सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा ओवी १५१ ते १७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

151-16
वरी कोणे एकें उपायें । पडिलें तें उभें होये । तेंच कीजे परी घाये । नेदावे वर्मीं ॥ 151 ॥
तर, जो कोणी पतित असेल तो ज्या उपायाने उभा राहील म्हणजे सुधारेल ते उपाय योजून त्याचा मर्मच्छेद करू नये. 51
152-16
पैं उत्तमाचियासाठीं । नीच मानिजे किरीटी । हें वांचोनि दिठी । दोषु न घेपे ॥ 152 ॥
किंवा, अर्जुना, एखाद्या उत्तम किंवा पुरुषाची तुलना मनांत आणून त्यामानाने हा कनिष्ठ आहे असें मनांत न आणितां जो त्याच्या दोषांकडे दुर्लक्ष करितो. 52
153-16
अगा अपैशून्याचें लक्षण । अर्जुना हें फुडें जाण । मोक्षमार्गींचें सुखासन । मुख्य हें गा ॥ 153 ॥
अर्जुना, ” अपैशुन्याचे ” अथवा सुजनतेनें हे लक्षण होय व मोक्षमार्गातील हे एक सुखसाधन आहे. 53
154-16
आतां दया ते ऐसी । पूर्णचंद्रिका जैसी । निववितां न कडसी । सानें थोर ॥ 154 ॥
आतां दया म्हणजे काय विचारशील, तर ती अशी असावी कीं, पूर्णचंद्र परतापहरण करितांना जसा भेदाभेद राखीत नाही, तशी ती प्राणिमात्राच्या ठिकाणी सारखी असावी. 54
155-16
तैसें दुःखिताचें शिणणें । हिरतां सकणवपणें । उत्तमाधम नेणें । विवंचूं गा ॥ 155 ॥
म्हणून कोणाही दुःखितांचे दुःख पाहून, त्याचा उत्तमपणा अगर अधमपणा मनांत न आणितां त्याची करुणा करावी. 55

156-16
पैं जगीं जीवनासारिखें । वस्तु अंगवरी उपखें । परी जातें जीवित राखे । तृणाचेंहि ॥ 156 ॥
किंवा जगांत जीवनासारखी (जलासारखी) दुसरी कोणती वस्तु आहे की जी आपला सर्वस्व वेंच करून घेऊनही गवतासारख्याचेही जीवित रक्षण करितें. 56
157-16
तैसें पुढिलाचेनि तापें । कळवळलिये कृपें । सर्वस्वेंसीं दिधलेंहि आपणपें । थोडेंचि गमे ॥ 157 ॥
त्याप्रमाणे दुःखातं पाहून ज्याला कृपेने कळवळा येतो व जो त्याच्या सहाय्यार्थं आपले सर्वस्व देऊनही कांहींच दिलें नाहीं असें चित्तांत मानतो. 57
158-16
निम्न भरलियाविणें । पाणी ढळोंचि नेणे । तेवीं श्रांता तोषौनि जाणें । सामोरें पां ॥ 158 ॥
सखल प्रदेश पूर्ण भरल्याशिवाय पाणी जसे वाहू लागतच नाही, त्याप्रमाणे ज्याला समोरील पीडिताचे दुःख निवारण केल्याशिवाय अन्य कांहीही करणे सुचत नाहीं. 58
159-16
पैं पायीं कांटा नेहटे । तंव व्यथा जीवीं उमटे । तैसा पोळे संकटें । पुढिलांचेनि ॥ 159 ॥
किंवा पायांत मोडलेला कांटा असेपर्यंत जसें जीवाला त्याचे दुःख होतें, त्याप्रमाणे पुढीलांचे संकट पाहून जो नित्य पाळतो. 59
160-16
कां पावो शीतळता लाहे । कीं ते डोळ्याचिलागीं होये । तैसा परसुखें जाये । सुखावतु ॥ 160 ॥

किंवा पावलाला शीतलोपचार केले तर त्यांचा जसा त्यांच्यापेक्षा डोळ्यांनाच अधिक उपयोग होतो, त्याप्रमाणे जो दुसऱ्यायाचें सुख पाहूनच मनांत सुखी होतो. 160

161-16
किंबहुना तृषितालागीं । पाणी आरायिलें असे जगीं । तैसें दुःखितांचे सेलभागीं । जिणें जयाचें ॥ 161 ॥
किंबहुना, तृषितांची तृषा हरण व्हावी म्हणूनच जस जगांत पाण्याचा जन्म आहे, त्याप्रमाणे दुःखितांचे दुःख हरण करावें हेंच ज्याच्या जीवनाचे मुख्य कर्तव्य आहे.61
162-16
तो पुरुषु वीरराया । मूर्तिमंत जाण दया । मी उदयजतांचि तया । ऋणिया लाभें ॥ 162 ॥
अर्जुना, असा जो पुरुष तो दयेची केवळ मूर्तींच होय; तो जन्मत:च मला ऋणी करून ठेवितो. 62
163-16
आतां सूर्यासि जीवें । अनुसरलिया राजीवें । परी तें तो न शिवे । सौरभ्य जैसें ॥ 163 ॥
आतां, कमल जरी, सूर्यापाशीं जीवें भावें अनन्य असले तरी, तो जसा त्याच्या सुगंधाला स्पर्शही करीत नाही,63
164-16
कां वसंताचिया वाहाणीं । आलिया वनश्रीच्या अक्षौहिणी । ते न करीतुचि घेणी । निगाला तो ॥ 164 ॥
किंवा वसंतऋतूच्या आगमनाने सर्व वनश्री जरी पत्र, पुष्प, फल युक्त ऐश्वर्याला धारण करते तरी, तो त्या ऐश्वर्याकडे ढंकूनही न पहातां जसा सरळ निघून जातो. 64
165-16
हें असो महासिद्धीसी । लक्ष्मीही आलिया पाशीं । परी महाविष्णु जैसी । न गणीच ते ॥ 165 ॥
किंवा, ही राहो, सर्व सिद्धींसह लक्ष्मी पायाशी आली असतांही श्रीमहाविष्णु जसे तिला मुळींच महत्त्व देत नाही. 65

166-16
तैसे ऐहिकींचे कां स्वर्गींचे । भोग पाईक जालिया इच्छेचे । परी भोगावे हें न रुचे । मनामाजीं ॥ 166 ॥
त्याप्रमाणे ऐहिक किंवा पारत्रिक भोग ह्याच्या इच्छेचे दास होऊन पुढे आले तरी, त्यांच्या भोगाविषयीं ज्याला यत्किंचितही इच्छा होत नाही. 66
167-16
बहुवें काय कौतुकीं । जीव नोहे विषयाभिलाखी । अलोलुप्‌त्वदशा ठाउकी । जाण ते हे ॥ 167 ॥
बहुत काय सांगावें? कौतुकाखातरही ज्याला कधीं विषयसेवनाची इच्छा होत नांहीं. अशी जी दशा तें “अलोलुप्त्व” होय. 67
168-16
आतां माशियां जैसें मोहळ । जळचरां जेवीं जळ । कां पक्षियां अंतराळ । मोकळें हें ॥ 168 ॥
आतां, मधमाशांना जसे मोहोळ किंवा जलचरांना जसें जल, किंवा पक्षांना जसें आकाश नित्यप्रिय असतें. 68
169-16
नातरी बाळकोद्देशें । मातेचें स्नेह जैसें । कां वसंतीच्या स्पर्शें । मऊ मलयानिळु ॥ 169 ॥
किंवा, बालकाविषयीं मातेचे चित्त जसें नित्य प्रेमयुक्त असतें अथवा मलयागिरीवरून वसंतांत येणारा वारा जसा मधुर व कोमल असतो. 69
170-16
डोळ्यां प्रियाची भेटी । कां पिलियां कूर्मीची दिठी । तैसीं भूतमात्रीं राहटी । मवाळ ते ॥ 170 ॥
पतिव्रतेला पतिदर्शन, किंवा कांसवीच्या पिलांना मातृदृष्टि, ह्याप्रमाणे भूतमात्राविषयीं ज्याच्या अंतःकरणांत नित्यप्रेम व मार्दव असतें. 170

171-16
स्पर्शें अतिमृदु । मुखीं घेतां सुस्वादु । घ्राणासि सुगंधु । उजाळु आंगें ॥ 171 ॥
स्पर्श केला तर मृदु, सेवन केला तर रुचकर, वास घेतला तर सुगंधित, व रूपाने शुभ्र असा जो कापूर. 71
172-16
तो आवडे तेवढा घेतां । विरुद्ध जरी न होतां । तरी उपमे येता । कापूर कीं ॥ 172 ॥
तो वाटेल तेवढा सेवन करून जर बाधा न करितां, तर, त्याची उपमा देतां आली असती. 72
173-16
परी महाभूतें पोटीं वाहे । तेवींचि परमाणूमाजीं सामाये । या विश्वानुसार होये । गगन जैसें ॥ 173 ॥
परंतु ज्याच्या पोटांत पंचमहाभूतांचा समावेश होऊनही जे परमाणूमध्येही प्रविष्ट असते व जें विश्वाचा आकार धारण करिते असें जें गगन. 73
174-16
काय सांगों ऐसें जिणें । जें जगाचेनि जीवें प्राणें । तया नांव म्हणें । मार्दव मी ॥ 174 ॥
फार काय सांगावें ! याचें जिणे म्हणजे केवळ जगाच्या कल्याणार्थच असते त्याला ‘मार्दव’ असें मी म्हणतों74
175-16
आतां पराजयें राजा । जैसा कदर्थिजे लाजा । कां मानिया निस्तेजा । निकृष्टास्तव ॥ 175 ॥
आतां पराभव पावलेला राजा जसा लज्जेने व्यथित होतो, किंवा मानी पुरुष निकृष्ट स्थिति प्राप्त झाली असतां जसा निस्तेज होतो. 75

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 16th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Solava Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 16 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १६ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *