सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १२१ ते १४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

अन्तर्यामिणमारभ्य स्थावरान्तेशवादिनः ।
सन्त्यश्वत्थार्कवंशादेः कुलदैवत्वदर्शनात् ॥ १२१ ॥
ह्या प्रकारे अंतर्यामीपासून स्थावरापर्यंत सर्व पदार्थांस ईश्वर मानणारे लोक आहेत. कित्येक लोकांचे अश्वत्थ, कित्येकांचे रुईचे झाड, कित्येकांचे वेळूं हें कुलदैवत असलेले जगात आढळतें ॥ १२१ ॥

तत्त्वनिश्चयकामेन न्यायागमविचारिणाम् ।
एकैव प्रतिपत्तिः स्यात्साप्यत्र स्फुटमुच्यते ॥ १२२ ॥
तत्त्वाचा निश्चय करण्याचे हेतूने न्याय आणि आगम यांच्या आधाराने तत्त्ववेत्त्यांनी ईश्वराविषयी सिद्धांत एकच ठरविला आहे; तो एथे स्पष्ट सांगतो. ॥ १२२ ॥

मायां तु प्रकृतिं विद्यान्मायिनं तु महेश्वरम् ।
अस्यावयवभूतैस्तु व्याप्तं सर्वमिदं जगत् ॥ १२३ ॥
माया हीच प्रकृति (जगाचे उपादान कारण) आहे. आणि ही मायोपाधि ज्याणें धारण केली आहे तोच परमेश्वर (जगाचे निमित्त कारण) होय. आणि याच्या अंशरूपानें सर्व जग व्यापून गेलें आहे. ॥ १२३ ॥

इति श्रुत्यनुसारेण न्यायो निर्णय ईश्वरे ।
तथा सत्यविरोधः स्यात्स्थावरान्तेशवादिनाम् ॥ १२४ ॥
या श्रुतीच्या आधाराने ईश्वराविषयी निर्णय करणे योग्य आहे. असें केल्याने स्थावरापर्यंत ईश्वर मानणारांपैकी कोणाच्याही मतास विरोध येत नाहीं. ॥ १२४॥

माया चेयं तमोरूपा तापनीये तदीरणात् ।
अनुभूतिं तत्र मानं प्रतियज्ञे श्रुतिः स्वयम् ॥ १२५ ॥
ही माया तमोरूप (जड) आहे असें तापनीय उपनिषदांत सांगितलें आहे. याविषयी अनुभूत प्रमाण आहे असें स्वतः श्रुतीच म्हणते. ॥ १२५॥

जडं मोहात्मकं तच्चेत्यनुभावयति श्रुतिः ।
आबालगोपं स्पष्टत्वादानन्त्यं तस्य साब्रवीत् ॥ १२६ ॥
“जड मोहात्मकं तच्च” (तें मायारूप जड आणि मोहात्मक आहे) असें श्रुति अनुभवास आणते. तें बाळगोपाळांच्या अनुभवास आल्यामुळे ती अनंतही आहे असें श्रुति म्हणते. ॥ १२६ ॥

अचिदात्मघटादिनां यत्स्वरूपं जडं हि तत् ।
यत्र कुण्ठीभवेद्बुद्धिः स मोह इति लौकिकाः ॥ १२७ ॥
घटादिक अचेतन पदार्थांचे जें स्वरूप तें जड असें समजावे. आणि जेथे बुद्धि कुंठित होते तोच मोह असे लोक म्हणतात. ॥ १२७ ॥

इत्थं लौकिकदृष्ट्यैतत्सर्वैरप्यनुभूयते ।
युक्तिदृष्ट्या त्वनिर्वाच्यं नासदासीदितिश्रुतेः ॥ १२८ ॥
याप्रमाणे लौकिक दृष्ट्या हें मायारूप सर्वांच्या अनुभवास येते. परंतु युक्तीने पाहिले असतां “नो सदासीत्” या श्रुतीवरून तें अनिर्वाच्य आहे असें ठरतें. म्हणजे तें आहे असेही म्हणता येत नाहीं व नाहीं असेही म्हणतां येत नाहीं. ॥ १२८ ॥

नासदासीद्विभातत्वान्नो सदासीच्च बाधनात् ।
विद्यादृष्ट्या श्रुतं तुच्छं तस्य नित्यनिवृत्तितः ॥ १२९ ॥
तें भासते म्हणून नाहीं म्हणतां येत नाहीं व बाधित होते म्हणून आहे असेही म्हणतां येत नाही. म्हणून ज्ञानदृष्टीने या मायेचे रूप तुच्छ आहे असें श्रुतीनें सांगितलें. कारण, त्याला नेहमी निवृत्ति (नाश) आहे. ॥ १२९ ॥

तुच्छानिर्वचनीया च वास्तवी चेत्यसौ त्रिधा ।
ज्ञेया माया त्रिभिर्बोधैः श्रौतयौक्तिकलौकिकैः ॥ १३० ॥
या प्रकारेंकरून श्रुति युक्ति आणि लौकिक या तीन दृष्टींनी मायेचे रूप तीन प्रकारचे आहे. म्हणजे श्रुतीने ती तुच्छ, युक्तीने ती अनिर्वाच्य आणि व्यवहारदृष्टीने ती खरी. ॥ १३० ॥

अस्य सत्त्वमसत्त्वं च जगतो दर्शयत्यसौ ।
प्रसारणाच्च संकोचाद्यथा चित्रपटस्तथा ॥ १३१ ॥
ज्याप्रमाण चित्रपट गुंडाळण्यानें व तो पसरण्याने चित्राचे नसणे व असणें अनुभवाला येतें, त्याप्रमाणें मायेमुळे जगाचे असणें व नसणे घडते. ॥ १३१ ॥

अस्वतन्त्रा हि माया स्यादप्रतीतेर्विना चितिम् ।
स्वतन्त्रापि तथैव स्यादसङ्गस्यान्यथाकृतेः ॥ १३२ ॥
ब्रह्मावांचून मायेची प्रतीति नाही. म्हणून हिला स्वतंत्र म्हणतां येत नाहीं. बरे असें जर म्हणावे, तर असंग जें ब्रह्म त्याला हिनें ससंग केलें म्हणून परतंत्रही म्हणतां येत नाहीं. ॥ १३२ ॥

कूटस्थासङ्गमात्मानं जडत्त्वेन करोति सा ।
चिदाभासस्वरूपेण जीवेशावपि निर्ममे ॥ १३३ ॥
असंगाची अन्यथा कृति कोणती म्हणाल तर कूटस्थ असंग जो आत्मा त्याला तिनें जगाचे रूप आणलें; आणि चिदाभासरूपाने जीव आणि ईश यांना तिनेंच निर्माण केलें. ॥ १३३ ॥

कूटस्थमनुपाऋत्य करोति जगदादिकम् ।
दुर्घटैकविधायिन्यां मायायां का चमत्कृतिः ॥ १३४ ॥
एवढे जग करूनही तिचा कूटस्थास लवमात्र संपर्क नाहीं. मायेचा स्वभावच दुर्घट रचनेचा आहे. मग तिच्या या कृतीमध्ये नवल ते काय ? ॥ १३४ ॥

द्रवत्वमुदके वह्नावुष्ण्यं काठिन्यमश्मनि ।
मायाया दुर्घटत्वं च स्वतः सिद्ध्यति नान्यथा ॥ १३५ ॥
ज्याप्रमाणें उदकाचा स्वभाव द्रवत्व, अग्नीचा स्वभाव उष्णता, आणि दगडाचा स्वभाव काठिन्य, त्याप्रमाणें दुर्घटत्व हा मायेचा स्वभावच आहे. स्वभावास दुसरें प्रमाण लागत नाहीं. ॥ १३५ ॥

न वेत्ति मायिनं लोको यावत्तावच्चमत्कृतिम् ।
धत्ते मनसि पश्चात्तु मायैषेत्युपशाम्यति ॥ १३६ ॥
जोपर्यंत लोकांनी तिचा स्वभाव जाणला नाहीं तोपर्यंत तिचा चमत्कार त्यांस वाटतो. नंतर ही माया आहे असें समजले की, तत्काळ समाधान होते. ॥ १३६ ॥

प्रसरन्ति हि चोद्यानि जगद्वस्तुत्ववादिषु ।
न चोदनीयं मायायां तस्याच्चोद्यैकरूपतः ॥ १३७ ॥
सृष्टिसंबंधीं शंका, जगाला खरें मानणारे जे नैय्यायिक आहेत त्यांच्यामध्यें मात्र पुष्कळ चालतात. मायावाद्यांपुढें त्यांची लटपट चालत नाहीं. कारण त्यांचे मते मायेचे रूप शंकात्मकच आहे. ॥ १३७ ॥

चोद्येऽपि यदि चोद्यं स्यात्तच्चोद्ये चोद्यते मया ।
परिहार्यं ततश्चोद्यं न पुनः प्रतिचोद्यताम् ॥ १३८ ॥
शंकारूपी माया आहे असें आम्ही म्हटलें, त्याजवरही जर कोणी शंका घेईल तर त्याचे शंकेवर पुनः आम्हीं शंका घेतो. म्हणून शंकेवर शंका घेणे हें योग्य नव्हे. तर शंका घेतल्यावर तिचे निवारणच केलें पाहिजे. ॥ १३८ ॥

विस्मयैकशरीराया मायायाश्चोद्यरूपतः ।
अन्वेष्यः परिहारोऽस्या बुद्धिमद्‌भिः प्रयत्नतः ॥ १३९ ॥
केवळ विस्मयाचीच पुतळी अशी जी माया तिचे रूप शंकामय असल्यामुळें तिचा परिहार काय आहे याचा शोध करण्याविषयी पंडितानी प्रयत्‍न करावा.॥ १३९ ॥

मायात्वमेव निश्चेयमिति चेत्तर्हि निश्चिनु ।
लोकप्रसिद्धमायाया लक्षणं यत्तदीक्ष्यताम् ॥ १४० ॥
ही मायाच आहे असें जर तुमचे मनांत समजावयाचे आहे तर लोकप्रसिद्ध मायेचे लक्षण समजून घेतलें म्हणजे झालें. ॥ १४० ॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *