सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १८१ ते २००

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

एतस्य वा अक्षरस्य प्रशासन इति श्रुतिः ।
अन्तः प्रविष्टः शास्तायं जनानामिति च श्रुतिः ॥ १८१ ॥
ईश्वर आंत बाहेर सर्वत्र व्यापला आहे असें म्हणण्यास “एतस्य वा अक्षरस्य” व “अंतःप्रविष्टः शास्ता” अशा दोन श्रुति प्रमाण होत. ॥ १८१ ॥

जगद्योनिर्भवेदेष प्रभवाप्ययकृद्यतः ।
आविर्भावतिरोभावावुत्पत्तिप्रलयौ मतौ ॥ १८२ ॥
ह्याच्यापासून जगाची उत्पत्ति आणि नाश होतात. म्हणून जगद्योनि (जगाचे कारण) असें त्यास म्हणतात. उत्पात आणि प्रलय याचा अर्थ दिसणे आणि गुप्त होणें असा आहे. ॥ १८२ ॥

आविर्भावयति स्वस्मिन्विलीनं सकलं जगत् ।
प्राणिकर्मवशादेष पटो यद्वत्प्रसारितः ॥ १८३ ॥
ज्याप्रमाणें घडी घातलेला पट स्वतःच्या पसरण्यानें आपल्याठायीं असलेली चित्रे प्रकट करतो, तद्वत ईश्वरही आपल्याठायीं लीन झालेले जग प्राण्याच्या कर्मभोगास्तव प्रकट करतो. ॥ १८३ ॥

पुनस्तिरोभावयति स्वात्मन्येवाखिलं जगत् ।
प्राणिकर्मक्षयवशात्संकोचितपटो यथा ॥ १८४ ॥
आणि ज्याप्रमाणें तो पट गुंडाळण्याच्या योगाने, आपल्या ठायीची चित्रें आपल्यामध्येच झांकतो, त्याप्रमाणें ईश्वरही आपल्याठायीचे जग प्रत्ययाच्या कर्मक्षयामुळे आपल्याठायींच लीन करतो. ॥ १८४ ॥

रात्रिघस्रौ सुप्तिबोधावुन्मीलननिमीलने ।
तूष्णींभावमनोराज्ये इव सृष्टिलयाविमौ ॥ १८५ ॥
ज्या- प्रमाणें रात्रं-दिवस, निद्रा-जागृति, उघडणे-झाकणें, मनाचा स्तब्धपणा आणि कल्पना हीं द्वंद्वे आहेत, त्याप्रमाणेंच सृष्टि आणि लय ही समजावी. ॥ १८५ ॥

आविर्भावतिरोभावशक्तिमत्त्वेन हेतुना ।
आरम्भपरिणामादिचोद्यानां नात्र सम्भवः ॥ १८६ ॥
आविर्भाव, तिरोभाव करण्याची शक्ति ईश्वराचेठायी आहे एवढ्या कारणानें आरंभवादाची व परिणामवादाची शंका येण्याचा संभव आहे. ह्या दोनही शंकाचे निवारण विवर्तवादाचा स्वीकार केल्याने होतें ॥ १८६ ॥

अचेतनानां हेतुः स्याज्जाड्यांशेनेश्वरस्तथा ।
चिदाभासांशतस्त्वेष जीवानां कारणं भवेत् ॥ १८७ ॥
एकच परमेश्वर चेतनाचेतनरूप द्विविध जगाला कारण कसा झाला, असें कोणी पुसेल, तर जडांशानें तो अचेतनाचे कारण आणि चिदाभासाच्या अंशाने चेतनाचें कारण आहे हेंच त्याचें उत्तर. ॥ १८७ ॥

तमः प्रधानः क्षेत्राणां चित्प्रधानाश्चिदात्मनाम् ।
परः कारणतामेति भावनाज्ञानकर्मभिः ॥ १८८ ॥
तमःप्रधान जो परमात्मा तो भावना, ज्ञान व कर्म यांही करून क्षेत्राचे कारण आहे; आणि चित्प्रधान जो परमात्मा तो चिदाभासाचें कारण आहे. ॥ १८८ ॥

इति वार्तिककारेण जडचेतनहेतुता ।
परमात्मन एवोक्ता नेश्वरस्येति चेच्छ्हृणु ॥ १८९ ॥
या रीतीनें वार्तिककारांनीं जड चेतनाचे कारण परमात्म्याकडेच लावलें आहे. म्हणून ईश्वर कांहीं जगत्कारण नव्हे असें जर म्हणाल, तर ॥ १८९ ॥

अन्योन्याध्यासमत्रापि जीवकूटस्थयोरिव ।
ईश्वरब्रह्मणोः सिद्धं कृत्वा ब्रूते सुरेश्वरः ॥ १९० ॥
येथेही जीव कूटस्थाप्रमाणें ईश्वर आणि ब्रह्म यांचा अन्योन्याध्यास सिद्ध करून सुरेश्वराचार्य बोलले आहेत तें असेंः-॥ १९० ॥

सत्यं ज्ञानमनन्तं यद्ब्रह्म तस्मात्समुत्थिताः ।
खं वाय्वग्निजलोर्व्योषध्यन्नदेहाः इति श्रुतिः ॥ १९१ ॥
ब्रह्म हें सत्यज्ञानस्वरूपी असून अनंत आहे. त्यापासून आकाशादि देहापर्यंत भाव उत्पन्न झाले अशी श्रुति आहे. ॥ १९१ ॥

आपातदृष्टितस्तत्र ब्रह्मणो भाति हेतुता ।
हेतोश्च सत्यता तस्मादन्योन्याध्यास इष्यते ॥ १९२ ॥
केवळ बाह्यदृष्टीने, ब्रह्म हें जगाचे कारण नसून तें आहे असें दिसते, आणि जगाचे जें कारण मायाधीन चिदाभास तो खोटा असून खरा दिसतो. यालाच अन्योन्याध्यास म्हणतात. ॥ १९२ ॥

अन्योन्याध्यासरूपोऽसावन्नलिप्तः पटो यथा ।
घट्टितेनैकतामेति तद्वद्‌भ्रान्तैकतांगतः ॥ १९३ ॥
ज्याप्रमाणें खळ लावलेल्या पटांत खळ कोणती आणि पट कोणता हें समजत नाहीं, त्याप्रमाणें भ्रांतीमुळें वर सांगितलेल्या अन्योन्याध्यासरूप हेतूमुळे ब्रह्म आणि ईश यांचा भेद समजत नाहीं. ॥ १९३ ॥

मेघाकाशमहाकाशौ विविच्येते न पामरैः ।
तद्वद्ब्रह्मएशयोरैक्यं पश्यन्त्यापातदर्शिनः ॥ १९४ ॥
मेघाकाश कोणतें आणि महाकाश कोणतें हें असें अज्ञानी लोकांस समजणे कठिण, त्याप्रमाणें वरवर पहाणारांना ब्रह्म आणि ईश हे दोन्ही एकच दिसतात. ॥ १९४ ॥

उपक्रमादिभिर्लिङ्गैस्तात्पर्यस्य विचारणात् ।
असङ्गं ब्रह्म मायावी सृजत्येष महेश्वरः ॥ १९५ ॥
उपक्रमादि लिंगांहींकरून श्रुतीचे तात्पर्य काढलें असता ब्रह्म असंग आहे आणि सृष्टिकर्ता ईश्वर आहे असें समजले. ॥ १९५ ॥

सत्यं ज्ञानमनन्तं चेत्युपक्रम्योपसंहृतः ।
यतो वाचो निवर्तन्ते इत्यसङ्गत्वनिर्णयः ॥ १९६ ॥
“सत्यं ज्ञानमनंतं” या श्रुतीने (उपक्रम) करून “यतो वाची निवर्तंते” या श्रुतीनें उपसंहार (समाप्ति) करून ब्रह्माच्या असंगत्वाविषयीं शास्त्रांत निर्णय केला आहे. ॥ १९६ ॥

मायी सृजति विश्वं संनिरुद्धस्तत्र मायया ।
अन्य इत्यपरा ब्रूते श्रुतिस्तेनेश्वरः सृजेत् ॥ १९७ ॥
मायावी ईश्वर जग उत्पन्न करतो आणि त्या जगांत जीव मायेने बद्ध झाला आहे अशी दुसरी एक श्रुति आहे. त्यावरून ईश्वर जगाचा उत्पन्नकर्ता, असें होतें. ॥ १९७ ॥

आनन्दमय ईशोऽयं बहु स्यामित्यवैक्षत ।
हिरण्यगर्भरूपोऽभूत्सुप्तिः स्वप्नो यथा भवेत् ॥ १९८ ॥
आनंदमय जो ईश तोच “बहुस्यां” असा संकल्प करून निद्रा जशी स्वप्न होते त्याप्रमाणें हिरण्यगर्भ झाला. ॥ १९८ ॥

क्रमेण युगपद्वैषा सृष्टिर्ज्ञेया यथाश्रुति ।
द्विविधश्रुतिसद्‌भावाद्द्विविधस्वप्नदर्शनात् ॥ १९९ ॥
ही सृष्टि दोन प्रकारची घ्यावी. एक क्रमसृष्टि आणि दुसरी युगपत्सृष्टि. कारण, त्याला दोन प्रकारच्या श्रुतीही प्रमाण आहेत. आणि ज्या स्वप्नाचा आम्ही दृष्टांत दिला, तें स्वप्नही दोन प्रकारचे अनुभवास येतें. ॥ १९९ ॥

सूत्रात्मा सूक्ष्मदेहाख्यः सर्वजीवघनात्मकः ।
सर्वाहंमानधारित्वात्क्रियाज्ञानादिशक्तिमान् ॥ २०० ॥
सूक्ष्म देहाख्य जो सुत्रात्मा तो सर्व जीवाचे समष्टिरूप आहे. कारण, आम्ही जसे एकेका देहाविषयी अभिमानी आहोंत, त्याप्रमाणें तो सर्व जगाचा अभिमानी आहे. आणि क्रियाज्ञान आदिकरून शक्ति त्याच्यामध्यें आहेत. ॥ २०० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *