सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १६१ ते १८०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अशेषप्राणिबुद्धीनां वासनास्तत्र संस्थिताः ।
ताभिः क्रोडीकृतं सर्वं तेन सर्वज्ञ ईरितः ॥ १६१ ॥
अखिल प्राण्यांच्या बुद्धिवासना त्याच्या ठायीं एकत्र झालेल्या आहेत, आणि त्या सर्व वासनांला हें सर्व जग विषय आहे म्हणून त्याला सर्वज्ञ म्हटलें. ॥ १६१ ॥

वासनानां परोक्षत्वात्सर्वज्ञत्वं न हीक्ष्यते ।
सर्वबुद्धिषु तद्दृष्ट्वा वासनास्वनुमीयताम् ॥ १६२ ॥
वासना परोक्ष आहेत म्हणून सर्वज्ञत्व अनुभवास येत नाहीं खरें; तथापि, तेंच सर्वांच्या बुद्धींत असल्यामुळें वासनांतही त्याचें अनुमान होतें. ॥ १६२ ॥

विज्ञानमयमुख्येषु कोषेष्वन्यत्र चैव हि ।
अन्तस्तिष्ठन्यमयति तेनान्तर्यामितां व्रजेत् ॥ १६३ ॥
विज्ञानमयादिक कोशांमध्ये आणि पूथ्व्यादिक जड पदार्थांमध्ये आंत राहून नियमन करतो म्हणून तो अंतर्यामी. ॥ १६३ ॥

बुद्धौ तिष्ठन्नान्तरोऽस्याधियानीक्ष्यश्च धीवपुः ।
धियमन्तर्यमयतीत्येवं वेदेन घोषितम् ॥ १६४ ॥
बुद्धीच्या ठायीं राहून बुद्धीला अदृश्य, बुद्धि हेंच त्याचें शरीर, असें असून तो बुद्धीचें नियमन करतो असा श्रुतीचा डांगोरा आहे.॥ १६४ ॥

तन्तुः पटे स्थितो यद्वदुपादानतया तथा ।
सर्वोपादानरूपत्वात्सर्वत्रायमवस्थितः ॥ १६५ ॥
ज्याप्रमाणें पटामध्यें तंतु उपादानरूपानें असतो त्याप्रमाणें ईश्वरही सर्व सृष्टीचे उपादान असल्यामुळें तो सर्वत्र व्यापक आहे. ॥ १६५ ॥

पटादप्यान्तरस्तन्तुस्तन्तोरप्यंशुरान्तरः ।
आन्तरत्वस्य विश्रान्तिर्यत्रासावनुमीयताम् ॥ १६६ ॥
पटाच्या आंत तंतु, तंतुच्या आत अंशु, या रीतीनें जेथे आंतपणाची सीमा संपून बुद्धि विश्रांति घेते तेथें ईश्वराचे अनुमान करावयाचे. ॥ १६६ ॥

द्वित्र्यान्तरत्वकक्षाणां दर्शनेऽप्ययमान्तरः ।
न वीक्ष्यते ततो युक्तिश्रुतिभ्यामेव निर्णयः ॥ १६७ ॥
एकीच्या आंत दुसरी, दुसरीच्या आंत तिसरी, याप्रमाणे कक्षा किती जरी दृष्टीस पडल्या, तरी अंतर्यामी परमेश्वर दिसत नाहीं; म्हणून त्याचा निर्णय युक्ति आणि श्रुति या दोहोंच्या साहाय्यानेंच केला पाहिजे. ॥ १६७ ॥

पटरूपेण संस्थानात्पटस्तन्तोर्वपुर्यथा ।
सर्वरूपेण संस्थानात्सर्वमस्य वपुस्तथा ॥ १६८ ॥
तंतु पटरूपाने असतो म्हणून पट हे तंतूचें बनले असें एक शरीरच आहे, त्याप्रमाणें सर्वरूपानें ईश्वर आहे म्हणून सर्व जगच याचे शरीर आहे. ॥ १६८ ॥

तन्तोः संकोचविस्तारचलनादौ पटस्तथा ।
अवश्यमेव भवति न स्वातन्त्र्यं पटे मनाक् ॥ १६९ ॥
तंतूचा संकोच, विस्तार आणि चलन हे जसजसे होतील तसतसा पटही संकोचादिक दशा पावतो. पटाच्याठायीं स्वातंत्र्य मुळींच नाहीं. ॥ १६९ ॥

तथान्तर्याम्ययं यत्र यया वासनया यथा ।
विक्रीयते तथावश्यं भवत्येव न संशयः ॥ १७० ॥
त्याप्रमाणें हा अंतर्यामी जेथे जेथे ज्या वासनेने जसा जसा विकार पावतो, त्या त्याप्रमाणें सर्व गोष्टी घडतात यांत संशय नाहीं. ॥ १७०॥

ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन !तिष्ठति ।
भ्रामयन्सर्वभूतानि यन्त्रारूढानि मायया ॥ १७१ ॥
भगवंतानी अर्जुनास असें सांगितलें आहे कीं, सर्व भूतांच्या हृदयांमध्ये ईश्वर वास करतो. आणि जणु यंत्रावरच बसविलेली भूते आपल्या मायारूप किल्लीने फिरवीत आहे. ॥ १७१ ॥

सर्वभूतानि विज्ञानमयास्ते हृदये स्थिताः ।
तदुपादानभूतेशस्तत्र विक्रियते खलु ॥ १७२ ॥
येथें “सर्वभूतांना” याचा अर्थ हृदयांत असलेले विज्ञानमय जे कोश तेच येथें भूतें समजावी त्यांचें उपादान कारण जो ईश तोच विकारातें पावतो. ॥ १७२ ॥

देहादिपञ्जरं यन्त्रं तदारोहोऽभिमानिता ।
विहितप्रतिसिद्धेषु प्रवृत्तिर्भ्रमणं भवेत् ॥ १७३ ॥
येथें देह, मन, बुद्धि आदिक जे पंजर तेंच यंत्र होय. त्याजवरील जो अभिमान हाच आरोह ( चढणे) आणि विधिनिषेधात्मक कर्माविषयी जी प्रवृत्ति तेंच भ्रमण होय. ॥ १७३ ॥

विज्ञानमयरूपेण तत्प्रवृत्तिस्वरूपतः ।
स्वशक्त्येशो विक्रियते मायया भ्रामणं हि तत् ॥ १७४ ॥
आतां “भ्रामयन्” ही प्रयोजक क्रिया व माया या दोन शब्दांचा अर्थ सांगतो त्या कर्माची प्रवृत्ति विज्ञानमयरूपानें असल्यामुळें ईश आपल्या शक्तीच्या योगाने जो विकार करतो त्यालाच मायेचे योगाने फिरविणे असें म्हणतात. ॥ १७४ ॥

अन्तर्यमयतीत्युक्त्या यमेवार्थः श्रुतौ श्रुतः ।
पृथिव्यादिषु सर्वत्र न्यायोऽयं योज्यतां धिया ॥ १७५ ॥
श्रुतींत “अंतर्यमयति” असें जें वचन आहे त्याचाही अर्थ हाच आहे. हाच न्यायबुद्धीनें पृथिव्यादिकांना लावावा. ॥ १७५ ॥

जानामि धर्मं न च मे प्रवृत्ति-
र्जानाम्यधर्मं न च मे निवृत्तिः ।
केनापि देवेन हृदि स्थितेन
यथा नियुक्तोऽस्मि तथा करोमि ॥ १७६ ॥
मी धर्म जाणतो म्हणून माझी धर्माकडे प्रवृत्ति आहे असें नाही. व अधर्म जाणतो म्हणून अधर्मापासून माझी निवृत्ति आहे असेही नाही. तर हृदयांत बसलेला कोणी एक देव मजकडून जसे करवितो तसें मी करीत आहें, असें पुराणांत वचन आहे. ॥ १७६ ॥

नार्थः पुरुषकारेणेत्येवं मा शंक्यतां यतः ।
ईशः पुरुषकारस्य रूपेणापि विवर्तते ॥ १७७ ॥
तर मग मनुष्य-प्रयत्‍न व्यर्थ अशी शंका कोणी घेईल तर त्याचें समाधान इतकें कीं, ईश्वर हा प्रयत्‍नरूपानेंच असतो. ॥ १७७ ॥

ईदृग्बोधेनेश्वरस्य प्रवृत्तिर्मैव वार्यताम् ।
तथापीशस्य बोधेन स्वात्मासङ्गत्वधीजनिः ॥ १७८ ॥
याप्रमाणें मानल्यास “अंतर्यमयति” या वाक्याने जी प्रेरणा सांगितली ती व्यर्थ असें मात्र म्हणू नये. कारण, तशा प्रकारचे ईश्वराचे ज्ञानही आम्हांस असंगत्वज्ञान होण्यास पुरे आहे. ॥ १७८ ॥

तावता मुक्तिरित्याहुः श्रुतयः स्मृतयस्तथा ।
श्रुतिस्मृती ममैवाज्ञे इत्यपीश्वरभाषितम् ॥ १७९ ॥
अशा आत्मज्ञानानें मुक्ति मिळते असें श्रुतिस्मृतीत सांगितलें आहे. श्रुति व स्मृति या माझ्याच आज्ञा असें भगवतांनी प्रत्यक्ष म्हटले आहे. म्हणून तें अप्रमाण म्हणतां येत नाही. ॥ १७९ ॥

आज्ञाया भीतिहेतुत्वं भीषास्मादिति हि श्रुतम् ।
सर्वेश्वरत्वमेतत्स्यादन्तर्यामित्वतः पृथक् ॥ १८० ॥
भीतीला हेतु आज्ञा आहे, एतद्विषयी “भीषास्मात्” ही श्रुति प्रमाण आहे. परमेश्वर अंतर्यामी असल्यामुळें तो सर्व जगाहनू निराळा आहे. ॥ १८० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *