सार्थ पंचदशी मराठी चतुर्थः परिच्छेदः – द्वैतविवेकः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

ईश्वरेणापि जीवेन सृष्टं द्वैतं प्रपञ्च्यते ।
विवेके सति जीवेन हेयो बन्धः स्फुटीभवेत् ॥ १ ॥
गु० – ही सर्व द्वैतसृष्टि द्विविध आहे. हिचा कांहीं भाग अंतर्यामी परमेश्वराने उत्पन्न केला आहे, व कांहीं भाग जीवानें केला आहे. त्या दोनही भागांचें विवेचन करून तुला दाखवतो. म्हणजे त्यांपैकीं जीवाने कोणत्या भागाचा त्याग करावा हे तुला स्पष्ट समजेल. ॥ १ ॥

मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम् ।
स मायी सृजतीत्याहुः श्वेताश्वतर शाखिनः ॥ २ ॥
शि० – ही सृष्टि ईश्वरानें उत्पन्न केली याला प्रमाण काय ? गु० – या गोष्टीस श्रुतीचीं प्रमाणे पुष्कळ आहेत. ”माया ही प्रकृति आहे; आणि त्या प्रकृतीस धारण करणारा परमेश्वर होय. तो मायी परमेश्वरच या सृष्टीस उत्पन्न करतो. अशा अर्थाच्या श्रुती श्वेताश्वतरशाखेंत आहेत. ॥ २ ॥

आत्मा वा इदमग्रेऽभूत्स ऐक्षत सृजा इति ।
सञ्कल्पेनासृजल्लोकान्स एतानिति बह्वृचाः ॥ ३ ॥
ऐतरेय उपनिषदांतही यास प्रमाण आहे. ”हें जगत पूर्वी आत्माच होतें. त्याच्या ईक्षणानेच हें जग उत्पन्न झालें. तो संकल्पेंकरून लोकांप्रत उत्पन्न करिता झाला” इत्यादि. ॥ ३ ॥

खंवाय्वग्निजलोर्व्योषध्यन्नदेहाः क्रमादमी ।
सम्भूता ब्रह्मणस्तस्मादेतस्मादात्मनोऽखिलाः ॥ ४ ॥
तैत्तिरीय श्रुतीतही असें सांगितले आहे, आकाश, वायु, अग्नि, जल, पृथ्वी, ओषधी, अन्न, देह ही क्रमेंकरून एकापासून एक अशीं, मूळब्रह्मापासूनच उत्पन्न झालीं. ॥ ४ ॥

बहु स्यामहमेवातः प्रजायेयेति कामतः ।
तपस्तप्त्वाऽसृजत्सर्वं जगदित्याह तैत्तिरिः ॥ ५ ॥
मी एकाचा अनेक होईन. अशा संकल्पेंकरून तप करून सर्व जग उत्पन्न करिता झाला. ॥ ५ ॥

इदमग्रे सदेवासीद्बहुत्वाय तदैक्षत ।
तेजोऽवन्नाण्डजादीनि ससर्जेति च सामगाः ॥ ६ ॥
छांदोग्य श्रुतीतही असेंच म्हटले आहे ”हें जग. पूर्वी एक सद्वस्तूच होतें. एकाचे अनेक व्हावे अशी त्यासच इच्छा झाली. तेज, उदक, अन्न, अंडज, जरायुज अणि उद्‌भिज्ज अशी सृष्टि त्यांतूनच उत्पन्न झाली.” ॥ ६ ॥

विस्फुलिङ्गा यथा वह्नेर्जायन्तेऽक्षरतस्तथा ।
विविधाश्चिज्जडा भावा इत्याथर्वणिकी श्रुतिः ॥ ७ ॥
आतां अथर्ववेदाचें प्रमाण ऐक. ”ज्याप्रमाणें अग्नीपासून ठिणग्या उत्पन्न होतात त्याचप्रमाणे अक्षरसंज्ञक परमेश्वरापासून नानाप्रकारचे जड व सजीव पदार्थ उत्पन्न होतात;” असें अथर्ववेदीय श्रुति सांगते. ॥ ७ ॥

जगदव्याकृतं पूर्वमासीद्व्याक्रियतेऽधुना ।
दृश्याभ्यां नामरूपाभ्यां विराडादिषु ते स्फुटाः ॥ ८ ॥
पूर्वी हे जग अव्यक्त (अस्पष्ट) होतें. ते ईश्वराने आतां अनुभवास योग्य अशा नामरूपांनीं व्यक्त केलें. तीं नामे व रूपे (आकार इत्यादि) विराटादि प्राण्यांमध्यें स्पष्ट प्रतीत होतात. ॥ ८ ॥

विराणानुर्नरो गावः खराश्वाजावयस्तथा ।
पिपीलिकावधिद्वन्द्वमिति वाजसनेयिनः ॥ ९ ॥
(कशी म्हणशील तर ऐक) विराट्, मनु, मनुष्यें, गाई, गर्दभ, अश्व, बकरी, मेंढ्या तसेच मुंगीपर्यंत सर्व लहानथोर प्राणी त्यानें उत्पन्न केले असे वाजसनेयी शाखाध्याची सांगतात. ॥ ९ ॥

कृत्वा रूपान्तरं जैवं देहे प्राविशदीश्वरः ।
इति ताः श्रुतयः प्राहु जीवत्वं प्राणधारणात् ॥ १० ॥
जीवसंबंधीं असें निराळें रूप करून ईश्वर देहांत प्रविष्ट झाला, असे त्या श्रुति सांगतात. प्राणादिकांच्या धारणामुळे त्या ब्रह्माकडे जीवत्व आले आहे. ॥ १० ॥

चैतन्यं यदधिष्ठानं लिङ्गदेहश्च यः पुनः ।
चिच्छाया लिङ्गदेहस्था तत्संघोजीव उच्यते ॥ ११॥
जें अधिष्ठान चैतन्य, तसेच जो लिंगदेह आणि जी लिंग देहस्थ चैतन्याची छाया यांच्या समुदायाला जीव असे म्हणतात. ॥ ११ ॥

माहेश्वरी तु या माया तस्या निर्माणशक्तिवत् ।
विद्यते मोहशक्तिश्च तं जीवं मोहयत्यसौ ॥ १२ ॥
जी ईश्वराची महामाया तिची निर्माण करण्याच्या शक्तिप्रमाणेंच मोहशक्तिही आहे. ती त्या जीवाला मोहित करते ॥ १२ ॥

मोहादनीशतां प्राप्य मग्नो वपुषि शोचति ।
ईशसृष्टमिदं द्वैतं सर्वमुक्तं समासतः ॥ १३ ॥
मोहामुळे हा परतंत्र होऊन शरीरांत निमग्न होत्साता शोक करतो. असो. ह्याप्रमाणे हें ईश्वरनिर्मित सर्व द्वैत संक्षेपत: सांगितलें ॥ १३ ॥

सप्तान्नब्राह्मणे द्वैतं जीवसृष्टं प्रपञ्चितम् ।
अन्नानि सप्तज्ञानेन कर्मणाजनयत्पिता ॥ १४ ॥
सर्व लोकांचा पालक जो समष्टि जीव त्यानें ज्ञान व प्रयत्न यांच्या योगाने सात प्रकारचे अन्न निर्माण केले असें सप्तान्न ब्राह्मणामध्यें जीवनिर्मित द्वैताचे सविस्तर वर्णन केले आहे. ॥ १४ ॥

मर्त्यानामेकं देवान्ने द्वे पश्वान्नं चतुर्थकम् ।
अन्नत्रितयमात्मार्थमन्नानां विनियोजनम् ॥ १५ ॥
मरण धर्मवान् प्राण्यांकरितां एक, देवांकरितां दोन, पशूंकरितां चवथे व स्वत: करितां राहिलेली तीन. अशा प्रकारे त्या अन्नांचा श्रुतीनेच विनियोग केलेला आहे. ॥ १५ ॥

व्रीह्यादिकं दर्शपूर्णमासौ क्षीरं तथा मनः ।
वाक्प्राणश्चेति सप्तत्वमन्नानामवगम्यताम् ॥ १६ ॥
व्रीह्यादिक मनुष्यांकरितां, दर्शपूर्णमास देवांकरितां, क्षीर पशूकरितां, आणि मन, वाणी व प्राण ही आत्म्याकरतां अशीं सात अन्नें समजावी. ॥ ११ ॥

ईशेन यद्यप्येतानि निर्मितानि स्वरूपतः ।
तथापि ज्ञानकर्माभ्यां जीवो कार्षीत्तदन्नताम् ॥ १७ ॥
शि० – मग ही अन्ने ईशनिर्मितच झाली, ती जीवनिर्मित कशी ? गु० – ही अन्ने जरी स्वरूपतः ईश्वरानें निर्माण केलीं, तथापि ज्ञानकर्माच्या योगानें त्यांस अन्नत्व जीवानेंच दिले आहे म्हणून त्यांचें भोग्यत्व त्यानेच निर्माण केले आहे असें समजावे ॥ १७ ॥

ईशकार्यं जीवभोग्यं जगद्द्वाभ्यां समन्वितम् ।
पितृजन्या भर्तृभोग्या यथा योषित्तथेष्यताम् ॥ १८ ॥
ईश्वराची कृति आणि जीवाचा भोग या दोहोंनी हें जग बनले आहे. म्हणजे ईश्वराने सृष्टि करावी आणि ती जीवांनीं भोगावी. यास दृष्टांत पित्यानें उत्पन्न केलेली कन्या जशी भर्त्यास भोग्य होते; तद्वत, शि० – ईश्वर कोणत्या साधनानें सृष्टि करतो ? व जीव कोणत्या साधनानें करतो ? ॥ १८ ॥

मायावृत्त्यात्मको हीशसंकल्पः साधनं जनौ ।
मनो वृत्त्यात्मको जीवो संकल्पो भोगसाधनम् ॥ १९ ॥
गु० – मायावृत्त्यात्मक जो संकल्प तो ईशसृष्टीचें साधन होय आणि मनोवृत्त्यात्मक जो संकल्प तो जीवसृष्टीचें म्हणजे भोगाचें साधन होय. शि ० – ईश्वरानें उत्पन्न केलेल्या पदार्थात जीवानें निर्माण केलेला भोग्यत्वाकार आहे. म्हणतात तो कोठे आहे ? ॥ १९ ॥

ईशनिर्मितमण्यादौ वस्तुन्येकविधे स्थिते ।
भोक्तृधीवृत्तिनानात्वात्तद्‌भोगो बहुधेष्यते ॥ २० ॥
गु० – ईश्वरानें निर्माण केलेल्या एकाच रत्नादि पदार्थाचे ठायीं भोक्त्याच्या मनाच्या नानाविध वृत्तीच्या योगें नानाप्रकारचे भोग घडतात. ॥ २० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *