सार्थ ज्ञानेश्वरी: ॥ अथ चतुर्दशोऽध्यायःअध्याय चौदावा ॥ गुणञयविभागयोगः ॥
अध्याय चौदावा
1-14
जय जय आचार्या । समस्तसुरवर्या । प्रज्ञाप्रभातसूर्या । सुखोदया ॥14-1॥
आचार्य आपण सर्व देवांमध्ये श्रेष्ठ आहात. जगामध्ये जेवढे पण सुख आहे. त्याचा उदय करणारे अन्य कोणी नसुन आपण आहात.आपला जयजयकार असो.
2-14
जय जय सर्व विसांवया । सोहंभाव-सुहावया । नाना लोक हेलावया । समुद्रा तूं ॥14-2॥
तुम्ही सर्व जगाचे विश्रांति-स्थान आहात. =सर्वांच्या ह्रदयात ‘मी ब्रह्म आहे’ अशा भावनेस सेवन करविणारे (तुम्ही आहात). तुम्ही विविध चतुर्दश लोकरूपी लाटांचा विशाल असा समुद्र आहात. तुमचा जयजयकार असो.
3-14
आइकें गा आर्तबंधू । निरंतरकारुण्यसिंधू । विशदविद्यावधू- । वल्लभा जी ॥14-3॥
देवा, तुम्ही दीनदयाळ असुन अखंड भरलेले ओहोटी नसलेले दयेचे समुद्र, शुद्धविद्यारूप अध्यात्मविद्यारूप स्त्रीचे प्रियकर असे महाराज, तुम्ही ऐका.
4-14
तू जयांप्रति लपसी । तया जग हें दाविसी । प्रकट तैं करिसी । आघवेंचि तूं ॥14-4॥
तू ज्यांना लपवतोस, त्यांना हे जग दाखवतोस म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्यासंबंधाने अज्ञान असते त्यांना तुझे स्वरूप न दिसता जग दिसते व तू ज्यांना प्रगट होतोस त्यावेळी त्यांना सर्व तूच करतोस. म्हणजे ज्यांच्यामधे तुझ्यासंबंधाने ज्ञान असते त्यांना जग न दिसता, सर्व तूच दिसतोस.
5-14
कीं पुढिलाची दृष्टि चोरिजे । हा दृष्टिबंधु निफजे । परी नवल लाघव तुझें । जें आपणपें चोरे ॥14-5॥
गारुडी जो नजरबंदीचा खेळ करुन समोरच्याची दृष्टि दोष घडवुन आणतो किंवा दृष्टी चोरतो आपण त्यास आपली स्वत:ची नजरबंदी करता येत नाही. परंतु आपण आपल्याला चोरून रहाणे स्वत:स स्वत: विषय न होणे ही तुझी अद्भुत जादू आहे. सद्गुरुराया हे जगतालाही आपले भान होऊ देत नाहीत व आपण स्वत: ज्ञानरूप असल्यामुळे आपले भानही आपल्या ठिकाणी घेत नाहीत.
6-14
जी तूंचि तूं सर्वा यया । मा कोणा बोधु कोणा माया । ऐसिया आपेंआप लाघविया । नमों तुज ॥14-6॥
कारण की या सर्व विक्ष्वाला तूच तू आहेस. म्हणजे या जगात सर्व काही तूच आहेस. असे असून सुद्धा कोणाचे ठिकाणी तुझे ज्ञान आहे तर कोणाचे ठिकाणी तुझ्यासंबंधी माया (अज्ञान) आहे. असा जो तू स्वभावत: जादूगार, त्या तुला नमस्कार असो.
7-14
जाणों जगीं आप वोलें । तें तुझिया बोला सुरस जालें । तुझेनि क्षमत्व आलें । पृथ्वियेसी ॥14-7॥
पृथ्वीतलावर चे द्रवरुप पाणी आहे.त्या पाण्याला तुमच्यामुळे गोडी आली आहे. भुतलावर भुतभाराची सहन करण्याची जी ताकत आली आहे ती तुमच्या मुळेच.
8-14
रविचंद्रादि शुक्ती । उदय करिती त्रिजगतीं । तें तुझिया दीप्ती । तेज तेजां ॥14-8॥
चंद्र आणि सुर्य हे विशाल शिंपल्याप्रमाने तेजोमय आहेत. परंतु त्यांचा जो तिन्ही लोकांवर पडनारा प्रकाश हा तुमच्याच तेजाच्या शक्तिचा प्रभाव आहे.
9-14
चळवळिजे अनिळें । तें दैविकेनि जी निजबळें । नभ तुजमाजीं खेळे । लपीथपी ॥14-9॥
तुमच्या अलौकीक व स्वाभाविक बळामुळे वारा सर्वञ हालचाल करत असतो.आणि विशाल दिसले तरी तो तुमच्या पोटामध्ये लपडांव खेळत असते.
10-14
किंबहुना माया असोस । ज्ञान जी तुझेनि डोळस । असो वानणें सायास।श्रुतीसि हे॥14-10॥
फार काय सांगावे? महाराज अमर्याद असे जे मायाज्ञान संपूर्ण अन्यथाज्ञानाचे आपणच प्रकाशक आहात. परंतु हे वर्णन पुरे ! कारण आपले वर्णन करणे श्रुतिलाही कष्टप्रद आहे.
11-14
वेद वानूनि तंवचि चांग । जंव न दिसे तुझें आंग । मग आम्हां तया मूग । एके पांती ॥11॥
वेद तुझे उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे वर्णन करत असतात. जोपर्यंत तुझ्या खर्या स्वरुपाचे त्यांना दर्शन होत नाही.तोपर्यंत पण एकदा का तुझ्या निर्गुण निराकार स्वरुपाचे दर्शन झाले की आम्हाला व वेदानां एकाच लाईन मध्ये बसुन मुग गिळुन शांत बसावे लागते.
12-14
जी एकार्णवाचे ठाईं । पाहतां थेंबाचा पाडु नाहीं । मा महानदी काई । जाणिजती ॥12॥
महाराज,प्रलयाच्या वेळेस सर्व ठिकानचे वातावरण जलमय झाल्यावर पाण्याच्या एका थेबांचा सुद्धा पत्ता लागत नाही. मग महानद्या तरी कशा जाणल्या जातील? (तर नाही. महानद्यांचा देखील प्रळयकालच्या महासमुद्रात पत्ता लागणार नाही).
13-14
कां उदयलिया भास्वतु । चंद्र जैसा खद्योतु । आम्हां श्रुति तुज आंतु । तो पाडु असे ॥13॥
अथवा सूर्य उगवल्यावर चंद्राचा असणारा प्रकाश जसा काजव्यासारखा असतो, त्याप्रमाणे तुझ्या स्वरुपाच्या वर्णनाविषयी आमची व वेदांची योग्यता एकसारखीच आहे.
14-14
आणि दुजया थांवो मोडे । जेथ परेशीं वैखरी बुडे । तो तूं मा कोणें तोंडें । वानावासि ॥14॥
आणि द्वैताचा जेथे जोर नाहीसा होतो, असलेला आधार मोडुन जातो व परावाणीसह वैखरी नाहीशी होते,किंबा बुडुन जाते. असा जो तू त्या तुझे मग ‘परा, पश्यन्ती’ इत्यादि वाचांपैकी कोणत्या वाचेने, वाणीने वर्णन करावे?
15-14
यालागीं आतां । स्तुति सांडूनि निवांता । चरणीं ठेविजे माथा । हेंचि भलें ॥15॥
देवा याकरता आता तुझी स्तुती करण्याचे सोडून देऊन चुपचाप आपल्या चरणांवर मस्तक ठेवावे हेच चांगले.
16-14
तरी तू जैसा आहासि तैसिया । नमो जी श्रीगुरुराया । मज ग्रंथोद्यमु फळावया । वेव्हारा होईं ॥16॥
(गुरूंकडे काव्यासंबंधी मागणे)
तर अहो गुरुमहाराज, आपण जसे आहात तशाच तुम्हाला मी आता नमस्कार करतो. आपण मजवर एवढी कृपा करा की माझा ग्रंथरूप उद्योग सफल होण्यास आपण सावकार व्हा.
17-14
आतां कृपाभांडवल सोडीं । भरीं मति माझी पोतडी । करीं ज्ञानपद्य जोडी । थोरा मातें ॥17॥
आता कृपारूपी भांडवल सोडा व माझी बुद्धिरूपी पिशवी भरा आणि ज्ञानाने भरलेल्या काव्याच्या लाभाने मला थोर करा.
18-14
मग मी संसरेन तेणें । करीन संतांसी कर्णभूषणें । लेववीन सुलक्षणें । विवेकाचीं ॥18॥
मग मी त्या योगाने सावरेन आणि मग विचारांची चांगली लक्षणे असलेली सुंदर कर्णभूषणे (भिकबाळी) करून ती संतांना घालीन.
19-14
जी गीतार्थनिधान । काढू माझें मन । सुयीं स्नेहांजन । आपलें तूं ॥19॥
महाराज, माझे मन गीतार्थरूपी ठेवा प्रगट करण्यास समर्थ व्हावे, या करता तुम्ही आपले कृपारूपी अंजन माझ्या बुद्धिरूपी डोळ्यात घाला.
20-14
हे वाक्सृष्टि एके वेळे । देखतु माझे बुद्धीचे डोळे । तैसा उदैजो जी निर्मळें । कारुण्यबिंबें ॥20॥
जेणे करून माझ्या बुद्धिचे डोळे सर्व शब्दसृष्टीला एकाच सपाट्यात माझ्या बुद्धीच्या ज्ञानाला आकलन करता येईल. या तर्हेने हे श्रीगुरुसूर्या, आपण आपल्या करुणारूप शुद्ध बिंबाने उदयाला यावे.
21-14
माझी प्रज्ञावेली वेल्हाळ । काव्यें होय सफळ । तो वसंतु होय स्नेहाळ । शिरोमणी ॥21॥
हे हे प्रेमळांचे शिरोमनी श्री सदगुरुराया श्रीगुरु, माझ्या बुद्धिरूपी सुंदर वेलाला काव्यरूपी फळे येण्यासाठी ज्या योगाने येईल,किंवा जो वसंतऋतु त्यासाठी पोषक लागते ते आपण व्हावे.
22-14
प्रमेय महापूरें । हे मतिगंगा ये थोरें । तैसा वरिष उदारें । दिठीवेनी ॥22॥
ज्या योगाने ही बुद्धिरूप गंगा ब्रह्मसिद्धांतरूपी बोधाचा महापूर येऊन चांगली फोफावेल, त्या प्रकाराने उदार दृष्टीचा वर्षाव होऊ दे.
23-14
अगा विश्वैकधामा । तुझा प्रसाद चंद्रमा । करूं मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी॥23॥
हे सर्व जगताला एकच आश्रय असणार्या श्रीगुरुराया, तुझा प्रसन्नतारूप चंद्र माझ्या अंत:करणात उदयास येऊन स्फूर्तिरूप पौर्णिमा करो.
24-14
जी अवलोकिलिया मातें । उन्मेषसागरीं भरितें । वोसंडेल स्फूर्तीतें । रसवृत्तीचें ॥24॥
महाराज, आपण मला कृपादृष्टीने पाहिले असता, माझ्या बुद्धिरूपी समुद्रात स्फूर्तीला शांत वगैरे नवरसांची भरती येईल.
25-14
तंव संतोषोनि श्रीगुरुराजें । म्हणितलें विनतिव्याजें । मांडिलें देखोनि दुजें । स्तवनमिषें ॥25॥
(गुरूंची आज्ञा)
तेव्हा संतोषित होऊन गुरुराय म्हणाले, ज्ञानदेवा, विनंती करण्याच्या मिषाने स्तुतीच्या पांघरुणाखाली तू द्वैत केले असे आम्हास दिसून येते.
Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण