1101-13
उजियेडा आणि अंधारेया । जो पाडु मृता उभेयां । तोचि गा आत्मया । देहा जाण ॥1101॥
उजेड व अंधार यात जे सादृश्य, अथवा मेलेला व जिवंत यात जे सादृश्य तेच सादृश्य आत्मा व देह यामधे आहे असे समज.
1102-13
रात्री आणि दिवसा । कनका आणि कापुसा । अपाडु कां जैसा । तैसाचि हा ॥1102॥
रात्र व दिवस, सोने व कापूस, यामधे जितके असादृश्य आहे तसेच असादृश्य आत्मा व देह यामधे आहे.
1103-13
देह तंव पांचांचें जालें । हें कर्माचें गुणीं गुंथले । भंवतसे चाकीं सूदलें । जन्ममृत्यूच्या ॥1103॥
(देहाचे स्वरूप)
हा देह तर पंचमहाभूतांचा आहे व कर्माच्या दोराने गुंफलेला आहे व जन्ममृत्यूच्या चाकावर घातलेला असून गरगरा फिरत आहे.
1104-13
हें काळानळाच्या तोंडीं । घातली लोणियाची उंडी । माशी पांखु पाखडी । तंव हें सरे ॥1104॥
कालरूपी अग्नीच्या कुंडात हा देह लोण्याचा गोळा घातलेला आहे. व माशी आपले पंख फडकावते तोच (तितक्या कालातच) हा देह नाश पावतो.
1105-13
हें विपायें आगींत पडे । तरी भस्म होऊनि उडे । जाहलें श्वाना वरपडें । तरी ते विष्ठा ॥1105॥
हा देह कदाचित अग्नीत पडला तर राख होऊन उडून जातो व कुत्र्याच्या तावडीत जर हा देह सापडला तर त्याची विष्ठा होते.
1106-13
या चुके दोहीं काजा । तरी होय कृमींचा पुंजा । हा परिणामु कपिध्वजा । कश्मलु गा ॥1106॥
वरील या दोन परिणामाला जर तो चुकला तर तो देह किड्यांचा ढीग होतो. असा हा देहाचा परिणाम अर्जुना वाईट आहे.
1107-13
या देहाची हे दशा । आणि आत्मा तो एथ ऐसा । पैं नित्य सिद्ध आपैसा । अनादिपणें ॥1107॥
(आत्म्याचे स्वरूप)
या देहाची अशी अवस्था आहे आणि आत्मा तर असा आहे की अनादिपणामुळे तो आत्मा स्वभावत: नित्य व सिद्ध आहे.
1108-13
सकळु ना निष्कळु । अक्रियु ना क्रियाशीळु । कृश ना स्थुळु । निर्गुणपणें ॥1108॥
तो आत्मा निर्गुण असल्यामुळे भागसहित नाही अथवा भागरहित नाही. तो कर्मसहित नाही अथवा कर्मरहित नाही. तो रोडका नाही वा लठ्ठही नाही.
1109-13
आभासु ना निराभासु । प्रकाशु ना अप्रकाशु । अल्प ना बहुवसु । अरूपपणें ॥1109॥
तो आत्मा अरूप असल्यामुळे दृश्य नाही अथवा अदृश्यही नाही, तो प्रकाशयुक्त नाही अथवा प्रकाशरहितही नाही, थोडा नाही अथवा पुष्कळ नाही.
1110-13
रिता ना भरितु । रहितु ना सहितु । मूर्तु ना अमूर्तु । शून्यपणें ॥1110॥
तो आत्मा शून्य असल्यामुळे रिकामा नाही अथवा भरलेला नाही. तो कोणत्याही गोष्टीने रहित नाही अथवा कोणत्याही गोष्टीने युक्त नाही. तो प्रगट नाही अथवा अप्रकट नाही.
1111-13
आनंदु ना निरानंदु । एक ना विविधु । मुक्त ना बद्धु । आत्मपणें ॥1111॥
तो आत्मा असल्यामुळे आनंद (सुख) नाही अथवा आनंदरहित (दु:ख) नाही. तो एक नाही अथवा नाना प्रकारचा नाही, तो मुक्त अथवा बद्ध नाही.
1112-13
येतुला ना तेतुला । आइता ना रचिला । बोलता ना उगला । अलक्षपणें ॥1112॥
तो आत्मा कोणास विषय होत नसल्यामुळे इतका नाही, तितका नाही, स्वत:सिद्ध नाही, अथवा तयार केलेला नाही, बोलणारा नाही अथवा मुका नाही.
1113-13
सृष्टीच्या होणा न रचे । सर्वसंहारें न वेंचे । आथी नाथी या दोहींचें । पंचत्व तो ॥1113॥
सृष्टीच्या होण्याबरोबर तो होत नाही अथवा सर्व सृष्टीचा संहार झाला तरी याचा नाश होत नाही. हा आत्मा आहेपणाचे व नाहीपणाचे लयस्थान आहे.
1114-13
मवे ना चर्चे । वाढे ना खांचे । विटे ना वेंचे । अव्ययपणें ॥1114॥
तो आत्मा अव्यय असल्यामुळे तो मोजला जात नाही व त्याचे वर्णन करता येत नाही. तो वाढत नाही अथवा कमी होत नाही. तो विकार पावत नाही अथवा खर्च होत नाही.
1115-13
एवं रूप पैं आत्मा । देहीं जें म्हणती प्रियोत्तमा । तें मठाकारें व्योमा । नाम जैसें ॥1115॥
हे प्रियोत्तमा अर्जुना, अशा प्रकारचा तो आत्मा देहात आहे असे जे म्हणतात, ते म्हणणे मठाच्या आकारात सापडलेल्या आकाशास मठाकाश म्हणण्यासारखे आहे.
1116-13
तैसें तयाचिये अनुस्यूती । होती जाती देहाकृती । तो घे ना सांडी सुमती । जैसा तैसा ॥1116॥
त्याप्रमाणे त्याच्या अखंड असण्यावर देहाचे आकार होतात व जातात, पण अर्जुना, तो आत्मा देहाकृति घेत नाही व टाकीतही नाही, तर जशाचा तसाच असतो.
1117-13
अहोरात्रें जैशी । येती जाती आकाशीं । आत्मसत्तें तैसीं । देहें जाण ॥1117॥
आकाशामधे जसे दिवस व रात्र येतात व जातात त्याप्रमाणे आत्मसत्तेवर देह येतात व जातात असे समज.
1118-13
म्हणौनि इयें शरीरीं । कांहीं करवीं ना करी । आयताही व्यापारीं । सज्ज न होय ॥1118॥
म्हणून या शरीरात आत्मा काही करत नाही व करवीत नाही व सहज घडून येणार्या व्यापाराचे ठिकाणी ‘तो व्यापार मी केला’ असे म्हणत नाही.
1119-13
यालागीं स्वरूपें । उणा पुरा न घेपे । हें असो तो न लिंपे । देहीं देहा ॥1119॥
याकरता तो आत्मा स्वरूपाने उणेपणास व पुरेपणास वश होत नाही. हे असो. तो आत्मा देहाच्या ठिकाणी असून देहाने लिप्त होत नाही.
यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते ।
सर्वत्रावस्थितो देहे तथाऽऽत्मा नोपलिप्यते ॥13.32॥
श्लोकार्थ -: :- ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सूक्ष्मत्वामुळे कोणत्याही वस्तूशी लिप्त होत नाही. त्याप्रमाणे आत्मा सर्व देहामधे स्थित असला तरी लिप्त होत नाही. आत्मा व देह यात फरक आहे.
1120-13
अगा आकाश कें नाहीं? । हें न रिघेचि कवणे ठायीं? । परी कायिसेनि कहीं । गादिजेना जैसे ॥1120॥
अर्जुना, आकाश कोठे नाही? व हे आकाश कोणत्या ठिकाणी प्रवेश करत नाही? परंतु ज्याप्रमाणे ते आकाश कशानेही व कधीही लिप्त होत नाही.
1121-13
तैसा सर्वत्र सर्व देहीं । आत्मा असतुचि असे पाहीं । परि संगदोषें एकेंही । लिप्त नोहे ॥1121॥
तसा आत्मा सर्वत्र सर्व देहात आहेच आहे. (परंतु) पहा तो एकाही संबंधाच्या विकाराने किंवा (संसर्ग-दोषाने) विटाळला जाऊ शकत नाही.
1122-13
पुढतपुढती एथें । हेंचि लक्षण निरुतें । जे जाणावें क्षेत्रज्ञातें । क्षेत्रविहीना ॥1122॥
आत्म्याचे हेच खरे लक्षण आहे, असे वेळोवेळी (वांरवार) जानावे कि क्षेञज्ञ आत्मा या देहात राहुनही क्षेञ हे धर्मरहित आहे.
1123-13
संसर्गें चेष्टिजे लोहें । परी लोह भ्रामकु नोहे । क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे । तेतुला पाडु ॥1123॥
लोहचुंबकाच्या सबंधाने लोखंड हालले जाते.पण लोहचुंबक कधि लोखंडाची जागा घेऊ शकत नाही किंवा लोखंड होऊ शकत नाही तसे क्षेत्रज्ञाच्या सत्तेवर क्षेञाचे व्यवहार होतात;पंरतु क्षेञज्ञ कधिही क्षेञ होऊ शकत नाही.
1124-13
दीपकाची अर्ची । राहाटी वाहे घरींची । परी वेगळीक कोडीची । दीपा आणि घरा ॥1124॥
दिव्याची प्रज्वलित झालेली ज्योत घरातील सर्व व्यवहार चालवते किंवा सर्व घर प्रकाशाने उजळविते.परंतु दिव्याची ज्योत आणि घर यांच्यात स्वभावत: अतिशय वेगळेपणा आहे.
1125-13
पैं काष्ठाच्या पोटीं । वन्हि असे किरीटी । परी काष्ठ नोहे या दृष्टी । पाहिजे हा ॥1125॥
अर्जुना, लाकडाच्या पोटात अग्नी आहे पण अग्नी हा कधी लाकुड होत याप्रमाने क्षेञामध्ये क्षेञज्ञ आहे. पंरतु क्षेञज्ञ कधि क्षेञ होऊ शकत नाही या दृष्टीने देह व आत्मा यातील फरक जाणून घ्यावा.
