सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा ओवी २०१ ते २२५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

201-14
तयाचि गा परिपाठीं । सत्त्व तमातें पोटीं । घालूनि जेव्हां उठी । रजोगुण ॥201॥
त्याच रीतीने सत्वगुणास व तमोगुणास या दोघानांही पाठीमागे सारून जेव्हा रजोगुण उठतो.
202-14
तेव्हां कर्मावांचूनि कांहीं । आन गोमटें नाहीं । ऐसें मानी देहीं । देहराजु ॥202॥
तेव्हा कर्मावाचून दुसरे काही सुंदर दिसत नाही असे देहाचा राजा जो जिवात्मा मानतो.
203-14
त्रिगुण वृद्धि निरूपण । तीं श्लोकीं सांगितलें जाण । आतां सत्त्वादि वृद्धिलक्षण । सादर परियेसीं ॥203॥
तीन गुणांची वृद्धी कशी होते, याचे निरूपण तीन श्लोकांनी तुला सांगितले असे समज. आता सत्वादि वृद्धीचे लक्षण आदरपूर्वक ऐक श्रवन कर.
*सर्वद्वारेषु देहेऽस्मिन् प्रकाश उपजायते ।
ज्ञानं यदा तदा विद्याद्विवृद्धं सत्त्वमित्युत ॥14.11॥
लोभः प्रवृत्तिरारम्भः कर्मणामशमः स्पृहा ।
रजस्येतानि जायन्ते विवृद्धे भरतर्षभ ॥14.12॥
अप्रकाशो$प्रवृत्तिश्र्च प्रमादो मोह एव च ।
तमस्येतानि जायन्ते विवृद्धे कुरुनन्दन ॥14.13॥
यदा सत्वे प्रवृद्धे तु प्रलयं याति देहभृत् ।
तदोत्तमविदां लोकानमलान् प्रतिपद्दते ॥14.14॥
रजसि प्रलय गत्वा कर्मसंगिषु जायते ।
तथा प्रलीनस्तमसि मुढयोनिषु जायते॥14.15॥

*श्लोकार्थ -: -:*
1)या देहामधे सर्व इंद्रियांचे ठिकाणी प्रकाश म्हणजे ज्ञान जेव्हा उत्पन्न होते तेव्हा सत्वगुण वाढले आहे. असे जाणावे.॥11॥
2)अर्जुना,जेव्हा मनुष्यामध्ये रजोगुण वाढला असता प्रवृत्ती,लोभ अशा अनेक कर्माचा आंरभ होण्यास सुरुवात होते. अशांती आणि इच्छा तयार होते.॥12॥
3) हे कुरुनंदना,जेव्हा तमोगुण आधिक वाढतो तेव्हा अप्रवृत्ती,अविवेक,प्रमाद आणि मोह तयार होतात.॥13॥
4)जेव्हा सत्वगुणाची वाढ झाली असताना जर हा मनुष्य मृत्यु पावतो,तेव्हा तो ज्ञानी व शुद्ध विचारांच्या लोकांमध्ये जन्म घेतो.॥14॥
5) जेव्हा रजोगुणाची वाढ होते तेव्हा मृत्यु जवळ येतो. तर कर्माने आसक्त असलेल्या लोकामध्ये जन्म प्राप्त होतो.
आणि जर तमोगुणाच्या काळात मृत्यु आला, तर पशुपक्ष्यांचा योनीत जन्म प्राप्त होतो ॥15॥
204-14
पैं रजतमविजयें । सत्त्व गा देहीं इयें । वाढतां चिन्हें तियें । ऐसीं होती ॥204॥
बाबा अर्जुना, रजोगुण व तमोगुण यांच्यावर मात करून जेव्हा सत्वगुणा या देहात वाढतो, तेव्हा जी लक्षणे होतात ती अशी असतात.
205-14
जे प्रज्ञा आंतुलीकडे । न समाती, बाहेरी वोसंडें । वसंतीं पद्मखंडें । दृती जैसी ॥205॥
की वसंत ऋतूत ज्याप्रमाणे सुवास कमलांच्या पाकळ्यात न मावता बाहेर पडतो, तशी बुद्धी ज्ञान अंतकरणात ओतप्रोत भरुन बाहेर पडते.

206-14
सर्वेंद्रियांच्या आंगणीं । विवेक करी राबणी । साचचि करचरणीं । होती डोळे ॥206॥
सर्व इंद्रियांच्या अंगणात विवेक पहारा करतो किंवा सेवा करत असतो. हातापायांच्या ठिकाणी खरोखरच डोळे फुटतात. म्हणजे हातपाय हे कर्मेंद्रिये असूनही त्यांना चांगले वाईट निवडण्याची शक्ती येते.
207-14
राजहंसापुढें । चांचूचें आगरडें । तोडी जेवीं झगडे । क्षीरनीराचे ॥207॥
राजहंसापुढे दूध व पाणी यांचे मिश्रण ठेवले असता त्या राजहंसाच्या चोचीचे टोक जसे त्या मिश्रणातील दूध व पाणी यांची वेगळीक करते.
208-14
तेवीं दोषादोषविवेकीं । इंद्रियेंचि होती पारखीं । नियमु बा रे पायिकी । वोळगे तैं ॥208॥
त्याप्रमाणे पापपुण्य निवडण्यात इंद्रियेच चांगल्या व वाईट कर्माची पारख करतात.
व त्यावेळेला अरे अर्जुना, इंद्रियनिग्रह हाच (आपणहून) सेवा चाकरी करत असतो.
209-14
नाइकणें तें कानचि वाळी । न पहाणें तें दिठीचि गाळी । अवाच्य तें टाळी । जीभचि गा ॥209॥
जे ऐकू नये ते कानच वर्ज्य करतात, जे पाहू नये ते दृष्टीच टाकून देते, ज्याचा उच्चार करू नये ते जीभच टाळते.
210-14
वाती पुढां जैसें । पळों लागे काळवसें । निषिद्ध इंद्रियां तैसें । समोर नोहे ॥210॥
दिव्यापुढे जसा काळोख पळावयास लागतो, त्याप्रमाणे इंद्रियांसमोर निषिद्ध विषय येत नाहीत.

211-14
धाराधरकाळें । महानदी उचंबळे । तैसी बुद्धि पघळे । शास्त्रजातीं ॥211॥
पावसाळ्याच्या दिवसात जसा महानदीला अपरंपार पूर येतो त्याप्रमाणे सर्व शास्त्रात बुद्धी पसरते.
212-14
अगा पुनवेच्या दिवशीं । चंद्रप्रभा धांवें आकाशीं । ज्ञानीं वृत्ति तैसी । फांके सैंघ ॥212॥
अर्जुना, पौर्णिमेच्या दिवशी ज्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश आकाशात जिकडे तिकडे पसरतो, त्याप्रमाणे ज्ञानात वृत्ती सर्वत्र पसरते.
213-14
वासना एकवटे । प्रवृत्ति वोहटे । मानस विटे । विषयांवरी ॥213॥
वासना एकत्र होतात. एक ब्रह्मप्राप्तीविषयीच काय ती वासना असते. संसाराकडे मनाची असलेली धाव कमी होते व मन विषयांना विटते.
214-14
एवं सत्त्व वाढे । तैं हें चिन्ह फुडें । आणि निधनही घडे । तेव्हांचि जरी ॥214॥
याप्रमाणे सत्वगुण वाढतो तेव्हा ही लक्षणे खरोखर असतात आणि अशा स्थितीत जर मृत्यू घडला.
215-14
कां पाहालेनि सुयाणें । जालया परगुणें । पडियंतें पाहुणें । स्वर्गौनियां ॥215॥
तर जशी घरामधे (विपुल) संपत्ती आहे आणि त्याच प्रमाणे त्या संपत्तीवाल्याची उदार वृत्ती असून त्याच्या अंगी धैर्य आहे, तर मग इहलोकात कीर्ती व नंतर स्वर्गसुख त्यास का मिळू नये?

216-14
तरी जैसीचि घरींची संपत्ती । आणि तैसीचि औदार्यधैर्यवृत्ती । मा परत्रा आणि कीर्ती । कां नोहावें? ॥216॥
अथवा सुकाळ (धान्य व जल यांची विपुलता) प्राप्त होऊन मेजवानीचा प्रसंग यावा आणि त्याच वेळी आपले आवडते मनुष्य (जे मृत होऊन गेलेले असल्यामुळे ज्याच्या भेटीचा बिलकुल संभव नव्हता असे आवडते मनुष्य) स्वर्गातून पाहुणे म्हणून यावे.
217-14
मग गोमटेया तया । जावळी असे धनंजया । तेवीं सत्त्वीं जाणे देहा । कें आथि गा? ॥217॥
अर्जुना मग त्या चांगल्या गोष्टीला दुसरी जोड आहे का? त्याप्रमाणे सत्वगुणाच्या वृद्धीत मरण आले असता तो (सत्वगुणाने स्वभावत: युक्त अशा जन्माशिवाय) दुसरीकडे कोठे जाईल?
218-14
जे स्वगुणीं उद्भट । घेऊनि सत्त्व चोखट । निगे सांडूनि कोपट । भोगक्षम हें ॥218॥
कारण की आपल्या गुणांनी श्रेष्ठ असा जो चांगला सत्वगुण, तो बरोबर घेऊन जो पुरुष भोगांना योग्य असे हे खोपट (शरीर) टाकून निघतो.
219-14
अवचटें ऐसा जो जाये । तो सत्त्वाचाचि नवा होये । किंबहुना जन्म लाहे । ज्ञानियांमाजीं ॥219॥
असा अकस्मात जो जातो,देह ठेवतो तो सत्वगुणांचीच मुर्ती बनलेला असतो. त्याला पुन्हा सत्वगुणाने युक्त असा जन्म मिळतो.
220-14
सांग पां धनुर्धरा । रावो रायपणें डोंगरा । गेलिया अपुरा । होय काई? ॥220॥
राजा हा राजेपणाने, गादीवर असताना डोंगरावर गेला असता त्याच्या राजेपणात काही कमी येईल काय? अर्जुना, सांग बरे

221-14
नातरी येथिंचा दिवा । नेलिया सेजिया गांवा । तो तेथें तरी पांडवा । दीपचि कीं ॥221॥
अथवा अर्जुना येथील (या गावातील) दिवा शेजारच्या गावात नेला असता तेथे तरी तो दिवाच आहे.
222-14
तैसी ते सत्त्वशुद्धी । आगळी ज्ञानेंसी वृद्धी । तरंगावों लागें बुद्धी । विवेकावरी ॥222॥
त्या दिव्याच्या तेजाप्रमाणे त्याच्या सत्वगुणाचे निर्मलत्व (प्रकाश) ज्ञानासह विशेषच वाढते व त्याची बुद्धी विवेकावर पोहू लागते.
223-14
पैं महदादि परिपाठीं । विचारूनि शेवटीं । विचारासकट पोटीं । जिरोनि जाय ॥223॥
महतत्वादि अनुक्रमाचा विचार करून अखेरीस (विचार करणारा) त्या विचारांसकट (ज्या ब्रह्मस्वरूपात) लीन होतो.
224-14
छत्तिसां सदतिसावें । चोविसां पंचविसावें । तिन्ही नुरोनि स्वभावें । चतुर्थ जें ॥224॥
वेदांतात (गीतेत 13 व्या अध्यायाच्या 5/6 श्लोकात सांगितल्याप्रमाणे) छत्तीस तत्वे मानली आहेत, त्यांच्या मते हे ब्रह्म सदतिसावे आहे, सांख्यात चोवीस तत्वे मानली आहेत म्हणून त्यांच्या मते जे ब्रह्म पंचविसावे आहे, व सत्वगुणादि तीन गुणांस नाहीसे करून जे स्वभावत: चौथे आहे.
225-14
ऐसें सर्व जें सर्वोत्तम । जालें असे जया सुगम । तयासवें निरुपम । लाहे देह ॥225॥
असे जे ब्रह्म सर्व असून सर्वात उत्तम आहे ते ब्रह्म ज्यास (ज्या कुलात) सुलभ झाले आहे त्याचे बरोबर त्या कुलात त्यास निरुपम देह मिळतो.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 14th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay ChaudavaSampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय चौदावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १४ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *