सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १०१ ते १२०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

महतः परमव्यक्तमिति प्रकृतिरुच्यते ।
श्रुताक्सङ्गता तद्वदसङ्गो हीत्यतः स्फुटा ॥ १०१ ॥
“महतः परमव्यक्तं” हें प्रमाण प्रकृतीविषयी आणि “असंगोहि” हे प्रमाण पुरुषाविषयीं श्रुतीत आहे. ॥ १०१ ॥

चित्सन्निधौ प्रवृत्ताया प्रकृतेर्हि नियामकम् ।
ईश्वरं ब्रुवते योगाः स जीवेभ्यः परः श्रुतः ॥ १०२ ॥
चैतन्याजवळ प्रवृत्त झालेली जी प्रकृति तिचे नियमन करणारा जो त्यास योगी ईश्वर असें म्हणतात. तो परमेश्वर जीवापासून भिन्न आहे, असें श्रुतीत आहे. ॥१० २ ॥

प्रधानक्षेत्रज्ञपतिर्गुणेश इति हि श्रुतिः ।
आरण्यके संभ्रमेण ह्यन्तर्याम्युपपादितः ॥ १०३ ॥
प्रधान ( प्रकृति) व क्षेत्रज्ञ ( जीव) यांचा पति आणि त्रिगुणांचा ईश अशी श्रुति आहे. याप्रमाणेंच आरण्यक उपनिषदांत अंतर्यामीचें उपपादन केलें आहे. ॥ १०३ ॥

अत्रापि कलहायन्ते वादिनः स्वस्वयुक्तिभिः ।
वाक्यान्यपि यथाप्रज्ञं दार्ढ्यायोदाहरन्ति हि ॥ १०४ ॥
याविषयीही वादी आपापल्या युक्ति लढवून कलह करतात, आणि आपला पक्ष दृढ करण्याकरितां यथामति श्रुतिवाक्येंही दाखवितात. ॥ १०४ ॥

क्लेशकर्मविपाकैस्तदाशयैरप्यसंयुतः ।
पुंविशेषो भवेदीशो जीववत्सोऽप्यसङ्गचित् ॥ १०५ ॥
अविद्यादिक क्लेशकर्मांची फळें व कर्माचे संस्कार यांचा ज्याला स्पर्श मुळींच नाहीं असा जो पुरुषविशेष त्याला ईश असें म्हणतात. तो जीवात्म्याप्रमाणें असंग आणि चिद्‌रूप आहे, असें पतंजलि म्हणतात. ॥ १०५ ॥

तथापि पुंविशेषत्वाद्घटतेऽस्य नियन्तृता ।
अव्यवस्थौ बन्धमोक्षावापतेतामिहान्यथा ॥ १०६ ॥
तथापि, हा एक विशेष पुरुष आहे असें श्रुतीने सांगितलें म्हणून त्याला नियंतृता असली पाहिजे. कारण तसें जर न घेतले तर बंधमोक्षांची व्यवस्था होणार नाहीं. ॥ १०६ ॥

भीषास्मादित्येवमादावसङ्गस्य परात्मनः ।
श्रुतं तद्युक्तमप्यस्य क्लेशकर्माद्यसङ्गमात् ॥ १०७ ॥
”भीषास्मात्” इत्यादिक श्रुतीमध्ये असंग परमात्म्याला नितंतृत्व सांगितले आहे. आणि ईश्वर असंग असल्यामुळें क्लेशादिकांचा संभव नाही. यावरून श्रुतिप्रमाण युक्तही दिसते. ॥ १०७ ॥

जीवानामप्यसङ्गत्वात्क्लेशादि न ह्यथापि च ।
विवेकाग्रहतः क्लेशकर्मादि प्रागुदीरितम् ॥ १०८ ॥
तर जीवही असंग आहे म्हणून त्यालाही क्लेशादिक नसावेत असें जर कोणी म्हणेल तर जीवांना तत्त्वज्ञान नसल्यामुळें क्लेशादिक होतात, असें पूर्वीच सांगितलें आहे. ॥ १०८ ॥

नित्यज्ञानप्रयत्नेच्छागुणानीशस्य मन्वते ।
असङ्गस्य नियन्तृत्वमयुक्तमिति तार्किकाः ॥ १०९ ॥
नित्यज्ञान, नित्यप्रयत्‍न, नित्यइच्छा इत्यादिक, गुण ईश्वराला आहेत, म्हणून तो असंग नव्हे. कारण, असंगाला नियंतृत्व अयोग्य आहे असें तार्किक मानितात. ॥ १०९ ॥

पुंविशेषत्वमप्यस्य गुणैरेव न चान्यथा ।
सत्यकामः सत्यसंकल्प इत्यादिश्रुतिर्जगौ ॥ ११० ॥
त्यांचें म्हणणे असें – याला नित्यगुण असल्यामुळें विशेष पुरुष म्हणून जें वर म्हटले तेही योग्य आहे. सत्यकाम सत्यसंकल्प असें श्रुतीत प्रमाण आहेच. ॥ ११० ॥

नित्यज्ञानादिमत्त्वेऽस्य सृष्टिरेव सदा भवेत् ।
हिरण्यगर्भ ईशोऽतो लिङ्गदेहेन संयुतः ॥ १११ ॥
ईश्वराचे ज्ञानादि गुण जर नित्य मानले तर सदा सृष्टीच होईल. म्हणून लिंगदेहाने संयुक्त असा हिरण्यगर्भच आमचा ईश असें कित्येक म्हणतात. ॥ १११ ॥

उद्गीथब्राह्मणे तस्य माहात्म्यमतिविस्तृतम् ।
लिङ्गसत्त्वेऽपि जीवत्वं नास्य कर्माद्यभावतः ॥ ११२ ॥
उद्गीथ ब्राह्मणांत हिरण्यगर्भाचे माहात्म्य विस्तारें करून सांगितलें आहे. लिंग शरीर असल्यामुळें त्याला जीवत्व येईल अशी शंका नको. कारण, अविद्येमुळे होणारी कर्में तीं त्याला संभवत नाहींत. ॥ ११२ ॥

स्थूलदेहं विना लिङ्गदेहो न क्वापि दृश्यते ।
वैराजो देह ईशोऽतः सर्वतो मस्तकादिमान् ॥ ११३ ॥
आता दुसरे मत – स्थूळ देहावाचून लिंगदेह कोठेच दिसत नाहीं. याकरितां सर्वत्र मस्तकें धारण करणारा असा जो विराट पुरुष तोच ईश्वर. ॥ ११३ ॥

सहस्रशीर्षेत्येवं हि विश्वतश्चक्षुरित्यपि ।
श्रुतमित्याहुरनिशं विश्वरूपस्य चिन्तकाः ॥ ११४ ॥
ते विराड्‌उपासक आपल्या मतास “सहस्रशीर्षा” “विश्वतश्चक्षु” इत्यादिक प्रमाणें देतात ॥ ११४ ॥

सर्वतः पाणिपादत्वे कृम्यादेरपि चेशता ।
ततश्चतुर्मुखो देव एवेशो नेतरः पुमान् ॥ ११५ ॥
जिकडून तिकडून हातपाय ज्याला आहेत तो ईश्वर असे मानल्यास कित्येक किड्यांना देखील ईश्वर म्हणावें लागेल. म्हणून चतुर्मुख जो ब्रह्मदेव तोच ईश्वर; त्यावाचून दुसरा पुरुष ईश्वर नाहीं. ॥ ११५ ॥

पुत्रार्थं तमुपासीना एवमाहुः प्रजापतिः ।
प्रजा असृजतेत्यादिश्रुतिश्चोदाहरन्त्यमी ॥ ११६ ॥
हें मत जे लोक पुत्राकरितां उपासना करतात त्यांचें होय. “प्रजापतिः प्रजाः असृजत” इत्यादिक श्रुतीच हे लोक प्रमाणास देतात. ॥ ११६ ॥

विष्णोर्नाभेः समुद्‌भूतो वेधाः कमलजस्ततः ।
विष्णुरेवेश इत्याहुर्लोके भागवता जनाः ॥ ११७ ॥
ब्रह्मदेव विष्णूच्या नाभिकमलापासून उत्पन्न झाला आहे, म्हणून भागवतजन विष्णूच ईश्वर असें म्हणतात. ॥ ११७ ॥

शिवस्य पादावन्वेष्टुं शार्ङ्ग्यशक्तस्ततः शिवः ।
ईशो न विष्णुरित्याहुः शैवा आगममानिनः ॥ ११८ ॥
शंकराचे पाय शोधण्यास विष्णू समर्थ झाला नाहीं. म्हणून शिवच ईश्वर होय, विष्णु नव्हे; असें आगमाला मुख्य मानणारे जे शैव ते म्हणतात. ॥ ११८ ॥

पुरत्रयं सादयितुं विघ्नेशं सोऽप्यपूजयत् ।
विनायकं प्राहुरीशं गाणपत्यमते रताः ॥ ११९ ॥
त्या शिवानेंही त्रिपुराचा नाश करण्याकरतां विघ्नेशाची पूजा केली, म्हणून, गाणपत्य मताला अनुसरणारे विनायकालाच ईश्वर म्हणतात. ॥ ११९ ॥

एवमन्ये स्वस्वपक्षाभिमानेनान्यथान्यथा ।
मन्त्रार्थवादकल्पादीनाश्रित्य प्रतिपेदिरे ॥ १२० ॥
ह्यी प्रकारे दुसरे, आपापली मते, अभिमानानें निरनिराळे मंत्र, अर्थवाद आणि कल्पना यांच्या आधाराने प्रतिपादन करतात. ॥ १२० ॥

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

सार्थ पंचदशी सूची
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *