सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

रजोंऽशैः पञ्चभिस्तेषां क्रमात्कर्मेन्द्रियाणि तु ।
वाक्पाणिपादपायूपस्थाभिधानानि जज्ञिरे ॥ २१ ॥
पंचभूतांच्या सत्त्वांशांनीं जशीं ज्ञानेंद्रियें बनलीं. तशींच आकाशापासून पृथ्वीपर्यंत प्रत्येक भूतांच्या रजोंशापासून क्रमानें वाणी, हस्त, पाद, गुद आणि उपस्थ हीं कर्मेद्रियें बनली ॥२१॥

तैः सर्वैः सहितैः प्राणो वृत्तिभेदात्स पञ्चधा ।
प्राणोऽपानः समानश्चोदानव्यानौ च ते पुनः ॥ २२ ॥
आणि सर्वांच्या सत्त्वांशाच्या मिश्रणानें जसें अंतःकरण बनलें तसाच सर्वांच्या रजोगुणांशाच्या मिश्रणानें प्राण बनला. या प्राणाचेही पुनः स्थानभेदेंकरून पांच प्रकार झाले; ते हे – प्राण, अपान, व्यान, उदान, आणि समान. ॥२२॥

बुद्धिकर्मेन्द्रियप्राणपञ्चकैर्मनसा धिया ।
शरीरं सप्तदशभिः सूक्ष्मं तल्लिङ्गमुच्यते ॥ २३ ॥
याप्रमाणें पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें, पंच प्राण, मन आणि बुद्धि ही सत्रा मिळून एक सूक्ष्म शरीर झालें आहे. यालाच वेदांती लिंगशरीर असें म्हणतात. ॥२३॥

प्राज्ञस्तत्राभिमानेन तैजसत्वं प्रपद्यते ।
हिरण्यगर्भतामीशस्तयोर्व्यष्टिसमष्टिता ॥ २४ ॥
पूर्वी सांगितलेला जो प्राज्ञ तो जेव्हां या लिंगशरीरास मी मी असें म्हणतो, तेव्हां त्यासच तैजस असें नांव प्राप्त होतें. यास तेजस म्हणण्याचें कारण हेच की, अंतःकरण स्वतः तेजोमय आहे. ते अंतःकरण या शरीरामध्ये मुख्य असल्यामुळें त्याच्या अभिमानी जीवास तेजस हें नांव दिलें. पूर्वोक्त जो मायाप्रतिबिंबित ईश्वर तो जेव्हां अशा शरीराचा अभिमानी होतो, तेव्हां त्यास हिरण्यगर्भ असें म्हणतात. तैजस आणि हिरण्यगर्भ या दोहोंमधील भेद इतकाच कीं, तैजस हा व्यष्टिरूप आहे, आणि हिरण्यगर्भ समष्टिरूप आहे. ॥२४॥

समष्टिरीशः सर्वेषां स्वात्मतादात्म्यवेदनात् ।
तदभावात्ततोऽन्ये तु कथ्यन्ते व्यष्टिसंज्ञया ॥ २५ ॥
सर्व लिंगशरीराचा अभिमान ईश्वरास असल्यामुळें तो समष्टिरूप आहे. आणि जीवास केवळ एकाच व्यक्तीचा अभिमान असल्यामुळें तो व्यष्टि (व्यक्ति) होय. ॥२५॥

तद्‌भोगाय पुनर्भोग्यभोगायतनजन्मने ।
पञ्चीकरोति भगवान्प्रत्येकं वियदादिकम् ॥ २६ ॥
याप्रमाणे लिंगशरीर व त्याचे अभिमानी तेजस आणि हिरण्यगर्भ क्रमेंकरून सांगितले. आतां स्थूलशरारीचा विचार करू. सूक्ष्म पंचभूतांपासून जसे सूक्ष्म शरीर झालें, तसें स्थूळ पंचभूतांपासून स्थूळ शरीर झालें. सूक्ष्मापासून स्थूळ होण्याचा जो प्रकार त्यास वेदांतांत पंचीकरण अशी संज्ञा आहे. जीवांना सुखदुःखाचा भोग व्हावा, म्हणून भोग्य म्हणजे विषय व भोगायतन म्हणजे शरीरें हीं परमेश्वराने पंचीकरणाचे योगानें उत्पन्न केलीं. ॥२६॥

द्विधा विधाय चैकैकं चतुर्धा प्रथमं पुनः ।
स्वस्वेतरद्वितीयांशैर्योजनात् पञ्चपञ्च ते ॥ २७ ॥
पंचीकरण म्हणजे सूक्ष्म किंवा शुद्ध पंचभूतांपैकी प्रत्येक भूतांत, इतर चार भूतांचे कांहीं नियमित अंश घालून तयार झालेलें मिश्रण. यांचा प्रकार असा – पहिल्याने प्रत्येक भूताचे बरोबर दोन दोन विभाग केले. त्या दोन दोन भागांपैकी एक एक तसाच ठेवून, बाकी प्रत्येक अर्ध्या भागाचे पुनः चार चार समभाग पाडले; तेव्हां अर्थातच हा एक भाग एक अष्टमांश झाला. मग प्रत्येक भूताच्या अर्ध्या भागांत दुसर्‍या प्रत्येक अर्धुकाचा चौथा भाग म्हणजे पूर्वोक्त एक अष्टमांश मिसळून पांचा पांचांचें असें प्रत्येक भूत तयार केले. यालाच पंचीकरण असें म्हणतात. हे खाली लिहिलेल्या कोष्टकावरून स्पष्ट ध्यानांत येईल ॥२७॥

तैरण्डस्तत्र भुवनं भोग्यभोगाश्रयोद्‌भवः ।
हिरण्यगर्भः स्थूलेऽस्मिन् देहे वैश्वानरो भवेत् ॥ २८ ॥
अशा पंचीकृत भूतांपासून ब्रह्मांडे व त्यांतील चतुर्दश भुवनें त्या त्या भुवनांतील प्राण्यांनी खाण्याचीं अन्ने व त्या त्या लोकांस योग्य अशीं शरीरें ईश्वराचे आज्ञेने निर्माण झालीं. या सर्व स्थूल सृष्टीचा जो एक अभिमानी त्यास वैश्वानर असें म्हणतात. पूर्वोक्त जो हिरण्यगर्भ, तोच येथें वैश्वानर होतो. ॥२८॥

तैजसा विश्वतां याता देव तिर्यङ्नरादयः ।
ते पराग्दर्शिनः प्रत्यक्तत्त्वबोधविवर्जिताः ॥ २९ ॥
आणि प्रत्येक सूक्ष्म देहाचे निरनिराळे अभिमानी तेजस तेच येथें विश्व होतात. या विश्वकोटींत देव, मनुष्य, पशु व पक्षी या सर्वांचा समावेश होतो. हे सर्व देवादिक जीव बहिर्मुख आहेत. त्यामुळें त्यांना स्वस्वरूपाचे ज्ञान नाहीं. ॥२९॥

कुर्वते कर्म भोगाय कर्म कर्तुं च भुञ्जते ।
नद्यां कीटा इवावर्तादावर्तान्तरमाशु ते ।
व्रजन्तो जन्मनो जन्म लभन्ते नैव निर्वृतिम् ॥ ३० ॥
म्हणूनच सुखदुःख भोगण्याकीरतां मनुष्यादि शरीरें धारण करून ते जीव त्या त्या शरीरास योग्य अशीं कर्में करतात. आणि देवादि शरीरें धारण करून त्या त्या कर्माची फळें भोगतात. भोगानंतर पुनः कर्म करावेसे वाटतें, पुनः तें भोगावे लागतें. याप्रमाणें कर्मानंतर भोग व भोगानंतर कर्म असें एक सतत रहाटगाडगे चाललें आहे. नदीच्या भोवर्‍यांत पडलेल्या कीटकाप्रमाणें, या जन्ममरणाच्या फेर्‍यांत पडल्यामुळे जीवास शांति मिळत नाहीं. ॥३०॥

सत्कर्मपरिपाकात्ते करुणानिधिनोद्धृताः ।
प्राप्य तीरतरुच्छायां विश्राम्यन्ति यथासुखम् ॥ ३१ ॥
मग ज्याप्रमाणें नदीतील कीटक सुदैवेंकरून एखाद्या दयाळू पुरुषाचे हातून त्या प्रवाहांतून सुटका पावून तीरीं असणार्‍या वृक्षाचे छायेत येऊन विश्रांति पावतात. ॥३१॥

उपदेशमवाप्यैवमाचार्यात्तत्त्वदर्शिनः ।
पञ्चकोशविवेकेन लभन्ते निर्वृतिं पराम् ॥ ३२ ॥
त्याप्रमाणें जीवही ब्रह्मवेत्या सत्पुरुषाची गांठ पडून त्याच्या उपदेशानें पंचकोशांचा विवेक करून उत्तम मोक्षसुख पावतात. ॥३२॥

अन्नं प्राणो मनो बुद्धिरानन्दश्चेति पञ्च ते ।
कोशास्तैरावृतः स्वात्मा विस्मृत्या संसृतिं व्रजेत् ॥ ३३ ॥
ते पंचकोश अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, या नांवानें प्रसिद्ध आहेत. या पांच वेष्टनांत आत्मा गुंडाळलेला असल्यामुळें आपल्या स्वरूपाला विसरून जन्ममरणरूप संसार पावतो. कोशांत सांपडलेला कीटक जसा आंतल्या आंत धडपडतो, त्याप्रमाणें आत्म्याचीही अवस्था झाल्यामुळे वरील अन्नादि आच्छादनांस कोश असें म्हणतात. ॥३३॥

स्यात्पञ्चीकृतभूतोत्थो देहः स्थूलोऽन्नसंज्ञकः ।
लिङ्गे तु राजसैः प्राणैः प्राणः कर्मेन्द्रियैः सह ॥ ३४ ॥
आतां त्या कोशांची स्वरूपें क्रमेंकरून सांगतों. पंचीकृत भूतांपासून झालेला जो स्थूलदेह त्यासच अन्नमय कोश म्हणतात. लिंगशरीरीं असलेले जे रजोगुणात्मक पांच प्राण व पांच कर्मेंद्रियें इतकी मिळून प्राणमय कोश होतो. ॥3४॥

सात्त्विकैर्धीन्द्रियैः साकं विमर्षात्मा मनोमयः ।
तैरेव साकं विज्ञानमयो धीर्निश्चयात्मिका ॥ ३५ ॥
पंचभूतांच्या सत्त्वांशानें बनलेलें संशयात्मक मन व पांच ज्ञानेंद्रियें मिळून मनोमय कोश समजावा व त्याच ज्ञानेंद्रियांसहित निश्वयात्मिका जी बुद्धि ती विज्ञानमय कोश. याप्रमाणें प्राणादिक तीनही कोश एका लिंगशरीरांतच मावले गेले. ॥३५॥

कारणे सत्त्वमानन्दमयो मोदादिवृत्तिभिः ।
तत्तत्कोशैस्तु तादात्म्यादात्मा तत्तन्मयो भवेत् ॥ ३६ ॥
कारण-शरीरांत जो मलिन सत्त्वांश आहे, तोच आनंदमय कोश. याच्या वृत्ति तीन आहेत. प्रिय, मोद आणि प्रमोद. प्रियवृत्ति म्हणजे इष्ट दर्शनापासून होणारी. मोदवृत्ति म्हणजे-इष्टवस्तूच्या लाभापासून होणारी; आणि इष्टविषयाच्या भोगापासून उत्पन्न होणारी ती प्रमोदवृत्ति होय. आत्मा त्या त्या कोशाच्या तादात्म्याने त्या त्या कोशाशी तन्मय होऊन गेला आहे. ॥३६॥

अन्वयव्यतिरेकाभ्यां पञ्चकोश विवेकतः ।
स्वात्मानं तत उद्धृत्य परं ब्रह्म प्रपद्यते ॥ ३७ ॥
याप्रमाणें स्थूल शरीरांत एक, सूक्ष्म शरीरांत तीन आणि कारण शरीरात एक असे पांच कोश झाले. या पांच कोशांपासून अन्वयव्यतिरेकाचे योगानें आत्म्याचे विवेचन (पृथक्करण) करून, तो सच्चिदानंदरूप आहे, असा मनुष्याच्या बुद्धीस निश्चय झाला असतां, तो ब्रह्मच होतो. ॥३७॥

अभाने स्थूलदेहस्य स्वप्ने यद्‌भानमात्मनः ।
सोऽन्वयो व्यतिरेकस्तद्‌भानेऽन्यानवभासनम् ॥ ३८ ॥
अन्वयव्यतिरेकाचे योगानें असें जें आम्ही म्हटलें त्याचा अर्थ येथें सांगणे अवश्य आहे. अन्वय म्हणजे एकाद्या गोष्टीचें किंवा स्थितीचे दुसर्‍याबरोबर असणें आणि व्यतिरेक म्हणजे तिचे नसणें. ‘अमुक गोष्ट असली तर अमुक असलीच पाहिजे’ असा जो नियम त्यास अन्वय असें म्हणतात. आणि ‘एक नसेल तर दुसरीही असणार नाहीं’ या नियमास व्यतिरेक असें म्हणतात. हे दोन नियम लावून पाहिलें असतां दोन गोष्टींचें साहचर्य किंवा कार्यकारणभाव चांगला समजतो. आतां हे नियम आत्मविवेचनास लावून दाखवितो. स्वप्नावस्थेंत स्थूल देह जो अन्नमय कोश याचें मुळींच भान नसून स्वप्न पाहणारा जो साक्षी आत्मा त्याचे भान असतें. म्हणून येथें स्थूलदेहाचा व्यतिरेक असून आत्म्याचा अन्वय आहे. म्हणून आत्मा नित्य आणि स्थूल देह अनित्य असें अन्वयव्यतिरेकानें सिद्ध झालें. ॥३८॥

लिङ्गभाने सुषुप्तौ स्यादात्मनो भानमन्वयः ।
व्यतिरेकस्तु तद्‌भाने लिङ्गस्याभानमुच्यते ॥ ३९ ॥
तसेंच, सुषुप्तीमध्यें लिंगदेहाचें मुळींच भान नाहीं म्हणून येथें लिंगदेहाचा व्यतिरेक आहे आणि अभावसाक्षित्वेंकरून आत्म्याचे येथेंही स्मरण आहे, म्हणून त्याचा येथें अन्वय आहे; म्हणून त्याच नियमावरून आत्मा नित्य आणि लिंगदेह अनित्य असें ठरलें. ॥३९॥

तद्विवेकाद्विविक्ताः स्युः कोशाः प्राणमनोधियः ।
ते हि तत्र गुणावस्थाभेदमात्रात्पृथक्कृताः ॥ ४० ॥
वर आम्ही पंचकोशविवेचन करण्याचा उपक्रम करून, अन्नमय कोशाच्या विवेचनानंतर दुसरा जो प्राणमय कोश तो येथें सांगणे योग्य असून मध्येंच लिंगदेह कोठून आणला, अशी कोणी शंका घेईल, तर तिचे समाधान असें आहे कीं, प्राणमय, मनोमय, आणि विज्ञानमय या तीनही कोशांचा समावेश एका लिंगदेहांतच होतो असें आम्हीं पूर्वीच सांगून ठेविले आहे, तेव्हां त्या लिंगशरीराचे विवेचन केलें असतां अर्थातच गुण आणि अवस्थाभेदेंकरून, प्राणादिक तीन कोशांचे विवेचन झाल्यासारिखेंच आहे. ॥४०॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *