सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा ओवी ९०१ ते ९२५ पहा.

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
, , , , , , ,

901-13
परी पैं गुळाची गोडी । नोहे बांधया सांगडी । तैसीं गुण इंद्रियें फुडीं । नाहीं तेथ ॥901॥
परंतु गुळाची गोडी जरी ढेपेत सापडलेली असते, तरी ती गोडी ढेपेच्या आकाराची झालेली नसते, त्याप्रमाणे (गुण व इंद्रिये यात जरी ब्रह्म वस्तु आहे तरी) ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी गुण व इंद्रिये ही खरोखर नाहीत.
902-13
अगा क्षीराचिये दशे । घृत क्षीराकारें असे । परी क्षीरचि नोहे जैसें । कपिध्वजा ॥902॥
हे कपिध्वजा अर्जुना, दुधाच्या अवस्थेमधे तूप हे दुधाच्या आकाराने असते, परंतु ते दूधच जसे तूप नसते.
903-13
तैसें जें इये विकारीं । विकार नोहे अवधारीं । पैं आकारा नाम भोंवरी । येर सोने तें सोनें ॥903॥
त्याप्रमाणे जे ब्रह्म या विकारात आहे, परंतु जे विकार नाही असे समज. (ते कसे तर) ज्याप्रमाणे आकाराला बुगडी हे नाव आहे, बाकी सर्व सोने ते सोनेच आहे.
904-13
इया उघड मऱ्हाटिया । तें वेगळेपण धनंजया । जाण गुण इंद्रियां- । पासोनियां ॥904॥
अर्जुना, या उघड उघड मराठी (सोप्या) भाषेने सांगावयाचे म्हटले म्हणजे, तू गुणेंद्रियांपासून वस्तूचे वेगळेपण समज.
905-13
नामरूपसंबंधु । जातिक्रियाभेदु । हा आकारासीच प्रवादु । वस्तूसि नाहीं ॥995॥
नाम रूप, संबंध, जाति, क्रिया व भेद हे सर्व आकाराला बोलणे आहे, वस्तूला हे बोलणे नाही.

906-13
तें गुण नव्हे कहीं । गुणा तया संबंधु नाहीं । परी तयाच्याचि ठायीं । आभासती ॥906॥
ते ब्रह्म कधी गुण होत नाही, आणि त्याचा व गुणांचा काही एक संबंधही नाही पण गुण हे त्याच्याच ठिकाणी भासतात.
907-13
येतुलेयासाठीं । संभ्रांताच्या पोटीं । ऐसें जाय किरीटी । ना हेंचि धरी ॥907॥
अर्जुना, एवढ्या मुळेच अज्ञानी लोकांच्या पोटात (मनात) असे वाटते की ही वस्तूच गुणाला धारण करते.
908-13
तरी तें गा धरणें ऐसें । अभ्रातें जेवीं आकाशें । कां प्रतिवदन जैसें । आरसेनी ॥908॥
पण अर्जुना, त्या वस्तूचे गुणाला धारण करणे असे आहे की जसे आकाश ढगांना धारण करते अथवा आरसा जसा प्रतिबिंबाला धारण करतो.
909-13
सूर्य प्रतिमंडल । जैसेनि धरी सलिल । कां रश्मिकरीं मृगजळ । धरिजे जेवीं ॥909॥
पाणी जसे सूर्याच्या प्रतिबिंबाला धारण करते, अथवा सूर्याची किरणे जशी मृगजलाला धारण करतात.
910-13
तैसें गा संबंधेंवीण । यया सर्वांतें धरी निर्गुण । येरी तें वायां जाण । मिथ्यादृष्टी ॥910॥
अर्जुना त्याप्रमाणे वास्तविक संबंधावाचून या सर्व विकारांना ते निर्गुण ब्रह्म आधार होते. परंतु विकारास आधार आहे, हेही म्हणणे व्यर्थच आहे, कारण ते भ्रमाच्या कल्पनेचा अंगीकार करून म्हटलेले आहे असे समज.

911-13
आणि यापरी निर्गुणें । गुणाते भोगणे । रंका राज्य करणें । स्वप्नीं जैसें ॥911॥
आणि एखाद्या गरीब दरीद्री पुरुषाने स्वप्नात जसे राज्य करावे, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्माने गुणांचा भोग घेणे होय.
912-13
म्हणौनि गुणाचा संगु । अथवा गुणभोगु । हा निर्गुणी लागु । बोलो नये ॥912॥
म्हणून गुणांचा संबंध अथवा गुणांचा भोग, यांचा निर्गुण ब्रह्माचे ठिकाणी संबंध आहे. हे बोलू नये. किंवा अयोग्य आहे.
बहिरंतश्च भूतानामचरं चरमेव च ।
सूक्षमत्वात्तदविज्ञेयं दूरस्थं चांतिके च तत् ॥13.15॥

भावार्थ ते भूतमात्रांच्या बाहेर आहे, आत आहे, ते अचर आहे, चरही आहे, सूक्ष्मत्वामुळे ते पूर्णपणे जाणण्याला अशक्य आहे, ते दूर आहे, व जवळही आहे.
913-13
जे चराचर भूतां- । माजीं असे पंडुसुता । नाना वन्ही उष्णता । अभेदे जैसी ॥913॥
परब्रह्माचे वर्णन पुढे चालू
अर्जुना, अनेक अग्नीतून जशी एकच उष्णता भेदरहित रूपाने असते, त्याप्रमाने जे ब्रम्ह चराचर भुतांमध्ये असते.
914-13
तैसेनि अविनाशभावे । जे सूक्ष्मदशे आघवे । व्यापूनि असे ते जाणावें । ज्ञेय एथ ॥914॥
ह्या सर्व पदार्थानां सुक्ष्म स्थितीने व्यापुन नित्य अविनाश रुपाने {असंगत्वाने} असते.अशी जी वस्तु येथे ज्ञेय असे समझावे.
915-13
जें एक आंतुबाहेरी । जें एक जवळ दुरी । जें एकवांचूनि परी । दुजी नाहीं ॥915॥
जे एक (चराचरांच्या) आत व बाहेर, जे एक जवळ व दूर आहे, इतकेच नव्हे तर ज्याच्या स्वरुपात कधीही तिळमाञ फरक होत नाही.

916-13
क्षीरसागराची गोडी । माजी बहु थडिये थोडी । हे नाही तया परवडी । पूर्ण जें गा ॥916॥
अर्जुना, क्षीरसमुद्राची गोडी क्षीरसागराच्या मध्यभागी फार गोड व काठाशी थोडी हे प्रकार जसे क्षीरसागराच्या ठिकाणी नाहीत, त्याप्रमाणे ते नित्य सर्व बाजूंनी सारखे आहे.
917-13
स्वेदजादिप्रभृती । वेगळाल्या भूती । जयाचिये अनुस्यूती । खोमणे नाही ॥917॥
स्वेदजादिकरून वेगळाल्या प्राण्यात, ज्याच्या व्याप्तीत न्यूनता नाही. किंवा स्वेदज-अंडज-जारज आणि उद्भिज अशा चारही प्रकारच्या वेगवेगळ्या प्राण्यांत ज्याच्या व्याप्तीस न्युनता नाही
918-13
पैं श्रोते मुखटिळका । घटसहस्रा अनेकां- । माजीं बिंबोनि चंद्रिका । न भेदे जेवीं ॥918॥
हे श्रोत्यांच्या भूषणा अर्जुना, ज्याप्रमाणे कित्येक हजारो घागरींमधे चंद्राचे प्रतिबिंब पडले असताही, चंद्रबिंबास अनेकता येत नाही,
919-13
नाना लवणकणाचिये राशी । क्षारता एकचि जैसी । कां कोडी एकीं ऊसीं । एकचि गोडी ॥919॥
मीठाच्या अनेक कणांच्या ढिगातून जसा एकच खारेपणा असतो, अथवा कोट्यावधी उसात गोडी जशी एकच असते.
अविभक्तं च भूतेषु विभक्तमिव च स्थिंतम ।
भूतभर्तृ च तज्ञेयं ग्रसिष्णु प्रभविष्णु च ॥13.16॥

भावार्थ ते तत्वत: अविभक्त असुनही, तरी भूतांचे ठिकाणी (नाना प्रकारच्या रूपांनी) विभागल्यासारखे आहे. भूतांचे पालन करणारे ते आहे. संहारकाली भूतांचा ग्रास करणारे व निर्माणकाली उत्पन्न करणारे ते आहे, याप्रमाणे जाणावे.
920-13
तैसें अनेकीं भूतजातीं । जे आहे एकी व्याप्ती । विश्वकार्या सुमती । कारण जे गा ॥920॥
परब्रह्मवर्णन पुढे चालू
त्याप्रमाणे अनेक भूतमात्रांमधे जे एकसारखे व्यापून राहिले आहे व हे चांगल्या बुद्धीच्या अर्जुना, जे ब्रह्म विश्व ह्याच कोणी एका कार्याला कारण आहे.

921-13
म्हणौनि हा भूताकारु । जेथोनि तेंचि तया आधारु । कल्लोळा सागरु । जियापरी ॥921॥
म्हणून ज्याप्रमाणे लाटा समुद्रापासून उत्पन्न होतात व त्या लाटांना जसा समुद्रच आधार असतो, त्याप्रमाणे ज्या ब्रह्मापासून हा भूताकार उत्पन्न होतो, तेच ब्रह्म, त्या भूताकाराला आधार आहे.
922-13
बाल्यादि तिन्हीं वयसीं । काया एकचि जैसी । तैसें आदिस्थितिग्रासीं । अखंड जें ॥922॥
बाल्य, तारुण्य व वृद्धावस्था, या तिन्ही अवस्थात शरीर जसे एकच आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्ती, स्थिती व लय या तिन्ही स्थितीत जे ब्रह्म अखंड एकसारखे असते.
923-13
सायंप्रातर्मध्यान । होतां जातां दिनमान । जैसें कां गगन । पालटेना ॥923॥
सायंकाल, प्रात:काल व मध्यान्हकाल, या क्रमाने सबंध दिवसही होत जात असताना जसे आकाश बदलत नाही.
924-13
अगा सृष्टिवेळे प्रियोत्तमा । जया नांव म्हणती ब्रह्मा । व्याप्ति जें विष्णुनामा । पात्र जाहलें ॥924॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, जगाच्या उत्पत्तीकाली ज्याला ब्रह्मदेव असे म्हणतात व व्याप्तिकाली जे विष्णू या नावाला प्राप्त झाले,
925-13
मग आकारु हा हारपे । तेव्हां रुद्र जें म्हणिपे । तेंही गुणत्रय जेव्हां लोपे । तैं जें शून्य ॥925॥
मग जेव्हा हा जगदाकार नाहीसा होतो त्यावेळी ज्यास रुद्र असे म्हणतात व रजसत्वतमादि तीन गुण (उत्पत्ती, स्थिती व लय) ते देखील नाहीसे होतात, त्यावेळेला जे ब्रह्म शून्य (निर्धर्म) होऊन रहाते.

, , , , , , ,
✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading