सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा ओवी ५१ ते ७५ पहा.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
, , , , , , ,

51-15
अर्जुना हें कवतिक । सांगतां असे अलौकिक । जे वाढी अधोमुख । रुखा यया ॥५१॥
अर्जुना, या संसारवृक्षाचे आश्चर्य सांगावयास लागले तर लोकोत्तर आहे. कारण की या संसारवृक्षाची वाढ खालच्या बाजुस आहे.
52-15
जैसा भानू उंची नेणों कें । रश्मिजाळ तळीं फांके । संसार हें कावरुखें । झाड तैसें ॥५२॥
ज्याप्रमाणे सूर्य आकाशात किती उंच आहे हे कळत नाही, परंतु सुर्याच्या किरणसमुदाय संपुर्ण जग प्रकाशमय करते(यावरुन त्याची अथांगपणा जाणवेल) त्याचप्रमाने हे संसाररुपी वृक्ष वर मुळ आणि खाली शाखा पसरलेल्या असल्यामुळे विचिञ आश्चर्य आहे.
53-15
आणि आथी नाथी तितुकें । रुंधलें असे येणेंचि एकें । कल्पांतींचेनि उदकें । व्योम जैसें ॥५३॥
ज्याप्रमाणे या विक्ष्वामध्ये जेवढ्या वस्तु आहेत, तेवढ्या सर्व वस्तु वृक्षाने व्यापुन टाकलेल्या आहेत. ज्याप्रमाने कल्पातांच्या वेळेस संपुर्ण आकाश पाण्याने व्यापुन टाकले जाते.
54-15
कां रवीच्या अस्तमानीं । आंधारेनि कोंदे रजनी । तैसा हाचि गगनीं । मांडला असे ॥५४॥
अथवा सूर्याचा अस्त झाला म्हणजे जशी रात्र अंधाराने व्यापून जाते, त्याप्रमाणे ह्याच एका वृक्षाने आकाश व्यापले आहे.
55-15
यया फळ ना चुंबितां । फूल ना तुरंबितां । जें कांहीं पंडुसुता । तें रुखुचि हा ॥५५॥
अर्जुना या संसारवृक्षाचे फळ खाण्याकरता पाहवयास गेले तर याला फळ नाही व वास घेण्याकरता फूल पाहयला गेले तर याला फूलही नाही मग जे काही आहे ते हा वृक्षच आहे.


56-15
हा ऊर्ध्वमूळ आहे । परी उन्मूळिला नोहे । येणेंचि हा होये । शाड्वळु गा ॥५६॥
हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे, परंतु हा उपटून पडलेला नाही. या वृक्षाचे मुळ हे परब्रम्ह आहे.याच कारणाने अर्जुना हा संसारवृक्ष नेहेमी हिरवागार आणि टवटवित आहे.
57-15
आणि ऊर्ध्वमूळ ऐसें । निगदिलें कीर असे । परी अधींही असोसें । मूळें यया ॥५७॥
आणि हा संसारवृक्ष वर मूळ असलेला आहे असे सांगितले खरे, परंतु याला खालीही पुष्कळ मुळे आहेत.
58-15
प्रबळला चौमेरी । पिंपळा कां वडाचिया परी । जे पारंबियांमाझारीं । डहाळिया असती ॥५८॥
झपाट्याने वाढणार्‍या लव्हाळ्याच्या गवताप्रमाणे जो आहे, तसाच पिंपळाप्रमाणे अथवा वडाच्या वृक्षाप्रमाणे हा संसाररुपीवृक्ष आहे. कारण की पिंपळाप्रमाणे अथवा वडाप्रमाणे याच्या पारंब्यांमध्ये डहाळ्या आहेत.
59-15
तेवींचि गा धनंजया । संसारतरु यया । अधींचि आथी खांदिया । हेंही नाहीं ॥५९॥
त्याचप्रमाणे अर्जुना ! या संसारवृक्षाला खालीच फांद्या आहेत असेही नाही.
60-15
तरी ऊर्ध्वाहीकडे । शाखांचे मांदोडे । दिसताति अपाडें । सासिन्नलें ॥६०॥
तरी याला वरच्या बाजूसही या संसारवृक्षाला फांद्यांचे पुष्कळ समुदाय विस्तारलेले दिसतात.


61-15
जालें गगनचि पां वेलिये । कां वारा मांडला रुखाचेनि आयें । नाना अवस्थात्रयें । उदयला असे ॥61॥
✏ह्या विशालमय वृक्षाचा विस्तार होण्यासाठी ज्याप्रमाने संपुर्ण आकाश आश्रयभुत कारण असुन संपुर्ण वारा या वृक्षाच्याच सामर्थ्याने वाहत असतो, हा संसाररुपी वृक्ष उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन अवस्थाच्यां रुपाने प्रगट झाला आहे.
62-15
ऐसा हा एकु । विश्वाकार विटंकु । उदयाला जाण रुखु । ऊर्ध्वमूळु ॥62॥
✏असा हा एक वर मूळ असलेला विश्वाकार वृक्ष घनदाट उगवलेला आहे असे समज.
63-15
आतां ऊर्ध्व या कवण । येथें मूळ तें किं लक्षण । कां अधोमुखपण । शाखा कैसिया ॥63॥
✏आता या संसारवृक्षाचा वरचा भाग काय आहे? संसारवृक्षाचे जे मूळ आहे, त्याचे लक्षण कोणते आहे? या वृक्षाच्यां फांद्यानां खाली मुख असणे आणि ते पसरणे, याचे कारण काय आहे? व याच्या फांद्या कशा प्रकारच्या आहेत?
64-15
अथवा द्रुमा यया । अधीं जिया मूळिया । तिया कोण कैसिया । ऊर्ध्व शाखा ॥64॥
✏अथवा या वृक्षाला खाली ज्या मुळ्या आहेत, त्यांचे स्वरुप काय आहे? त्या कोणत्या व वरच्या शाखा कोणत्या व कशा प्रकारच्या आहेत?
65-15
आणि अश्वत्थु हा ऐसी । प्रसिद्धी कायसी । आत्मविदविलासीं । निर्णयो केला ॥65॥
✏आणि याची अश्वत्थ अशी प्रसिद्धी कशाकरता प्रात्त झाली आहे? आणि आत्मज्ञानी लोकांनी या अश्वत्थाबद्दल जो काही निर्णय केला आहे.


66-15
हें आघवेंचि बरवें । तुझिये प्रतीतीसि फावे । तैसेनि सांगों सोलिंवें । विन्यासें गा ॥66॥
✏अर्जुना, या सर्व गोष्टी तुझ्या चांगल्या अनुभवाला किंवा ध्यानात येतील अशा निर्मळ भाषेत विवरण करुन तुला सांगत आहे.
67-15
पंरतु ऐकें गा सुभगा । हा प्रसंगु असे तुमचिजोगा । कानचि करी हो सर्वागां । हिंये आथिलिया ॥67॥
✏परंतु हे भाग्यवान अर्जुना, हे गितारुपी अमृत पिण्यास तुच योग्य आहेस. म्हणुन तुझ्या सर्व इंद्रियाचे कान करुन अंतकरणापासुन ऐक.
68-15
ऐसें प्रेमरसें सुरफुरें । बोलिलें जंव यादववीरें । तंव अवधान अर्जुनाकारें । मूर्त जालें ॥68॥
✏जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रेमरसाच्या अतिशय भराने असे भाषण केले, तेव्हा अर्जुनाच्या आकाराने मृतरुपी अवधान प्रगटले असुन त्यास दाही दिशांनी कवटाळले आहे,
69-15
देव निरूपिती तें थेंकुलें । येवढें श्रोतेपण फांकलें । जैसे आकाशा खेंव पसरिलें । दाही दिशीं ॥69॥
✏ज्याप्रमाणे आकाश जसे विशाल असुन त्यास दाही दिशांनी कवटाळले आहे. त्याप्रमाने श्रीकृष्णाने जे विस्तारपुर्वक निरुपण केले. ते अर्जुनाच्या श्रोतेपणामुळे कमी पडले.
70-15
श्रीकृष्णोक्तिसागरा । हा अगस्तीचि दुसरा । म्हनौनि घोंटु भरों पाहे एकसरा । अवघेयाचा ॥70॥
श्रीकृष्णाच्या विचाररूपी समुद्रास गायब करणारा अर्जुन हा दुसरा अगस्ती ऋषीच उत्पन्न झाला. म्हणून तो श्रीकृष्णाच्या संपूर्ण निरूपणाचा एकदम घोट घेण्यास पाहू लागला.


71-15
ऐसी सोय सांडूनि खवळिली । आवडी अर्जुनीं देवें देखिली । तेथ जालेनि सुखें केली । कुरवंडी तया ॥71॥
श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी श्रवणाविषयी अमर्याद आवड उत्पन्न झालेली पाहिली, तेव्हा त्यास श्रीकृष्णास जे सुख झाले त्या सुखाची त्यांनी अर्जुनावरून ओवाळणी केली
श्रीभगवानुवाच ।
उर्ध्वमूलमधःशाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् ।
छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् ॥15.1॥

*क्ष्लोकार्थ :- श्रीकृष्ण म्हणाले, ज्याचे मूळ उर्ध्वभागी आहे, ज्याच्या शाखा खाली आहेत, जो *विनाशी* आहे, तरी ज्याला अविनाशी असे (सामान्य जन) म्हणतात, वेद ज्याची पाने आहेत, असा जो प्रपंचरूपी वृक्ष, त्याला जाणणारा (या वृक्षाला मूलकारण परम पुरुष असून वृक्षरूपी विस्तार ही माया आहे व त्यापासून वस्तुत: भिन्न नाही असे जाणणारा) तो खरा वेदवेत्ता अथवा ज्ञानी हो संसारावरील वृक्षरूपक भगवंतांनी कशाकरता सांगितले?
72-15
मग म्हणे धनंजया । तें ऊर्ध्व गा तरू यया । येणें रुखेंचि कां जया । ऊर्ध्वता गमे ॥15-72॥
मग भगवान म्हणतात, हे अर्जुना, या संसारवृक्षाला ब्रह्म हे ऊर्ध्व वर आहे आणि ब्रह्माच्या ठिकाणी ऊर्ध्वपणा खाली असलेल्या या संसारवृक्षामुळे वाटत आहे.
73-15
एऱ्हवीं मध्योर्ध्व अध । हे नाहीं जेथ भेद । अद्वयासीं एकवद । जया ठायीं ॥73॥
(ब्रह्म) वास्तविक विचार केला तर ज्या ब्रह्माच्या ठिकाणी वरील मधला व खालचा असे भेद नाहीत, फार काय सांगावे? ज्याच्या ठिकाणी दुसरे नाही अशाविषयी एकवाक्यता आहे.
74-15
जो नाइकिजतां नादु । जो असौरभ्य मकरंदु । जो आंगाथिला आनंदु । सुरतेविण ॥74॥
जो कानाला विषय न होणारा नाद व नाकाने सुवास न घेता येण्यासारखा मकरंद आणि मैथुनादि साधनाशिवाय असलेला मूर्तिमंत आनंद होय.
75-15
जया जें आऱ्हां परौतें । जया जें पुढें मागौतें । दिसतेविण दिसतें । अदृश्य जें ॥75॥
ज्याला जे अलीकडे व पलीकडे आहे, ज्याला जे पुढे व मागे आहे व पहाणार्‍यावाचून जे पहाणे आहे व स्वभावत: इंद्रियांना जे अगोचर आहे.

, , , , , , ,

Sartha Dnyaneshwari Chapter 15th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Pandharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 15 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १५ वा संपूर्ण

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *