दृष्टांत 10 स्मशान वैराग्य ! एक व्यवाहारिक स्थितप्रज्ञता

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

लेख : मृत्यूचं मार्केट*
लेखक : राजेंद्र वैशंपायन

खरं तर ही घटना दुःखाची. पण कधी कधी काही घटना अनपेक्षितपणे आपल्याला काहीतरी शिकवून जातात त्यातलीच ही एक घटना. माझ्या जवळच्या नात्यातील एका आजींचं नुकतंच देहावसान झालं. जवळच्या नात्यात असल्यामुळे मी संपूर्ण अंत्यविधी पार पडेपर्यंत त्या सर्व प्रसंगात उपस्थित होतो. घरात मृत्यू झाला होता. वातावरण दुःखाचं होतं. पण सर्व अंत्यविधी तर पार पडायला लागणारच होते. परिस्थितीची चौकशी करायची म्हणून मी स्मशानभूमीत गेलो. तिथे कसलीतरी सजावट दिसली म्हणून थोडं आश्चर्य वाटलं. तेवढ्यात एक फ्लेक्स दिसला आणि त्यावरून कळलं की त्या दिवशीच त्या स्मशानभूमीत ‘नैसर्गिक वायुदाहिनी’ असलेल्या नवीन युनिटचं लोकार्पण होणार होतं. त्या फ्लेक्सवरही त्यानिमित्ताने येणाऱ्या सर्व खासदार,  आमदार आणि इतर जनप्रतिनिधी यांची हसऱ्या फोटोसकट मोठी यादी होती. त्या कार्यक्रमाच्या संदर्भात आणि स्मशानभूमीच्या गेटवर लावलेल्या त्यांच्या हसऱ्या आणि उत्साहित फोटोंमुळे आणि त्यावेळी असणाऱ्या माझ्या मानस्थितीमुळे एक विचित्र विषण्ण विरोधाभास तो फ्लेक्स पाहताना जाणवत होता. तो नियोजित कार्यक्रम १० वाजता होणार होता. तिथे अधिक चौकशी केल्यावर तिथल्या एका कर्मचाऱ्याने जे सांगितलं ते मी तसंच्या तसं इथे अवतारणांकित करतो.

” साहेब सध्या इथलं काम चालू आहे. सध्या बॉडी जाळायला दोनच ‘स्लॉट’ अव्हेलेबल आहेत. एकाचं बुकिंग आधीच झालं आहे. तुम्ही बॉडी लवकर घेऊन या नाहीतर तेवढ्यात दुसरी बॉडी आली तर तुम्हाला थांबायला लागेल. आता इथे नवीन गॅस युनिटचं ‘उदघाटन’ आहे. तो कार्यक्रम मग सुरु होणार. कार्यक्रम सुरु झाला की बॉडी आत घ्यायची नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे लवकर या आणि तुमचं काम लवकर उरकून घ्या नाहीतर मग खूप लेट होईल तुम्हालाच”

मी या वर्णनाने सर्द झालो पण माझं कुतूहल जागं झालं. मी विचारलं ‘उदघाटन’ म्हणजे काय करणार?  त्यावर तो म्हणाला,

“आत्ताच २२ बेवारशी बॉडी आल्या आहेत त्यांना नवीन सिस्टमने या गॅसयुनिटमध्ये दहन करून ‘उदघाटन’ करणार. तुम्ही जा लवकर आणि तुमची बॉडी घेऊन या नाहीतर तुमच्याच टाइमबाची खोटी होईल मग लायनीत वाट पाहायला लागेल”

जाता जाता त्याने एकाकडे बोट दाखवून सांगितलं, “यांचं बाहेर दुकान आहे शेवटच्या सामानाचं. त्याच्याकडूनच लगेच तुम्ही सामान पण घेऊन जा.”
त्या दुकानाची पाटी  मला तिथूनच दिसत होती. त्यावर लिहिलं होतं
‘इथे अंत्यविधीचे सर्व सामान, व पुरोहित मिळतील. बिस्लेरीची बाटली मिळेल.’
 ती पाटी पाहून आणि तो स्मशानभूमीतील कर्मचारी ज्या व्यावहारिक स्थितप्रज्ञतेने बोलत होता ते पाहून मला काय बोलावं हेच कळेना. अर्थात त्याचं काहीच चूक नव्हतं.  उलट तो आमच्या भल्याचंच सांगत होता. तसंही त्या वातावरणाची त्याला सवय असल्यामुळे आणि त्यात त्या दिवशी सगळे ‘साहेबलोक’ ‘उदघाटनाला’ येणार असल्यामुळे तो अधिकच लगबगीत होता.

त्याच्या सल्ल्यानुसार आम्हीसुद्धा सर्व अंत्यकार्य लवकर करून घेण्याच्या तयारीला लागलो. लवकरच त्या आजींचा देह स्मशानभूमीत आणला गेला आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरु झाले. मी एका बाजूला उभा राहून इकडे तिकडे पाहत होतो. इतक्यात माझं लक्ष दुसऱ्या एका पाटीवर गेलं. त्यावर लिहिलं होतं ‘इथे कामाशिवाय उगाच गप्पा मारत बसू नये’. मी ती पाटी पाहिली आणि अवाक झालो. ज्या जागी कमीत कमी वेळ घालवावा अशी कुठल्याही जिवंत माणसाची इच्छा असते तिथे कामाशिवाय उगाच गप्पा मारायला कुणी येत असेल आणि ते टाळण्यासाठी ही पाटी लावण्याची गरज पडली असेल हे मला ती पाटी प्रत्यक्ष पाहिली नसती तर कुणी सांगूनही विश्वास बसला नसता.

एवढयात कुणीतरी सांगितलं की आणलेल्या सामानात तूप आणि चंदनाचा भुसा नाही. आता या वेळी ते सामान कुठून आणायचं या चिंतेत मी असताना तोच कर्मचारी आला आणि दुसऱ्या एका माणसाकडे बोट दाखवून म्हणाला, “त्याला भेटा. तो देईल तुम्हाला सगळं.” पाहिलं तर त्या माणसाची त्या स्मशानभूमीच्या एका कोपऱ्यात छोटेखानी टपरी होती आणि त्यात सर्व आवश्यक सामान ठेवलेलं होतं. त्यातूनच तो आमच्याकडे नसलेलं सामान पुरवणार होता. सामानाची किंमत तो योग्य लावतो आहे का नाही हे पाहण्याची ती जागाही नव्हती आणि वेळही,  आणि हे त्यालाही माहीत होतं म्हणून तो सांगेल ती किंमत देऊन ते सामान उपलब्ध करून दिलं.

मग सर्व विधी कुठल्याही अडथळ्याशिवाय पार पडला. पुन्हा तो कर्मचारी आला आणि म्हणाला, ” ते लाकडांची पावती फाडून घ्या चला.. लवकर…”. मग तो सोपस्कार झाला. मग तो म्हणाला , “तीन-चार वाजेपर्यंत येऊन अस्थी आणि सर्टिफिकेट घेऊन जा, तो पर्यंत उदघाटनाचा कार्यक्रम पण झाला असेल”
सर्व विधी पूर्ण झाल्यावर मी त्या कर्मचाऱ्याला त्याच्या सर्व सहकार्याबद्दल धन्यवाद दिले आणि मी तिथून बाहेर पडलो.

साधारणतः स्मशानभूमीतून परतत असताना जीवनाचा फोलपणा लक्षात येतो. आसक्ती, हवेनकोपण, मनुष्याचा अहंकार, या सर्व गोष्टी,  काही थोड्या काळापुरत्या का होईना,   गळून पडतात. आणि म्हणूनच त्याला ‘स्मशानवैराग्य’ असंही म्हणतात. अशा स्मशानवैराग्याचा काहीसा अनुभव मलाही यापूर्वी स्मशानभूमीतून परतत असताना आला आहे. पण यावेळी तिथून परतताना मात्र माझी मनस्थिती खूप विचित्र होती. तो कर्मचारी आणि त्याची व्यावहारिक स्थितप्रज्ञता मनातून जात नव्हती.  त्या स्मशानभूमी लगतचं ते अंत्यविधीच्या सामनाचं दुकान आणि त्यावरची ‘अंत्यविधीची सर्व तयारी, पुरोहित, व बिस्लेरीची बाटली मिळेल” ही पाटी,  स्मशानभूमीच्या आतील ‘कामाशिवाय उगाच गप्पा मारत बसू नये’ ही पाटी, स्मशानभूमीच्या आतली ती छोटेखानी टपरी या सर्व गोष्टी मनातून जात नव्हत्या. वायुदाहिनीच्या युनिटच्या ‘उदघाटनासाठी’ तयार असलेल्या त्या २२ बेवारशी बॉड्या मनातून जात नव्हत्या. एकंदरीत ‘रोज मरे तिथे कोण रडे’ ही तिथल्या कर्मचारी मंडळींची मानसिकता आणि त्यामुळे तेथील सेवा आणि त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या व्यावहारिक सोयी यांची आवश्यकताही मनाला पटत होती. एकंदरीत आपल्या मनात असलेल्या ‘मृत्यू’ या संकल्पनेभोवती फिरत असलेल्या पाप, पुण्य, शुद्ध अशुद्धता, सुतक, दिवस, दुःख, विरह आणि त्याच्याशी निगडित मानवी सहवेदना आणि सहसंवेदना यांची सांगड या व्यावहारिक मानसिकतेशी घालणं मला कठीण जात होतं. मृत्यूबद्दल असलेलं भय, कुतूहल, उत्सुकता, वैराग्य त्या दिवशी या व्यावहारिकतेपुढे कमी झालं आहे असं जाणवत होतं. जे अंतिम सत्य मला माहीत आहे तेच अंतिम सत्य ते कर्मचारीही दररोज पाहत होते. पण त्यामुळे आणि कदाचित म्हणूनच त्यांच्या जगण्यातली उर्मी, व्यवहार, सहजपणा कमी झाला नव्हता असं मला लक्षात आलं. हॉस्पिटल मधले डॉक्टर ज्या त्रयस्थपणे जिवंत पेशंट तपासतात त्याच व्यावसायिक तटस्थतेने आणि इतर कुठल्याही प्रकारच्या सेवा पुरवणाऱ्या व्यवसायिकाप्रमाणे किंवा कर्मचाऱ्यांप्रमाणे त्या स्मशानभूमीतील कर्मचारी मेलेल्या ‘बॉड्या’ हाताळत होते आणि त्यांची दिनचर्या आणि व्यवहार सुरु होते.

घरी आल्यावर शुचिर्भूत झाल्यावर थोडा शांत झाल्यावरसुद्धा माझ्या मनातून ‘मृत्यू’ या मानवीय सत्यघटनेवर आधारित आणि त्यामागील उद्योगाबद्दलचं कुतूहल मनातून गेलं नाही. गुगल महाराजांना या संदर्भात त्याच कुतूहलापोटी प्रश्न विचारला तर उत्तर मिळालं की  ‘डेथ केअर इंडस्ट्री’ या नावाने एकट्या अमेरिकेत २०२३ पर्यंत ६० अब्ज डॉलर इतका मोठा उद्योग असणार आहे. इतकंच नव्हे तर एका रिपोर्टप्रमाणे हा व्यवसाय दरवर्षी ४ टक्के या प्रमाणात वाढत जाणार आहे,  हे ही त्या रिपोर्टमध्ये दिलं होतं.  अमेरिकेत किंवा जपान या सारख्या देशात किंवा ज्या ज्या अशा देशात जिथे देह अग्नीला स्वाधीन न करता पुरला जातो तिथे हा उद्योग अधिक फायदेशीर आहे हेही कळलं. किती विरोधाभास आहे पहा की
 ज्याला कधीच ‘मरण’ नाही असं ‘मरणाचं मार्केट’ माणूस मरत राहील तोपर्यंत जिवंत रहाणार आहे.
 देहाला ठेवण्यासाठी कॉफीनची किंमत, ते पुरण्यासाठी लागणारी जमीन हे अमेरिकेतला किंवा अश्या देशांमधला तिथला माणूस म्हणे आधीच ठरवून आणि विकत घेऊन ठेवतो किंवा तसं बजेट मृत्यूपूर्वीच बाजूला काढून ठेवतो असंही मी वाचलं. एवढंच नाही,  तर काही देशातील उच्चभ्रू वस्तीतील दफनभूमीत देह पुरण्यापुरता लागणाऱ्या जमिनीच्या प्लॉटची किंमत ही मोठ्या घरांच्या किमतीइतकी असते हे कळल्यावर मी थक्क झालो.

हे सगळं वाचल्यावर पुन्हा एकदा आपल्या भारतीय संस्कृतीतील संस्कारांमागील सांस्कृतिक, सामाजिक, भावनिक, मानसिक, नैसर्गिक संतुलनाचा आणि अगदी आर्थिक विचार सुद्धा करणारे आपले पूर्वज किती शहाणे आणि विवेकी असतील याचा विचार मनात आल्याशिवाय रहात नाही. 

असं म्हणतात की,

“If you get any product for free, then you are the product”
म्हणजे “तुम्हाला जेव्हा एखादी वस्तू विनामूल्य दिली जाते तेव्हा खरंतर तुम्ही स्वतःच कुणासाठी तरी वस्तू असता”. आताची सर्व समाजमाध्यमं याच तत्वावर चालतात.
 आजींच्या अंत्यविधीच्या संदर्भात घडलेल्या सर्व घटनाक्रमामुळे आणि ‘डेथ केअर इंडस्ट्री’ वरच्या वाचलेल्या त्या रिपोर्टमुळे या वचनातील सत्यता पटली आणि एक मनात आलं की  आपला मृत्यू आपल्याला विनामूल्य मिळतो पण तो इतरांसाठी मात्र अब्जावधी डॉलरचा उद्योग मिळवून द्यायला कारणीभूत ठरतो. हे लक्षात आल्यावर स्मशानवैराग्य येण्याऐवजी मला खरं तर यावेळी एक वेगळंच समाधान मिळालं. मला एक लक्षात आलं की मी जिवंत असताना इतरांसाठी झटण्याचा मी किती प्रयत्न करेन तो भाग वेगळा पण माझ्या मृत्यूनंतर जेव्हा माझी चिता जळत असेल तेव्हा आणि त्यामुळेच कुणाची तरी चूलही पेटणार आहे हे सत्य, हेच मृत्यूनंतरही मिळणारं समाधान नसेल का?

अर्थात ते समाधान अनुभवण्यासाठी ‘मी’ तिथे देहाने तरी नक्कीच नसेन हे मात्र खरंच अंतिम सत्य! 

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 24

दृष्टांत सूची पहा

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *