सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १० वा ओवी २२६ ते २५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

226-10
यक्षरक्षोगणांआंतु । शंभूचा सखा जो धनवंतु । तो कुबेरु मी हें अनंतु । म्हणता जाहला ॥226॥
यक्षराक्षस यांच्या समुदायांत शंकराचा मित्र जो धनसंपन्न कुबेर, तो माझी विभूति होय, असे अनंत म्हणाला.
227-10
मग आठांही वसूंमाझारीं । पावकु तो मी अवधारीं । शिखराथिलियां सर्वोपरी । मेरु तो मी ॥227॥
मग अष्टवसूंमध्ये जो अग्नि, तो मी आहे, हे जाण आणि उंच शिखर असलेल्या पर्वतांत मेरु मी आहे.
पुरोधसां च मुख्यं मां विद्धि पार्थ बृहस्पतिम् ।
सेनानीनामहं स्कन्दः सरसामस्मि सागरः॥10.24॥
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम् ।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः॥10.25॥

228-10
जो स्वर्ग सिंहासना सावावो । सर्वज्ञते आदीचा ठावो । तो पुरोहितांमाजीं रावो । बृहस्पती मी ॥228॥
स्वर्गाच्या सिंहासनाला सहायभूत, सर्वज्ञतादि गुणांचे राहतें घर व पुरोहितांचा राजा असा जो बृहस्पति तो मी आहे.
229-10
त्रिभुवनींचिया सेनापतीं- । आंत स्कंदु तो मी महामती । जो हरवीर्यें अग्निसंगती । कृत्तिकाआंतु जाहला ॥229॥
हे महामति अर्जुना ! त्रैलोक्यांतील सेनापतिमध्ये श्रेष्ठ, शंकराच्या वीर्यापासून, अग्नीच्या संगतीने, कृत्तिकेच्या पोटी जन्मलेला, जो कार्तिकस्वामी, तो माझें स्वरूप होय.
230-10
सकळिकां सरोवरांसी । माजीं समुद्र तो मी जळराशी । महर्षींआंतु तपोराशी । भृगु तो मी ॥230॥
समस्त सरोवरांमध्ये अगाध जळराशी जो समुद्र तो मी आहे व महर्षींमध्ये तपोराशी जो भृगुऋषि तो मी आहे.

231-10
अशेषांही वाचा । आंतु नटनाच सत्याचा । तें अक्षर एक मी वैकुंठींचा । वेल्हाळु म्हणे ॥231॥
वाणीने उच्चारिले जाणार्‍या संपूर्ण शब्दांमध्ये अविनाशीपणाचें नृत्य करणारे जें ॐ काररूपी एक अक्षर तें मी होय, असे वैकुंठांत विलास करणारा भगवान श्रीकृष्ण म्हणतो.
232-10
समस्तांही यज्ञांचा पैकीं । जपयज्ञु तो मी ये लोकीं । जो कर्मत्यागें प्रणवादिकीं । निफजविजे ॥232॥
जो जपयज्ञ, यज्ञादि कर्म न करतां ॐ कारादिकांच्या योगाने प्रगट केला जातो, तो या लोकांतील संपूर्ण यज्ञापेकीं मी आहे.
233-10
नामजपयज्ञु तो परम । बाधूं न शके स्‍नानादि कर्म । नामें पावन धर्माधर्म । नाम परब्रह्म वेदार्थें ॥233॥
नामजपयज्ञ हा सर्व यज्ञांत श्रेष्ठ आहे. त्याला स्नानादि कर्मांचे बंधन नाही. उलट त्या नामजपयज्ञानेच धर्माधर्म देखील पावन व पूर्ण होतात; कारण नाम हें परब्रह्म आहे असाच वेदार्थ आहे.
234-10
स्थावरां गिरीवरां आंतु । पुण्यपुंज जो हिमवंतु । तो मी म्हणे कांतु । लक्ष्मियेचा ॥234॥
स्थावर जे पर्वतादिक पदार्थ त्यांत पुण्याची राशी जो हिमालय तो मी आहे असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाले.
अश्वत्थः सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारदः ।
गन्धर्वाणां चित्ररथः सिद्धानां कपिलो मुनिः॥10.26॥
उच्चैःश्रवसमश्वानां विद्धि माममृतोद्‍भवम् ।
ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्॥10.27॥

235-10
कल्पद्रुम हन पारिजातु । गुणें चंदनुही वाड विख्यातु । तरि ययां वृक्षजातां आंतु । अश्वत्थु तो मी ॥235॥
गुणाने, कल्पवृक्ष, पारिजात, चंदन हे वृक्ष श्रेष्ठ म्हणून प्रसिध्द आहेत; तरीपण या सर्व वृक्षामध्ये अश्वत्थवृक्ष मी आहे.

236-10
देवऋषींआंतु पांडवा । नारदु तो मी जाणावा । चित्ररथु मी गंधर्वां । सकळिकांमाजीं ॥236॥
अर्जुना ! देवर्षींमध्ये नारदऋषि मी आहे असे जाण. सर्व गंधर्वामध्ये चित्ररथ गंधर्व हा मी होय.
237-10
ययां अशेषांही सिद्धां- । माजीं कपिलाचार्यु मी प्रबुद्धा । तुरंगजातां प्रसिद्धां- । आंत उचैःश्रवा मी ॥237॥
या सर्व सिध्दांमध्ये, सूज्ञ अर्जुना ! कपिलाचार्य मी होय. अमृतासाठी देवांनी केलेल्या क्षीरसागराच्या मंथनांतून निघालेले उच्चैःश्रवा व
238-10
राजभूषण गजांआंतु । अर्जुना मी गा ऐरावतु । पयोराशी सुरमथितु । अमृतांशु तो मी ॥238॥
ऐरावत अनुक्रमें हे दोन, अश्वांच्या प्रसिध्द असलेल्या जातिमध्ये व राज्यभूषण जे गज त्यामध्ये, माझ्या विभूति आहेत.
239-10
ययां नरांमाजीं राजा । तो विभूतिविशेष माझा । जयातें सकळ लोक प्रजा । होऊनि सेविती ॥239॥
ज्याची सर्व लोक प्रजाजन होऊन सेवा करतात तो राजा, सर्व मनुष्यांमध्ये माझी विभूति होय.
आयुधानामहं वज्रं धेनूनामस्मि कामधुक् ।
प्रजनश्चास्मि कन्दर्पः सर्पाणामस्मि वासुकिः॥10.28॥
अनन्तश्चास्मि नागानां वरुणो यादसामहम् ।
पितृणामर्यमा चास्मि यमः संयमतामहम्॥10.29॥

240-10
पैं आघवेयां हातियेरां । आंत वज्र तें मी धनुर्धरा । जें शतमखोत्तीर्णकरा । आरूढोनि असे ॥240॥
संपूर्ण हत्यारांमध्ये जे शंभर यज्ञ करणार्‍या इंद्राच्या हातात असतें तें वज्र मी आहे.

241-10
धेनूंमध्यें कामधेनु । तें मी म्हणेविष्वक्सेनु । जन्मवितयाआंत मदनु । तो मी जाणें ॥241॥
गायींमध्ये कामधेनु ती मी होय, असे भगवान म्हणतात. जन्मदेणार्‍यांमध्ये मदन हा माझें स्वरूप जाण.
242-10
सर्पकुळाआंत अधिष्ठाता । वासुकी गा मी कुंतीसुता । नागांमाजीं समस्तां । अनंतु तो मी ॥242॥
अर्जुना ! संपूर्ण सर्पकुळांमध्ये त्या कुळाचा अधिपति जो वासुकी तो मी आहे व सर्व नागामध्ये अनंत मी आहे.
243-10
अगा यादसांआंतु । जो पश्चिमप्रमदेचा कांतु । तो वरुण मी हें अनंतु । सांगत असे ॥243॥
अर्जुना ! जलांत राहणार्‍या प्राण्यांमध्ये पश्चिमदिशारूपी स्रियेचा पति जो वरूण तो मी आहे असे श्रीकृष्ण सांगूं लागले.
244-10
आणि पितृगणां समस्तां- । माजीं अर्यमा जो पितृदेवता । तो मी हें तत्त्वता । बोलत आहें ॥244॥
सर्व पितरांच्या समुदायांत अर्यमा नावांची पितृदेवता मी आहे, हें मी खरें जे सुखदुःखाचे भोग देतात.
245-10
जगाचीं शुभाशुभें लिहिती । प्राणियांच्या मानसांचा झाडा घेती । मग केलियानुरूप होती । भोगनियम जे ॥245॥
असे भोगांचे नियमन करणार्‍यामध्ये, कर्माचा साक्षी जो यमधर्मराज तो मी आहे, असे रमेचा पति आत्माराम भगवान श्रीकृष्ण म्हणाले.

246-10
तयां नियमितयांमाजीं यमु । जो कर्मसाक्षी धर्मु । तो मी म्हणे रामु । रमापती ॥246॥
असे भोगांचे नियमन करणार्‍यांमध्ये, कर्माचा साक्षी जो यमधर्मराज तो मी आहे, असे रमेचा पती आत्माराम भगवान श्रीकृष्ण म्हणाले.
प्रल्हादश्चास्मि दैत्यानां कालः कलयतामहम् ।
मृगाणां च मृगेन्द्रोऽहं वैनतेयश्च पक्षिणाम्॥10.30॥
247-10
अगा दैत्यांचिया कुळीं । प्रल्हादु तो मी न्याहाळीं । म्हणौनि दैत्यभावादिमेळीं । लिंपेचिना ॥247॥
अर्जुना ! दैत्यांच्या कुळामध्ये प्रल्हाद मी आहे. पहा. म्हणूनच त्याच्या ठिकाणी दैत्यांच्या स्वभावाचा स्पर्श नव्हता.
248-10
पैं कळितयांमाजीं महाकाळु । तो मी म्हणे गोपाळु । श्वापदांमाजीं शार्दूळु । तो मी जाण ॥248॥
श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना ! गणना करणार्‍यांमध्ये महाकाळ मी आहे आणि वन्यपशूंमध्ये सिंह मी आहे असे जाण
249-10
पक्षिजातिमाझारीं । गरुड तो मी अवधारीं । यालागीं जो पाठीवरी । वाहों शके मातें ॥249॥
सर्व पक्षिजातींमध्ये गरुड मी आहे हे जाण, म्हणूनच तो मला पाठीवर वाहू शकतो.
पवनः पवतामस्मि रामः शस्त्रभृतामहम् ।
झषाणां मकरश्चास्मि स्त्रोतसामस्मि जान्हवी॥10.31॥

250-10
पृथ्वीचिया पैसारा- । माजीं घडीं न लगतां धनुर्धरा । एकेचि उड्डाणें सातांहि सागरां । प्रदक्षिणा करी जो ॥250॥
एका उड्डाणासरसे साताही सागराला प्रदक्षिणा होईल अशा वेगाने वाहणारे जेवढे या संपूर्ण पृथ्वीवर पदार्थ आहेत,

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *