हरिविजय तिसरा अध्याय श्रीकृष्ण जन्म

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

भगवान श्रीकृष्ण जन्म असा साजरा करावा
श्रीकृष्ण जन्माचे अभंग

टीप :
श्रावण वद्य अष्टमी अर्थात गोकुळ अष्टमी (जन्माष्टमी) आहे,

तेंव्हा भ. श्रीकृष्ण यांची खालीलप्रमाणे प्रतिमा घेऊन
ती उंचावर किंवा पाळण्यात ठेवून पंचामृत, सुंठ-साखर, खोबरे, यांचा प्रसाद बनवून दिवसभर एकादशी सारखा उपवास करून रात्री भ. श्रीकृष्ण यांचे स्मरण. कीर्तन. भजन, नृत्य आदी रीतीने उत्सव साजरा करावा.
रात्रौ १२ वाजता भ. श्रीकृष्ण यांचा जन्म अभंग नं. ११ दशरथें मारिला तोचि होता मास हा संपूर्ण अभंग जसा म्हणता येईल तसा म्हणून शेवटचे चरण पूर्ण झाले कि
किंवा
हरिविजय ग्रंथातील तिसरा अध्याय म्हणून साजरा करावा.
(तिसरा अध्याय श्रीकृष्ण जन्माच्या अभंगाच्या शेवटी दिलेला आहे.)

सर्वांनी गजर करताना फुले. गुलाल उधळणे (वर्षाव) करणे.
बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपालकृष्ण भगवान कि जय!!!!!!! …

टीप :
भ. श्रीकृष्ण जन्म खालील अध्याय म्हणून साजरा करावा.

भगवान श्रीकृष्ण जन्म असा साजरा करावा
श्रीकृष्ण जन्माचे अभंग

हरिविजय अध्याय ३

अवताराची योजना – कृष्णजन्म व कृष्णाचे गोकुळात आगमन –

श्रीगणेशाय नमः ॥

जय जय अनंतब्रह्मांडनायका ॥ चतुराननाचिया निजजनका ॥ चोघांसीही नव्हे आवांका ॥ तुझें स्वरुप वर्णावया ॥१॥ साही जणें वेडीं होती ॥ अठरांची खुंटली गती ॥ चौघीजणी तटस्थ पाहती ॥ स्वरुपस्थिति न वर्णवे ॥२॥ पांचां नुरेचि ठाव ॥ चारी सहजचि जाहलीं वाव ॥ चौदाजणींची ठेव ॥ न चले स्वरुप वर्णावया ॥३॥ शिणल्या बहुत चौसष्टी ॥ आठजणी बहुत कष्टी ॥ अकराही हिंपुटी ॥ स्वरुप तुझें वर्णितां ॥४॥ आणीक बारा देखण्या ॥ सोळाजणी चतुर शाहाण्या ॥ आणि चौघी डोळेमोडण्या ॥ लाजोनियां तटस्थ ॥५॥ पंचविसां जाहली वाव ॥ तिघांचें नुरेचि नांव ॥ दोन्ही म्हणणें भाव ॥ हेंही तेथें विरालें ॥६॥ चहूं मुखांचा वर्णितां भागला ॥ पांचां मुखांचा तटस्थ राहिला ॥ सहा मुखांचा दडाला ॥ कपाटामाजी जाऊनि ॥७॥

सहस्त्र मुखांचा वर्णितां देख ॥ तोही जाहला तळीं तल्पक ॥ थोरथोरांसी पडले अटक ॥ एक मुखें काय वर्णूं ॥८॥ जीमूतींचें बिंदू किती ॥ हेही एक वेळां होय गणती ॥ निराळीं पायीं वेंघती ॥ परी तुझी स्थिति अगम्य ॥९॥ होईल पृथ्वीचें वजन ॥ गणवेल सिंधूचें जीवन ॥ अवनीवरी किती तृण ॥ मोजवेल गणितां तें ॥१०॥ अंबर आहे किती विती ॥ हेंही गनवेल रमापती ॥ परी तुझे गुण निश्चिती ॥ न वर्णवती कोणातें ॥११॥

असो आतां पूर्वानुसंधान ॥ द्वितीयाध्याय संपतां पूर्ण ॥ कंसें देवकीचे गर्भ वधून ॥ साही टाकिले बंदिशाळे ॥१२॥ पाप जाहलें उत्कट जाण ॥ गांजिले गाई ब्राह्मण ॥ यावरी क्षीरसागरीं जगज्जीवन ॥ काय करिता जाहला ॥१३॥ अनंतासी म्हणे अनंत ॥ चला अवतार घेऊं त्वरित ॥ करुं दुष्‍टांचा निःपात ॥ संत भक्त रक्षूं पैं ॥१४॥ तंव बोले धरणीधर ॥ मी न घें आतां अवतार ॥ पूर्वीं मी जाहलों सौमित्र ॥ कष्ट फार भोगितले ॥१५॥ हांसोनि बोले द्विसहस्त्रनयन ॥ अष्टविंशति अयनें उपोषण ॥ निराहार घोर अरण्य ॥ तुम्हांसवें सेविलें जी ॥१६॥ आतां आपणांचे अवतरावें ॥ अवतारनाटय दाखवावें ॥ गोब्राह्मण सुखी रक्षावे ॥ प्रतिपाळावे साधुजन ॥१७॥ टाकोनि कपट कुटिलभाव ॥ स्वामीसी हांसे भोगिराव ॥ बोले कौतुकें रमाधव ॥ शेषाप्रती स्वानंदें ॥१८॥ तूं माझा प्राणसखा ॥ समरभूमीचा पाठिराखा ॥ तुजविण भक्तटिळका ॥ अवतार मी न घेंचि ॥१९॥ तूं माझें निजांग पूर्ण ॥ तूं सखया माझा निजप्राण ॥ तुजविण मज एक क्षण ॥ न गमेचि जिवलगा ॥२०॥

तूं जाहलासी पूर्वीं लक्ष्मण ॥ लंकेसी केलें रणकंदन ॥ बहुत सेवा करुन ॥ मज तुवां तोषविलें ॥२१॥ आतां तूं पुढें जाय सत्वर ॥ होईं माझा ज्येष्‍ठ सहोदर ॥ मी तूझी आज्ञा पाळीन निर्धार ॥ बळिभद्र होईं तूं ॥२२॥ वडील बंधु तूं होईं देवकीच्या गर्भीं जाऊनि राहीं ॥ मी योगमायेस लवलाहीं ॥ पाठवितो तुजमागें ॥२३॥ कंसें वधिलें गर्भ सकळ ॥ तुज योगमाया काढील ॥ मग गोकुळीं नेऊनि ठेवील ॥ रोहिणीच्या निजगर्भीं ॥२४॥ माया जाईल यशोदेच्या उदरा ॥ मग मी येईन मथुरापुरा ॥ देवकीचा गर्भवोवरा ॥ माझा अवताररुप होय ॥२५॥

भगवान श्रीकृष्ण जन्म असा साजरा करावा
श्रीकृष्ण जन्माचे अभंग

उपजतांचि गोकुळीं येईन ॥ मग तुम्ही आम्ही खेळों दोघे जण ॥ गोरक्षमिषें संपूर्ण ॥ दैत्य तेथील संहारुं ॥२६॥ करुन साष्टांग नमन ॥ पुढें चालिला संकर्षण ॥ देवकीच्या उदरीं येऊन ॥ गर्भ राहिला सातवा ॥२७॥ दिवसेंदिवस गर्भ वाढे ॥ मंदिरीं परम प्रकाश पडे ॥ जैसा पळेंपळ सूर्य चढे ॥ उदयाद्रीहूनि पश्चिमे ॥२८॥ वसुदेवाप्रती देवकी बोले ॥ सहा वेळां मी गर्भिणी जाहलें ॥ परी नवल वाटतें ये वेळे ॥ या गर्भाचें मजलागीं ॥२९॥ वाटे पृथ्वी उचलीन ॥ कीं आकाशा धीर देईन ॥ सप्त समुद्र सांठवीन ॥ नखाग्रीं मज वाटतसे ॥३०॥ घेऊन नांगरमुसळ ॥ मीच मर्दीन कंसदळ ॥ दैत्य मारावे समूळ ॥ मनामाजी वाटतसे ॥३१॥ वसुदेव म्हणे ते क्षणीं ॥ न कळे ईश्वराची करणी ॥ येवढा तरी वांचोनी ॥ विजयई हो का सर्वदा ॥३२॥ तों लागला सातवा मास ॥ निद्रा आली देवकीस ॥ वसुदेवही सावकाश ॥ निद्रार्णवीं निमग्न ॥३३॥ तंव ती हरीची योगमाया ॥ तिची ब्रह्मांदिकां न कळे चर्या ॥ इच्छामात्रें महत्कार्या ॥ ब्रह्मांड हें रचियेलें ॥३४॥ ब्रह्मा विष्णु शिव तीन्ही ॥ गर्भी आलीं बाळें तान्हीं ॥ परी एकासी नेत्र उघडूनी ॥ स्वरुप पाहों नेदीच ॥३५॥

आत्मसुखाचा समुद्र ॥ त्यांत पहुडले जीव समग्र ॥ परी चाखों नेदी अणुमात्र ॥ गोडी तेथींची कोणातें ॥३६॥ हे चैतन्याची बुंथी ॥ हे अरुपाची रुपकर्त्री ॥ ब्रह्मांडींचे पुतळे नानागती ॥ एका सूत्रें नाचवी पैं ॥३७॥ इनें निर्गुण गुणासी जाहली पतिव्रता ॥ ब्रह्मांड रचिलें तत्त्वतां ॥ इच्छामात्रेंकरुनियां ॥३९॥ शेजे निजवूनि भ्रतार ॥ सृष्टी घडी मोडी समग्र ॥ समाचार अणुमात्र ॥ कळों नेदी पतीचें ॥४०॥ हे कौटाळीण निर्धारीं ॥ नसतींच दैवतें उभीं करी ॥ जीव पाडिले अघोरीं ॥ नाना योनीं हिंडवी ॥४१॥

भगवान श्रीकृष्ण जन्म असा साजरा करावा
श्रीकृष्ण जन्माचे अभंग

धरील कोणी स्वरुपाची चाड ॥ त्यावरी घाली नसतें लिगाड ॥ पुढें स्वर्गसुख करी आड ॥ तेंचि गोड दाखवी ॥४२॥ गोड तें कडवट केलें ॥ कडवटा गोडपण दाखविलें ॥ अहंकारामद्य जीवा पाजिलें ॥ वेडे केले सर्वही ॥४३॥ आतां असो हे मायाराणी ॥ इची विपरीतचि करणी ॥ तिनें देवकीचा गर्भ काढूनी ॥ गोकुळासी पैं नेला ॥४४॥ कैसा नेला काढुनी ॥ ब्रह्मादिकां न कळे करणी ॥ रोहिणी वसुदेवाची पत्‍नी ॥ नंदागृहीं होती ते ॥४५॥ कंसाचिया भयें जाण ॥ नंदगृहीं राहिली लपोन ॥ तिच्या पोटीं नेऊन ॥ गर्भ घातला ते क्षणीं ॥४६॥ निजले ठायीं गर्भ ॥ पोटांत घातला स्वयंभ ॥ परम तेजस्वी सुप्रभ ॥ सूर्य जैसा तेजस्वी ॥४७॥ जागी जाहली रोहिणी ॥ तों सात मासांची गर्भिणी ॥ म्हणे कैसी जाहली करणी ॥ चिंता मनीं वर्तत ॥४८॥ पुरुष नसतां गर्भ राहिला ॥ परम चिंताक्रांत ते अबला ॥ नंदयशोदेस कळला ॥ समाचार सर्व तो ॥४९॥ जीवीं झोंबला चिंताग्नी ॥ तों आकाशीं वदली देववाणी ॥ चिंता करुं नको रोहिणी ॥ वसुदेवाचा गर्भ असे ॥५०॥

पोटा येतो भोगींद्र ॥ उतरील पृथ्वीचा भार ॥ ऐकतां हें उत्तर ॥ सुख जाहलें समस्तां ॥५१॥ लोकापवाद सर्व हरला ॥ चिंतेचा डाग धुतला ॥ तों बळिराम जन्मला ॥ नवमास भरतांचि ॥५२॥ प्रकाशला सहास्त्रकिरण ॥ तैसा बाळ देदीप्यमान ॥ नंदें जातक वर्तवून ॥ बळिभद्र नाम ठेविलें ॥५३॥ ऐसा उपजला अहींद्र ॥ तों यशोदा जाहली गरोदर ॥ हरिमायेनें अवतार ॥ तेथें घेतला तेधवां ॥५४॥ यशोदा गर्भिणी जाहली ॥ इकडे कथा कैसी वर्तली ॥ देवकी पाहे घाबरली ॥ तों गर्भ नाहीं पोटांत ॥५५॥ नेणों कैसी जाहली करणी ॥ सांगे वसुदेवा लागोनी ॥ म्हणे गर्भ न पडेची धरणीं ॥ गेला जिरोनि पोटांत ॥५६॥ वसुदेव म्हणे ते वेळां ॥ कंसधाकें गर्भ जिरला ॥ न कळे ईश्वराची कळा ॥ कंसास कळला समाचार ॥५७॥ दूत सांगती कंसातें ॥ गर्भ जिरला तेथिंचा तेथें ॥ कंस म्हणे आतां आठव्यातें ॥ बहुत जपा सर्वही ॥५८॥ देवकी होतांचि गर्भिण ॥ जागा नेत्रीं तेल घालून ॥ आठव्याची आठवण ॥ विसरुं नका सर्वथा ॥५९॥ देवकीउदरींचा आठवा ॥ निजध्यास बसला कंसभावा ॥ जनीं वनीं आघवा ॥ आठवा आठवा आठवत ॥६०॥

जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं ॥ आठवा दिसे ध्यानीं मनीं ॥ आठवा दिसे भोजनीं ॥ आठवा शयनीं सोडीना ॥६१॥ भूमि दिसे आठव्याऐसी ॥ आठवा दिसे आकाशीं ॥ आठव्यानें व्यापिलें त्यासी ॥ दिवसनिशी आठवा ॥६२॥ क्षीरसागरीं श्रीहरी ॥ क्षीराब्धिसुतेसी आज्ञा करी ॥ पद्माक्षि तूं क्षितीवरी ॥ क्षितीपाळउदरीं अवतरें ॥६३॥ वैदर्भदेशींचा भीमक राजा ॥ तयाची तूं होय आत्मजा ॥ तात्काळ चालली कमळजा ॥ नमस्कारुनि हरीतें ॥६४॥ जगद्वंद्य स्वयें आपण ॥ प्रवेशाला मथुरापट्टण ॥ देवकीचे गर्भी येऊन ॥ राहता जाहला कौतुकें ॥६५॥ गर्भवासा आला भगवंत ॥ म्हणतां हांसतील साधुसंत ॥ लीलावतारी जगन्नाथ ॥ जन्ममृत्यु त्या कैंचा ॥६६॥ ज्याचें करितां स्मरण ॥ जाय जन्ममृत्यु खंडोन ॥ तो राहिला गर्भीं येऊन ॥ कल्पांतींही घडेना ॥६७॥ उगाच लौकिकभाव ॥ दाविली मृत्युलोकींची टेव ॥ तो ब्रह्मानंद स्वयमेव ॥ जन्म मृत्यु त्या कैंचा ॥६८॥ क्षीरसागरींहून हरि आला ॥ तरी तो ठाव काय ओस पडिला ॥ तो तैसाचि संचला ॥ लक्ष्मीशेषांसमवेत ॥६९॥ अनंत रुपें अनंत नामें ॥ अनंत अवतार अनंत कर्में ॥ अनंत लीला घनश्यामें ॥ भक्तांलागीं दाविल्या ॥७०॥

अनंत ब्रह्मांडें अनंत शक्ती ॥ अनंत युगींच्या अनंत कीर्ती ॥ अनंत रुपें अनंत मूर्ती ॥ अतर्क्य गति वेदशास्त्रां ॥७१॥ असो लौकिक विचार देख ॥ गर्भीं आला लक्ष्मीनायक ॥ कंसासी लाविला धाक ॥ देखिला नसतां सर्वदा ॥७२॥ देवकी जाहली गर्भिणी ॥ तेज न माये गगनीं ॥ खेद कांहीं न वाटे मनीं ॥ सुखेंकरुनि डुल्लत ॥७३॥ पोटा आला विदेही हरी ॥ देवकी नाहीं देहावरी ॥ जनीं वनीं दिगंतरीं ॥ अवघा मुरारी दिसतसे ॥७४॥ वसुदेव म्हणे देवकीप्रती ॥ तुज चिंता कां न वाटे चित्तीं ॥ आठव्याची कैसी गती ॥ होईल ते न कळे पां ॥७५॥ कंस जपतो बहुत ॥ आठव्याचा करावया घात ॥ यावरी देवकी बोलत ॥ प्रतिउत्तर काय तेव्हां ॥७६॥ भुजा पिटोनि बोले वचन ॥ कंसास मारीन आपटोन ॥ मुष्टिकचाणूरांचा प्राण ॥ क्षणमात्रें घेईन मी ॥७७॥ हांक फोडोन गर्जे थोर ॥ उतरीन पृथ्वीचा भार ॥ करुनि दैत्यांचा संहार ॥ बंदिशाळा फोडीन मी ॥७८॥

आणीं वेगें धनुष्यबाण ॥ युद्ध करीन मी दारुण ॥ जरासंध रथीं बांधोन ॥ सत्रा वेळां आणीन मी ॥७९॥ भस्म करीन कालयवन ॥ रचीन द्वारकापट्टण ॥ सकळ नृपां शिक्षा लावून ॥ पट्टरानी आणीन मी ॥८०॥ हांक फोडिली क्रोधें थोर ॥ जिवें मारीन भौमासुर ॥ निवटीन कौरवभार ॥ निजभक्तकैवारें ॥८१॥ मी भक्तांचा सारथि होईन ॥ दुष्ट सर्व संहारीन ॥ मी ब्रह्मानंद परिपूर्ण ॥ अवतरलों पृथ्वीवर ॥८२॥ वसुदेवासी चिंता वाटे ॥ ही गर्जते येवढ्या नेटें ॥ जरि बाहेर मात प्रकटे ॥ तरी अनर्थ होईल पां ॥८३॥ वसुदेव बोले वचन ॥ देवकी धरीं आतां मौन ॥ येरी म्हणे कैंची देवकी पूर्ण ॥ ब्रह्म सनातन मी असें ॥८४॥ स्त्री पुरुष नपुंसक ॥ त्यांहूनि वेगळा मी निष्कलंक ॥ सकळमायाचक्रचाळक ॥ कर्ता हर्ता मीच पैं ॥८५॥ मी सर्वद्रष्टा अतींद्रिय ॥ मी अज अव्यय निरामय ॥ अजित अपार निष्क्रिय ॥ आनंदमय वर्तें मी ॥८६॥ मी प्रळयकाळाचा शास्ता ॥ मी आदिमायेचा नियंता ॥ मी चहूं वाचांपरता ॥ मायानिमिंता मीच पैं ॥८७॥ मीच सगुण मीच निर्गुण ॥ मीच थोर मीच लहान ॥ देव दैत्य निर्मून ॥ पाळिता हर्ता मीच पैं ॥८८॥ ऐसें देवकी बोलोन ॥ मागुती धरिलें मौन ॥ तों आकाशीं देव संपूर्ण ॥ गजर करिती दुंदुभींचा ॥८९॥ अवतरेल आतां भगवंत ॥ करील दुष्‍टांचा निःपात ॥ देव मिळोनि समस्त ॥ गुप्त मथुरेंत उतरले ॥९०॥ ब्रह्मादिक आणि चंद्र ॥ बंदिशाळे पातळे समग्र ॥ देवकीस प्रदक्षिणा करिती सुरवर ॥ एक नमस्कार घालिती ॥९१॥

उभे ठाकूनि बद्धांजली ॥ गर्भस्तुति आरंभिली ॥ जय सच्चिदानंद वनमाळी ॥ देवकीजठरगर्भा ॥९२॥ जय हरे नारायणा गोविंदा ॥ इंदिरावर आनंदकंदा ॥ सर्वेशा मुकुंदा परमानंदा ॥ परमपुरुषा परज्ञा ॥९३॥ पद्मजजनका पुरातना ॥ पंकजनेत्रा परमपावना ॥ पद्मवल्लभा पशुपतिजीवना ॥ पयोब्धिवासा परेशा ॥९४॥ पतितपावना पंकजधारका ॥ कमनीयरुपा निष्कलंका ॥ कमळस्वरुपा कमलानायका ॥ किल्बिषमोचका कमलेशा ॥९५॥ कर्ममोचका करिवरतारणा ॥ कैवल्यनिधि कैटभभंजना ॥ करुणाकरा कामविहीना ॥ काळनाशना काळात्मया ॥९६॥ आदिकेशवा विश्वभूषणा ॥ विश्वंभरा वेदपाळणा ॥ वेदपुरुषा वेदस्थापना ॥ विश्वाधीशा विश्वपते ॥९७॥ अनंतेवषा अनंतवदना ॥ अनंतनामा अनंतनयना ॥ अनंतपाणि अनंतचरणा ॥ अनंतकल्याणा नमोस्तु ते ॥९८॥

अव्ययरुपा अपरंपारा ॥ आगण्युआ अगुणा अगोचरा ॥ अनामा असंगा अक्षरा ॥ आदिकारणा आत्मया ॥९९॥ अमानुइषा अविद्याछेदना ॥ आनंदरुपा आनंदसदना ॥ अभेदा अबोधी अमळपूर्णा ॥ आदिमूळा अव्यक्ता ॥१००॥ सर्वतीता सर्वज्ञा ॥ गुणसागरा गुणज्ञा ॥ आम्ही सकळ सुर तवाज्ञा ॥ पाळोनियां राहतों ॥१॥ ऐसी स्तुति करुनि जाणा ॥ देव पावले अंतर्धाना ॥ आनंद न माये मना ॥ सुरवरांच्या तेधवां ॥२॥ कंसास रात्रंदिवस ॥ लागला आठव्याचा निजध्यास ॥ आठही प्रहर तयास ॥ आठवावयास दुजें नाहीं ॥३॥

दूतींप्रती पुसे कंस ॥ गर्भास किती जाहले मास ॥ त्या म्हणती संपावयास ॥ नवमासां अवधि थोडी हो ॥४॥ आपण येऊन कंसासुर ॥ उभा राहे देवकीसमोर ॥ तंव ते आनंदरुप साचार ॥ चिंता अणुमात्र नाहींच ॥५॥ नासाग्रीं ठेवून दृष्टी ॥ कृष्णरुप पाहे सृष्‍टी ॥ कृष्णरुप पाहे पाठीं पोटीं ॥ बोलतां ओठीं कृष्णचि ये ॥६॥ कृष्णरुप आसन वसन ॥ कृष्णरुप अन्न पान ॥ कृष्णरुप दिसे सदन ॥ भूषण संपूर्ण कृष्णरुप ॥७॥ पृथ्वी आप तेज वायु निराळ ॥ कृष्णरुप दिसे सकळ ॥ स्थावर जंगम निर्मळ ॥ घननीळरुप दिसतसे ॥८॥ पुढें उभा कंस देख ॥ परी निर्भय देवकी सुरेख ॥ महेशापुढें मशक ॥ तैसा कंस भासतसे ॥९॥ इंद्रापुढें जैसा रंक ॥ कीं ज्ञानियापुढें महामूर्ख ॥ कीं केसरीपुढें जंबुक ॥ का सूर्यापुढें खद्योत पैं ॥११०॥ कीं हंसापुढें बक ॥ कीं कोकिळेपुढें काग ॥ कीं विप्रासमोर मांग ॥ तैसा खळ उभा तेथें ॥११॥ कीं नामापुढें पाप देख ॥ कीं वेदांतापुढें चार्वाक ॥ कीं शंकरापुढें मशक ॥ कीं मीनकेतन उभा जैसा ॥१२॥

भगवान श्रीकृष्ण जन्म असा साजरा करावा
श्रीकृष्ण जन्माचे अभंग

कीं पंडितापुढें अजापाळक ॥ कीं श्रोतियापुढें हिंसक ॥ कीं वासुकीपुढें मूषक ॥ लक्षणें पाहूं पातला ॥१३॥ अग्नीपुढें जैसें तृण ॥ कीं ज्ञानियापुढें अज्ञान ॥ कीं महावातासी आडवें पूर्ण ॥ जलदजाल जैसें कां ॥१४॥ ऐसा कंस देवकीपुढें ॥ तीस न्याहाळूनि पाहे निवाडें ॥ तंव तें चतुर्भुज रुपडें ॥ शंखचक्रयुक्त दिसे ॥१५॥ न दिसे स्त्रियेची आकृती ॥ परम देदीप्यमान विष्णुमूर्ती ॥ आरक्तनेत्र सुदर्शन हातीं ॥ ऊर्ध्व करुनि उभी असे ॥१६॥ मुरकुंडी कंसाची वळली ॥ शस्त्रें हातींचीं गळालीं ॥ बोबडी तोंडासी पडली ॥ हांक फोडिली भयें तेव्हां ॥१७॥

आरडोनियां कंस पळे ॥ थरथरां कांपे वाटे अडखळे ॥ पिशाचवत संचरलें ॥ गृहामाजी आपुलिया ॥१८॥ कंस तेव्हां शस्त्र घेऊनी ॥ रागें आपटीत मेदिनीं ॥ आठव्यास जिवें मारुनी ॥ टाकीन मी निर्धारें ॥१९॥ आठव्यानें मज व्यापिलें ॥ त्यास मी गिळीन सगळें ॥ कंस रागें फिरवी डोळे ॥ आल्यागेल्यावरी पैं ॥१२०॥ आतां श्रीकृष्णाचा जन्मकाळ ॥ पाहों आले निर्जर सकळ ॥ दुंदुभिनादें निराळ ॥ दुमदुमलें तेधवां ॥२१॥ विमानांची जाहली दाटी ॥ वाव नाहीं नभापोटीं ॥ करिती दिव्य सुमनवृष्‍टी ॥ आनंद पोटीं न समाये ॥२२॥ वर्षाऋतु श्रावणमास ॥ बुधाष्टमी कृष्णपक्ष ॥ अवतरला कमलदलाक्ष ॥ रोहिणी नक्षत्र ते दिवशीं ॥२३॥ सोमवंशीं अवतार ॥ म्हणोनि साधिला चंद्रपुत्रवार ॥ जाहला शशीचा उद्धार ॥ दशा आली वंशासी ॥२४॥ मध्यरात्रीं अष्टमीस ॥ देवकीपुढें परमपुरुष ॥ चतुर्भुज हृषीकेश ॥ निमासुर डोळस पैं ॥२५॥ आठां वर्षांची मूर्ती ॥ असंभाव्य पडली दीप्ती ॥ तेजें दश दिशा उजळती ॥ तेथें लपती शशिसूर्य ॥२६॥ पदकमळींचा आमोद सेवावया ॥ भ्रमरी जाहली क्षीराब्धितनया ॥ सर्वकाळ न विसंबे पायां ॥ कृपण जैसा धनातें ॥२७॥ भागीरथी चरणीं उद्भवली ॥ सागरीं ते एक जाहली ॥ परी न विसंबे निजमुळीं ॥ कदाकाळीं तुटेना ॥२८॥ अरुणबालार्कसंध्याराग ॥ दिव्य रत्‍नांचे काढिले रंग ॥ तैसे तळवे आरक्त सुरंग ॥ श्रीरंगाचे शोभती ॥२९॥ चंद्र क्षयरोगें जाहला कष्टी ॥ मग राहिला चरणांगुष्ठीं ॥ कीं दशधा होऊनि दाही बोटीं ॥ सुरवाडला शशी तो ॥१३०॥ वज्र ध्वज पद्म अंकुश ॥ ऊर्ध्वरेखा चक्र पदीं विशेष ॥ सामुद्रिक चिन्हें सुरस ॥ काय अर्थ सुचविला ॥३१॥ साधकास ऊर्ध्वरेखा ॥ ऊर्ध्वमार्ग दावी देखा ॥ सत्त्वशीळा प्रेमळ भाविका ॥ ऊर्ध्वसंकेत दावीतसे ॥३२॥

विद्यामदें जाहले जे मस्त ॥ कोणास न लेखिती गज उन्मत्त ॥ त्यांसी आकर्षावया वैकुंठनाथ ॥ क्षमांकुश धरी पदीं ॥३३॥ पद्म कां धरिलें पायीं ॥ पद्मा वसे तया ठायीं ॥ आणिकांतें प्राप्त नाहीं ॥ घोर तप आचरतां ॥३४॥ अहंकार पर्वत थोर ॥ भक्तांस बाधक जड फार ॥ तो फोडावया वज्र ॥ हरीनें पायीं धरियेलें ॥३५॥ कीं तें चरणलक्षण जहाज ॥ वरी विशाळ भक्तिध्वज ॥ भक्त तारावया अधोक्षज ॥ सदा उदित वाट पाहे ॥३६॥ जीव शरण येती जडरुप ॥ त्यांचें छेदावया सर्व पाप ॥ चक्र पायीं देदीप्य ॥ तेज अमूप झळकतसे ॥३७॥ प्रपदें दिसती विमल ॥ घोटी त्रिकोण सोज्ज्वळ ॥ इंद्रनीळमणि सुढाळ ॥ परी उपमे पुरेना ॥३८॥ तळवे आरक्त विराजती ॥ कीं बहु श्रमली सरस्वती ॥ म्हणोनि घ्यावया विश्रांती ॥ तळवां राहिली हरीच्या ॥३९॥ विश्वाचीं पापें किती हरावीं ॥ म्हणोनि श्रमली जान्हवी ॥ शुभ्र वांकीरुप जाहली बरवी ॥ म्हणोनि सत्कवि वर्णिती हो ॥१४०॥

कालिंदी कृतांताची भगिनी ॥ ऐसें बोलिजे सर्वजनीं ॥ तो अपवाद चुकवावयालागूनी ॥ मांडया सुनीळ झाली ते ॥४१॥ ऐसी हरिपदीं त्रिवेणी सुरंग ॥ अज्ञानच्छेदक दिव्य प्रयाग ॥ अक्षयवट सुरंग ॥ ध्वजांकुश तेचि पैं ॥४२॥ चरणीं सुरवाडले प्रेमळ ॥ तेच तेथें पूर्ण मराळ ॥ वांकींवरी रत्‍नें तेजाळ ॥ तपोधन तपती ते ॥४३॥ प्रयागीं मोक्ष ठेवितां देह ॥ येथींच्या श्रवणें होय विदेह ॥ भावें माघमासीं निःसंदेह ॥ त्रिवेणीमाधव सेविजे ॥४४॥ त्या प्रयागीं जातां कष्ट ॥ हा ध्यानींच होतो प्रगट ॥ या प्रयागीं नीलकंठ ॥ क्षेत्रसंन्यास घेत पैं ॥४५॥ वांकी नेपुरें तोडर ॥ करिती दैत्यांवरी गजर ॥ पोटर्‍या जंघा सुकुमार ॥ श्यामसुंदर दिसती पैं ॥४६॥ कीं ते सरळ कर्दळी स्तंभ ॥ कीं गरुडपाचूंचे उगवले कोंभ ॥ कीं शोधूनियां सुनीळ नभ ॥ जानु जंघा ओतिल्या ॥४७॥ कीं मिळोनि सहस्त्र सौदामिनी ॥ शीतळ होऊनि पीतवसनीं ॥ जडल्या चंचळपण टाकूनी ॥ हरिजघनीं सर्वदा ॥४८॥ कटीं मेखळेचें तेज आगळें ॥ दिव्य रत्‍नें मिरवती सुढाळें ॥ कीं एकहारी सूर्यमंडळें ॥ हरिजघनीं जडलीं पैं ॥४९॥

नाभि वर्तुळ गंभीर ॥ जैसा कां बालभास्कर ॥ तेथें उद्भवला चतुर्वक्‍त्र ॥ सृष्टीचिये आदिकाळीं ॥१५०॥ उदरीं त्रिवळी सुकुमार ॥ कौस्तुभतेजें झांके अंबर ॥ वैजयंती मुक्ताहार ॥ चरणांगुष्ठापर्यंत पैं ॥५१॥ वक्षःस्थळीं श्रीवत्सलांछन ॥ सव्यभागीं शोभायमान ॥ वामभागीं श्रीनिकेतन ॥ वास्तव्यस्थळ श्रीचें पैं ॥५२॥ शंख चक्र गदा पद्म ॥ चतुर्बाहु उत्तमोत्तम ॥ कीं धर्मार्थमोक्षकाम ॥ चारी पुरुषार्थं उभारिले ॥५३॥ पांघुरला जो पिंताबर ॥ जडितपल्लव मनोहर ॥ कीं तेणें रुपें सहस्त्रकर ॥ अवतरला भासतसे ॥५४॥ चांदणें शोभे शुद्ध निराळीं ॥ तैसी उटी आंगीं शोभली ॥ कीं इंद्रनीळा गवसणी घातली ॥ काश्मीराची सुरंग ॥५५॥ कंबुकंठ विराजमान ॥ नासिक सरळ सुहास्यवदन ॥ मंदस्मित झळकती द्शन ॥ चंद्रतेज उणें पैं ॥५६॥ कीं सर्वही आनंद मिळोन ॥ हरिमुखीं वसती अनुदिन ॥ त्रैलोक्यसौंदर्य विसांवोन ॥ तेथेंच गोळा जाहलें ॥५७॥ कुंडलें तळपती मकराकार ॥ तेजें लखलखिलें अंबर ॥ मज वाटे शशिदिनकर ॥ हरिश्रोत्रीं लागले ॥५८॥ कुंडलांची दिव्य दीप्ती ॥ गंडस्थळीं झळके ज्योती ॥ कुंडलांस कर्ण शोभविती ॥ कर्णाची दीप्ती विशेष ॥५९॥ कृष्णतनूच्या सुरवाडे ॥ अलंकारांसी प्रभा चढे ॥ कपाळीं टिळक निवाडे ॥ मृगमदाचा सतेज ॥१६०॥ कल्पांतीचा सूर्य प्रगटला ॥ तैसा मुकुट तेजागळा ॥ वरी दिव्य मणि मिरवला ॥ तो वर्णिला नवजाय ॥६१॥

भगवान श्रीकृष्ण जन्म असा साजरा करावा
श्रीकृष्ण जन्माचे अभंग

बाहुदंडीं कीर्तिमुखें ॥ हस्तकंकणें दिव्य सुरेखें ॥ मुद्रिकांचें तेज झळके ॥ चपळेहूनि विशेष ॥६२॥ ऐसा एकाएकीं बंदिशाळे ॥ देवकी देखे घनसांवळें ॥ जिवाचें निंबलोण केलें ॥ हरीवरुनि तेधवां ॥६३॥ आनंद न माये अंबरीं ॥ म्हणे भक्तवत्सला श्रीहरी ॥ तूं माझिया निजोदरीं ॥ पुत्र होवोनि अवतरें ॥६४॥ तूं विश्वंभर बहु थोर ॥ परी लोक म्हणती माझा पुत्र ॥ ऐसा होईं तूं राजविनेत्र ॥ आळी माझी पुरवावी ॥६५॥ हरी म्हणे ते वेळ ॥ मी बाळक होईन अवलीळा ॥ परी मज सत्वर गोकुळा ॥ नेऊनियां घालावें ॥६६॥ तेथें माझा प्राणमित्र ॥ ज्येष्ठ बंधु बळिभद्र ॥ मग दोघेही येऊ साचार ॥ दर्शनालागीं तुमच्या ॥६७॥ ऐसें बोलून जगज्जीवन ॥ हास्यवदनें अवलोकून ॥ आपुली योगमाया घालून ॥ देवकीसी मोहिलें ॥६८॥ सच्चिदानंद घननीळ ॥ देवकीपुढें जाहला बाळ ॥ तीस वाटलें केवळ ॥ माझें उदरीं जन्मला ॥६९॥ पहिला प्रताप विसरली ॥ बाळ देखोन घाबरली ॥ असंभाव्य प्रभा पडली ॥ बंदिशाळे न समाये ॥१७०॥ रात्र जाहली दोन प्रहर ॥ वसुदेवासी उठवी सुंदर ॥ म्हणे शब्द जाईल बाहेर ॥ तरी कंस धांवेल पैं ॥७१ कोठें तरी कृष्ण लपवावा ॥ बाहेर तर्क कळों न द्यावा ॥ मौनेंचि हृदयीं धरावा ॥ तरीच लाभेल कृष्ण हा ॥७२॥ वसुदेव लावलाहें धांविन्नला ॥ श्रीकृष्ण हृदयीं धरिला ॥ म्हणे कोठें लपवूं याला ॥ हा झांकिला नवजाय ॥७३॥

सूर्य काय मुष्टींत झांके ॥ चंद्र न लपे कदा काखे ॥ ऐरावत शक्राचा देखें ॥ लपे कैसा पर्णकुटीं ॥७४॥ सिंधु न माये रांजणीं ॥ बोचक्यांत न लपे कदा अग्नी ॥ मेरु काखेसी घालूनी ॥ कोणा लपवे सांग पां ॥७५॥ मूर्खांमाजी पंडित ॥ अभाग्यांत श्रीमंत ॥ क्लीबांमाजी प्रतापवंत ॥ शूर कैसा झांके पां ॥७६॥ लवणाचा घट थोर ॥ आवरुं न शके गंगापूर ॥ वानरांमाजीं रघुवीर ॥ कदाकाळीं झांकेना ॥७७॥ भूतांमाजी शंकर ॥ किरडांमाजी धरणीधर ॥ रंकामाजी राजेंद्र ॥ कदा झांकिला जाईना ॥७८॥ कस्तुरी चोरिली चोरें ॥ परी परिमळें हाट भरे ॥ तैसा कृष्ण न झांके वो सुंदरे ॥ लपवितां कोठेंही ॥७९॥ बाहेर प्रकटतां मात ॥ तात्काळ होईल अनर्थ ॥ ज्यासी द्रव्यकूप सांपडत ॥ तेणें लोकातें न सांगावें ॥१८०॥ तों हळूच बोले देवकी बोला ॥ हा अयोनिसंभव पुतळा ॥ यास नेऊन घाला गोकुळा ॥ भय तुम्हांला कदा नाहीं ॥८१॥

तंव वसुदेव म्हणे ॥ पदीं श्रृंखला द्वारीं रक्षणें ॥ लोहारें ठोकूनि घणे ॥ कुलुपें कपाटें दृढ केलीं ॥८२॥ मध्यरात्रीं पर्जन्यकाळ ॥ यमुनेसी पूर असे तुंबळ ॥ बेडी वाजे खळखळ ॥ द्वारपाळ जागे पैं ॥८३॥ घन वर्षतो मंदमंद ॥ वसुदेव जाहला सद्गद ॥ हृदयीं धरिला ब्रह्मानंद ॥ चैतन्यधन श्रीकृष्ण ॥८४॥ अवलोकिता श्रीकृष्णवदन ॥ बेडी तुटली न लागतां क्षण ॥ ज्यांचे करितांच स्मरण ॥ भावबंधन निरसे पैं ॥८५॥ नवल वाटलें वसुदेवा ॥ घेवोनि चालिला वासुदेवा ॥ माय धांवोनि तेधवां ॥ वदन विलोकी पुत्राचे ॥८६॥ पुन्हां बाळा दावी वदन ॥ आसुवें भरले तेव्हां नयन ॥ कृष्ण करी हास्यवदन ॥ मातेकडे पाहोनियां ॥८७॥ तो चहूं दारवंटा ते वेळे ॥ दृढ कुलुपें ठोकिले खिळे ॥ जावळी येता घननीळें ॥ पायें स्पर्शिलीं कपाटें ॥८८॥ तात्काळ उघडलीं चारीं द्वारें ॥ रक्षक व्यापिले निद्राभरें ॥ वसुदेव चालिला त्वरें ॥ कोणी दुसरें आढळेना ॥८९॥ वर्षती पर्जन्याच्या धारा ॥ तों फणींद्र धांविन्नला त्वरा ॥ विशाळ फळा ते अवसरा ॥ कृष्णावरी उभारिला ॥१९०॥ खालीं पिता नेत राजीवनेत्र ॥ भोगींद्र वरी जाहला छत्र ॥ वेगें पावला यमुनातीर ॥ तों महापूर भरलासे ॥९१॥

भगवान श्रीकृष्ण जन्म असा साजरा करावा
श्रीकृष्ण जन्माचे अभंग

मागें पुढें वसुदेव पाहे ॥ म्हणे येथें करावें काय ॥ उदकामाजी लवलाहें ॥ बाळ घेवोन संचरला ॥९२॥ जों जों उचली कृष्णातें ॥ तों तों जीवन चढे वरुतें ॥ स्पर्शावया जगज्जीवनातें ॥ यमुनेतें आल्हाद ॥९३॥ वरी उचलितां माधवा ॥ आकंठ उदक जाहलें वसुदेवा ॥ वसुदेव म्हणे कमळाधवा ॥ वैकुंठपति धांवें कां ॥९४॥ तंव श्रीकृष्णें दक्षिणचरण ॥ तात्काळ बाहेर काढून ॥ स्पर्शिलें यमुनाजीवन ॥ जाहली पावन तेणें ते ॥९५॥ परमसुखें यमुना सवेग ॥ तात्काळ जाहली दोन भाग ॥ जैसा स्त्रिया करिती भांग ॥ क्षणमात्र नलगतां ॥९६॥ वसुदेव उतरुन यमुना ॥ तात्काळ आला नंदभवना ॥ तंव यशोदेसी जाहली कन्या ॥ परी ते कांहीं नेणेचि ॥९७॥ ते योगमाया हरीची पूर्ण ॥ तिनें निद्रिस्त केले सकळ जन ॥ यशोदेशी न कळे वर्तमान ॥ कन्यारत्‍न पुढें तें ॥९८॥ कपाटें मोकळीं सर्वही ॥ वसुदेव प्रवेशला अंतर्गृहीं ॥ कृष्णा ठेवूनि लवलाही ॥ कन्या वेगें उचलिली ॥९९॥

पुत्र ठेवूनि कन्या नेली ॥ कोणासी न कळे गोकुळीं ॥ वसुदेव तेच वेळीं ॥ बंदिशाळे पातला ॥२००॥ वसुदेव परम ठकला ॥ कृष्ण हातींचा दूर टाकिला ॥ माया आणितां श्रृंखला ॥ पायीं दृढ तैसीच ॥१॥ कपाटें तैसींच सकळिक ॥ द्वारीं जागती सेवक ॥ मायेसी घेतां अटक ॥ सर्व जाहली पूढती ॥२॥ हिरा ठेवूनि आणिली गार ॥ सूर्य देऊनि घेतला अंधकार ॥ पाच देऊनि निर्धार ॥ कांच घरा आणिली ॥३॥ परीस देऊनि घेतला खडा ॥ पंडित देऊनि आणिला वेडा ॥ चिंतामणि देऊनि रोकडा ॥ पलांडू घेतला वळेंचि ॥४॥ अमृत देऊनि घेतली कांजी ॥ कल्पवृक्ष देऊनि घेतली भाजी ॥ कामधेनु देऊनि सहजी ॥ अजा घेतली पालटें ॥५॥ निजसुख देऊनि घेतलें दुःख ॥ कस्तूरी देऊनि घेतली राख ॥ सोनें देऊनि सुरेख ॥ शेण जैसें घेतलें ॥६॥ हंस देऊनि घेतला काग ॥ विप्र देऊनि घेतला मांग ॥ मुक्त देऊनि सुरंग ॥ गुंज जैसी घेतली ॥७॥ देवोनियां रायकेळें ॥ घेतलीं अर्कीचीं फळें ॥ ज्ञान देऊनि घेतलें ॥ अज्ञानत्व जैसें पैं ॥८॥ तैसें वसुदेवें केलें ॥ कृष्ण ठेवूनि मायेसी आणिलें ॥ तंव ते कन्या कोल्हाळें ॥ रडतां कळलें रक्षकां ॥९॥ चहूंकडून सेवक धांवत ॥ राया देवकी जाहली प्रसूत ॥ येरु उठिला त्वरित ॥ पिशाचवत धांवतसे ॥२१०॥

बिडालक धांवे मूषकावरी ॥ तैसा आला बंदिशाळेभीतरी ॥ कोठें गे आठवा अरी ॥ म्हणोनियां धीट बोलत ॥११॥ तों देवकी म्हणे बंधु ॥ करुं नको येवढा वधु ॥ देवकी रडे करी खेदु ॥ काकुळती येतसे ॥१२॥ देवकी वोसंगा घेऊनि बैसली ॥ कंस ओढीत तये वेळीं ॥ पुत्र कीं कन्या नाहीं ओळखिली ॥ रात्रिभागीं तेधवां ॥१३॥ रागें भोवंडी दुराचारी ॥ आपटावी जंव शिळेवरी ॥ तंव ते महाशक्ति झडकरी ॥ गेली अंबरी निसटूनियां ॥१४॥ सहस्त्र कडकडती चपला ॥ तैसा प्रलय तेव्हां वर्तला ॥ कंस भयभीत जाहला ॥ म्हणे वैरी गेला हातींचा ॥१५॥ कंस जंव वरतें पाहे ॥ तंव ते महाशक्ति तळपत आहे ॥ तेज अंबरीं न समाये ॥ बोले काय कंसासी ॥१६॥ अरे मूढा दुराचारा ॥ महामलिना खळा निष्ठुरा ॥ तुझा वैरी पामरा ॥ पृथ्वीवरी वाढतसे ॥१७॥ ऐकतांच ऐसें वचन ॥ धगधगलें कंसाचें मन ॥ शक्ति गेली अदृश्य होऊन ॥ कंस आला मंदिरासी ॥१८॥

श्रोतीं व्हावें सादर ॥ पुढें कथा मनोहर ॥ गोकुळा गेला जगदुध्दार ॥ परिसा चरित्र तयाचें ॥१९॥ श्रीकृष्णकथा मुक्तमाळा ॥ सभाग्य श्रोते हो घाला गळां ॥ ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा ॥ धन्य गोकुळा करील तो ॥२२०॥ तुमच्या हृदयगोकुळीं ॥ शांतियशोदेजवळी ॥ शेजे पहुडला वनमाळी ॥ पुराणपुरुष तो पहा ॥२१॥ ब्रह्मानंद म्हणे श्रीधर ॥ धन्य तें गोकुळ पवित्र ॥ जेथें अवतरला यादवेंद्र ॥ त्रिभुवनसुंदर जगदात्मा ॥२२॥ या अध्यायाचें निरुपण ॥ कंस येऊनि आपण ॥ माया आपटावी जों धरुन ॥ तंव ते हातींची निसटली ॥२३॥

इति श्रीहरिविजयग्रंठ ॥ संमत हरिवंशभागवत ॥ विचक्षण परिसोत संत ॥ तृतीयध्याय गोड हा ॥२२४॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

॥श्रीक्षीराब्धिजारमणार्पणमस्तु ॥
॥अध्याय॥ ३॥ओंव्या॥२२४॥

भगवान श्रीकृष्ण जन्म असा साजरा करावा
श्रीकृष्ण जन्माचे अभंग

अवतार गोकुळी हो। जन
भ. श्रीकृष्ण आरती

टीप: जन्म झाल्यावर खालील आरती जरूर म्हणावी.

अवतार गोकुळी हो। जन तारावयासी।
लावण्यरुपडे हो। तेज:पुंजाळ राशी।
उगवले कोटिबिंब। रवि लोपला शशी।
उत्साह सुरवरां। महाथोर मानसी।।1।।

जय देवा कृष्णनाथा। जय रखुमाई कांता।
आरती ओवाळीन। तुम्हा देवकीसुता ।।धृ।।

कौतुक पहावया। माव ब्रह्मयाने केली।
वत्सेही चोरूनिया। सत्यलोकासी नेलीं।
गोपाळ गाईवत्सें। दोन्ही ठाई रक्षिली।
सुखाचा प्रेमसिंधु। अनाथांची माऊली।।2।।

चोरितां गोधनें हो। इन्द्र कोपलाभारी।
मेघ कडाडिला। शिला वर्षलल्या धारी।
रक्षिले गोकुळ हो। नखीं धरिला गिरी।
निर्भय लोकपाळ। अवतरले हरी।।3।।

वसुदेव देवकीचे। बंद फोडिली शाळ।
होऊनिया विश्वजनिता। तया पोटिंचा बाळ।
दैत्य हे त्रासियेले। समुळ कंसासी काळ।
राज्य हें उग्रसेना। केला मथुरापाळ।।4।।

तारिले भक्तजन। दैत्य सर्व निर्दाळूनि।
पांडवा साहाकारी। अडलिया निर्वाणी।
गुण मी काय वर्णु। मति केवढी वाणी।
विनवितो दास तुका। ठाव मागे चरणी।।5।।

****॥ विठ्ठल-विठ्ठल ॥*****

भगवान श्रीकृष्ण संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *