सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

251-15
एऱ्हवीं दोरीचिया उरगा । डांगा मेळवितां पैं गा । तो शिणुचि वाउगा । केला होय ॥251॥
या संसारवृक्षाच्या नाशाकरता आत्मज्ञाना व्यतिरिक्त इतर साधने म्हणजे ओझेच सहज विचार करून पाहिले तर दोरीवर भासणार्‍या सर्पाला मारण्याकरता लांब लांब काठ्या गोळा केल्या असता त्या काठ्यांचे ओझे उगीच गोळा केल्यासारखे होते.
252-15
तरावया मृगजळाची गंगा । डोणीलागीं धांवतां दांगा- । माजीं वोहळें बुडिजे पैं गा । साच जेवीं ॥252॥
मृगजळाची नदी उतरून जाण्याकरता नावेसाठी (होडी) रानोमाळ धावावयास लागले तर त्याने खर्‍या ओढ्यात सापडून बुडावे,
253-15
तेवीं नाथिलिया संसारात्र । उपाईं जाचतया वीरा । आपणपें लोपे वारा । विकोपीं जाय ॥253॥
अर्जुना, त्याप्रमाणे खोट्या संसाराचा नाश करण्याच्या उपायांमधे खटपट करणार्‍याला साधनांचे जिवापाड श्रम होऊन तो खटपट करणारा आपण स्वत: मरतो.
254-15
म्हणौनि स्वप्नींचिया घाया । ओखद चेवोचि धनंजया । तेवीं अज्ञानमूळा यया । ज्ञानचि खड्ग ॥254॥
म्हणून अर्जुना, स्वप्नातील भीतीला जागे होणे हेच औषध आहे, त्याप्रमाणे अज्ञानरूपी मूळ असलेल्या याला नाश करण्यास समर्थ एक ज्ञानखड्गच आहे.
255-15
परी तेचि लीला परजवे । तैसें वैराग्याचें नवें । अभंगबळ होआवें । बुद्धीसी गा ॥255॥
(ज्ञानखड्ग फिरवण्यास वैराग्याची आवश्यकता) परंतु अरे तेच ज्ञानरूपी खड्ग सहज फिरवता येईल, तसे वैराग्याचे न खचणारे सामर्थ्य बुद्धीला नित्य नवे पाहिजे.

256-15
उठलेनि वैराग्यें जेणें । हा त्रिवर्गु ऐसा सांडणें । जैसें वमुनियां सुणें । आतांचि गेलें ॥256॥
ज्या वैराग्याचा उठाव झाला असता ह्या त्रिवर्गाचा (स्वर्ग, मृत्यू व पाताळाचा) असा त्याग होतो की जसे काही कुत्रे आताच ओकून गेले आहे.
257-15
हा ठायवरी पांडवा । पदार्थजातीं आघवा । विटवी तो होआवा । वैराग्य लाठु ॥257॥
अर्जुना, येथपर्यंत सर्व पदार्थमात्रसंबंधाने वीट उत्पन्न करील असे हे दांडगे वैराग्य पाहिजे.
258-15
मग देहाहंतेचें दळें । सांडूनि एकेचि वेळे । प्रत्यक्बुद्धी करतळें । हातवसावें ॥258॥
(हे ज्ञानखड्ग कसे चालवावे?) मग त्या ज्ञानखड्गावरील देहाभिमानरूपी म्यान एकदम काढून अंतर्मुख झालेल्या बुद्धिरूपी मुठीत ते धरावे
259-15
निसळें विवेकसाहणें । जें ब्रह्माहमस्मिबोधें सणाणें । मग पुरतेनि बोधें उटणें । एकलेचि ॥259॥
ते ज्ञानरूपी खड्ग विवेकरूपी सहाणेवर पाजळलेले असावे व ‘अहं ब्रह्मास्मि’ (मी ब्रह्म आहे’ अशा बोधाची त्यास सणसणीत (तीक्ष्ण) धार असावी व मग ते एकट्या पूर्णबोधाने घासावे.
260-15
परी निश्चयाचें मुष्टिबळ । पाहावें एकदोनी वेळ । मग तुळावें अति चोखाळ । मननवरी ॥260॥
परंतु (मी ब्रह्म आहे अशा) निश्चयरूपी मुठीचे बळ एकदोन वेळ पहावे (आणि मी ब्रह्म आहे असा दृढ निश्चय झाला आहे असे वाटले की मग ते अती शुद्ध मननापर्यंत तोलून धरावे (म्हणजे अद्वैतबोधाचे अती शुद्ध असे चिंतन करावे.

261-15
पाठीं हतियेरां आपणयां । निदिध्यासें एक जालिया । पुढें दुजें नुरेल घाया- । पुरतें गा ॥261॥
नंतर (ज्ञानरूपी) हत्यार व आपण निजध्यासाने एक झाल्यावर (आपण ज्ञानरूप झाल्यावर) अर्जुना, आपल्यापुढे घाव मारण्यापुरते दुसरे (हत्यार) उरणार नाही.
262-15
तें आत्मज्ञानाचें खांडें । अद्वैतप्रभेचेनि वाडें । नेदील उरों कवणेकडे । भववृक्षासी ॥262॥
ती आत्मज्ञानरूपी दुधारी तलवार आपल्या अद्वैत प्रकाशाच्या आधिक्याने संसारवृक्षाला कोणीकडेही उरू देणार नाही.
263-15
शरदागमींचा वारा । जैसा केरु फेडी अंबरा । का उदयला रवी आंधारा । घोंटु भरी ॥263॥
शरद् ऋतूच्या आरंभीचा वारा जसा आकाशातील ढगरूपी कचरा नाहीसा करतो अथवा उगवलेला सूर्य जसा अंधाराचा घोट भरतो,
264-15
नाना उपवढ होतां खेंवो । नुरे स्वप्नसंभ्रमाचा ठावो । स्वप्नप्रतीतिधारेचा वाहो । करील तैसें ॥264॥
अथवा जागे होताक्षणीच स्वप्नांच्या गर्दीचा ठावठिकाणा उरत नाही. त्याप्रमाणे आत्मानुभवरूपी धारेचा प्रहार करील (म्हणजे संसारवृक्षाचा ठावठिकाणा उरू देणार नाही).
265-15
तेव्हां ऊर्ध्वींचें मूळ । कां अधींचें हन शाखाजाळ । तें कांहींचि न दिसे मृगजळ । चादिणां जेवीं ॥265॥
तेव्हा या संसारवृक्षाचा वरचा भाग अथवा वरचे मूळ अथवा शाखांचा खालचा विस्तार हे जसे चांदण्यात मृगजळ दिसणार नाही तसे काही एक दिसणार नाही.

266-15
ऐसेनि गा वीरनाथा । आत्मज्ञानाचिया खड्गलता । छेदुनिया भवाश्वत्था । ऊर्ध्वमूळातें ॥266॥
अर्जुना, अशा रीतीने आत्मज्ञानरूपी तलवारीच्या पात्याने वर मूळ आहे असा जो संसारवृक्ष, तो छेदून (म्हणजे आत्मविचाराने त्याचा निरास करून)
ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः ।
तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणी ॥15.4॥*

क्ष्लोकार्थ 👉 नंतर त्या (आपल्या) रूपास पहावे, की ज्या ठिकाणी गेले असता (मुमुक्षु) पुन्हा परत येत नाहीत, ज्यापासून ही (विश्व) परंपरा वाढली, अशा त्या आद्य पुरुषास आत्मस्वरूपास ज्ञानाच्या अंगाने ) शरण जावे.
(आत्मस्वरूपानुभव कसा घ्यावा?
267-15
मग इदंतेसि वाळलें । जें मीपणेंवीण डाहारलें । तें रूप पाहिजे आपलें । आपणचि ॥267॥
(संसारवृक्षाच्या नाशानंतर येणारी आत्मानुभूती कशी घ्यावी) वर सांगितल्याप्रमाणे आत्मविचाराने देहादि अनात्मतत्वरूप प्रपंचाचा निरास झाल्यावर मग आपल्याहून जे भिन्न प्रतीत होते, त्यासंबंधाने इदंभाव (हे ते पणा) स्फुरतो त्याचा ज्या वस्तूच्या ठिकाणी किंचितही संबंध नसतो व (इदंच्या सापेक्ष आपल्यासंबंधाने अहंभाव (मीपणा) असतो. आत्मस्वरूप एकरस असल्याकारणाने तेथे भिन्न प्रतीती नाही, म्हणून तेथे इदं स्फुरण नाही आणि इदं स्फुरण नाही म्हणून) अहंस्फुरणही जेथे नसते असे जे अहं-इदं-वृत्तिशून्य, प्रसिद्ध असलेले आत्मस्वरूप, ते आपले स्वरूप आपणच पहावे.
268-15
परी दर्पणाचेनि आधारें । एकचि करून दुसरें । मुख पाहाती गव्हारें । तैसें नको हो ॥268॥
परंतु आरशाच्या आधाराने समोर आरसा घेऊन जसे अज्ञानी लोक एका मुखाची दोन मुखे करून म्हणजे बिंब व प्रतिबिंब अशा तर्‍हेने आपणच आपल्याला पहातात. तसे हे आत्मस्वरूपाला दृश्य-द्रष्टा करून पहाणे नको.
269-15
हें पाहाणें ऐसें असे वीरा । जैसा न बोडलिया विहिरा । मग आपलिया उगमीं झरा । भरोनि ठाके ॥269॥
अर्जुना, हे आपल्या आत्मस्वरूपाचे पाहणे असे आहे की विहीर उकरण्याच्या पूर्वी झरा जसा आपल्या उगमाच्या ठिकाणी पाण्याने भरलेला असतोच, तो जरी दृश्य झाला नाही तरी तो आपल्या स्वरूपाने आहेच.
270-15
नातरी आटलिया अंभ । निजबिंबीं प्रतिबिंब । निहटे कां नभीं नभ । घटाभावीं ॥270॥
अथवा पाणी आटाल्यावर प्रतिबिंब जसे आपल्या बिंबाच्या ठिकाणी मिळते, अथवा घट फुटल्यावर जसे घटाकाश महाकाशाच्या ठिकाणी मिळते,

271-15
नाना इंधनांशु सरलेया । वन्हि परते जेवीं आपणपयां । तैसें आपेंआप धनंजया । न्याहाळणें जें गा ॥271॥
अथवा अग्नीतील जळणारी लाकडे नि:शेष संपल्यावर अग्नी जसा मूळ स्वरूपात येऊन मिळातो, त्याचप्रमाणे अर्जुना, जे आपण आपल्याला सहज पहाणे आहे.
272-15
जिव्हे आपली चवी चाखणें । चक्षू निज बुबुळ देखणें । आहे तया ऐसें निरीक्षणें । आपुलें पैं ॥272॥
जिभेने जशी आपलीच चव चाखावी, अथवा डोळ्याने जसे आपले बुबुळ पहावे, त्याप्रमाणे आपण आपल्याला पहाणे आहे.
273-15
कां प्रभेसि प्रभा मिळे । गगन गगनावरी लोळे । नाना पाणी भरलें खोळे । पाणियाचिये ॥273॥
अथवा तेज तेजात मिसळावे, अथवा आकाशाने आकाशावर लोळावे, किंवा पाणी जसे पाण्याच्याच पदरात भरावे
274-15
आपणचि आपणयातें । पाहिजे जें अद्वैतें । तें ऐसें होय निरुतें । बोलिजतु असे ॥274॥
आपणच आपल्याला द्वैतभावाने जे पहावयाचे ते असे (वर सांगितल्याप्रमाणे) आहे हे मी खरे सांगतो.
275-15
जें पाहिजतेनवीण पाहिजे । कांहीं नेणणाचि जाणिजे । आद्यपुरुष कां म्हणिजे । जया ठायातें ॥275॥
जे आत्मस्वरूप पहाणेपणा घेतल्याशिवाय पहावे, (दृश्यसापेक्ष द्रष्ट्याची कल्पना टाकून पहावे), काही न जाणणे, हेच त्याचे जाणणे होय व ज्या ठिकाणाला (ज्या आत्मस्वरूपाला) आद्य (आरंभीचा) पुरुष असे म्हणतात.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading