सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

151-13
रथांगांचा मेळावा । जेवीं रथु म्हणिजे पांडवा । कां अधोर्ध्व अवेवां । नांव देहो ॥151॥
चाक, जूं वगैरे रथाच्या भागांच्या समुदायास, अर्जुना, ज्याप्रमाणे रथ म्हणावे, किंवा (शरीराच्या) वरच्या व खालच्या अवयवांना एकत्र मिळून जसे देह हे नाव येते,
152-13
करीतुरंगसमाजें । सेना नाम निफजे । कां वाक्यें म्हणिपती पुंजे । अक्षरांचे ॥152॥
हत्ती, घोडे वगैरेंच्या समुदायास जसे सैन्य हे नाव उत्पन्न होते किंवा अक्षरांच्या समुदायांना वाक्ये म्हणतात
153-13
कां जळधरांचा मेळा । वाच्य होय आभाळा । नाना लोकां सकळां । नाम जग ॥153॥
अथवा ढगांचा समुदाय, आभाळ या नावाने बोलला जातो अथवा सर्व लोकांना मिळून जग हे नाव येते,
154-13
कां स्नेहसूत्रवन्ही । मेळु एकिचि स्थानीं । धरिजे तो जनीं । दीपु होय ॥154॥
अथवा तेल, वात व अग्नी यांचा एके ठिकाणी संयोग करून ठेवणे, तोच लोकात दिवा म्हणून प्रसिद्ध होतो,
155-13
तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें । तेणें समूह परत्वें । क्षेत्र म्हणिपे ॥155॥
त्याप्रमाणे ही छत्तीस तत्वे ज्या एकत्वाने जमा होतात त्या समुदायपरत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते.


156-13
आणि वाहतेनि भौतिकें । पाप पुण्य येथें पिके । म्हणौनि आम्ही कौतुकें । क्षेत्र म्हणों ॥156॥
लागवडीस आणलेल्या या शरीराच्या योगाने येथे (शरीररूप शेतात) पाप-पुण्यरूप पीक पिकते, म्हणून आम्ही कौतुकाने ह्या देहाला क्षेत्र असे म्हणतो.
157-13
आणि एकाचेनि मतें । देह म्हणती ययातें । परी असो हें अनंतें । नामें यया । । 157॥
कित्येकांच्या मताने याला देह असे म्हणतात. पण आता हे राहू दे. या क्षेत्राला अनंत नावे आहेत.
158-13
पैं परतत्त्वाआरौतें । स्थावराआंतौतें । जें कांहीं होतें जातें । क्षेत्रचि हें ॥158॥
परंतु परब्रह्माच्या अलीकडे व स्थावरापर्यंत धरून त्या दोहोंच्या दरम्यान जे जे काही उत्पन्न होते व नाहीसे होते, ते सर्व क्षेत्रच होय.
159-13
परि सुर नर उरगीं । घडत आहे योनिविभागीं । तें गुणकर्मसंगीं । पडिलें सातें ॥159॥
परंतु गुण व कर्म यांच्या संगतीत सापडले असता देव, मनुष्य, सर्प वगैरे जातींच्या वेगळेपणाने या क्षेत्राची रचना होते.
160-13
हेचि गुणविवंचना । पुढां म्हणिपैल अर्जुना । प्रस्तुत आतां तुज ज्ञाना । रूप दावूं ॥160॥
ज्ञान = अर्जुना, हाच गुणांचा विचार तुला पुढे (अध्याय 14 मधे) सांगण्यात येईल. सांप्रत आता ज्ञानाचे स्वरूप सांगतो.


161-13
क्षेत्र तंव सविस्तर । सांगितलें सविकार । म्हणौनि आतां उदार । ज्ञान आइकें ॥161॥
क्षेत्र तर आम्ही तुला विकारांसह विस्तारपूर्वक सांगितले. म्हणून आता उदार ज्ञान ऐक.
162-13
जया ज्ञानालागीं । गगन गिळिताती योगी । स्वर्गाची आडवंगी । उमरडोनि ॥162॥
ज्ञानाकरता केले जाणारे प्रयत्न = ज्या ज्ञानाकरता योगी हे स्वर्गाचा आडमार्ग उल्लंघून आकाश गिळतात. (म्हणजे मूर्ध्निआकाशाचा लय करतात).
163-13
न करिती सिद्धीची चाड । न धरिती ऋद्धीची भीड । योगा{ऐ}सें दुवाड । हेळसिती ॥163॥
(ज्या ज्ञानाकरता योगी) सिद्धीची इच्छा करीत नाहीत आणि ऐश्वर्याची पर्वा करत नाहीत आणि योगासारखी कष्टसाध्य गोष्ट तुच्छ मानतात.
164-13
तपोदुर्गें वोलांडित । क्रतुकोटि वोवांडित । उलथूनि सांडित । कर्मवल्ली ॥164॥
(ज्या ज्ञानाकरता कित्येक लोक) तपरूपी डोंगरी किल्ले ओलांडून पलीकडे जातात आणि कोट्यवधी यज्ञ आचरून त्या अनुष्ठानांतून पार पडतात आणि कर्मरूपी वेलाची उलथापालथ करून (आचरण करून) त्याचा त्याग करतात.
165-13
नाना भजनमार्गी । धांवत उघडिया आंगीं । एक रिगताति सुरंगीं । सुषुम्नेचिये ॥165॥
अथवा (ज्या ज्ञानाकरता) कित्येक उघड्या अंगांनी (अंतर्बाह्य परिग्रह टाकून) भजनमार्गाने धावतात व कित्येक सुषुम्नेच्या भुयारात शिरतात.


166-13
ऐसी जिये ज्ञानीं । मुनीश्वरांची उतान्ही । वेदतरूच्या पानोवानीं । हिंडताती ॥166॥
याप्रमाणे मुनीश्वरांस ज्या ज्ञानाच्या ठिकाणी इच्छा असते व ते मुनीश्वर ज्या ज्ञानाकरता वेदरूपी झाडाचे पान आणि पान हिंडतात (म्हणजे संपूर्ण वेदांचे अध्ययन करतात)
167-13
देईल गुरुसेवा । इया बुद्धि पांडवा । जन्मशतांचा सांडोवा । टाकित जे ॥167॥
अर्जुना, गुरुसेवेने ते ज्ञान मिळेल या बुद्धीने त्या सेवेवरून आपला जन्म ओवाळून टाकतात, (जन्मभर गुरुसेवा करतात).
168-13
जया ज्ञानाची रिगवणी । अविद्ये उणें आणी । जीवा आत्मया बुझावणी । मांडूनि दे ॥168॥
ज्ञानाचे कार्य = 168-ह्या ज्ञानाचा प्रवेश अविद्येला नाहीसे करतो आणि जीव व ब्रह्म यांचे ऐक्य करून देतो,
169-13
जें इंद्रियांचीं द्वारें आडी । प्रवृत्तीचे पाय मोडी । जें दैन्यचि फेडी । मानसाचें ॥169॥
जे ज्ञान इंद्रियांची द्वारे बंद करते, बहिर्मुख वृत्तीचे पाय मोडते आणि जे मनाचे दारिद्र्य नाहीसे करते
170-13
द्वैताचा दुकाळु पाहे । साम्याचें सुयाणें होये । जया ज्ञानाची सोये । ऐसें करी. ॥170॥
द्वैतरूपी दुष्काळ नाहीसा होतो व सर्वत्र समबुद्धीच्या बोधरूपी सुबत्तेचे दिवस येतात, ज्या ज्ञानाची प्राप्ती अशी स्थिती प्राप्त करून देते.


171-13
मदाचा ठावोचि पुसी । जें महामोहातें ग्रासी । नेदी आपपरु ऐसी । भाष उरो ॥171॥
जे ज्ञान उन्मत्तपणाचा ठावठिकाणा नाहीसा करते व जे जबरदस्त भ्रांतीस नाहीसे करते व (जे) आपले आणि दुसर्‍याचे ही गोष्टच शिल्लक राहू देत नाही,
172-13
जें संसारातें उन्मूळी । संकल्पपंकु पाखाळी । अनावरातें वेंटाळी । ज्ञेयातें जें ॥172॥
अर्जुना जे ज्ञान संसाराला मुळासकट उपटून टाकते व संकल्परूपी चिखल साफ धुवून टाकते व आकलन करण्यास कठीण अशा परब्रह्माला ते ज्ञान व्यापून टाकते.
173-13
जयाचेनि जालेपणें । पांगुळा होईजे प्राणें । जयाचेनि विंदाणें । जगहें चेष्टें ॥173॥
जे ज्ञान प्राप्त झाले असता प्राणही स्थिर होतो व ज्या ज्ञानाच्या सत्तेने जगातील व्यापार चालतात.
173-13
जयाचेनि उजाळें । उघडती बुद्धीचे डोळे । जीवु दोंदावरी लोळे । आनंदाचिया ॥173अ॥
ज्या ज्ञानाच्या प्रकाशाने बुद्धीची दृष्टी उघडते व जीव आनंदाच्या पोटावर लोळतो
175-13
ऐसें जें ज्ञान । पवित्रैकनिधान । जेथ विटाळलें मन । चोख कीजे॥175॥
असे जे ज्ञान जे पवित्रपणाचा एकच ठेवा आहे व जेथे(जे प्राप्त झाले असता)(विषयाने)विटाळलेले मन शुद्ध करता येते

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *