स्यमंतक मणी चोरण्याचा आळ श्रीकृष्णावर का ?

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

स्यमंतक मण्याची कथा.

द्वारकेत सत्राजित नावाचा धर्मशील यादव रहात होता. त्याने प्रखर सूर्योपासना करून सूर्याला प्रसन्न करून घेतले. सूर्याने सत्राजिताला स्यमंतक नावाचा अत्यंत तेजस्वी मणी दिला. या मण्यापासून दररोज सुवर्ण प्राप्त होत असे. त्याच्या बळावर सत्राजित बराच दानधर्म करून दानशूर म्हणून प्रसिद्ध पावला.

कृष्णाच्या कानावर त्याची कीर्ती व स्यमंतक मण्याची गोष्ट गेल्यावर श्रीकृष्णाने सत्राजिताला तो मणी राजा उग्रसेनाला देण्यास सांगितले. राजाकडे तो मणी सांभाळण्याची ताकद असून, तोच त्यापासून मिळालेल्या संपत्तीचा योग्य तो विनियोग करील असे कृष्णाचे म्हणणे होते; पण सत्राजिताने ते ऐकले नाही.

एकदा सत्राजिताचा भाऊ प्रसेन गळ्यात स्यमंतक मणी बांधून शिकारीला गेला असता एका सिंहाने त्याला ठार मारले व तो मणी घेऊन जाऊ लागला. वाटेत त्याला जांबवंत हा श्रीरामाचा भक्त भेटला. त्याने तो मणी सिंहाकडून काढून घेतला व आपली मुलगी जांबवंती हिच्या पाळण्याला बांधून ठेवला. इकडे द्वारकेत प्रसेन आला नाही म्हणून सत्राजिताने त्याचा शोध घेतला असता अरण्यात त्याचे व त्याच्या घोड्याचे प्रेत मिळाले; पण तो मणी तिथे नव्हता. श्रीकृष्णानेच तो मणी घेतला असणार असे सत्राजित म्हणू लागला.

प्रसेनाचा वध व मण्याची चोरी श्रीकृष्णानेच केली असे आपल्यावरील आरोप ऐकून कृष्णाने हा लोकापवाद दूर करण्याचे ठरवले. त्याने जंगलात बारकाईने पाहिले असता, त्याला मेलेला सिंह व अस्वलाची पावले दिसली. माग काढत श्रीकृष्ण जांबवंताच्या विवरात पोचला असता तेथे पाळण्यावर लावलेला मणी दिसला. तो हळूच मणी घेत असता जांबवंत त्याच्यावर चालून आला. कृष्णाचा पराक्रम पाहून हा श्रीरामचंद्रच असावा असे जांबवंताला वाटले. श्रीकृष्ण हे श्री रामाचेच अवतार आहेत, ही ओळख पटताच जांबवंत श्रीकृष्णाला शरण गेला व जांबवंतीचा तू स्वीकार कर, असे विनवू लागला.

श्रीकृष्णाने आनंदाने जांबवंतीशी गांधर्व विवाह केला. जांबवंताने स्यमंतक मणी लग्नात आंदण म्हणून दिला. श्रीकृष्ण जांबवंती व मण्यासह द्वारकेस गेला. तेथे आल्यावर श्रीकृष्णाने सत्राजितास बोलावून घेतले व उग्रसेनाच्या सभेत सर्वांसमक्ष स्यमंतक मणी त्याला देऊन सर्व हकिगत सांगितली. झालेल्या चुकीबद्दल सत्राजिताने श्रीकृष्णाची क्षमा मागितली.

स्यमंतक मणी कृष्णाकडून मिळाल्यानंतर सत्राजिताला कृष्णाबद्दल पूज्यभावना निर्माण झाली. त्याने आपली सुंदर मुलगी सत्यभामा हिचे लग्न उद्धवाच्या मध्यस्थीने श्रीकृष्णाबरोबर लावून दिले व स्यमंतक मणीही त्याला अर्पण केला; पण एकदा दिलेली वस्तू परत घेणे, हा धर्म नव्हे म्हणून कृष्णाने तो नाकारला.

सत्राजिताने पूर्वी सत्यभामेचा विवाह कृतवर्मा नावाच्या मनुष्याला देण्याचे ठरविले होते; पण आता त्याने कृष्णाशी तिचे लग्न लावून दिल्यामुळे कृतवर्मा सत्राजिताचा नाश करण्याची संधी शोधू लागला. त्यासाठी तो अक्रुराकडे गेला. त्या दोघांनी शतधन्वा नावाच्या एका माणसाला आपल्या कटात सामील करून घेतले. तो अत्यंत शूर होता. त्याने सत्राजिताला तो झोपेत असता ठार मारले, तो मणी घेतला व अक्रुराजवळ दिला. मणी मिळताच अक्रूर व कृतवर्मा काशीला निघून गेले.

सत्राजिताच्या मृत्यूमुळे दुःखी झालेली सत्यभामा शोक करू लागली. त्या वेळी श्रीकृष्ण पांडव लाक्षागृहात जळाल्याचे वृत्त आल्यामुळे हस्तिनापुराला गेला होता. तो परत आल्यावर त्याने या गोष्टीचा छडा लावण्याचे ठरवले. ते ऐकल्यावर शतधन्वा भिऊन पळून द्वारकेच्या बाहेर गेला. ही बातमी कृष्णाला समजताच त्याने शतधन्वाचा पाठलाग करून त्याला ठार मारले; पण त्याला तो मणी मिळाला नाही. तो बलरामासह द्वारकेला परतू लागला. तेव्हा बलरामाने स्यमंतक मणी कसा दिसतो, ते पाहण्यासाठी मागितला; पण आपण शतधन्वाला निष्कारणच मारले, मणी त्याच्याजवळ नव्हताच, हे कृष्णाचे म्हणणे बलरामाला पटले नाही. त्याला कृष्णाचा राग येऊन तो मिथिलेस निघून गेला.

द्वारकेला पोचल्यावर मणी मिळाला नाही, हे कृष्णाचे म्हणणे सत्यभामेलाही पटले नाही व ती कृष्णावर नाराज झाली. आता मण्याचा पुन्हा शोध घेतला पाहिजे, असे कृष्णाला वाटू लागले. इकडे बलराम हिंडतहिंडत काशीला पोचला, तेथे त्याला अक्रूर व कृतवर्मा यांच्या अफाट दानधर्माविषयी कळले. तो त्यांना भेटला असता, स्यमंतक मण्यामुळे ते दोघे हे सर्व करीत आहेत हे कळले. श्रीकृष्णाला त्याने हे कळवताच कृष्णाच्या निरोपावरून बलराम, अक्रूर व कृतवर्मा हे द्वारकेस परत आले. तेथे अक्रुराने स्यमंतक मण्याची हकिगत सांगितली व तो मणी कृष्णापुढे ठेवला. बलराम व सत्यभामा दोघेही आपण श्रीकृष्णावर उगाचच आळ घेतला, असे वाटून ओशाळले व त्यांनी कृष्णाची क्षमा मागितली. मग कृष्णाने तो मणी अक्रुराला दिला व त्यापासून मिळणार्‍या सुवर्णाचा योग्य तो विनियोग कर, असे सांगितले.

संकलन- अरुण भाऊ पगार.

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

भ. श्रीकृष्ण संपूर्ण चरित्र

सर्व देवी देवतांचे व संतांचे चरित्र

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *