सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी २७६ ते ३०० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

276-13
तरी चंद्रबिंबौनि धारा । निघतां नव्हती गोचरा । परि एकसरें चकोरां । निघती दोंदें ॥13-276॥
तर चंद्रबिंबातून निघणार्‍या अमृताच्या धारा जरी निघतांना डोळ्याना दिसत नाहीत परंतु त्या धारांच्या योगाने चकोर पक्षांना एकसारखी दोंदे निघतात, (चकोर पक्षी पुष्ट होतात).
277-13
तैसें प्राणियांसि होये । जरी तो कहींवासु पाहे । तया अवलोकनाची सोये । कूर्मींही नेणे ॥13-277॥
त्याप्रमाणे त्याने जर कोणा प्राण्याकडे पाहिले तर तसे होते. त्या पहाण्याचा प्रकार कासवीसुद्धा जाणत नाही.
278-13
किंबहुना ऐसी । दिठी जयाची भूतांसी । करही देखसी । तैसेचि ते ॥13-278॥
फार काय सांगावे? याप्रमाणे ज्याची दृष्टी प्राण्याकडे असते व त्याचे जे हात आहेत तेही तसेच आहेत असे तुझ्या दृष्टीस पडेल
279-13
तरी होऊनियां कृतार्थ । राहिले सिद्धांचे मनोरथ । तैसे जयाचे हात । निर्व्यापार ॥13-279॥
अहिंसकाची कृती = सिद्ध पुरुषाचे मनोरथ ज्याप्रमाणे कृतार्थ होऊन रहातात. (म्हणजे सिद्ध पुरुषांचे मन जसे कर्तव्यशून्य झालेले असते) त्याप्रमाणे ज्याचे हात चेष्टारहित असतात. (व्यापाररहित असतात).
280-13
अक्षमें आणि संन्यासिलें । कीं निरिंधन आणि विझालें । मुकेनि घेतलें । मौन जैसें ॥13-280॥
अगोदरच आंधळा, आणखी त्याने पहाण्याचे टाकले, अथवा आधीच काष्ठरहित अग्नि, आणि पुन्हा तो विझलेला किंवा मुळचाच मुका व त्यात आणखी मौनव्रत घेतलेले..


281-13
तयापरी कांहीं । जयां करां करणें नाहीं । जे अकर्तयाच्या ठायीं । बैसों येती ॥13-281॥
अर्जुना त्याप्रमाणे ज्या हातांना काही करावयाचे राहिलेले नाही, कारण काहीच कर्तव्य न उरलेल्या सिद्ध पुरुषाचे ठिकाणी ते राहावयास येतात.
282-13
आसुडैल वारा । नख लागेल अंबरा । इया बुद्धी करां । चळों नेदी ॥13-282॥
वार्‍याला झटका बसेल वआकाशाला नख लागेल अशा बुद्धीने हात हलू देत नाही
283-13
तेथ आंगावरिलीं उडवावीं । कां डोळां रिगतें झाडावीं । पशुपक्ष्यां दावावीं । त्रासमुद्रा ॥13-283॥
(अशी जेथे स्थिती आहे) तेथे अंगावर बसलेले (माशा, डास वगैरे प्राणी) उडवावेत अथवा डोळ्यात जाणारी चिलटे वगैरे झाडून टाकावीत अथवा पशुपक्ष्यांना आपल्या पाहण्याने भीती वाटेल असा आविर्भाव आणावा.
284-13
इया केउतिया गोठी । नावडे दंडु काठी । मग शस्त्राचें किरीटी । बोलणें कें? ॥13-284॥
या गोष्टी कोठल्या? त्याला हातात दंड अथवा काठी घेणे आवडत नाही. असे जर आहे, तर मग अर्जुना हातात शस्त्र घेण्याचे बोलणे कोठले?
285-13
लीलाकमळें खेळणें । कां पुष्पमाळा झेलणें । न करी म्हणे गोफणें । ऐसें होईल ॥13-285॥
सहज मजेने कमळाने खेळावयाचे अथवा फुलांच्या माळा झेलावयाच्या (हे करणे चिलट वगैरे अतिसूक्ष्म प्राण्यांना) गोफणीप्रमाणे होईल असे म्हणून जो वरील गोष्टी करत नाही.


286-13
हालवतील रोमावळी । यालागीं आंग न कुरवाळी । नखांची गुंडाळी । बोटांवरी ॥13-286॥
अंगावर केसांच्या रांगा हलतील (व त्यायोगाने केसांच्या आश्रयाला असलेल्या सूक्ष्म जीवांना त्रास होईल) याकरता जो अंग कुरवाळीत नाही व नखांच्या गुंडाळ्या बोटांवर वाढतात.
287-13
तंव करणेयाचाचि अभावो । परी ऐसाही पडे प्रस्तावो । तरी हातां हाचि सरावो । जे जोडिजती ॥13-287॥
आधी तर हातांना काही कर्तव्यच नसते परंतु अशाही स्थितीत त्या हातांना काही करण्याचा प्रसंग आला तर हातांना हीच सवय असते की ते जोडावेत.
288-13
कां नाभिकारा उचलिजे । हातु पडिलियां देइजे । नातरी आर्तातें स्पर्शिजे । अळुमाळु ॥13-288॥
अथवा ‘भिऊ नकोस’ असे सांगण्यास हात उचलावेत अथवा कोणी पडलेल्यास वर काढण्यास हात द्यावेत किंवा पीडित मनुष्याला त्याची पीडा कमी होण्याकरता त्याला हाताने थोडासा स्पर्श करावा.
289-13
हेंही उपरोधें करणें । तरी आर्तभय हरणें । नेणती चंद्रकिरणें । जिव्हाळा तो ॥13-289॥
तरी दु:खाने पीडित मनुष्याचे भय नाहीसे करणे, हे देखील तो मोठ्या जुलुमाने करतो,पण त्याच्या हस्तस्पर्शाचा ओलावा चंद्रकिरणांना सुद्धा माहीत नसतो.
290-13
पावोनि तो स्पर्शु । मलयानिळु खरपुसु । तेणें मानें पशु । कुरवाळणें ॥13-290॥
त्याच्या ह्स्तस्पर्शाच्या मानाने पाहिले असता मलय पर्वतावरून येणार्‍या वार्‍याचा स्पर्श कडक भासेल. इतका त्याच्या हाताचा स्पर्श मृदु व सुखकर असतो. अशा प्रकारच्या स्पर्शाने त्याचे पशूंना कुरवाळणे असते.


291-13
जे सदा रिते मोकळे । जैशी चंदनांगें निसळें । न फळतांही निर्फळें । होतीचिना ॥13-291॥
जे हात नेहेमी रिकामे व मोकळे असतात (परंतु) ज्याप्रमाणे चंदनाच्या वृक्षाचे सर्व भाग शुद्ध असल्यामुळे ती झाडे फळली नाहीत तर ती निष्फळ आहेत असे म्हणता येणार नाही.
292-13
आतां असो हें वाग्जाळ । जाणें तें करतळ । सज्जनांचे शीळ । स्वभाव जैसे ॥13-292॥
आता हे भाराभर बोलणे राहू दे. सज्जन मनुष्याची वागणूक व स्वभाव ही ज्याप्रमाणे असतात, त्याप्रमाणे त्याचे ते करतल असतात असे समज.
293-13
आतां मन तयाचें । सांगों म्हणों जरी साचें । तरी सांगितले कोणाचे । विलास हे? ॥13-293॥
अहिंसकाचे मन =
आता त्याचे मन खरोखर सांगतो म्हणून जर म्हटले तर आतापर्यंत जे व्यापार सांगितले ते कोणाचे?
294-13
काइ शाखा नव्हे तरु? । जळेंवीण असे सागरु? । तेज आणि तेजाकारु । आन काई? ॥13-294॥
फांद्या म्हणजेच झाड नव्हे काय? समुद्र हा जलाशिवाय आहे काय? प्रकाश आणि सूर्य हे वेगळे आहेत काय?
295-13
अवयव आणि शरीर । हे वेगळाले कीर? । कीं रसु आणि नीर । सिनानीं आथी? ॥13-295॥
शरीर आणि शरीराचे अवयव हे खरोखर वेगळे आहेत काय? किंवा ओलावा आणि पाणी निराळी आहेत काय?


296-13
म्हणौनि हे जे सर्व । सांगितले बाह्य भाव । ते मनचि गा सावयव । ऐसें जाणें ॥13-296॥
म्हणून ही जी सर्व बाह्य लक्षणे सांगितली ती मूर्तिमंत मनच असे समज. (वर सांगितलेले सर्व व्यवहार मनाचेच आहेत).
297-13
जें बीज भुईं खोंविलें । तेंचि वरी रुख जाहलें । तैसें इंद्रियाद्वारीं फांकलें । अंतरचि कीं ॥13-297॥
ज्याप्रमाणे भुईत पेरलेले बी, तेच तर पुढे वृक्ष होते, त्याप्रमाणे मनच इंद्रियद्वारा पसरले आहे.
298-13
पैं मानसींचि जरी । अहिंसेची अवसरी । तरी कैंची बाहेरी । वोसंडेल? ॥13-298॥
परंतु मनातच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल?
299-13
आवडे ते वृत्ती किरीटी । आधीं मनौनीचि उठी । मग ते वाचे दिठी । करांसि ये ॥13-299॥
अर्जुना कोणतीही वृत्ती प्रथम मनात उत्पन्न होते व मग ती वृत्ती वाचा, दृष्टी, हात वगैरे इंद्रियांकडे येते.
300-13
वांचूनि मनींचि नाहीं । तें वाचेसि उमटेल काई? । बींवीण भुईं । अंकुर असे? ॥13-300॥
याशिवाय जे मनातच नाही, ते वाचेत प्रगट होईल काय? बीजाशिवाय जमिनीत अंकुर आहे काय?

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *