सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा ओवी २५१ ते २७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, ,

251-9
कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिये तरुवरा । बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं ॥251॥
किंवा फांद्या जरी लहानमोठ्या असल्या तरी त्या एकाच झाडाच्या असतात, अथवा पुष्कळ किरणे दृष्टीस पडली तरी ती जशी एकाच सुर्यापासून निघालेली असतात;
252-9
तेविं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनाना वृत्ती । ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ॥252॥
त्याप्रमाणे अनेक व्यक्ति असून जरी त्यांची नावे व स्वभाव पुष्कळ आहेत, तरी भूतांमध्ये माझे ऐक्य आहे असे जाणतात.
253-9
येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा । जे न भेंदतीं जाणिवा । जाणते म्हणउनि ॥253॥
हे पांडवा, अशा रीतीने सर्व भूतें वेगळी आहेत असे जाणून जे उत्तम असा ज्ञानयज्ञ करतात, व जे जाणते असल्यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या ठिकाणीं भिन्न भाव उरत नाही;
254-9
ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं । तें मीवांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥254॥
किंवा जेव्हां ज्या ठिकाणी ते जी जी वस्तु पाहतात, त्यांत माझ्यावांचून दुसरे कांही नाही असा ज्यांच्या मनाचा निश्चय असतो;
255-9
पाहें पां बुडबुडा जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे । मग विरे अथवा राहे । तऱ्ही जळाचिमाजि ॥255॥
हे पहा, पाण्यावरील बुडबुडा जिकडे जातो, तिकडे पाणी म्हणून त्याला एकच आहे, मग तो नाहीसां झाला अथवा राहिला तरी तो पाण्यांतच असतो;.

256-9
कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले । आणि माघौतें जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥256॥
किंवा वाऱ्याने मातीचे कण उंच उडाले, तरी त्यांना काही पृथ्वीपणावेगळे केले नाही, आणि पुनः जरी ते खाली पडले, तरी ते पृथ्वीवरच;
257-9
तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही न हो अथवा होआवें । परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेलें ॥257॥
त्याचप्रमाणे, पाहिजे तेथे पाहिजे त्या भावनेनें पाहिजेल ते होवो, परंतु ते सर्व ‘ मीच आहे ‘ अशी ज्यांचे मनाची वृत्ति होऊन गेली आहे;
258-9
अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति । तेव्हडीचि तयांचि प्रतीति । ऐसे बहुधाकारीं वर्तती । बहुचि होउनि 258॥
अर्जुना, माझी जेवढी व्याप्ति आहे तेवढा त्यांचा अनुभव आहे; आणि याप्रमाणे पुष्कळ व्यक्तींत जरी ते वागले, तरी ते मद्रूपच झालेले असतात.
259-9
हें भानुबिंब आवडे तया । सन्मुख जैसें धनंजया । तैसें ते विश्वा इया । समोर सदा ॥259॥
हे धनंजया, सुर्यबिंब पाहिजे त्यानें पाहिले असतां त्याच्यासमोरच ते दिसते, त्याप्रमाणे ते ज्ञानी नेहमी जगाच्या समोरच असतात;
260-9
अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना । वायु जैसा गगना । सर्वांगी असे ॥260॥
अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला आंतबाहेर असा भेद नाही. ज्याप्रमाणे वायु हा आकाशांत सर्वत्र भरलेला आहे;

261-9
तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयांचिया सद्भावा । तरी न करितां पांडवा । भजन जहालें ॥261॥
त्याप्रमाणे; मी जेवढा संपुर्ण आहे, तेवढा त्यांच्या सद्भावाच्या मापास उतरतो, म्हणून हे पांडवा, त्यांनी भजन न करिता माझे भजन केल्याप्रमाणे होते.
262-9
एऱ्हवीं तरी सकळ मीचि आहें । तरी कवणीं कें उपासिला नोहें । एथ एकें जाणणेवीण ठाये । अप्राप्तासी ॥262॥
एरव्ही तरी मी सर्वत्र भरलेला आहे; परंतु माझी कोण व कोठे उपासना करीत नाहीत? परंतु एक पूर्ण ज्ञानाशिवाय अज्ञानी जनाला माझी प्राप्ति होत नाही..
263-9
परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते । उपासिती मातें । ते सांगितले ॥263॥
परंतु हे असो; या योग्य ज्ञानयज्ञाने यज्ञ करून जे माझी उपासना करतात; ते भक्त तुला सांगितले..
264-9
अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं । कीं नेणणेयासाठीं मूर्खीं । पविजेचि मातें ॥264॥
सदासर्वकाली जीं जीं कर्मे होतात, ती सर्व बाजूंनी मला सहज पावतात, परंतू हे मुर्खांना समजत नसल्यामुळे मी त्यांना प्राप्त होत नाही.
अहं क्रतुरहं यज्ञ: स्वधाहमहमौषधम् ।
मन्त्रोऽहमहमेवाज्यमहमग्निरहं हुतम्॥9.16॥

265-9
तोचि जाणिवेचा जरी उदय होये । तरी मुदल वेदु मीचि आहें । आणि तो विधानातें जया विये । तो क्रतुही मीचि ॥265॥
तेच ज्ञान झाले असतां, मुख्य वेद मीच आहे, त्यांत विधि-अनुष्ठान जे सांगितले आहे तो ऋतुही मीच.

266-9
मग तया कर्मापासूनि बरवा । जो सांगोपांगु आघवा । यज्ञु प्रगटे पांडवा । तोही मी गा ॥266॥
मग हे पांडवा, त्या यज्ञविधानापासून प्रकट होणारा जो यथाविधि यज्ञ, तोही मीच आहे
267-9
स्वाहा मी स्वधा । सोमादि औषधी विविधा । आज्य मी समिधा । मंत्रु मी हवि ॥267॥
देवांस हवि देण्याचा मंत्र मी, पितरांसही हवि देण्याचा मंत्र मी, सोमवल्ली वैगेरे नानाप्रकारच्या औषधि मी,
268-9
होता मी हवन कीजे । तेथ अग्नि तो स्वरुप माझें । आणि हुतके वस्तू जें जें । तेही मीचि ॥268॥
धृत मी, समिधा मी, मंत्र मी, होमद्रव्य मी, ऋत्विज मी, ज्यांत हवन करावयाचे तो अग्निही माझे स्वरुप आहे, आणि अग्नीत हवन करण्याचा ज्या ज्या वस्तु, त्याही मीच आहे.
पिताहमस्य जगतो माता धाता पितामह: ।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक्साम यजुरेव च॥9.17॥

269-9
पैं जयाचेनि अंगेसंगें । इये प्रकृतीस्तव अष्टांगे । जन्म पाविजत असे जगें । तो पिता मी गा ॥269॥
हे पहा, ज्याच्या अंगसंगाने अष्टांग-प्रकृति ही जगास प्रसवते, तो जगत्पिता मी
270-9
अर्धनारीनटेश्वरीं । जो पुरुष तोचि नारी । तेविं मी चराचरीं । माताही होय ॥270॥
अर्धनारीनटेश्वर स्वरूपांत ज्याप्रमाणे पुरुष तोच स्त्री व स्त्री तोच पुरुष असतो, त्याप्रमाणे स्थावरजंगमाची माताही मी;

271-9
आणि जाहालें जग जेथ राहे । जेंणे जीवित वाढत आहे । तें मीचि वाचूनि नोहे । आन निरुतें ॥271॥
आणि उत्पन्न झालेले जग ज्या ठिकाणीं राहते, व ज्याच्या योगाने प्राणिमात्राचे रक्षण होते ते निःसंशय माझ्याशिवाय होत नाही.
272-9
इयें प्रकृतिपुरुषें दोन्ही । उपजलीं जयाचिया अमनमनीं । तो पितामह त्रिभुवनीं । विश्वाचा मी ॥272॥
प्रकृति व पुरुष ही दोन्ही ज्याच्या अंतःकरपाधिरहित स्वरूपांत म्हणजे निर्गुणांत उत्पन्न होतात, तो या विश्वाचा आजा त्रिभुवनांत मीच.
273-9
आणि आघवेयां जाणणेयांचिया वाटाणो । जया गांवा येती गा सुभटा । वेदांचियां चोहटां । वेद्य जें म्हणिजे ॥273॥
अर्जुना, सर्व ज्ञानाच्या वाटा ज्या गांवात येऊन मिळतात, व चारी वेदांच्या चव्हाट्यावर ज्याला वेद्य असे म्हणतात.
274-9
जेथ नाना मतां बुझावणी आली । एकमेकां शास्त्रांची अनोळखी फिटली । चुकलीं ज्ञानें जेथ मिळों जाहलीं । जे पवित्र म्हणिजे ॥274॥
ज्या ठिकाणीं पुष्कळ प्रकारची मते ऐक्यतेस आली, शास्त्रांची एकमेकांशी ओळख झाली; व चुकलेली ज्ञाने जेथे एकत्र मिळाली, असे जे स्थान, त्याला पवित्र असे म्हणतात.
275-9
पै ब्रह्मबीजा जाहला अंकुरु । घोषध्वनी नादाकारु । तयांचें गा भवन जो ॐकारु । तोही मी गा ॥275॥
हे पहा, ब्रह्मबीजाला परा, पश्यंती, मध्यमा आणी वैखरी या चार वाचा हेच अंकुर फुटल्यावर, त्यांचे मंदीर जो ॐकार, तोही मीच होय.

, ,
1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *