सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

या प्रकरणास ”चित्रदीप” असें नांव ठेवण्यांचे कारण हेंच की येथें आत्म्याच्या चार अवस्था चित्रपटाच्या दृष्टांताने चांगल्या स्पष्ट करून दाखविल्या आहेत. चित्रपट म्हणजे धुवट कापडावर खळ लावून त्याजवरून मनुष्य, पशु पक्षी, पर्वत, वृक्ष व नद्या वगैरे सृष्टीचे चित्र – काढून तयार केलेला एक नकाशा होय.

यथा चित्रपटे दृष्टमवस्थानां चतुष्टयम् ।
परमात्मनि विज्ञेयं तथावस्थाचतुष्टयम् ॥ १ ॥
ज्याप्रमाणें या चित्रपटामध्यें चार अवस्था दिसून येतात, त्याचप्रमाणें परमात्म्याचे ठायीही अवस्थाचतुष्टय समजावे. ॥ १ ॥

यथा धौतो घट्टितश्च लाञ्छितो रञ्जितः पटः ।
चिदन्तर्यामि सूत्राणि विराट् चात्मा तथेर्यते ॥ २ ॥
पटामध्यें जशा धौत, घट्टित, लांछित आणि रंजित ह्या चार अवस्था आहेत, तशाच आत्म्याचे ठायीही चित्, अंतर्यामी, सूत्रात्मा व विराट्अशा चार अवस्था आहेत. ॥ २ ॥

स्वतः शुभ्रोऽत्र धौतः स्याद्घट्टितोऽन्नविलेपनात् ।
मस्याकारैर्लाञ्छितः स्याद्रञ्जितो वर्णपूरणात् ॥ ३ ॥
धौत म्हणजे स्वतःसिद्ध मूळचा शुभ्रपट, घट्टित म्हणजे खळ दिलेला, लांछित म्हणजे काजळाच्या किंवा कोळशाच्या वगैरे रेघांनी आखलेला, आणि रंजित म्हणजे यथायोग्य रंगविलेला, हा चित्रपटाचा प्रकार झाला. ॥ ३ ॥

स्वतश्चिदन्तर्यामी तु मायावी सूक्ष्मसृष्टितः ।
सूत्रात्मा स्थूलसृष्ट्यैष विराडित्युच्यते परः ॥ ४ ॥
आणि चित्‌ म्हणजे स्वतः चिद्‌रूपी, अंतर्यामी म्हणजे मायावी, सूत्रात्मा म्हणजे सूक्ष्मशरीरी, आणि विराट् म्हणजे स्थूलशरीरी, असा परमात्म्याचा प्रकार समजावा. ॥ ४ ॥

ब्रह्माद्याःस्तम्बपर्यन्ताः प्राणिनोऽत्र जडा अपि ।
उत्तमाधमभावेन वर्तन्ते पटचित्रवत् ॥ ५ ॥
चित्रपटावरील चित्राप्रमाणें या आत्म्याचे ठायींही ब्रह्मदेवापासूनू तो अतिसूक्ष्म तृणापर्यंत सर्व स्थावरजंगमात्मक सृष्टि उत्तमाधम भावेकरून दृष्टीस पडते. ॥ ५ ॥

चित्रार्पितमनुष्याणां वस्त्राभासाः पृथक्पृथक् ।
चित्राधारेण वस्त्रेण सदृशा इव कल्पिताः ॥ ६ ॥
चित्रांतील मनुष्यांना जसे वस्त्राभास निरनिराळे असून चित्रास आधारभूत जें वस्त्र तेंच तें असे आम्ही कल्पितो, ॥ ६ ॥

पृथक्पृथक्चिदाभासाश्चैतन्याध्यस्तदेहिनाम् ।
कल्पान्ते जीवनामानो बहुधा संसरन्त्यमी ॥ ७ ॥
त्याप्रमाणें चिदाभासही निरनिराळे असून आधारभूत चैतन्याशी त्यांचें ऐक्य करून त्यांनी केलेला संसार चैतन्यगतच अशी आम्हास भ्रांति होते. ॥ ७ ॥

वस्त्राभासस्थितान्वर्णान्यद्वदाधारवस्त्रगान् ।
वदन्त्यज्ञास्तथा जीवसंसारं चिद्गतं विदुः ॥ ८ ॥
कल्पित वस्त्रांचे रंग जसे आधारभूत वस्त्रासच लागलेले दृष्टीस पडतात, त्याप्रमाणें अज्ञानी लोक भ्रमाने जिवाचा संसार आत्म्यास लावू पहातात. ॥ ८ ॥

चित्रस्थ पर्वतादीनां वस्त्राभासो न लिख्यते ।
सृष्टिस्थमृत्तिकादीनां चिदाभासास्तथा न हि ॥ ९ ॥
चित्रांतील पर्वतादि जड पदार्थास जशी वस्त्रें नाहींत, त्याप्रमाणें सृष्टीतील काष्ठषाणादिकांसही चिदाभास नाहीं. ॥ ९ ॥

संसारः परमार्थोऽयं संलग्नः स्वात्मवस्तुनि ।
इति भ्रान्तिरविद्या स्याद्विद्ययैषा निवर्तते ॥ १० ॥
वस्तुतः जीवास लागू असलेला संसार आत्म्यास लावू पहाणे, हीच अविद्या. तिची निवृत्ति विद्येवाचून होत नाहीं. ॥ १० ॥

आत्माभासस्य जीवस्य संसारो नात्मवस्तुनः ।
इति बोधो भवेद्विद्या लभ्यतेऽसौ विचारणात् ॥ ११ ॥
हा संसार केवळ जीवांनाच लागू असून आत्म्याला त्याचा मुळींच संबंध नाहीं, असें जे ज्ञान त्यासच विद्या असें म्हणतात. ती विचारापासून प्राप्त होते. ॥ ११ ॥

सदा विचारयेत्तस्माज्जगत्ज्जीवपरात्मनः ।
जीवभावजगद्‌भावबाधे स्वात्मैव शिष्यते ॥ १२ ॥
याजकरितां जग म्हणजे काय, जीव म्हणजे काय, आणि आत्मा कसा आहे, याचा चांगला विचार करावा. ह्मणजे विचाराअंती जीव आणि जग या दोहींचा बाध झाला असतां बाकी अबाधित राहिलेला आत्मा सत्य, हें अर्थातच सिद्ध झालें. ॥ १२ ॥

नाप्रतीतिस्तयोर्बाधः किन्तु मिथ्यात्वनिश्चयः ।
नो चेत्सुषुप्तिमूर्च्छादौ मुच्येता यत्नतो जनः ॥ १३ ॥
वर, जीव आणि जग यांचा बाध करावा असें म्हटले त्यांत बाध शब्दाचा अर्थ त्यांचें मुळीच न दिसणे नव्हे, तर तीं खोटी आहेत असा निश्चय झाला म्हणजे झालें. कारण असें जर न मानले, तर सुषुप्तिमूर्च्छादिकांचेठायी श्रमावांचून मोक्षप्राप्ति होईल. ॥ १३ ॥

परमात्मावशेषोऽपि तत्सत्यत्वविनिश्चयः ।
न जगद्विस्मृतिर्नो चेज्जीवन्मुक्तिर्न सम्भवेत् ॥ १४ ॥
तसेंच आत्म्याचा अवशेष याचा अर्थ, तो सत्य आहे असा निश्चय करणें हा होय. जगाचे विस्मरण होणें असा त्याचा अर्थ केल्यास जीवन्मुक्ति म्हणून जी म्हणतात ती मुळीच संभवणार नाहीं. ॥ १४ ॥

परोक्षा चापरोक्षेति विद्या द्वेधा विचारजा ।
तत्रापरोक्ष विद्याप्तौ विचारोऽयं समाप्यते ॥ १५ ॥
वर सांगितलेली जी विद्या (ज्ञान) ती दोन प्रकारची- परोक्ष आणि अपरोक्ष. अपरोक्ष ज्ञान झाले म्हणजे विचार संपला. ॥ १५ ॥

अस्ति ब्रह्मेति चेद्वेद परोक्षज्ञानमेव तत् ।
अहं ब्रह्मेति चेद्वेद साक्षात्कारः स उच्यते ॥ १६ ॥
“ब्रह्म आहे” इतकेच केवळ गुरुमुखापासून किंवा श्रुतीपासून जें समजणें त्यास परोक्ष विद्या म्हणतात; आणि “ते ब्रह्म मीच आहे” असें जें प्रत्यक्ष अनुभवास येणें त्यास अपरोक्ष विद्या किंवा साक्षात्कार असें म्हणतात. ॥ १६ ॥

तत्साक्षात्कारसिद्ध्यर्थमात्मतत्त्वं विविच्यते ।
येनायं सर्वसंसारात्सद्य एव विमुच्यते ॥ १७ ॥
हा साक्षात्कार झाला असतां जन्ममरणापासून प्राणी तत्काल मुक्त होतो. म्हणून याच्या प्राप्तीकरितां आत्मतत्त्वाचें विवेचन आधी पुढें करतो. ॥ १७ ॥

कूटस्थो ब्रह्मजीवेषावित्येवं चिच्चतुर्विधा ।
घटाकाशमहाकाशौ जलाकाशाभ्रखे यथा ॥ १८ ॥
ज्याप्रमाणें घटाकाश, महाकाश, जलाकाश आणि अभ्राकाश असे आकाशाचे चार प्रकार आहेत, त्याप्रमाणें कूटस्थ, ब्रह्म, जीव आणि ईश असे चैतन्याचे चार प्रकार आहेत. ॥ १८ ॥

घटावच्छिन्नखे नीरं यत्तत्र प्रतिबिम्बितः ।
साभ्रनक्षत्र- आकाशो जलाकाश- उदीर्यते ॥ १९ ॥
ह्यापैकी घटाकाश हें प्रसिद्धच आहे, म्हणून त्याविषयी येथें विशेष सांगणे नलगे. महाकाश म्हणजे ज्यामध्ये सूर्य, चंद्र व नक्षत्रे प्रकाशित होतात अशी, अवाढव्य पोकळी. जलाकाश म्हणजे घटातील पोकळींत पाणी घालून तो आंगणांत ठेवला असतां त्यांत साभ्र नक्षत्र (ढग आणि नक्षत्रे यांसहित) जें आभाळाचे प्रतिबिंब पडते तें. ॥ १९ ॥

महाकाशस्य मध्ये यन्मेघमण्डलमीक्ष्यते ।
प्रतिबिम्बतया तत्र मेघाकाशो जले स्थितः ॥ २० ॥
आणि अभ्राकाश म्हणजे पूर्वोक्त महाकाशामध्यें जें मेघमंडळ दिसते त्यांत जें महाकाशाचें प्रतिबिंब, तें होय. ॥ २० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *