सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

॥ पञ्चदशी ॥
प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः

नमः श्रीशङ्करानन्दगुरुपादाम्बुजन्मने ।
सविलासमहामोहग्राहग्रासैककर्मणे ॥ १ ॥
(मंगलाचरणम्)

॥ श्रीणेशाय नमः ॥ जगत्प्रपंचासहवर्तमान जें मूल अज्ञान तेंच कोणी एक मकर (सुसर) तिचा ग्रास करून टाकणें हेंच मुख्य कृत्य ज्याचे असा जो आनंददायक आनंदरूपी परमात्मा गुरु त्याच्या पदकमलाला नमस्कार असो. ॥१॥

तत्पादाम्बुरुहद्वन्द्वसेवानिर्मलचेतसाम् ।
सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते ॥ २ ॥

त्या श्रीसद्‌गुरूच्या पदकमलद्वयाची सेवा करून ज्यांचें चित्त निर्मल झालें आहे, अशा पुरुषांना सुलभ रीत्या तत्त्वज्ञान व्हावे ह्मणून आम्ही येथे तत्त्वविवेकाचें निरूपण करतो. ॥२॥

शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्याज्जागरे पृथक् ।
ततोविभक्ता तत्संविदैक्यरूप्यान्न भिद्यते ॥ ३ ॥

जाग्रदवस्थेमध्यें भासणारे शब्द, स्पर्श, रूप, रस व गंध, हे पांच विषय जरी एकमेकांपासून भिन्न दिसतात तथापि त्या सर्वाचे ज्ञान म्हणून एकच आहे. उदाहरण, आम्हास घट दिसतो आणि शब्द ऐकू येतो. येथें जरी घटापासून शब्द भिन्न आहे, तरी त्या दोहोंचें ज्ञान एकच आहे. ॥३॥

तथा स्वप्नेऽत्र वेद्यं तु न स्थिरं जागरे स्थिरम् ।
तद्‌भेदोऽतस्तयोः संविदेकरूपा न भिद्यते ॥ ४ ॥
त्याचप्रमाणें स्वप्नांतील प्रकार – स्वप्न म्हणजे जागृतीमध्यें जें आम्हांस विषयज्ञान होतें त्याचाच संस्कार ज्या अवस्थेमध्ये पुनः इंद्रियांच्या साहाय्यावाचून उमटतो ती अवस्था. या दोनही अवस्थांमध्ये भेद इतकाच की, स्वप्नांतील पदार्थ केवळ भासरूप असून कालांतरीं त्यांचा उपयोग होत नाहीं, आणि जागृतींतील पदार्थ अधिक स्थिर असून कालांतरीं त्यांचा उपयोग होतो. असा जरी भेद आहे तरी त्या अवस्थेतील ज्ञान म्हणून एकच आहे. ॥४॥

सुप्तोत्थितस्य सौषुप्ततमोबोधो भवेत्स्मृतिः ।
सा चावबुद्धविषयावबुद्धं तत्तदा ततः ॥ ५ ॥
वर आम्ही जागृती आणि स्वप्न या दोनही अवस्थांतील ज्ञानांचें ऐक्य सिद्ध केले. आतां सुषुप्तीतील ज्ञानाविषयीं विचार करूं. कोणी म्हणेल की सुषुप्तींतील ज्ञानच मुळीं नाहीं. तर ही शंका योग्य नाहीं. कारण झोंपेंतून उठलेला मनुष्य असे सांगतो कीं, ”मी इतका वेळ सुखाने निजलों होतो. मला कांहीं समजले नाही” असे जे त्याला स्मरण होतें तें पूर्वींच्या अनुभवावांचून कसें होईल ? जेथें स्मरण आहे, तेथें पूर्वीचा अनुभव असलाच पाहिजे. अमुक स्थळी अमुक पदार्थ आहे असें समजण्यास जसा डोळा पाहिजे, तसा तो नाहीं असें समजण्यासही डोळाच पाहिजे. त्याप्रमाणें ”कांहीं नाहीं” असें समजणें हे देखील ज्ञानच आहे, म्हणून जागृती व स्वप्न यांप्रमाणे निद्रेंतही अज्ञानाचें ज्ञान आहें ही गोष्ट निर्विवाद सिद्ध झाली. ॥५॥

सबोधोविषयाद्‌भिन्नो न बोधात्स्वप्नबोधवत् ।
एवं स्थानत्रयेऽप्येका संवित्तद्वद्दिनान्तरे ॥ ६ ॥
”मला कांहीं समजलें नाहीं” असें जें हें सुषुप्तींतील अभावज्ञान तेंही जाग्रत्स्वप्नांतील ज्ञानाप्रमाणें विषयापासून मात्र भिन्न आहे; ज्ञानापासून भिन्न नाहीं. या ठिकाणीं कांहीं न समजणे हाच विषय. म्हणून स्वप्नांतील व जागृतींतील ज्ञानांत जसा भेद नाहीं तसा या उभयावस्थांतील ज्ञानांत व सुषुप्तीतील ज्ञानांतही भेद नाही. याप्रमाणे जाग्रत्स्वप्नसुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये ज्ञान एकच रूपाने असते हे सिद्ध झाले. ॥६॥

मासाब्दायुगकल्पेषु गतागम्येष्वनेकधा ।
नोदेति नास्तमेत्येका संविदेषा स्वयंप्रभा ॥ ७ ॥
एकाच दिवशीं जाग्रत्स्वप्नसुषुप्ती या तीनही अवस्थांतील ज्ञान जसे एकच आहे, त्याप्रमाणें आजपर्यंत गेलेला काळ व पुढें येणारा काळ म्हणजे दिवस, महिने, वर्ष, युगे व कल्पांची कल्पें जरी लोटली तरी ज्ञानाचा अभेदच आहे. आतां ज्या अर्थी सर्वकाळ ज्ञानाचें ऐक्य आहे त्या अर्थी तें उत्पत्ति-विनाशशून्य व स्वयं-प्रकाश असलेंच पाहिजे; कारण यास उत्पत्ति-विनाश आहेत, असें जर म्हणावें तर त्या उत्पत्ति-विनाशांस पहाणारा कोणी साक्षी असलाच पाहिजे. उत्पत्ति-विनाश ज्याचे त्यास दिसणें अगदी अशक्य आहे. या साक्षीरूप ज्ञानाचे उत्पत्ति-विनाश दुसर्‍या एका साक्षीरूप ज्ञानास दिसतात असें जर म्हणावें तर तेंही संभवत नाहीं; कारण या साक्षीवांचून दुसरें ज्ञानच नाहीं. याजवर दुसरी अशी शंका आहे कीं; वरील साक्षीरूप ज्ञानावांचून दुसरे ज्ञानच नाही असें म्हटलें तर त्याला कोणी पहाणारा नसल्यामुळे साक्षीचेंही अस्तित्व नाहीसे होईल; तर याचें उत्तर हेंच कीं, वर सिद्ध केलेले ज्ञान दुसर्‍या ज्ञानाला विषय न होतां प्रत्यक्ष आहे. घटादिपदार्थांची गोष्ट तशी नाहीं. ते प्रत्यक्ष होण्यास इंद्रियादि ज्ञानसाधनांची गरज आहे. तशी याला गरज नाहीं. हें आपणास आपण जाणते असेंही म्हणतां कामा नये. कारण तसें मानल्यास कर्मकर्तृत्वविरोध होईल. म्हणजे कर्म आणि कर्ता एकच होईल. म्हणून हें ज्ञान नित्य असून स्वयंप्रकाश आहे असें कबूल करणे. भाग आहे. ॥७॥

इयमात्मा परानन्दः परप्रेमास्पदं यतः ।
मा न भुवं हि भूयासमिति प्रेमात्मनीक्ष्यते ॥ ८ ॥
वर सिद्ध केलेले जें नित्य आणि स्वयंप्रकाश साक्षीज्ञान तेंच आत्मा म्हणणें योग्य आहे; कारण आत्मा सच्चिदानंदरूप आहे असें श्रुति म्हणते. हे साक्षीज्ञानही सच्चिदानंदरूपच आहे. तीन रूपांपैकीं पहिली दोन तर वर सिद्ध केलीच आहेत. आतां यास आनंदरूपता कशी येते ती सिद्ध करून दाखवितो. जीवाची प्रीति सुखावर साहजिक आहे म्हणून जेथे ज्या मानानें सुख असतें तेथें त्या मानाने प्रीति असते, या नियमावरून ज्या वस्तूचे ठायीं निःसीम प्रेम आहे ती वस्तु परमानंदरूप असलीच पाहिजे. आतां आत्म्यावर आमची निरतिशय प्रीति आहे म्हणून आत्मा परमानंद रूप आहे, ही गोष्ट सिद्ध आहे. आतां कोणी अशी शंका घेईल कीं, ”मला मरण येवो, मी व्यर्थ जन्मलों.” असा केव्हां केव्हां आपल्याविषयीचा कंटाळा आढळतो मग आत्मा निःसीम प्रीतीस विषय आहे असें कसें म्हणतां ? कारण यावरून आत्म्याविषयींचे प्रीतीसच मुळी व्यत्यय येतो. मग ती निःसीम आहे ही गोष्ट तर दूरच. या शंकेचे समाधान असे कीं, वरील प्रकारे आत्म्याविषयीचा जो द्वेष केव्हां केव्हां आढळतो, तो केवळ देहाच्या संबंधानें आहे. आत्म्याच्या संबंधानें नव्हे. मनुष्यावर कांहीं वाईट प्रसंग गुदरला म्हणजे हा देह नको, प्राण नको, कांहीं नको, दे माय धरणी ठाय, अशी मनुष्याची स्थिति होते, तीही आत्मसुखाकरिताच होते. ॥८॥

तत्प्रेमात्मार्थमन्यत्र नैवमन्यार्थमात्मनि ।
अतस्तत्परमं तेन परमानन्दतात्मनः ॥ ९ ॥
पुत्रादिकांवर जी आम्ही प्रीति करतो ती केवळ आत्मसुखाकरितां, व आपल्यावर जी करतो ती प्रीति दुसर्‍याकरतां कधींही नसते म्हणून आत्मा परमानंदरूप आहे ही गोष्ट अगदीं निर्विवाद सिद्ध आहे, ॥९॥

इत्थं सच्चित्परानन्द आत्मा युक्त्या तथाविधम् ।
परं ब्रह्म तयोश्चैक्यं श्रुत्यन्तेषूपदिश्यते ॥ १० ॥
याप्रमाणे ज्ञानाचे नित्यत्व सिद्ध करून तें ज्ञान सच्चिदानंदरूप असल्यामुळें तेंच आत्मा ठरलें. हें आत्म्याचे सचिदानंदरूप केवळ युक्तीनेच ठरलें, व त्यास श्रुतिप्रमाण नाहीं असें मात्र कोणी समजू नये. कारण तशाच लक्षणांनी युक्त परबह्म व त्याचें आणि आत्म्याचे ऐक्य वेदांतांत सिद्ध केलें आहे; म्हणून श्रुति आणि युक्ति या दोहोंच्या कसोटीने आत्मा सच्चिदानंदरूप आहे हें सिद्ध झाले ॥१०॥

अभाने न परं प्रेम भाने न विषयस्पृहा ।
अतोभानेऽप्यभाताऽसौ परमानन्दतात्मनः ॥ ११ ॥
या आत्म्याची परमानंदरूपता अशी आहे कीं, एकीकडून पाहिलें असतां तिची प्रतीति आहे, आणि दुसरीकडून पाहिले असतां तिची प्रतीति नाहीं; असें नजरेस येतें. त्या आनंदाचे भान नाहीं म्हणावें तर मनुष्याची प्रीति स्वतःवर निःसीम आहे. कारण, विषयसौंदर्यज्ञान झाल्यावांचून प्रीति उत्पन्नच होत नाहीं. बरे त्याचें भान मनुष्यास आहे म्हणावें तर त्याची विषयांवर इतकी कां आसक्ति असावी ? फलप्राप्ति झाल्यावर साधनास कोण विचारतो. निरतिशये आनंदाचा लाभ झाला असतां क्षणिक आणि साधनावर अवलंबून असणारे जें वैषयिक सुख त्याजवर मनुष्याचे मन जाईल काय ? परंतु विषयावर आमची आसक्ति फारच आहे. तेव्हां त्या आनंदाचे भान आहे असेंही म्हणतां येत नाहीं. याप्रमाणें दोन्हीकडून दोष येतात. म्हणून भान आणि अभान ही दोन्ही रूपें आत्म्यास आहेत म्हणणें भाग आलें ॥११॥

अध्येतृवर्गमध्यस्थ पुत्राध्ययन शब्दवत् ।
भानेऽप्यभानं भानस्य प्रतिबन्धेन युज्यते ॥ १२ ॥
पण तसें जर म्हणावें, तर एकाच वस्तूस एकदम भान आणि अभान कसें संभवेल असा एक प्रश्न उत्पन्न होतो. तर याजवर आम्ही असे पुसतों कीं, तुम्ही जो असंभव मानतां त्यास दोन कारणें असलीं पाहिजेत. एक, कोणीही अशी गोष्ट जगामध्ये पाहिली नसावी दुसरे, तिजविषयी कोणचीही उपपत्ति जुळूं नये. ही दोन्ही येथें संभवत नाहींत. अशा गोष्टी जगामध्ये दृष्टीस पडतात हें पुढील दृष्टांतावरून चांगलें ध्यानांत येईल. कल्पना करा कीं, कोणी एका गृहस्थाचा मुलगा वेदशाळेत अध्ययन करीत आहे. एके दिवशीं आपल्या वर्गातील मुलाबरोबर पंचिकेची तो आवृत्ति उच्च स्वरानें करीत असतां शाळेबाहेरच्या पडवींत त्याचा बाप येऊन ऐकत उभा राहिला. त्यास हा माझ्या मुलाचा स्वर आहे असे विशेषेंकरून सांगतां जरी न आलें तथापि त्या सर्व घोषांत आपल्या मुलाचा स्वर खचित आहे असें सामान्यत्वेंकरून त्यास समजतें. त्याप्रमाणें आत्मानंदाचे भान आहे असें म्हणण्यास प्रत्यवाय कोणता ? याविषयीं उपपत्तीही तशीच जुळते. वस्तूचे भान असून अभान जें होतें तें केवळ प्रतिबंधानें होतें. ॥१२॥

प्रतिबन्धोऽस्तिभातीति व्यवहारार्हवस्तुनि ।
तन्निरस्य विरुद्धस्य तस्योत्पादनमुच्यते ॥ १३ ॥
प्रतिबंध म्हणजे आहे व भासते अशा व्यवहारास ज्या योग्य वस्तू त्यांच्याठायीं वरील आहे व भासतें याच्या विरुद्ध, नाहीं, व भासत नाही; अशा व्यवहाराची जी उत्पत्ति तीच येथें प्रतिबंध असें समजावे. ॥१३॥

तस्य हेतुः समानाभिहारः पुत्रध्वनिश्रुतौ ।
इहानादिरविद्यैव व्यामोहैकनिबन्धनम् ॥ १४ ॥
आतां हा प्रतिबंध वरील दृष्टांतावरून कसा जुळतो तो पहा. दृष्टांतांत पुत्रध्वनि विशेषेंकरून ध्यानांत न योग्यास कारण समानाभिहार (सर्वांबरोवर सारख्या स्वरानें पठण करणें) हेंच होय. त्याप्रमाणेंच आत्मा नित्य प्रतीतीस येण्यास येथें मुख्य प्रतिबंध म्हटला म्हणजे अविद्या होय. विपरीत ज्ञानास तीच कारण होय. ॥१४॥

चिदानन्दमयब्रह्मप्रतिबिम्बसमन्विता ।
तमोरजःसत्त्वगुणा प्रकृतिर्द्विविधा च सा ॥ १५ ॥
आतां ती अविद्या कोणची याचा विचार करूं. परंतु तिचे स्वरूप सांगण्यापूर्वी तिचे मूळ जी प्रकृति ती प्रथम सांगतो. जिच्यामध्ये सच्चिदानंद ब्रह्माचें प्रतिबिंब आहे व जीमध्थे सत्त्व, रज व तम हे तिन्ही गुण सारख्या मानानें आहेत तिला प्रकृति असें म्हणतात. ॥१५॥

सत्त्वशुद्धाविशुद्धिभ्यां मायाऽविद्ये च ते मते ।
मायाबिम्बोवशीकृत्य तां स्यात्सर्वज्ञ ईश्वरः ॥ १६ ॥
तिचे दोन प्रकार आहेत. जीमध्यें शुद्ध सत्त्वगुण अधिक असून इतर दोन गुणांनी तो गढूळ झालेला नसतो; तिला माया असें म्हणतात. व जीमध्ये तो गुण इतर दोन गुणांनी गढूळ झालेला असतो. तिला अविद्या असें म्हणतात. पहिली शुद्धसत्त्वप्रधान आहे. पहिली जी माया सांगितली तिजमध्यें प्रतिबिंबित जो चैतन्य आत्मा त्यानें त्या मायेस आपले स्वाधीन ठेविले आहे. तोच सर्वज्ञ व सर्वशक्तिमान् ईश्वर होय. ॥१६॥

अविद्यावशगस्त्वन्यस्तद्वैचित्र्यादनेकधा ।
सा कारणशरीरं स्यात्प्राज्ञस्तत्राभिमानवान् ॥ १७ ॥
आणि अविद्येमध्यें प्रतिबिंबित जो चिदात्मा तोच जीव. तो परतंत्र आहे. ती अविद्या नानाप्रकारची असल्यामुळे तिजमध्यें प्रतिबिंबित, जो जीव तोही देव, मनुष्य, पशु, पक्षी या भेदेंकरून नानाप्रकारचा झाला आहे. या जीवास स्थूल, सूक्ष्म आणि कारण ही तीन शरीरें आहेत. वर सांगितलेली जी अविद्या तीच याचें कारणशरीर आहे; आणि त्या कारणशरीरास तादात्म्याध्यासेंकरून ”मी” म्हणणारा जो जीव त्यास प्राज्ञ असे म्हणतात. ॥१७॥

तमः प्रधानप्रकृतेस्तद्‌भोगायेश्वराज्ञया ।
वियत्पवनतेजोऽम्बु भुवोभूतानि जज्ञिरे ॥ १८ ॥
आतां सूक्ष्म शरीर कोणतें, व त्याचा अभिमानी कोण, हें आम्ही सांगतों. परंतु हें शरीर कसे बनलें हे सांगण्यास त्यास कारणीभूत जी आकाशादि सृष्टि ती आधी सांगितली पाहिजे. म्हणून ती येथे सांगतों. वर जो कारणशरारीभिमानी प्राज्ञ सांगितला त्यास सुखदुःखाचा भोग व्हावा म्हणून पूर्वोक्त तमःप्रधानप्रकृतीपासून ईश्वराच्या आज्ञेनें म्हणजे इच्छेने आकाश, वायु, तेज, आप आणि पृथ्वी अशीं पंचभूतें क्रमेंकरून एकापासून एक अशीं उत्पन्न झालीं. ॥१८॥

सत्त्वांशैः पञ्चभिस्तेषां क्रमाद्धीन्द्रियपञ्चकम् ।
श्रोत्रत्वगक्षिरसनघ्राणाख्यामुपजायते ॥ १९ ॥
मूळप्रकृति त्रिगुणात्मक आहे. तेव्हां तिजपासून उत्पन्न झालेलीं जी पंचभूतें तींही त्रिगुणात्मकच असली पाहिजेत; म्हणजे, प्रत्येकांत कांहीं अंश सत्वाचा, कांहीं रजाचा आणि कांहीं तमाचा असें तिन्ही अंश असले पाहिजेत. त्या प्रत्येक भूताच्या सत्त्वांशांनीं क्रमेंकरून श्रोत्र, त्वचा, नेत्र, रसना आणि घ्राण, अशीं पांच ज्ञानेंद्रियें बनली, म्हणजे आकाशाच्या सत्त्वांशानें श्रोत्र, आपाच्या सत्त्वांशानें रसना, वायूच्या सत्त्वांशानें त्वचा, अग्नीच्या सत्त्वांशानें नेत्र आणि पृथ्वीच्या सत्त्वांशानें घ्राणेंद्रिय झालें, असें समजावे ॥१९॥

तैरन्तःकरणं सर्वैर्वृत्तिभेदेन तद्‌द्विधा ।
मनोविमर्शरूपं स्याद्बुद्धिः स्यान्निश्चयात्मिका ॥ २० ॥
प्रत्येक भूताच्या सत्त्वांशानें एक एक इंद्रिय बनलें. त्याप्रमाणें सर्वांचे सत्त्वांश एकत्र मिळून त्या मिश्रणापासून अंतःकरण बनलें. या अंतःकरणाचीं रूपे वृत्तिरूपानें दोन आहेत. याची वृत्ति जेव्हां संशयात्मक असते, तेव्हां त्यास मन असें म्हणतात. जेव्हां ती निश्चयात्मक असते तेव्हां त्यास बुद्धि असें म्हणतात. ॥२०॥

सार्थ पंचदशी सूची
, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *