सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक ४१ ते ६५

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

सुषुप्त्यभाने भानं तु समाधावात्मनोऽन्वयः ।
व्यतिरेकस्त्वात्मभाने सुषुप्त्यनवभासनम् ॥ ४१ ॥
याप्रमाणें स्थूल व सूक्ष्म या दोन शरीरांच्या विवेचनानें अन्नमयापासून विज्ञानमयापर्यंत चार कोशांचे विवेचन झालें. आतां आनंदमय कोशरूप जें कारणशरीर त्याचे विवेचनाचा विचार करूं. समाधीत सुषुप्तीचें अभान असून आत्म्याचे भान आहे. म्हणून येथें कारणशरीराचा व्यतिरेक आणि आत्म्याचा अन्वय आहे. याकरितां आत्मा नित्य आणि कारणशरीर (आनंदमय कोश) अनित्य असें सिद्ध झालें. ॥४१॥

यथामुञ्जादिषीकैवमात्मा युक्त्या समुद्धृतः ।
शरीरत्रितयाद्धीरैः परं ब्रह्मैव जायते ॥ ४२ ॥
ज्याप्रमाणें मुंजा नांवाच्या गवताच्या काडीतून कोमल तंतू युक्तीने काढावा, त्याप्रमाणें अन्वयव्यतिरेकाच्या योगानें वैराग्यादि साधनसंपन्न पुरुषाने तीनही शरीरांपासून आत्म्याचे पृथक्करण केले असतां तो ब्रह्मच होतो असें कठश्रुतींत सांगितलें आहे. ॥४२॥

परापरात्मनोरेवं युक्त्या सम्भावितैकता ।
तत्त्वमस्यादिवाक्यैः सा भागत्यागेन लक्ष्यते ॥ ४३ ॥
याप्रमाणें तत्त्वज्ञान म्हणजे काय ? आणि त्यापासून फल कोणतें मिळतें, हें सांगितलें. तसेंच, तत्पदवाच्य परमात्मा आणि त्वंपदवाच्य जीवात्मा या दोघांचें लक्षण एकच असल्यामुळें ते अभिन्न आहेत असेंही सिद्ध झालें. हें दोघांचे ऐक्य, भागत्यागलक्षणावृत्ति लावून, तत्त्वमस्यादि महावाक्याचा अर्थ केला असतां स्पष्टपणे ध्यानांत येईल. ॥४३॥

जगतो यदुपादानं मायामादाय तामसीम् ।
निमित्तं शुद्धसत्त्वां तामुच्यते ब्रह्म तद्गिरा ॥ ४४ ॥
”तत्त्वमसि” या वाक्याचा अर्थ करण्यांकरितां पूर्वीं तत्पदाचा व त्वंपदाचा वाच्यार्थ केला पाहिजे म्हणून तो येथें सांगतो. जें ब्रह्म तमोगुणप्रधान मायेचा स्वीकार करून जगाचें विवर्तोपादान कारण झालें, व जें ब्रह्म शुद्धसत्त्वप्रधान मायेचा स्वीकार करून जगाचें निमित्तकारण बनलें तें ब्रह्म येथें तत्पदानें सांगितले. ॥४४॥

यदा मलिनसत्त्वां तां कामकर्मादिदूषितम् ।
आदत्ते तत्परं ब्रह्म त्वं पदेन तदोच्यते ॥ ४५ ॥
आणि तेंच ब्रह्म जेव्हां मलिनसत्त्वप्रधान म्हणजे रजस्तममिश्रित व कामकर्मादिकेंकरून दूषित, अशा अविद्येचा स्वीकार करते तेव्हां तें त्वंपदानें दर्शविले जातें. ॥४५॥

त्रितयीमपि तां मुक्त्वा परस्परविरोधिनीम् ।
अखण्डं सच्चिदानन्दं महावाक्येन लक्ष्यते ॥ ४६ ॥
तमःप्रधान, विशुद्धसत्त्वप्रधान आणि मलिनसत्त्वप्रधान अशी परस्परविरुद्ध जी तीन प्रकारची माया ती गळून बाकी राहिलेलें अखंड सच्चिदानंद ब्रह्मच “तत्त्वमसि” वाक्याचा विषय अथवा लक्ष्य होय. ॥४६॥

सोऽयमित्यादिवाक्येषु विरोधात्तदिदंतयोः ।
त्यागेन भागयोरेक आश्रयो लक्ष्यते यथा ॥ ४७ ॥
ज्याप्रमाणें ”सोऽयं देवदत्तः” (तोच हा देवदत्त) या वाक्यांत तो आणि हा अशीं भिन्न देशकालदर्शकें टाकून त्या दोन्ही दर्शकांस आश्रयभूत जो एक देवदत्त तो मात्र घ्यावयाचा. ॥४७॥

मायाविद्ये विहायैवमुपाधी परजीवयोः ।
अखण्डं सच्चिदानन्दं परं ब्रह्मैव लक्ष्यते ॥ ४८ ॥
त्याप्रमाणें परमात्म्याचा उपाधि माया व जीवाची अविद्या असे दोन विरुद्धांश वर्ज्य करून बाकीचें केवळ अखंड सच्चिदानंद ब्रह्म मात्र महावाक्याचें लक्ष्य होतें. ॥४८॥

सविकल्पस्य लक्ष्यत्वे लक्ष्यस्य स्यादवस्तुता ।
निर्विकल्पस्य लक्ष्यत्वं न दृष्टं न च सम्भवि ॥ ४९ ॥
याजवर प्रतिपक्षाची एक चमत्कारिक कोटी आहे ती अशी. महावाक्यास लक्ष्य जें ब्रह्म तें काय सविकल्प कीं निर्विकल्प ? तें सविकल्प जर म्हणाल तर मिथ्या होईल. कारण, ज्याचा विकल्प करतां येतो ती वस्तु सत्य नव्हे असें तुम्हींच म्हणतां. बरें तें बाह्य निर्विकल्प म्हणावें तर तें वाक्यास लक्ष्य कसें झालें ? कारण, ज्याची कल्पना करतां येत नाहीं ती वस्तु वाक्यानें कशी सांगतां येईल ? ॥४९॥

विकल्पो निर्विकल्पस्य सविकल्पस्य वा भवेत् ।
आद्ये व्याहतिरन्यत्रानवस्थात्माश्रयादयः ॥ ५० ॥
याप्रमाणें दोहोंकडून अडविणारा जो वादी त्यास आम्ही उलट असे पुसतों कीं, तुम्हीं जो विकल्प केला तो सविकल्पाविषयी कीं निर्विकल्पाविषयीं ? जर निर्विकल्पाविषयी केला असेल तर तुमच्याच बोलण्यामध्यें विरोध येतो. कारण, निर्विकल्पाचा विकल्प केला असे म्हणणें म्हणजे आंधळा पहातो, मुका बोलतो असें म्हटल्यासारखें होईल. बरें, सविकल्पाचा विकल्प म्हणाल तर आत्माश्रय, अन्योन्याश्रय, चक्रिकापत्ति आणि अनवस्था असे चार दोष येतात. ते असे कीं, ”सविकल्पाचा विकल्प” या वाक्यांत पहिला विकल्प आणि दुसरा विकल्प हे दोन नसून एकच जर असतील, तर आश्रित आणि आश्रय एकच होऊन स्वस्कंधारोहण न्यायाने आत्माश्रय दोष येतो. आतां ते दोनही विकल्प भिन्न असे म्हटले तर पहिल्या विकल्पानें दुसर्‍या विकल्पाची सिद्धि होते कीं दुसर्‍याने पहिल्याची होते. हें सांगतो येत नाहीं. म्हणून येथें अन्योन्याश्रय दोष येतो. बरें, तो दोष उडविण्याकरितां त्या दोन विकल्पांखेरीज तिसर्‍या एका विकल्पापासून त्याची सिद्धि होते असें जर म्हणशील तर चक्रिकापत्ति दोष येतो. बरें, तोही उडविण्याकीरतां तिसर्‍यास चवथा कारण, चवथ्यास पांचवा, पांचव्यास सहावा असें सांगत बसणे हाच अनवस्था दोष. ॥५०॥

इदं गुणक्रियाजातिद्रव्यसम्बन्धवस्तुषु ।
समं तेन स्वरूपस्य सर्वमेतदितीष्यताम् ॥ ५१ ॥
जेथें गुण, क्रिया, जाती, द्रव्य आणि संबंध या पांच गोष्टी आहेत तेथें वरील दोष लागावयाचेच. उदाहरण-गुण निर्गुणीं रहातो कीं सगुणीं, रहातो ? यांत पहिल्या पक्षीं व्याहतिदोष म्हणजे विरोध येतो. दुसर्‍या पक्षीं आत्माश्रयादि दोष येतात. त्याचप्रमाणें क्रिया, जाती इत्यादिकांस लावून पहावे. ॥५१॥

विकल्पतदभावाभ्यामसंस्पृष्टात्मवस्तुनि ।
विकल्पितत्वलक्ष्यत्वसम्बन्धाद्यास्तु कल्पिताः ॥ ५२ ॥
जेथे विकल्पाचाही स्पर्श नाहीं व त्याच्या अभावाचाही स्पर्श नाहीं अशी जी आत्मवस्तु तिचे ठायीं कल्पितत्त्व लक्ष्यत्वसंबंध, द्रव्य इत्यादि कल्पित आहेत. असेनात बापडे !! ॥५२॥ असो.

इत्थं वाक्यैस्तदर्थानुसन्धानं श्रवणं भवेत् ।
युक्त्या सम्भावितत्वानुसन्धानं मननं तु तत् ॥ ५३ ॥
याप्रमाणे वाक्याचा अर्थ करून त्याचें जें अनुसंधान राखणें यालाच श्रवण असें म्हणतात. व तोच अर्थ साधक व बाधक प्रमाणांनीं मनांत घोळवून त्याची उपपत्ति युक्तीनें बसविणें, त्याला मनन असें म्हणतात. ॥५३॥

ताभ्यां निर्विचिकित्सेऽर्थे चेतसः स्थापितस्य यत् ।
एकतानत्वमेतद्धि निदिध्यासनमुच्यते ॥ ५४ ॥
श्रवण आणि मनन या दोहोंच्या योगे निःसंशयपणें जो सिद्धांत ठसला त्याचे ठायी एकसारखे जें चित्ताचें स्थापन, त्याला निदिध्यासन असें म्हणतात. ॥५४॥

ध्यातृध्याने परित्यज्य क्रमाद्ध्येयैकगोचरम् ।
निर्वातदीपवच्चित्तं समाधिरभिधीयते ॥ ५५ ॥
या निदिध्यासाची जी परिपाकदशा तीच समाधि होय. तो समाधि असा. वर जो निदिध्यास सांगितला त्यामध्यें ध्याता, ध्यान आणि ध्येय ही त्रिपुटी भासते. तेथील ध्याता व ध्यान योगाभ्यासानें क्रमाने परित्यागून चित्त जेव्हां केवळ ध्येयरूपच होऊन निर्वातस्थळीं ठेवलेल्या दीपाप्रमाणें निश्चळ रहातें त्यास समाधि असें म्हणतात. ॥५५॥

वृत्तयस्तु तदानीमज्ञाता अप्यात्मगोचराः ।
स्मरणादनुमीयन्ते व्युत्थितस्य समुत्थितात् ॥ ५६ ॥
या समाधिकाळीं मनाच्या वृत्ति आत्मगोचर असतात, म्हणून लक्षांत येत नाहीत. परंतु त्या अगदीं नाहींत असें समजूं नये. कारण समाधींतून उठलेला मनुष्य ”मी इतका वेळ समाहित होतों” असा आपला अनुभव सांगतों. यावरून समाधिकाळीं वृत्ति असतात असें अनुमान होतें. ॥५६॥

वृत्तीनामनुवृत्तिस्तु प्रयत्‍नात्प्रथमादपि ।
अदृष्टासकृदभ्याससंस्कारः सचिराद्‌भवेत् ॥ ५७ ॥
या आत्मगोचर वृत्ति एकामागून एक अशा आपोआप उठतात. त्यास विशेष प्रयत्‍नांची गरज नाहीं. कारण पूर्वींचा निदिध्यास वारंवार दृढ होत असल्यामुळे व वृत्तीस आत्मसुखाची एकदां लालूच लागल्यानें ती पुनः पुनः आत्म्यालाच व्यापावयास जाते. ॥५७॥

यथा दीपो निवातस्थ इत्यादिभिरनेकधा ।
भगवानिममेवार्थमर्जुनाय न्यरूपयत् ॥ ५८ ॥
”यथा दीपो निवातस्थो नेंगते सोपमा स्मृता,” इत्यादि श्लोकांनी भगवंतांनीं अर्जुनास जो निर्विकल्पसमाधी सांगितला त्याचाही अभिप्राय हाच आहे. ॥५८॥

अनादाविह संसारे सञ्चिताः कर्मकोटयः ।
अनेन विलयं यान्ति शुद्धो धर्मो विवर्धते ॥ ५९ ॥
आतां या समाधीचें प्रथम अवांतर फल सांगून नंतर मुख्य फळ सांगतों. या अनादि संसाराचे ठायीं अनेक जन्मांपासून केलेले अनंत संचित कर्म या समाधीच्या योगानें सर्व नाशाप्रत पावतें, आणि साक्षात्कारास साधनभूत असा शुद्ध धर्म अधिकाधिक वाढतो. ॥५९॥

धर्ममेघमिमं प्राहुः समाधिं योगवित्तमाः ।
वर्षत्येष यतो धर्मामृतधाराः सहस्रशः ॥ ६० ॥
या निर्विकल्प समाधीस मोठमोठ्यांनी धर्ममेघ असे नांव ठेविलें आहे. कारण, या मेघांतून धर्मामृताच्या धारा सहस्रशः वाहतात. ॥६०॥

अमुना वासनाजाले निःशेषं प्रविलापिते ।
समूलोन्मूलिते पुण्यपापाख्ये कर्म सञ्चये ॥ ६१ ॥
हें अवांतर फल झालें. आता मुख्य फळ ऐका. या समाधीचे योगाने ”हा मी”, “हें माझें” इत्यादिक ज्या अनेक वासना त्या सर्व जळून जाऊन व ज्ञानाला आड येणारी पुण्यपापाख्य कर्में त्यांचे उन्मूलन होऊन, ॥६१॥

वाक्यमप्रतिबद्धं सत्प्राक्परोक्षावभासिते ।
करामलकवद्‌बोधमपरोक्षं प्रसूयते ॥ ६२ ॥
पूर्वीं परोक्षत्वेंकरून समजलेलें जें तत्त्वमस्यादि वाक्य तेच प्रतिबंधरहित तळहातींच्या आंवळ्याप्रमाणें स्पष्टपणे अपरोक्षज्ञान करून देतें. ॥६२॥

परोक्षं ब्रह्मविज्ञानं शाब्दं देशिकपूर्वकम् ।
बुद्धिपूर्वकृतं पापं कृत्स्नं दहति वह्निवत् ॥ ६३ ॥
आतां परोक्ष व अपरोक्ष ज्ञानाचें फळ सांगून हें प्रकरण आटपतों. गुरुमुखापासून प्राप्त झालेलें जें महावाक्यजन्य परोक्षज्ञान तें उत्तम रीतीनें झालें असतां बुद्धिपूर्वक केलेले पाप जळून जातें. हें फळ केवळ श्रद्धाजन्य परोक्षज्ञानाचे नव्हे; तर श्रवणमननापासून झालेलें जें दृढ परोक्षज्ञान त्याचें हे फळ आहे हें पक्कें ध्यानांत ठेवावे. ॥६३॥

अपरोक्षात्मविज्ञानं शाब्दं देशिकपूर्वकम् ।
संसारकारणाज्ञानतमसश्चण्डभास्करः ॥ ६४ ॥
तसेंच, सद्‌गुरूच्या मुखापासून व त्याच्या कृपेने प्राप्त झालेलें महावाक्यजन्य संशयविपर्ययरहित असें अपरोक्षज्ञान झालें असतां, सूर्योदयानें जसा काळोख अगदी नाहींसा होतो, त्याप्रमाणें, संसाराला कारणीभूत जें अज्ञान तें समूळ नष्ट होतें. ॥६४॥

इत्थं तत्त्वविवेकं विधाय विधिवन्मनः समाधाय ।
विगलितसंसृतिबन्धः प्राप्नोति पारं पदं नरो न हिरात् ॥ ६५ ॥
इति तत्त्वविवेकः समाप्तः ॥ १ ॥
॥ आर्या ॥ यापरि तत्त्वविवेका करुनि विधीनें मनासि शांत करी ॥
संसृतिबंधन तुटुनी मोक्षाची तुज मिळेल पदवी खरी ॥६५॥
तत्त्वविवेक समाप्त

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *