्मुक्ति संपादन करण्याकरिता तत्त्वज्ञानानंतरही त्याचा त्याग केलाच पाहिजे. कारण कामक्रोधादि क्लेशबंध ज्याला आहेत त्याला जीवन्मुक्ति कधीही प्राप्त होणार नाहीं. ॥ ५१ ॥

जीवन्मुक्तिरियं मा भुज्जन्माभावे त्वहं कृती ।
तर्हि जन्मापि तेऽस्त्येव स्वर्गमात्रात्कृती भवान् ॥ ५२ ॥
शि० – जर तत्त्वज्ञानानें मनुष्य जन्ममरणाच्या फेऱ्यांतून मुक्त होतो असा सिद्धांत आहे, तर तितक्यानेंच कृतार्थता होते; मग आणखी जीवन्मुक्ति ती कशाला पाहिजे ? ती नसली तरी चालेल. गु० – ऐहिक भोग नाहींसे होतात या भयानें जर तुला जीवनमुक्तीचा कंटाळा आला तर पुढील जन्मांतील सुखोपभोग अंतरतील. म्हणून पुनर्जन्माचीही इच्छा कर. जीवन्मुक्ति जर नको तर तुला विदेहमुक्ति तरी कशाला पाहिजे. जन्म असेना बापडा. यज्ञादिकेंकरून स्वर्गप्राप्ति मिळवून धन्य हो म्हणजे झालें. ॥ ५२ ॥

क्षयातिशयदोषेण स्वर्गो हेयो यदा तदा ।
स्वयं दोषतमात्मायं कामादिः किं न हीयते ॥ ५३ ॥
शि० – स्वर्गांतील सुख नित्य नाहीं, तर त्याला क्षय व वृद्धि आहे, म्हणून स्वर्ग त्याज्य आहे, गु० – क्षयवृद्धिरूप दोषांमुळे जर स्वर्ग त्याज्य आहे, तर मूर्तिमंत केवळ दोषच असे जे कामक्रोधादिक त्यांचा त्याग कां बरें करूं नये. ॥ ५३ ॥

तत्त्वं बुद्ध्वापि कामादीन्निःशेषं न जहासि चेत् ।
यथेष्टाचरणं ते स्यात्कर्मशास्त्रातिलङ्घिनः ॥ ५४ ॥
शि० – एकदां तत्त्वज्ञान झाल्यानंतर ऐहिक भोगापुरते कामादिक जरी उत्पन्न झाले तरी काय नड आहे ? गु० – बाबारे, जर’ विषयलोभ न सोडशील तर विधिनिषेधशास्त्राचें उल्लंघन होऊन मनास वाटेल तसें आचरण करून अगदीं बहकशील. ॥ ५४ ॥

बुद्धाद्वैतसतत्त्वस्य यथेष्टाचरणं यदि ।
शुनां तत्त्वदृशां चैव कोभेदोऽशुचिभक्षणे ॥ ५५ ॥
शि० – ज्ञान्यानें यथेष्टाचरण केलें म्हणून काय झालें ? गु० – सुरेश्वराचार्य असें म्हणतात कीं, अद्वैततत्वाचा बोध होऊन देखील जर मनुष्य यथेष्टाचरणांत पडला, तर तो अभक्ष्य देखील भक्षण करील. काय पाहिजे तें करील, मग तसें झाल्यावर त्याला आणि कुत्र्याला भेद काय राहिला. शि० – मग काय झाले ? ॥ ५५ ॥

बोधात् पुरा मनोदोषमात्रात्क्लिष्टोऽस्यथाधुना ।
अशेषलोकनिन्दा चेत्यहो ते बोधवैभवम् ॥ ५६ ॥
गु० – अहाहा ! तुझ्या ह्या ज्ञानाचें वैभव काय सांगावे रे ! तत्त्वज्ञान होण्यापूर्वी काक्रोधादि क्लेश मात्र भोगावे लागले, आणि आता तर ज्ञान झाल्यावर सर्व लोकांकडून छी थू म्हणून घ्यावें लागेल. वाहवारे वाहवा. ॥ ५६ ॥

विड्वराहादितुल्यत्वं मा काङ्क्षीस्तत्त्वविद् भवान् ।
सर्वधीदोषसंत्यागाल्लोकैः पूज्यस्व देववत् ॥ ५७ ॥
शि० – मग आपलें म्हणणें काय तें तरी समजू द्या ! गु० – बाबारे आमचें म्हणणें इतकेंच कीं, तूं आतां तत्त्ववेत्ता झालास त्याअर्थी दुकरासारखा वागण्यास इच्छूं नको. कामक्रोधादिक बुद्धीचे दोष काढून टाक; आणि सर्व लोकांकडून देवासारखी पूजा घे. ॥ ५७ ॥

काम्यादिदोषदृष्ट्याद्याः कामादित्यागहेतवः ।
प्रसिद्धा मोक्षशास्त्रेषु तानन्विष्य सुखी भव ॥ ५८ ॥
शि० – ते दोष काढून टाकण्यास उपाय कोणता ? गु० – विषयदोषदर्शनादि उपाय योजले असतां कामक्रोधादिकांचा त्याग होतो. हे उपाय मोक्षशास्त्रांत प्रसिद्ध आहेत, त्यांचा चांगला शोध करून सुखी हो. ॥ ५८ ॥

त्यज्यतामेष कामादिर्मनोराज्ये तु का क्षतिः ।
अशेषदोषबीजत्वात् क्षतिर्भगवतेरिता ॥ ५९ ॥
शि० – कामादिक विकारांपासून मोठमोठे अनर्थ होतात, म्हणून त्यांचा त्याग केला पाहिजे हें योग्य आहे. परंतु मनोराज्य असल्यानें काय हानि आहे ? गु० – बाबारे कामादिक परवडले पण मनोराज्य नको. तें तर सर्व दोषांचें मूळ होय. म्हणून त्याचा त्याग अगदीच केला पाहिजे. त्यापासून मोठी हानि आहे, असें भगवंतांनीं अर्जुनास सांगितले आहे. ॥ ५९ ॥

ध्यायते विषयान्पुंसः सङ्गस्तेषूपजायते ।
सङ्गात्संजायते कामः कामात्क्रोधोऽभिजायते ॥ ६० ॥
भगवंतांनी काय सांगितले ? गु० – भगवद्वाक्य असें आहे कीं, विषयाचें जे चिंतन त्यापासून संसर्ग घडतो. संसर्गापासून काम, कामापासून क्रोध, क्रोधापासून मोह आणि मोहापासून शेवटीं नाश होतो. एवढ्या अनर्थास कारण मनोराज्य होय. ॥ ६० ॥

शक्यं जेतुं मनोराज्यं निर्विकल्पसमाधितः ।
सुसम्पादः क्रमात्सोऽपि सविकल्पसमाधिना ॥ ६१ ॥
शि० – बरें पण हें मनोराज्य जिंकावे कसे ? गु० – निर्विकल्प समाधीच्या योगानें हे जिंकतां येते. हा निर्विकल्प समाधि साधण्यास आधीं सविकल्प समाधीचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे हखू हळू तो साध्य होतो. ॥ ६१ ॥

बुद्धतत्त्वेन धीदोषशून्येनैकान्तवासिना ।
दीर्घं प्रणवमुच्चार्य मनोराज्यं विजीयते ॥ ६२ ॥
शि० – परंतु हा समाधि साधण्यास तरी अष्टांगयोग केला पाहिजे. पण तो ज्याला साध्य होत नाही त्यानें काय करावें ? गु० – मनोराज्य जिंकण्यास आणखी एक उत्तम साधन आहे, ज्याला चांगलें तत्त्व समजले आहे, व ज्याच्या मनांतील कामक्रोधादिक दोष जाऊन मन अगदी स्वच्छ झालें आहे. अशा पुरुषानें एकांतीं बसून गुरूपदिष्ट प्रणवाचा दीर्घ उच्चार केला असता मनोराज्य नाहींसें होतें. ॥ ६२ ॥

जिते तस्मिन् वृत्तिशून्यं मनस्तिष्ठति मूकवत् ।
एतत्पदं वशिष्ठेन रामाय बहुधेरितम् ॥ ६३ ॥
शि० – बरें; या रीतीनें मनोराज्य जिंकल्यानंतर पुढे काय होतें ? गु० – ज्याप्रमाणे मुका वाग्व्यवहाररहित होऊन उगाच बसतो, त्याप्रमाणें मनोराज्य जिंकलें म्हणजे मन सर्वव्यापाररहित होऊन उगीच बसतें. या दशेचे वर्णन वसिष्ठानें रामचंद्रास पुष्कळ प्रकारें करून दाखविले आहे ॥ ६३ ॥

दृश्यं नास्तीति बोधेन मनसो दृश्यमार्जनम् ।
सम्पन्नं चेत्तदोत्पन्ना परा निर्वाणनिर्वृतिः ॥ ६४ ॥
शि० – वसिष्ठ ऋषींनी काय सांगितलें आहे ? गु० – वसिष्ठ म्हणतात कीं, आत्म्यांवाचून दुसरा दृश्य पदार्थच नाहीं, असा पक्का निश्चय करून सर्व दृश्याचें लयसाक्षित्व संपादन केलें असतां निरतिशय मोक्षसुखाची प्राप्ति होते. ॥ ६४ ॥

विचारितमलं शास्त्रं चिरमुद्ग्राहितं मिथः ।
सन्त्यक्तवासनान्मौनादृते न्यस्त्युत्तमं पदम् ॥ ६५ ॥
कितीही शास्त्रें धुंडाळिलीं, व कितीही वादविवाद केला, तरी शेवटीं सर्वांचा फलितार्थ म्हणून इतकाच कीं, सकल वासनांचा त्याग करून मनाची तूष्णीं स्थिति संपादन केल्यावांचून उत्तम पदाची प्राप्ति होत नाहीं. ॥ ६५ ॥

विक्षिप्यते कदाचिद्धीः कर्मणा भोगदायिना ।
पुनः समाहिता सा स्यात्तदैवाभ्यासपाटवात् ॥ ६६ ॥
शि० – अशी मनाची निर्विकल्प स्थिति होऊनही भोगदायक प्रारब्धकर्माच्या योगानें पुन: विक्षेप झाला असता त्याचा परिहार कसा करावा ? गु० – त्याला दुसरा उपाय नाहीं. पुन: पुन: अभ्यास करून चित्त स्थिर करावें. ॥ ६६ ॥

विक्षेपो यस्य नास्त्यस्य ब्रह्मवित्त्वं न मन्यते ।
ब्रह्मैवायमिति प्राहुर्मुनयः पारदर्शिनः ॥ ६७ ॥
ज्याच्या चित्ताला कधीही विक्षेप होत नाहीं तो ब्रह्मवेत्ता म्हणणें देखील औपचारिकच. वास्तविक तो ब्रह्मच आहे, अंसें वेदांत पारंगत ऋषि म्हणतात. ॥ ६७ ॥

दर्शनादर्शने हित्वा स्वयं केवलरूपतः ।
यस्तिष्ठति स तु ब्रह्मन्ब्रह्म न ब्रह्मवित्स्वयम् ॥ ६८ ॥
याविषयीं वसिष्ठांनीहीं असेंच सांगितलें आहे. तें असें म्हणतात कीं, मला ब्रह्म समजलें, व न समजलें असें जें ब्रह्माचे ज्ञान आणि अज्ञान या दोहोंचाही त्याग करून जो केवळ अद्वैत चैतन्य मात्र होऊन जातो, तो वास्तविक ब्रह्मच होय; ब्रह्मवेत्ता नव्हे. ॥ ६८ ॥

जीवन्मुक्तेः परा काष्ठा जीवद्वैतविवर्जनात् ।
लभ्यतेऽसावतोऽत्रेदमीशद्वैताद्विवेचितम् ॥ ६९ ॥
इति द्वैतविवेकनाम चतुर्थः परिच्छेदः ॥ ४ ॥
जीवद्वैताच्या अत्यंत त्यागाने जीवन्मुक्तीची परा काष्ठा ( शेवटची स्थिति) प्राप्त होते. या कारणास्तव आज आम्हीं ईशसृष्टीपासून जीवसृष्टि निराळी करून दाखविली. ॥६९॥
द्वैतविवेक समाप्त

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

  1. […] https://warkarirojnishi.in/2022/06/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a5%e0%a4%ae%e0%a4%83-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9b%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%83-%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5/ सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक २१ ते ४० सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक ४१ ते ६५ सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक १ ते २० सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक २१ ते ४० सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ४१ ते ६० सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ६१ ते ८० सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ८१ ते १०० सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक १०१ ते १०९ सार्थ पंचदशी मराठी तृतीयः परिच्छेदः – पञ्चकोशविवेकः श्लोक १ ते २० सार्थ पंचदशी मराठी तृतीयः परिच्छेदः – पञ्चकोशविवेकः श्लोक २१ ते ४० सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक १ ते २० सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक २१ ते ४० सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः… […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *