सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १४१ ते १६०

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
सार्थ पंचदशी सूची

न निरूपयितुं शक्या विस्पष्टं भासते च या ।
सा मायेतीन्द्रजालादौ लोकाः संप्रतिपेदिरे ॥ १४१ ॥
स्पष्ट तर भासते आणि तेच कारण तर सांगतां येत नाहीं. तीच माया असें लोक म्हणतात, ती माया गारुडादिकांत सर्वांच्या दृष्टीस पडते. ॥ १४१ ॥

स्पष्टं भाति जगच्चेदमशक्यं तन्निरूपणम् ।
मायामयं जगत्तस्मादीक्षस्वापक्षपाततः ॥ १४२ ॥
हे लक्षण जगालाही कसें लागू पडते तें पहा. कारण तेही स्पष्ट भासून त्याची उपपत्ति कांहीं समजत नाहीं. याकरितां जग मायामय आहे ही गोष्ट निष्पक्षपात दृष्टीने मनांत आणा. ॥ १४२ ॥

निरूपयितुमारब्धे निखिलैरपि पण्डितैः ।
अज्ञानं पुरतस्तेषां भाति कक्षासु कासुचित् ॥ १४३ ॥
आजपर्यंत पंडितानी या जगाचे निरूपण करण्यास पुष्कळ प्रयत्‍न केले. परंतु त्यांचे पुढें अज्ञानाचा परिघ शेवटीं भासतोच. ॥ १४३ ॥

देहेन्द्रियादयो भावा वीर्येणोत्पादिताः कथम् ।
कथं वा तत्र चैतन्यमित्युक्ते ते किमुत्तरम् ॥ १४४ ॥
वरील म्हणणे ज्यांना खरें वाटत नसेल त्यांनी आम्ही जे प्रश्न करतो त्यांची उत्तरे द्यावीत – वीर्यापासून देहेंद्रियादिक कशी उत्पन्न होतात ? व पुढें त्यांत चैतन्य प्रवेश कसा होतो ? ॥ १४४ ॥

वीर्यस्यैष स्वभावश्चेत्कथं तद्विदितं त्वया ।
अन्वयव्यतिरेकौ यौ भग्नौ तौ व्यर्थवीर्यतः ॥ १४५ ॥
वीर्याचा हा स्वभावच असें जर म्हणाल तर तें तुम्हांला कसें समजले ? अन्वयव्यतिरेकाचे योगानें म्हणजे जेथे वीर्य तेथें देहादिक आहेत; आणि जेथे वीर्य नाही तेथे तेही नाहींत, या नियमांवरून आम्हांस समजलें, असें कदाचित् उत्तर येईल तर तसा नियम अनुभवास येत नाहीं. कारण, वीर्य हें पुष्कळदां निष्फळ होते. ॥ १४५ ॥

न जानामि किमप्येतदित्यन्ते शरणं तव ।
अत एव महन्तोऽस्याः प्रवदन्तीन्द्रजालताम् ॥ १४६ ॥
यावर मला कांहीं ठाऊक नाहीं हेंच शेवटचे उत्तर येणार. म्हणूनच मोठमोठ्यांनी हें जग गारुड असें ठरविलें. ॥ १४६ ॥

एतस्मान्किमिवेन्द्रजालमपरं यद्गर्भवासस्थितम्
रेतश्चेतति हस्तमस्तकपदं प्रोद्‌भूतनानाङ्कुरम् ।
पर्यायेण शिशुत्वयौवनजरारोगैरनेकैर्वृतम्
पश्यत्यत्ति शृणोति जिघ्रति तथा गच्छत्यथागच्छति ॥ १४७ ॥
काय चमत्कार सांगावा ! गर्भीत असणाऱ्या रेताला हातपाय, डोके असे नानांकुर फुटून शेवटी तें चेतना पावते. नंतर क्रमाने बाल, यौवन आणि वृद्ध या दशा मनुष्य अनुभवतो. आणि पाहणे, ऐकणें, वास घेणे इत्यादिक क्रिया करून आला तसा जातो यापेक्षा दुसरें गा- रुड तें कोणचें ? ॥ १४७ ॥

देहवद्वटधानादौ सुविचार्यावलोक्यताम् ।
क्व धाना कुत्र वा वृक्षस्तस्मान्मायेति निश्चिनु ॥ १४८ ॥
देहाप्रमाणेंच वटबीजादिकांचा विचार करून पहावा. कोणीकडे तें सूक्ष्म बीज, आणि कोणीकडे तो अफाट वृक्ष ! तस्मात् ही माया आहे अशा निश्चयांतच समाधान आहे. ॥ १४८ ॥

निरुक्तावभिमानं ये दधते तार्किकादयः ।
हर्षमिश्रादिभिस्ते तु खण्डनादौ सुशिक्षिताः ॥ १४९ ॥
आम्हांला जरी याचे उत्तर देता आलें नाहीं, तरी तार्किकादिक जे आहेत ते त्याचें उत्तर देण्यास समर्थ आहेत, असें जर म्हणाल, तर हर्षमिश्रादिक जे आहेत ते त्यांनाही वादांत हटविणारे आहेत. ॥ १४९ ॥

अचिन्त्याः खलु ये भावा न तांस्तर्केषु योजयेत् ।
अचिन्त्यरचनारूपं मनसापि जगत्खलु ॥ १५० ॥
ह्याकरिता खरोखर जें तर्कापलीकडे आहे तेथें तर्काची योजना कधींही करूं नये. हें जग असें आहे कीं, त्याजविषयीं बुद्धीचा तर्क कांहींच चालत नाहीं. मग उगीच बडबड करण्यांत काय अर्थ आहे ? ॥ १५० ॥

अचिन्त्यरचनाशक्तिबीजं मायेति निश्चिनु ।
मायाबीजं तदेवैकं सुषुप्तावनुभूयते ॥ १५१ ॥
ही जगाची गोष्ट झाली. परंतु मायेचा संबंध येथें काय आला ? असें जर म्हणाल तर अचिंत्य रचना शक्तिरूप जें जगाचे कारण तीच माया, हें मायाबीज सुषुप्तीमध्ये प्रत्ययास येतें. ॥ १५१ ॥

जाग्रत्स्वप्नजगत्तत्र लीनं बीज इव द्रुमः ।
तस्मादशेषजगतो वासनास्तत्र संस्थिताः ॥ १५२ ॥
त्या कारणांत जाग्रत्स्वप्नरूप जें जग, तें बीजांत जसा वृक्ष लीन होतो. त्याप्रमाणें लीन होतें. याकरितां सर्व जगाच्या वासना त्या कारणांत आहेत असें म्हटलें पाहिजे. ॥ १५२ ॥

या बुद्धिवासनास्तासु चैतन्यं प्रतिबिम्बति ।
मेघाकाशवदस्पष्टश्चिदाभासोऽनुमीयताम् ॥ १५३ ॥
त्या बुद्धीच्या वासनांमध्यें चैतन्याचे प्रतिबिंब पडते. येथें अभ्राकाशाप्रमाणें अस्पष्ट चिदाभासाचे अनुमान करावे. ॥ १५३ ॥

साभासमेव तद्बीजं धीरूपेण प्ररोहति ।
अतो बुद्धौ चिदाभासो विस्पष्टं प्रतिभासते ॥ १५४ ॥
ते मायारूप बीज बुद्धीच्या रूपाने प्रतिबिंब घेऊनच उदयास येतें. याकरिता बुद्धीच्याठायी चिदाभास स्पष्ट दिसतो. ॥ १५४ ॥

मायाभासेन जीवेशौ करोतीति श्रुतौ श्रुतम् ।
मेघाकाशजलाकाशाविव तौ सुव्यवस्थितौ ॥ १५५ ॥
म्हणूनच श्रुतीत असें सांगितलें आहे कीं, माया ही प्रतिबिंबाच्या योगाने जीव आणि ईश यांस करते. जलाकाश व मेघाकाशाप्रमाणें त्यांचा भेद समजावा. ॥ १५५ ॥

मेघवद्वर्तते माया मेघस्थिततुषारवत्.
धीवासनाश्चिदाभासस्तुषारस्थखवत्स्थितः ॥ १५६ ॥
येथें मेघांप्रमाणें माया. तुषारांप्रमाणें धीवासना, आणि तुषारांत असलेल्या आकाशाप्रमाणें चिदाभास समजावा. ॥ १५६ ॥

धीवास्नाश्चिदाभासः श्रुतो मायी महेश्वरः ।
अन्तर्यामी च सर्वज्ञो जगद्योनिः स एव हि ॥ १५७ ॥
माया ज्याच्या आधीन आहे त्यालाच श्रुतीमध्ये मायी, अंतर्यामी, सर्वज्ञ आणि जगद्योनि, असें नांव दिलें आहे. ॥ १५७ ॥

सौषुप्तमानन्दमयं प्रक्रम्यैवं श्रुतिर्जगौ ।
एष सर्वेश्वर इति सोऽयं वेदोक्त ईश्वरः ॥ १५८ ॥
ह्याप्रमाणें सुषुतीसंबंधी जो आनंदमय कोश तो ईश्वर असें श्रुतीनें सांगितलें. वेदोक्त ईश्वर हाच. ॥ १५८ ॥

सर्वज्ञत्वादिके तस्य नैव विप्रतिपद्यताम् ।
श्रौतार्थस्यावितर्क्यत्वान्मायायां सर्वसम्भवात् ॥ १५९ ॥
हा ईश्वर मानला तर त्याचे ठायीं सर्वज्ञत्वादि गुण कसे आले अशी शंका नको. कारण श्रुतीचा अर्थ तर्कास योग्य नाहीं. आणि मायेचेठायी सर्व संभव आहे. ॥ १५९ ॥

अयं यत्सृजते विश्वं तदन्यथयितुं पुमान् ।
न कोऽपि शक्तस्तेनायं सर्वेश्वर इति ईरितः ॥ १६० ॥
ईश्वर जी सृष्टि उत्पन्न करतो ती अन्यथा करण्यास कोणी समर्थ नाहीं. म्हणून याला सर्वेश्वर असें म्हणतात. ॥ १६० ॥

सार्थ पंचदशी सूची
, ,

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading