सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ६१ ते ८०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

आद्यो विकार आकाशः सोऽवकाशस्वभावान् ।
आकाशोऽस्तीति सत्तत्त्वमाकाशेऽप्यनुगच्छति ॥ ६० ॥
सद्‌वस्तूवरील पहिला विकार आकाश होय. त्याचें मुख्य स्वरूप अवकाश. ‘आकाश आहे’ या वाक्यावरून आहेपणा आकाशाचे ठायीं व्यापून आहे असे होतें. ॥६०॥

एकस्वभावं सत्तत्त्वमाकाशो द्विस्वभावकः ।
नावकाशः सति व्योम्नि स चैषोऽपि द्वयं स्थितम् ॥ ६१ ॥
आहेपणांत अवकाश नाहीं. केवळ अस्तित्वाचा एकच स्वभाव आहे. परंतु आकाशाचे ठायी एक आहेपणा व दुसरा अवकाश असे दोन स्वभाव आहेत. ॥६१॥

यद्वा प्रतिध्वनिर्व्योम्नो गुणो नासौ सतीक्ष्यते ।
व्योम्नि द्वौ सद्ध्वनी तेन सदेकं द्विगुणं वियत् ॥ ६२ ॥
अथवा आकाशाचा गुण प्रतिध्वनि हा आहे, तो सद्वस्तूचे ठायीं दिसत नाहीं. परंतु आकाशाचे ठायीं आहेपणा आणि प्रतिध्वनि असे दोन आहेत. म्हणून सत् एक स्वभाव आणि आकाश द्विस्वभाव आहे असे अर्थातच सिद्ध झाले. ॥६२ ॥

या शक्तिः कल्पयेद्व्योम सा सद्व्योम्नोरभिन्नताम् ।
आपाद्य धर्मधर्मित्वं व्यत्ययेनावकल्पयेत् ॥ ६३ ॥
याजवर अशी शंका आहे कीं, आकाश हें सद्‌वस्तूचे कार्य असून आकाशाची सत्ता असें म्हणण्याचा जो परिपाठ आहे, त्याजवरून सत्ता हा आकाशाचा धर्म आहे, असें होते तर हे विपरीत कसे ? तर याजवर आमचें असें समाधान आहे की, जी शक्ति आकाशाची कल्पना करते, तीच शक्ति सत्ता आणि आकाश या दोहोंचा अभेद कल्पून धर्माचा धर्मी आणि धर्मीचा धर्म करते. ॥६३॥

सतो व्योमत्वमापन्नं व्योम्नः सत्तान्तु लौकिकाः ।
तार्किकाश्चावगच्छन्ति मायाया उचितं हि तत् ॥ ६४ ॥
वास्तविक पहातां सत्तेचे आकाश असा व्यवहार असावा तो नसून आकाशाची सत्ता असा व्यवहार साधारण लोकांत व विद्वान लोकांत आढळतो हाही मायेचाच खेळ आहे. ॥६४॥

यद्यथा वर्तते तस्य तथात्वं भाति मानतः ।
अन्यथात्वं भ्रमेणेति न्यायोऽयं सर्वलौकिकः ॥ ६५ ॥
पदार्थ जशाचा तसा भासला असतां तें सत्यज्ञान होय. आणि जशाचा तसा न भासतां अन्यथा भासतो त्यासच भ्रम असें म्हणतात. ॥६५॥

एवं श्रुतिविचारात्प्राक्यद्यथा वस्तु भासते ।
विचारेण विपर्येति ततस्तच्चिन्त्यतां वियत् ॥ ६६ ॥
याप्रमाणें श्रुत्यर्थविचार करण्यापूर्वी जें सद्‌रूप ब्रह्म भ्रांतीनें गगनादिकांच्या रूपानें भासते, तेंच श्रुत्यर्थविचार झाल्यानंतर त्याचा गगनादि भाव जाऊन पूर्ववत् ब्रह्मच भासू लागतें. याजकीरतां आधीं आकाशाचें विवेचन करावे. ॥६६॥

भिन्ने वियत्सती शब्दभेदाद्बुद्धेश्च भेदतः ।
वाय्वादिष्वनुवृत्तं सन्न तु व्योमेति भेदधीः ॥ ६७ ॥
आकाश आणि सत् हे दोन शब्द जसे एकमेकांपासून भिन्न आहेत, तसेंच आकाशबुद्धि आणि सद्‌बुद्धि या दोनही एकमेकांपासून भिन्न आहेत. कारण पूर्वी वाय्वादिक भूतांचेठायी जशी सत्ता व्यापून आहे तसे आकाश नाहीं. म्हणून आकाशापासून सत्ता भिन्न आहे हें सिद्ध झाले. ॥६७॥

सद्वस्त्वधिकवृत्तित्वाद्धर्मि व्योम्नस्तु धर्मता ।
धिया सतः पृथक्कारे ब्रूहि व्योम किमात्मकम् ॥ ६८ ॥
आतां सद्‌वस्तूची व्याप्ति अधिक असल्यामुळें त्याला धर्मत्व येते. बुद्धीनें आकाशापासून सत्ता निराळी केली असतां आकाशाचे स्वरूप काय रहातें हें सांगता येणे अशक्य आहे. ॥६८॥

अवकाशात्मकं तच्चेदसत्तदिति चिन्त्यताम् ।
भिन्नं सतोऽसच्च नेति वक्षि चेद्व्याहतिस्तव ॥ ६९ ॥
कोणी म्हणेल की, तें अवकाशात्मक आहे. होय, पण तें सतापासून भिन्न असल्यावर असतच असले पाहिजे. तसें न म्हटल्यास व्याहतिदोष येतो. ॥६९॥

भातीति चेद्‌भातु नाम भूषणं मायिकस्य तत् ।
यदसद्‌भासमानन्तन्मिथ्या स्वप्नगजादिवत् ॥ ७० ॥
वास्तविक नसणारे जग भासते कसें अशी शंका घेण्याचें कारण नाहीं. असें भासणें हे मायेचें भूषणच आहे स्वप्नांत हत्ती घोडे भासतात म्हणून ते खरे काय ? जे नसून भासते त्यासच मिथ्या म्हणतात. ॥७०॥

जातिव्यक्तो देहिदेहौ गुणद्रव्ये यथा पृथक् ।
वियत्सतोस्तथैवास्तु पार्थक्यं कोऽत्र विस्मयः ॥ ७१ ॥
जाति, व्यक्ति देही, देह, गुण, आणि द्रव्य ही जशी एकमेकांपासून पृथक् आहेत तशींच सत्ता आणि आकाश ही एकमेकांपामून भिन्न आहेत. यांत नवल तें काय ? ॥७१॥

बुद्धोऽपि भेदो नो चित्ते निरुढिं याति चेत्तदा ।
अनैकाग्र्यात्संशयाद्वा रूढ्यभावोऽस्य ते वद ॥ ७२ ॥
हें मात्र खरे आहे कीं, हा भेद जरी समजला तरी तो चांगला चित्तांत ठसत नाहीं. यास कारणें दोन आहेत. एक चित्ताचें अनैकाग्र्य, दुसरें संशय. यांपैकी कोणचें कारण आहे याचा विचार करावा. ॥७२॥

अप्रमत्तो भव ध्यानादाद्येऽन्यस्मिन्विवेचनम् ।
कुरु प्रमाणयुक्तिभ्यां ततो रूढतमो भवेत् ॥ ७३ ॥
अनैकाग्र्य असेल तर ध्यानानें एकाग्रता करावी. आणि संशय असेल तर प्रमाण व युक्ति लढवून चांगलें निवेदन करावे. म्हणजे वर सांगितलेला भेद चित्तांत चांगला ठसेल. ॥७३॥

ध्यानान्मानाद्युक्तितोऽपि रूढे भेद वियत्सतोः ।
न कदाचिद्वियत्सत्यं सद्वस्तु छिद्रवन्न च ॥ ७४ ॥
ध्यान, प्रमाण आणि युक्ति यांच्या योगानें आकाश आणि सत्ता या दोहोंतील भेद एकदां मनांत चांगला ठसल्यावर पुनः आकाश सत्य व सद्वस्तु पोकळ असें कधींही वाटणार नाहीं. ॥७४॥

ज्ञस्य भाति सदा व्योम निस्तत्त्वोल्लेखपूर्वकम् ।
सद्वस्त्वपि विभात्यस्य निश्छिद्रत्वपुरःसरम् ॥ ७५ ॥
तत्त्ववेत्त्याला आकाश हे अगदीं निस्तत्त्व आणि सद्वस्तु ओतप्रोत दाट भरलेली अशी भासते. ॥७५॥

वासनायां विवृद्धायां वियत्सत्यत्ववादिनम् ।
सन्मात्राबोधयुक्तं च दृष्ट्वा विस्मयते बुधः ॥ ७६ ॥
हें ज्ञान एकदां दृढ झाले असतां आकाशाला खरें म्हणणारास व ज्याला सद्‌रूपाची व्यापकता समजली नाहीं अशा मनुष्यास पाहून तत्त्ववेत्त्याला मोठे आश्वर्य वाटेल. ॥७६॥

एवमाकाशमिथ्यात्वे सत्सत्यत्वे च वासिते ।
न्यायेनानेन वाय्वादेः सद्वस्तु प्रविविच्यताम् ॥ ७७ ॥
याप्रमाणे आकाशाचे मिथ्यात्व आणि सद्‌वस्तूचे सत्यत्व चांगलें ठसल्यावर याच न्यायाने वाय्वादिक भूतांपासून सद्‌वस्तूची निवड करावी ॥७७॥

सद्वस्तुन्येकदेशस्था माया तत्रैकदेशगम् ।
वियत्तत्राप्येकदेशगतो वायु प्रकल्पितः ॥ ७८ ॥
सद्‌वस्तूच्या एकदेशी माया, मायेच्या एकदेशीं आकाश व आकाशाच्या एकदेशी वायु कल्पिलेला आहे. ॥७८॥

शोषस्पर्शौ गतिर्वेगो वायुधर्मा इमे मताः ।
त्रयः स्वभावाः सन्मायाव्योम्नां ये तेऽपि वायुगाः ॥ ७९ ॥
शोष, स्पर्श, गति आणि वेग हे वायूचे धर्म आहेत. सत्ता माया आणि आकाश या तिहींचे जे तीन स्वभाव तेही वायुगतच आहेत. ॥७५॥

वायुरस्तीति सद्‌भावः सतो वायौ पृथक्कृते ।
निस्तत्त्वरूपता मायास्वभावो व्योमगो ध्वनिः ॥ ८० ॥
‘वायु आहे’ अशा व्यवहारास जो हेतुभूत तो वायूंतील सत्ताधर्म समजावा, आणि सत्तेपासून वायु पृथक् केला असतां जे त्याचें निःसत्त्व रूप रहाते तो मायाधर्म, आणि वायूंतील जो ध्वनि तो आकाशधर्म समजावा. ॥८०॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *