सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २०१ ते २२०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

प्रत्यूषे वा प्रदोषे वा मग्नो मन्दे तमस्ययम् ।
लोको भाति यथा तद्वदस्पष्टं जगदीक्ष्यते ॥ २०१ ॥
पहांटेस अथवा सायंकाळी मंद अंधकारांत जग जसे अस्पष्ट भासते तसेंच हिरण्यगर्भावस्थेमध्यें भासते. ॥ २०१ ॥

सर्वतो लाञ्छितो मस्या यथा स्याद्घट्टितः पटः ।
सूक्ष्माकारैस्तथेशस्य वपुः सर्वत्र लाञ्छितम् ॥ २०२ ॥
ज्याप्रमाणें खळ दिलेला पट मषीने आसलेला सर्वत्र असतो, त्याप्रमाणें ईश्वराचे शरीर या अवस्थेमध्ये सूक्ष्म आकारानीं लांछित झालेले असते. ॥ २०२ ॥

शस्यं वा शाकजातं वा सर्वतोऽङ्कुरितं यथा ।
कोमलं तद्वदेवैष पेलवो जगदङ्कुरः ॥ २०३ ॥
अथवा ज्याप्रमाणें धान्य .अथवा भाजीपाला यांचे कोवळे अंकुर भूमीवर उगवतात, त्याप्रमाणें या अवस्थेंत जगाचा अंकुर फार कोंवळा असतो. ॥ २०३ ॥

आतपाभातलोको वा पटो वा वर्णपूरितः ।
शस्यं वा फलितं यदवत्तथा स्पष्टवपुर्विराट् ॥ २०४ ॥
आतां हिरण्यगर्भ अवस्थेला वर जे तीन दृष्टांत दिले त्यांच्याच क्रमेंकरून स्पष्ट दशा पाहिल्या असतां विराट्-स्वरूप चांगले ध्यानांत येईल. म्हणजे मदांधकार जाऊन ऊन पडलें असतां जग जसे स्पष्ट भासते, पट रंगविला असतां चित्रे जशी स्पष्ट भासतात, अथवा शेते पक्व झाली असतां धान्यफळें जशी स्पष्ट भासतात; त्याप्रमाणें हिरण्यगर्भ विराट्-रूपाने स्पष्ट भासूं लागतो. ॥ २०४ ॥

विश्वरूपाध्याय एष उक्तः सूक्तेऽपि पौरुषे ।
धात्रादिस्तम्बपर्यन्तानेतस्यावयवान् विदुः ॥ २०५ ॥
विश्वरूपाध्यायामध्यें आणि पुरुषसूक्तांतही ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत या विराटाचे सर्व अवयव आहेत असें म्हटलें आहे. ॥ २०५ ॥

ईशसूत्रविराट्वेधोविष्णुरुद्रएन्द्रवह्नयः ।
विघ्नभैरवमैरालमारिका यक्षराक्षसाः ॥ २०६ ॥
ईश, सूत्र, विराट्, ब्रह्मदेव, विष्णु, रुद्र, इंद्र, अग्नि, विघ्नेश, भैरव, मैराल, मारिका, यक्ष व राक्षस. ॥ २०६ ॥

विप्रक्षत्रियविट्शूद्रा गवाश्वमृगपक्षिणः ।
अश्वत्थवटचूताद्या यववृहितृणादयः ॥ २०७ ॥
विप्र, क्षत्रिय, विट्, शूद्र, गाय, घोडा, मृग, पक्षी, अश्वत्थ, वट, आम्रवृक्षादि, यवादि, धान्यतृणादि ॥ २०७ ॥

जलपाषाणमृत्काष्ठवास्याकुद्दालकादयः ।
ईश्वराः सर्व एवैते पूजिताः फलदायिनः ॥ २०८ ॥
जल, पाषाण, माती, काष्ठ, वास्याकुद्दालकादिपर्यंत ईश्वर मानून पूजिले असतां फलदायी होतात. ॥ २०८ ॥

यथा यथोपासते तं फलमीयुस्तथा तथा ।
फलोत्कर्षापकर्षौ तु पूज्यपूजानुसारतः ॥ २०९ ॥
जशी जशी उपासूना करावी तसें तसें फळ मिळतें. कमीजास्त फळ मिळणे हें पूज्य देवता आणि पूजेचा प्रकार यांवर अवलंबन आहे. ॥ २०९ ॥

मुक्तिस्तु ब्रह्मतत्त्वस्य ज्ञानादेव न चान्यथा ।
स्वप्रबोधं विना नैव स्वस्वप्नं हीयते यथा ॥ २१० ॥
परंतु मुक्ति ही ब्रह्मतत्त्वाच्या ज्ञानावाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने मिळणार नाहीं. पहा, स्वप्न जर नाहींसें करावयाचें आहे, तर जागेच झालें पाहिजे; त्यावाचून दुसरा उपाय नाहीं. ॥ २१० ॥

अद्वितीयब्रह्मतत्त्वे स्वप्नोऽयमखिलं जगत् ।
ईशजीवाद्रूपेण चेतनाचेतनात्मकम् ॥ २११ ॥
एथें स्वप्नाचा दृष्टांतही योग्य आहे. कारण, अद्वितीय ब्रह्मतत्त्वाचेठायी ईशजीवादिरूपानें असणारे सर्व चराचर जग स्वप्नाप्रमाणेंच आहे. ॥ २११ ॥

आनन्दमयविज्ञानमयावीश्वरजीवकौ ।
मायया कल्पितावेतौ ताभ्यां सर्वं प्रकल्पितम् ॥ २१२ ॥
आनंदमय ईश्वर अणि विज्ञानमय जीव हे आदिमायेने कल्पिले आणि त्या उभयतांनी बाकी जगाची कल्पना केली. आतां मायेने कल्पिले तेही जगच आहे; तेव्हां जीव आणि ईश हे जगापैकीच झाले. ॥ २१२ ॥

ईक्षणादिप्रवेशान्ता सृष्टिरीशेन कल्पिता ।
जाग्रदादिविमोक्षान्तः संसारो जीवकल्पितः ॥ २१३ ॥
इच्छादिकरून प्रवेशापर्यंत जी सृष्टि आहे ती ईश्वराने केलेली, आणि जागृतीपासून मोक्षापर्यंत जी सृष्टि ती जीवानें केलेली आहे. ॥ २१३ ॥

अद्वितीयं ब्रह्मतत्त्वमसङ्गं तन्न जानते ।
जीवएशयोर्मायिकयोर्वृथैव कलहं ययुः ॥ २१४ ॥
असंग, अद्वितीय जें ब्रह्मतत्त्व, तें न जाणतां मायीक जे जीव आणि ईश यांविषयी लोक व्यर्थ कलह करतात. ॥ २१४ ॥

ज्ञात्वा सदा तत्त्वनिष्ठाननुमोदामहे वयम् ।
अनुशोचाम एवान्यान्न भ्रान्तैर्विवदामहे ॥ २१५ ॥
आतां यांना बोध करून मार्गास लावावें असें कोणी म्हणेल, तर आमची रीती अशी आहे. तत्त्वनिष्ठांना पाहून आम्ही मान डोलवितों. अज्ञान्यांना पाहून आम्हांस वाईट वाटतें, आणि भ्रमिष्टांशी आम्हीं वादच करीत नाहीं. ॥ २१५ ॥

तृणार्चकादियोगान्ता ईश्वरभ्रान्तिमाश्रिताः ।
लोकायतादिसांख्यान्ता जीवविभ्रान्तिमाश्रिताः ॥ २१६ ॥
तृणार्चकापासून योगवाद्यापर्यंत सारे ईश्वराविषयी भ्रांतींत पडले आहेत, आणि लोकायत म्हणजे देहात्मवाद्यांपासून सांख्यवाद्यांपर्यंत सगळे जीवाविषयीं भ्रांतींत पडले आहेत. ॥ २१६ ॥

अद्वितीयब्रह्मतत्त्वं न जानन्ति यदा तदा ।
भ्रान्ता एवाखिलास्तेषां क्व मुक्तिः क्वेह वा सुखम् ॥ २१७ ॥
हे भ्रांत कसे जर म्हणाल तर जोपर्यंत अद्वितीय ब्रह्मतत्त्व समजलें नाहीं, तोपर्यंत सर्व भ्रमांतच आहेत असें म्हटलें पाहिजे. अशा लोकांस मुक्तीही नाहीं आणि ऐहिक सुखही नाहीं. ॥ २१७ ॥

उत्तमाधमभावश्चेत्तेषां स्यादस्तु तेन किम् ।
स्वप्नस्थराज्यभिक्षाभ्यां न बुद्धः स्पृश्यते खलु ॥ २१८ ॥
कोणी म्हणेल कीं, त्यांस ब्रह्मज्ञान जरी कदाचित् नसलें, तरी इतर विद्येच्या संबंधाने लहानमोठेपणा आहे, आणि त्याप्रमाणें त्यांना सुखाची प्राप्तीही आहे; तर तसें सुख असून नमून सारखेच, त्याचा आम्हास काय उपयोग ? स्वप्नांत राज्यप्राप्ति आणि भिक्षा मागणें या दोन्ही गोष्टींचा संपर्क जागृताला मुळींच नाहीं. ॥ २१८ ॥

तस्मान्मुमुक्षिभिर्नैव मतिर्जीवेशवादयोः ।
कार्या किंतु ब्रह्मतत्त्वं विचार्य बुध्यतां च तत् ॥ २१९ ॥
म्हणून मुमुक्षूंनी जीव आणि ईश याविषयींचा वाद सोडून देऊन ब्रह्मतत्त्वाचा विचार करावा, आणि तें नीट समजून घ्यावे. ॥ २१९ ॥

पूर्वपक्षतया तौ चेत्तत्त्वनिश्चयहेतुताम् ।
प्राप्नुतोऽस्तु निमज्जस्य तयोर्नैतावता वशः ॥ २२० ॥
ब्रह्मतत्त्वाचा निश्चय करण्याकरितां तरी या दोन्ही वादांची आवश्यकता आहे कीं नाही असा जर कोणी प्रश्न करील, तर त्यास असें सांगतो कीं गरजेपुरता त्याचा उपयोग करून स्वीकार करावा. अविचाराने त्यांतच गढून बसू नये. २२० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *