626-13
एऱ्हवीं बोधा आलेनि ज्ञानें । जरी ज्ञेय न दिसेचि मनें । तरी ज्ञानलाभुही न मने । जाहला सांता ॥626॥
वास्तविक ज्ञानाविषयी मनात समजूत पटली असूनही जर ज्ञानाने जाणण्याच्या वस्तूचा मनाला नीट बोध होत नसेल तर तो ज्ञानाचा लाभ झाला असला तरी देखील आमच्या मनाला नीटसा पटत नाही.
627-13
आंधळेनि हातीं दिवा । घेऊनि काय करावा? । तैसा ज्ञाननिश्चयो आघवा । वायांचि जाय ॥627॥
आंधळ्याने आपल्या हाती दिवा घेऊन त्याचा काय उपयोग करावा? त्याप्रमाणे आपल्यास झालेले ज्ञान जर ज्ञेय दाखवू शकले नाही, तर ते ज्ञेयाचे ज्ञान म्हणून जे काही ते हेच असा ज्याचा निश्चय असतो, त्याचा तो असला निश्चय सर्व व्यर्थच जातो.
628-13
जरि ज्ञानाचेनि प्रकाशें । परतत्त्वीं दिठी न पैसे । ते स्फूर्तीचि असे । अंध होऊनी ॥628॥
जर ज्ञानाच्या प्रकाशाने परमात्म्याचे ठिकाणी बुद्धीचा प्रवेश होत नसेल तर ती बुद्धीच आंधळी होऊन राहिली आहे, असे म्हणावयास हरकत नाही.
629-13
म्हणौनि ज्ञान जेतुलें दावीं । तेतुली वस्तुचि आघवी । तें देखे ऐशी व्हावी । बुद्धि चोख ॥629॥
म्हणून ज्ञान जेवढे दाखवील तेवढे सर्व ज्ञेय वस्तूच असते, परंतु ती ज्ञेय वस्तू पाहील अशी बुद्धी शुद्ध पाहिजे.
630-13
यालागीं ज्ञानें निर्दोखें । दाविलें ज्ञेय देखे । तैसेनि उन्मेखें । आथिला जो ॥630॥
याकरता निर्मळ ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जी पहाते अशा शुद्ध बुद्धीने जो संपन्न आहे.
631-13
जेवढी ज्ञानाची वृद्धी । तेवढीच जयाची बुद्धी । तो ज्ञान हे शब्दीं । करणें न लगे ॥631॥
जेवढा ज्ञानाचा विकास आहे तेवढाच ज्याच्या बुद्धीचा विकास झालेला आहे, तो ज्ञानाचे रूप आहे, हे शब्दाने सांगावयास नको.
632-13
पैं ज्ञानाचिये प्रभेसवें । जयाची मती ज्ञेयीं पावे । तो हातधरणिया शिवे । परतत्त्वातें ॥632॥
एवढेच काय परंतु ज्याच्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश पडल्याबरोबर ज्याची बुद्धी ब्रह्मस्वरूपाला जाऊन भिडते तो परब्रह्माला हातोहात जाऊन भेटतो.
633-13
तोचि ज्ञान हें बोलतां । विस्मो कवण पंडुसुता? । काय सवितयातें सविता । म्हणावें असें? ॥633॥
अर्जुना तोच ज्ञान आहे असे म्हटले तर त्यात आश्चर्य ते काय आहे? सूर्याला सूर्य म्हणावयाला पाहिजे काय?
634-13
तंव श्रोतें म्हणती असो । संगतियेचा अतिसो । ग्रंथोक्ती तेथ आडसो । घालितोसी कां ॥634॥
श्रोत्यांची प्रतिक्रिया
तेव्हा श्रोते म्हणाले, ‘ते राहू दे, त्या पुरुषाचे अतिशय वर्णन करू नकोस. ग्रंथाच्या चाललेल्या विचारात मध्येच खोळंबा का करतोस?
635-13
तुझा हाचि आम्हां थोरु । वक्तृत्वाचा पाहुणेरु । जे ज्ञानविषो फारु । निरोपिला ॥635॥
आत्मज्ञानाचा विषय तू पुष्कळ विस्ताराने सांगितलास, हाच आम्हाला तुझ्या वक्तृत्वाचा मोठा पाहुणचार झाला.
636-13
रसु होआवा अतिमात्रु । हा घेतासि कविमंत्रु । तरी अवंतूनि शत्रु । करितोसि कां गा? ॥636॥
आपल्या व्याख्यानात विषयाचे प्रतिपादन करताना त्याचे पाल्हाळ अतिशय रसभरित करावे ही जी सामान्य कवींची क्लृप्ती, तिचा आश्रय जर केला असता तर तू श्रोत्यास मुद्दाम बोलावून आणून शत्रू केल्याचा दोष केला असतास.
637-13
ठायीं बैसतिये वेळे । जे रससोय घेऊनि पळे । तियेचा येरु वोडव मिळे । कोणा अर्था? ॥637॥
भोजन करण्याच्या पात्रावर बसायच्या वेळी जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदरसत्काराचा काय उपयोग?
638-13
आघवाचि विषयीं भादी । परी सांजवणीं टेंकों नेदी । ते खुरतोडी नुसधी । पोषी कवण? ॥638॥
इतर सर्व गोष्टीत चांगली, परंतु दूध काढण्याच्यावेळी जी कासेखाली बसू देत नाही (खाली बसल्याबरोबर लाथेचा फटकारा मारते), तर अशी ती नुसती लाथाडी गाय कोण पोशील?
639-13
तैसी ज्ञानीं मती न फांके । येर जल्पती नेणों केतुकें । परि तें असो निकें । केलें तुवां ॥639॥
त्याप्रमाणे ज्ञानात बुद्धिविस्तार न पावताना (इतर कवी) ज्ञानावाचून इतर गोष्टींचे किती पाल्हाळ लावतात, ते कळत नाही. परंतु त्यांची गोष्ट राहू दे. तू चांगले केलेस.
640-13
जया ज्ञानलेशोद्देशें । कीजती योगादि सायासें । तें धणीचें आथी तुझिया ऐसें । निरूपण ॥640॥
ज्या ब्रह्मज्ञानाच्या अंशाच्या हेतूने लोक योगादिक कष्ट करतात, त्या ब्रह्मज्ञानाचे पोटभर आणि तुझ्यासारखे रसाळ व्याख्यान आम्हास मिळाल्यावर ते पुरे कसे वाटेल?
641-13
अमृताची सातवांकुडी । लागो कां अनुघडी । सुखाच्या दिवसकोडी । गणिजतु कां ॥641॥
अमृताची झड एकसारखी सात दिवस लागेना का तिचा कंटाळा यावयाचा नाही. दु:खाचे दिवस जसे आपण मोजतो व प्रत्येक दिवस जाता जात नाही, इतका मोठा वाटतो तसे सुखाचे दिवस कोट्यवधी गेले तरी त्यांना कोणी मोजतो का?
642-13
पूर्णचंद्रेंसीं राती । युग एक असोनि पहाती । तरी काय पाहात आहाती । चकोर ते? ॥642॥
पूर्ण चंद्रासह रात्र, एक युगभर न उजाडणारी अशी एकसारखी असली, तरी चकोरांना ती उजाडावी असे वाटेल काय?
643-13
तैसें ज्ञानाचें बोलणें । आणि येणें रसाळपणें । आतां पुरे कोण म्हणे? । आकर्णितां ॥643॥
त्याप्रमाणे ज्ञानाचे व्याख्यान आणि अशा गोडपणाने ते व्याख्यान केलेले आता ते व्याख्यान ऐकताना कोण पुरे म्हणेल?
644-13
आणि सभाग्यु पाहुणा ये । सुभगाचि वाढती होये । तैं सरों नेणें रससोये । ऐसें आथी ॥644॥
आणि भाग्यशाली पाहुणा आला व त्याला भाग्यशालीच स्त्री वाढणारी असली तर त्या वेळेला स्वयंपाकाला संपायचे माहीत नसते असे असते. म्हणजे स्वयंपाक इतका भरपूर केलेला असतो अन्न संपेल अशी कल्पना त्या पाहुण्याच्या आणि त्या वाढणारणीचे मनात येतच नाही अशी स्थिती असते.
645-13
तैसा जाहला प्रसंगु । जे ज्ञानीं आम्हांसि लागु । आणि तुजही अनुरागु । आथि तेथ ॥645॥
तसा हा प्रसंग झाला, कारण की आम्हाला ज्ञानाची प्रीती आहे आणि तुलाही येथे (ज्ञानाचे ठिकाणी) प्रीती आहे.
646-13
म्हणौनि यया वाखाणा- । पासीं से आली चौगुणा । ना म्हणों नयेसि देखणा? । होसी ज्ञानी ॥646॥
म्हणून तुझ्या या ज्ञानाच्या निरूपणाला चौपट स्फूर्ति आली. तू ज्ञानामधे डोळस आहेस, हे नाही म्हणता येत नाही,
647-13
तरी आतां ययावरी । प्रज्ञेच्या माजघरीं । पदें साच करीं । निरूपणीं ॥647॥
तर आता यानंतर तू आपल्या व्याख्यानात बुद्धीचा चांगला विकास करून श्लोकातील पदांचे यथार्थ निरूपण कर.
648-13
या संतवाक्यासरिसें । म्हणितलें निवृत्तिदासें । माझेंही जी ऐसें । मनोगत ॥648॥
ज्ञानेशांचे उत्तर
या संतांच्या आज्ञेबरोबर ‘महाराज, माझाही हेतू असाच आहे’ असे निवृत्तीचे दास ज्ञानदेव यांनी म्हटले.
649-13
यावरी आतां तुम्हीं । आज्ञापिला स्वामी । तरी वायां वाग् मी । वाढों नेदी ॥649॥
माझाही मूळ हेतू असाच होता यावर महाराज मला तुमचाही तसाच हुकूम झाला, तर आता मी व्यर्थ बोलणे वाढू देत नाही.
650-13
एवं इयें अवधारा । ज्ञानलक्षणें अठरा । श्रीकृष्णें धनुर्धरा । निरूपिली ॥650॥
याप्रमाणे ज्ञानाची ही अठरा लक्षणे श्रीकृष्णांनी अर्जुनास सांगितली, ऐका.