दृष्टांत 36 उघडं झाकावं? जरूरीपुरते असते तेच पांघरूण…का?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

पांघरूण

पांघरूण ह्या शब्दातच अतिव माया नि उब दाटलेली आहे. बाहेर धो धो पाऊस पडतोय असं दिसलं, की, मस्तं पांघरूण लपेटून गुडूप व्हावं वाटतं. झोप येवो, न येवो ! पण पांघरुणाची उब हवीहवीशी वाटते.

हिवाळ्यात एक पांघरूण पुरतच नाही! पूर्वी गोधडी, दुघडी, चौघाडी अश्या अनेक पदरात दाटलेली माया उब देत असे. आता, सोलापुरी चादर, ब्लॅंकेट, दुलई, रजई ह्यासारखी पांघरायला अनेकविध साधनं उपलब्ध आहेत.

पण मला आठवतंय, लहानपणी जेंव्हा दरदरून ताप आला होता, तेंव्हा आजीच्या लुगड्याच्या चार गोधड्या अंगावर टाकल्यावर, इतकी उब आली होती, नि कसकसलेल्या अंगाला तो स्पर्श सुखद वाटत होता. थोड्याच वेळात दरदरून घाम फुटल्यावर, त्या चार गोधड्या अंगावर नकोश्या झाल्या, सहन होईनाशा झाल्या, म्हणून पायांनीच सरकवून दिल्या!
तेंव्हा आजीं म्हणाली होती, “राजा, काम झालं म्हणून असं लाथाडू नये रे पांघरूण! त्याच्या मुळेच तर उतरला ताप तुझा!”

झोपतांना गरज नसली तरी पायापुरते पांघरूण घ्यावेच हा आजीचा संस्कार. “त्यात पाय कधी उघडे ठेवून झोपू नये, पायांना उब राहिली तर रक्तप्रवाह सुरळीत चालतो,” हे एकही इयत्ता न शिकलेल्या माझ्या आजीचे वाक्य माझे पाय दुखू देत नाहीत.

“चारचौघात कोणी उघडं पडतंय, वाभाडे काढल्या जातायेत हे दिसलं, की, त्यावर पांघरूण घालावं!” हे मला आजीनेच शिकवले, कारण ह्यामुळे मन मरून जातं नि मेलेलं मन घेऊन शरीर जगवण्यात काही अर्थ नसतो, हे तत्वज्ञान स्वयंपाक घरात चुलीपाशी बसलेल्या आजीच्या डोक्यात कुठून आलं असेल?

“चुका झाकायच्या नि गुण उघडे पाडायचे,” हे फक्त मायेचे पांघरूण असेल तरच शक्य होते. हृदयात अतिव माया, कणव असावीच, पण ही माया पांघरून जर कोणी निष्क्रिय होत असेल, तर पांघरूण ओढून कमरेत लाथ घालून उठवण्याची हिंमत पण हवीच!
हे वरवर कठोर वाटलं तरी, आपलं माणूस कर्मप्रवृत्त व्हावं ही देखील मायाच असते.

परवाच एक जोक वाचला, अंथरूण पाहून पाय पसरावे ह्या म्हणीवर. “माझ्याकडे खूप अंथरूणं आहेत पण पाय दोनच आहेत तर मग मी अजून पाय कुठून आणू पसरायला ?” ह्याला ‘ते लोक’ जोक म्हणत होते म्हणून, अन्यथा, यात हसण्यासारखे नाही, तर बुद्धीची कीव करावी, असे काही आहे! जरूरीपुरते असते त्यालाच पांघरूण म्हणतात अन्यथा तो फाफट पसाराच!

आवश्यक तेंव्हा वापरावं, इतरवेळी घडी करून जतन करावं,
नको असेल, तर, ज्याला गरज त्याला द्यावं!

“दुसर्‍याचं उघडं झाकावं” ही दानत असेल तरच दुसर्‍याच्या चुकांवर पांघरूण घालण्याची वृत्ती तयार होते!

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *