सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी १२६ ते १५० पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

126-14
कीं विरूढलिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा । वेंचला कीं आगळा । दिसतसे ॥126॥
जोंधळ्याचा बी पेरल्यानंतर त्याला अंकुर फुटून कणीस निवडून आल्यावर म्हणजे कणीस परिपक्व झाल्यावर तो पहिला पेरलेला दाणा नाहीसा झाला का? का तो दाना अनेक पटीने वाढला.
127-14
म्हणौनि जग परौतें । सारूनि पाहिजे मातें । तैसा नोव्हें उखितें । आघवें मीचि ॥127॥
म्हणून असे समजु नको की जग पलीकडे सारून मला पहावे असे नाही, तर सर्व सरसकट मीच आहे असे पहावे.
128-14
हा तूं साचोकारा । निश्चयाचा खरा । गांठीं बांध वीरा । जीवाचिये॥128॥
हे वीर अर्जुना, हा निश्चयाचा खरा सिद्धांत तू जीवाच्या गाठीस गच्च बांधून ठेव. म्हणजे तू आपल्या अंत:करणात या सिद्धांताचा दृढ निश्चय करुन ठेव.
129-14
आतां मियां मज दाविला । शरीरीं वेगळाला । गुणीं मीचि बांधला । ऐसा आवडें ॥129॥
आता अनेक भिन्न भिन्न किंवा निरनिराळ्या शरीरात माझे दर्शन माझ्याकडूनच होते आणि त्या शरीरांमधे गुणांनी मीच बांधला गेल्यासारखा दिसतो.
130-14
जैसें स्वप्नीं आपण । उठूनियां आत्ममरण । भोगिजे गा, जाण । कपिध्वजा ॥130॥
भगवान म्हणतात कि हे अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्नामधे आपले मरण आपणच आपल्या कल्पनेने तयार करून त्या स्वकल्पित मरणाचे दु:ख आपण स्वत:च भोगतो.

131-14
कां कवळातें डोळे । प्रकाशूनि पिवळें । देखती तेंही कळे । तयांसीचि ॥131॥
अथवा एखादी पांढरी वस्तू पिवळी दिसली म्हणजे आपल्यास कावीळ झाली असे समजते. हे कावीळ झाल्याचे ज्ञान आपल्यास डोळ्यांमुळे होते व तेच डोळे पिवळ्याचे प्रकाशन करतात. (ह्याप्रमाणे डोळ्यांकडून काविळीचे ज्ञान होऊन त्यामुळे दिसणार्‍या पिवळेपणाचेही तेच डोळे प्रकाशन करतात.
132-14
नाना सूर्यप्रकाशें । प्रकटी तैं अभ्र भासे । तो लोपला हेंही दिसे । सूर्येंचि कीं ॥132॥
अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्यावेळेस आपल्यावर आलेल्या ढगांचे प्रकाशन करतो, त्यावेळेस ते ढग आपणास दिसतात व सूर्यबिंबावर आलेल्या ढगाने सूर्यास झाकून टाकले आहे हे देखील सूर्याच्या प्रकाशामुळेच समजण्यात येते.
133-14
पैं आपणपेनि जालिया । छाया गा आपुलिया । बिहोनि बिहालिया । आन आहे? ॥133॥
अर्जुना, आपल्यापासून झालेल्या छायेला भ्याले असता ती छाया भ्यालेल्या पुरुषाहून काही वेगळी आहे का? तर नाही, म्हणजे त्या छायेचे प्रकाशन आपणच केले आहे.
134-14
तैसीं इयें नाना देहें । दाऊनि मी नाना होयें । तेथ ऐसा जो बंधु आहे । तेंही देखें ॥134॥
त्याप्रमाणे हे अनेक देह दाखवून (प्रकाशून) मी अनेक होतो आणि त्या अनेक शरीरात मी गुणांकडून बांधला गेलो आहे असे जे वाटते त्या वाटण्याचे प्रकाशनही मीच करतो.
135-14
बंधु कां न बंधिजे । हें जाणणें मज माझें । नेणणेनि उपजे । आपलेनि ॥135॥
माझे मला यथार्थ ज्ञान असणे हे गुणांचा बंध दिसत असून त्या बंधाकडून न बांधले जाण्यास कारणीभूत होते व आपल्या नेणण्यानेच आपल्या यथार्थस्वरूपाच्या अज्ञानानेच बंध उत्पन्न होतो.

136-14
तरी कोणें गुणें कैसा । मजचि मी बंधु ऐसा । आवडे तें परियेसा । अर्जुनदेवा ॥136॥
तर अर्जुनदेवा, कोणत्या गुणाने व कसा मी बद्ध आहे असे वाटते ते ऐका.
137-14
गुण ते किती किंधर्म । कायि ययां रूपनाम । कें जालें हें वर्म । अवधारीं पां ॥137॥
गुण किती आहेत व त्यांचे धर्म काय? त्यांचे नाव व रूप काय? व ते कोठे उत्पन्न झाले? हे वर्म ऐक.
सत्त्वं रजस्तम इति गुणाः प्रकृतिसंभवाः ।
निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनमव्ययम् ॥14.5॥

भावार्थ हे महाबाहो, सत्व, रज व तम हे गुण आहेत व प्रकृती यांची जन्मभूमी आहे. हे त्रिगुण देहामध्ये अविनाशी जो देही (आत्मा) त्याला बंधन करतात.
(त्रिगुणांचे सामान्य स्वरूप)
138-14
तरी सत्त्वरजतम । तिघांसि हें नाम । आणि प्रकृति जन्म- । भूमिका ययां ॥138॥
तरी सत्व, रज व तम ह्या तिघांनाही गुण म्हणतात आणि यांची प्रकृती ही जन्मभूमी आहे.
139-14
येथ सत्त्व तें उत्तम । रज तें मध्यम । तिहींमाजीं तम । सावियाधारें ॥139॥
या तीन गुणात सत्वगुण हा उत्तम, रजोगुण हा मध्यम व तमोगुण हा सहज कनिष्ठ आहे.
140-14
हें एकेचि वृत्तीच्या ठायीं । त्रिगुणत्व आवडे पाहीं । वयसात्रय देहीं । येकीं जेवीं ॥140॥
ज्याप्रमाणे एका देहाचे ठिकाणी वयाच्या तीन अवस्था बाल्य, तारुण्य व वार्धक्य भासतात, त्याप्रमाणे एकाच अंत:करणवृत्तीच्या ठिकाणी त्रिगुणत्व भासते असे समज.

141-14
कां मीनलेनि कीडें । जंव जंव तूक वाढे । तंव तंव सोनें हीन पडे । पांचिका कसीं ॥141॥
अथवा हिणकस धातू सोन्यात मिसळला असता जसे जसे त्या सोन्याचे वजन वाढते, तसे तसे सोने पाच रुपये तोळा किंमतीपर्यंतच्या कसाचे हलके होते.
142-14
पैं सावधपण जैसें । वाहविलें आळसें । सुषुप्ति बैसे । घणावोनि ॥142॥
आळसाने सावधपणा नाहीसा झाल्यावर मग गाढ झोप दृढ होऊन बसते.
143-14
तैसी अज्ञानांगीकारें । निगाली वृत्ति विखुरे । ते सत्त्वरजद्वारें । तमही होय ॥143॥
त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून बाहेर पडलेली वृत्ती ज्या वेळेस फैलावते त्यावेळेस ती सर्व, रज होऊन तम देखील होते.
144-14
अर्जुना गा जाण । ययां नाम गुण । आतां दाखऊं खूण । बांधिती ते ॥144॥
अर्जुना यांना गुण असे म्हणतात, असे समज. आता हे गुण (आत्म्याला) कसे बांधतात ते वर्म दाखवतो.
145-14
तरी क्षेत्रज्ञदशे । आत्मा मोटका पैसे । हें देह मी ऐसें । मुहूर्त करी ॥145॥
तर आत्मा हा जीवदशेत थोडासा प्रवेश करतो न करतो तोच (अज्ञानाचा थोडासा स्वीकार करतो न करतो) तोच हा देह मी आहे असे म्हणावयास आरंभ करतो.

146-14
आजन्ममरणांतीं । देहधर्मीं समस्तीं । ममत्वाची सूती । घे ना जंव ॥146॥
जन्मापासून तो मरणापर्यंत सर्व देहधर्माच्या ठिकाणी ममत्वाचा जन्ममरण वगैरे जे सर्व देहाचे धर्म आहेत ते माझे आहेत असा अभिमान घेतो न घेतो इतक्यात
147-14
जैसी मीनाच्या तोंडीं । पडेना जंव उंडी । तंव गळ आसुडी । जळपारधी ॥147॥
ज्याप्रमाणे माशाच्या तोंडात आमिष पडते न पडते तोच धीवर गळास हिसका देतो,
*तत्र सत्त्वं निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम् ।
सुखसंगेन बध्नाति ज्ञानसंगेन चानघ ॥14.6॥

*भावार्थ* 👉त्यामधे सत्वगुण निर्मल असल्यामुळे प्रकाश व उपद्रवरहित आहे हे पापरहिता अर्जुना, तो सत्वगुण सुखाच्या व ज्ञानाच्या संगतीने या दोन पाशांनी प्राण्याला बद्ध करतो. म्हणजे मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे अशी जाणीव उत्पन्न करतो.
(सत्वगुण प्राण्याला कसा बद्ध करतो?
148-14
तेवीं सत्त्वें लुब्धकें । सुखज्ञानाचीं पाशकें । वोढिजती मग खुडके । मृगु जैसा ॥148॥
त्याप्रमाणे सत्वगुणरूपी पारध्याकडून सुख व ज्ञानरूपी पाश ओढले जातात पण हरण जसा पारध्याच्या पाशात अडकतो तसा तो सुख आणि ज्ञान यांच्या पाशात अडकतो.
149-14
मग ज्ञानें चडफडी । जाणिवेचे खुरखोडी । स्वयं सुख हें धाडी । हातींचें गा ॥149॥
मग ज्ञानाने चरफडावयास लागतो व जाणीवरूपी लाथा झाडतो आणि अरे, आपल्यापाशी असलेले आपले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवतो.
150-14
तेव्हां विद्यामानें तोखे । लाभमात्रें हरिखे । मी संतुष्ट हेंही देखे । श्लाघों लागे ॥150॥
तेव्हा अविद्येने व मानाने संतुष्ट होतो. कोणताही लाभ झाला तर आनंद पावतो, आपण संतुष्ट आहोत हेही पहातो व आपणास धन्य मानतो. ॥150॥

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *